ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली असून अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या अत्याधुनिक चाचणीद्वारे आपली सामरिक ताकद सिद्ध केली आहे. ही चाचणी विशेषतः एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्याला एमआयआरव्ही तंत्रज्ञान म्हटले जाते. याद्वारे भारत आता जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. भारताची संरक्षण क्षमता अधिक अभेद्य झाली आहे.
भारताने अलीकडेच ‘एमआयआरव्ही’ अर्थात मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री एन्ट्री व्हेईकल तंत्रज्ञानाने सज्ज प्रगत अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर देशाच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. ओडिशाच्या किनारपट्टीजवळील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आलेल्या या चाचणीने आता एका क्षेपणास्त्रातून अनेक अण्वस्त्रधारी वॉरहेड वेगवेगळ्या लक्ष्यांवर प्रक्षेपित करू शकतात अशा मोजक्या महासत्तांच्या श्रेेणीत भारत अधिक ठामपणे उभा राहत असल्याचे स्पष्ट केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी ‘अग्नी-6’ कार्यक्रमासाठी डीआरडीओ पूर्णपणे तयार असून केवळ सरकारी मंजुरीची प्रतीक्षा आहे, असे म्हटल्याने या चर्चेला आणखी वेग मिळाला आहे.
1980 च्या दशकात तंत्रज्ञानावरील कठोर आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या काळात केवळ ‘तंत्रज्ञान प्रदर्शन प्रकल्प’ म्हणून सुरू झालेला अग्नी कार्यक्रम आज भारताच्या अणू प्रतिरोधक क्षमतेचा मुख्य आधार बनला आहे. अग्नी-1 पासून प्रस्तावित अग्नी-6 पर्यंतचा प्रवास हा भारताच्या बदलत्या सुरक्षा चिंतांचा, वाढत्या तांत्रिक आत्मनिर्भरतेचा आणि व्यापक भूराजकीय महत्त्वाकांक्षांचा आरसा आहे. 1983 मध्ये सुरू झालेल्या ‘इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम’मधून भारताचा हा अग्नी कार्यक्रम आकाराला आला. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाने भारताच्या संरक्षण क्षमतेत क्रांतिकारी बदल घडवून आणला. अविनाश चंदर यांना अग्नी-1 ते अग्नी-5 मालिकेचे मुख्य शिल्पकार मानले जाते, तर ‘मिसाईल वूमन’ म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. टेसी थॉमस यांनी अग्नी-4 आणि अग्नी-5च्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय अवकाश कार्यक्रमातून विकसित झालेल्या एसएलव्ही-3 तंत्रज्ञानाचाही या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मोठा लाभ झाला.
अग्नी कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काळात भारताला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम’मुळे अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर निर्बंध आले; मात्र या निर्बंधांनी भारताचा वेग कमी करण्याऐवजी स्वदेशी संशोधनाला चालना दिली. घन इंधन प्रणाली, कंपोझिट साहित्य, उष्णतारोधक कवच यांसारखी महत्त्वाची तंत्रज्ञाने भारताने स्वतः विकसित केली. 1989 मध्ये पहिल्या अग्नी तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाची यशस्वी चाचणी झाली आणि भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या सामरिक क्षेपणास्त्र युगाची सुरुवात झाली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची कार्यपद्धती अत्यंत गुंतागुंतीची असते. ही क्षेपणास्त्रे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन नंतर प्रचंड वेगाने लक्ष्याकडे झेपावतात. त्यांचे ‘बूस्ट’, ‘मिडकोर्स’ आणि ‘टर्मिनल’ असे तीन टप्पे असतात. ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान विशेषतः मिडकोर्स टप्प्यात कार्यरत होते. क्षेपणास्त्र वातावरणाबाहेर गेल्यानंतर त्यातून अनेक वॉरहेड वेगळे होतात आणि स्वतंत्र लक्ष्यांकडे झेपावतात. त्यामुळे शत्रूच्या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालींवर प्रचंड दबाव निर्माण होतो. एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर प्रहार करण्याची क्षमता ही आधुनिक सामरिक युद्धातील निर्णायक बाब मानली जाते.
कारगिल युद्धानंतर विकसित करण्यात आलेले अग्नी-1 हे भारताचे पहिले प्रभावी सामरिक प्रतिरोधक क्षेपणास्त्र ठरले. सुमारे 700 ते 1200 किलोमीटर पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लक्ष्यांवर जलद प्रहार करण्याची क्षमता भारताला मिळाली. त्यानंतर अग्नी-2मुळे भारताचा पल्ला 2000 ते 3000 किलोमीटरपर्यंत वाढला आणि चीनमधील अनेक भाग भारतीय क्षेपणास्त्रांच्या कक्षेत आले. अग्नी-3 ने अधिक वजनदार अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता दिली, तर ‘रिंग लेसर गायरोस्कोप’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अचूकतेत मोठी वाढ झाली.
अग्नी-4 ने भारतीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला आणखी परिष्कृत स्वरूप दिले. सुमारे 4000 किलोमीटर . पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रामुळे चीनमधील बहुतांश सामरिक लक्ष्यांवर भारतातूनच प्रहार करणे शक्य झाले. कंपोझिट मोटर्स, अत्याधुनिक संगणकीय प्रणाली, अधिक अचूक मार्गदर्शन आणि कमी वजन यामुळे अग्नी-4 हे भारताच्या सर्वाधिक विश्वासार्ह सामरिक शस्त्रांपैकी एक बनले. अग्नी-5ला भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा मुकुटमणी मानले जाते. 5000 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रामुळे बीजिंगसह चीनचा बहुतांश भाग भारताच्या सामरिक कक्षेत आला. तीन टप्प्यांच्या घन इंधन प्रणालीवर आधारित हे क्षेपणास्त्र ‘कॅनिस्टराइज्ड’ लाँचरमधून प्रक्षेपित केले जाते. त्यामुळे ते दीर्घकाळ सुरक्षित स्थितीत सज्ज ठेवणे शक्य होते. अग्नी-5 मुळे भारत ‘आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र’ विकसित करू शकणार्या मोजक्या राष्ट्रांच्या जवळ पोहोचला.
2024 मधील ‘मिशन दिव्यास्त्र’ ही भारताच्या सामरिक क्षमतेतील ऐतिहासिक झेप ठरली. अग्नी-5 प्लॅटफॉर्मवरून एमआयआरव्ही तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेत भारताने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनच्या श्रेणीत प्रवेश केला. एका क्षेपणास्त्रातून अनेक स्वतंत्र वॉरहेड वेगवेगळ्या लक्ष्यांवर प्रक्षेपित करण्याची क्षमता केवळ प्रतिरोधक ताकद वाढवत नाही, तर शत्रूच्या संरक्षण यंत्रणांनाही निष्प्रभ करण्याची क्षमता निर्माण करते. ‘अग्नी प्राईम’ किंवा ‘अग्नी पी हे भारताच्या पुढील पिढीतील मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र मानले जाते. हलकी संरचना, अधिक गतिशीलता, ‘मॅन्युव्हरेबल री एन्ट्री व्हेईकल’ आणि रेल्वेमार्गावरून प्रक्षेपणाची क्षमता यामुळे या प्रणालीचे महत्त्व वाढले आहे. रेल्वेमार्गावरील प्रक्षेपणामुळे क्षेपणास्त्रांचे स्थान शोधणे अधिक कठीण बनते आणि त्यामुळे त्यांची ‘सर्व्हायव्हेबिलिटी’ वाढते.
आता संपूर्ण जगाचे लक्ष अग्नी-6कडे लागले आहे. विविध अहवालांनुसार या क्षेपणास्त्राचा पल्ला 8000 ते 12000 किलोमीटरपर्यंत असू शकतो. त्यात प्रगत एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह पाणबुडीवरून प्रक्षेपणाची क्षमताही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारताची ‘सेकंड स्ट्राईक’ क्षमता आणखी मजबूत होईल. सामरिक भाषेत याचा अर्थ असा की, शत्रूने पहिला अणुहल्ला केला, तरी भारताकडे प्रत्युत्तर देण्याची क्षमता कायम राहील. भारतीय अधिकृत भूमिका कोणत्याही विशिष्ट देशाचा उल्लेख टाळत असली, तरी अग्नी-4, अग्नी-5 आणि संभाव्य अग्नी-6च्या विकासामागे चीन हा केंद्रस्थानी असलेला घटक आहे. पाकिस्तान भारताच्या अल्प आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या कक्षेत आधीपासूनच आहे; मात्र चीनने उभारलेली विशाल क्षेपणास्त्र संरचना, प्रगत ‘डीएफ-41’सारखी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि वाढती अवकाशाधारित निरीक्षण क्षमता यामुळे भारतालाही अधिक सक्षम आणि टिकाऊ प्रतिरोधक व्यवस्था उभारणे अपरिहार्य झाले आहे.
अमेरिका-चीन संघर्ष, पश्चिम आशियातील इराण-अमेरिका तणाव आणि वाढती क्षेपणास्त्र स्पर्धा या पार्श्वभूमीवर आधुनिक युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. भविष्यातील युद्धांमध्ये हायपरसॉनिक शस्त्रे, ड्रोन स्वॉर्म, सायबर हल्ले आणि अवकाशाधारित लक्ष्य प्रणाली निर्णायक ठरणार आहेत. अशा परिस्थितीत गतिशीलता, जलद प्रक्षेपण, एमआयआरव्ही तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली भेदण्याची क्षमता या बाबी अधिक महत्त्वाच्या बनल्या आहेत.
भारताचे ‘नो फर्स्ट यूज’ अणुधोरण विश्वसनीय प्रतिरोधक क्षमतेवर आधारित आहे. भारत प्रथम अणुहल्ला करणार नाही; मात्र शत्रूकडून अणुहल्ला झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भूमिका या धोरणामागे आहे. यासाठी जमिनीवरील अग्नी क्षेपणास्त्रे, विमानांद्वारे प्रक्षेपित होणारी अण्वस्त्रे आणि पाणबुडीवरील अणू प्रणाली अशी त्रिस्तरीय रचना भारताने उभी केली आहे. या त्रिसूत्री व्यवस्थेतील जमिनीवरील सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणजे अग्नी मालिका.
अग्नी कार्यक्रम हा भारताच्या वैज्ञानिक जिद्दीचा, तांत्रिक आत्मनिर्भरतेचा आणि जागतिक सामरिक समीकरणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा साक्षीदार आणि प्रतीक राहिला आहे. 1989 मधील पहिल्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकापासून ते आजच्या एमआयआरव्ही सज्ज प्रगत प्रणालींपर्यंतचा हा प्रवास भारताने निर्बंध, दबाव आणि तांत्रिक अडथळ्यांवर मात करत साध्य केला आहे. त्यामुळे अग्नी-1 ते अग्नी-6 ही मालिका शस्त्रसज्जतेबरोबरच दीर्घकालीन राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक पातळीवरील सामरिक आत्मविश्वासाची उभारणी करणारी आहे.