प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
युद्धशास्त्रामध्ये ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हे सूत्र बहुतेकदा अवलंबले जाते. राजकारणातही या तत्त्वाचा अवलंब होताना दिसतो. त्याच न्यायाने भारताने आता आंतरराष्ट्रीय राजकारणात अफगाणिस्तानातील तालिबान शासनासोबत केलेल्या हातमिळवणीकडे पाहावे लागेल. येणार्या काळात अफगाणिस्तान आणि भारत यांचे मैत्र पाकिस्तानपुढील अडचणी वाढवत जाईल, यात शंका नाही.
भारत आणि अफगानिस्तान या दोन देशांच्या संबंधांची पार्श्वभूमी अतिशय प्राचीन आहे. या दोन संस्कृतींमध्ये धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक द़ृष्टीने प्रगाढ संबंध कायम राहिले आहेत. भारताने अफगाणिस्तानच्या कठीण काळात नेहमीच त्याला आधार दिला आहे. 2021 मध्ये अमेरिकन फौजा माघारी फिरल्यानंतर आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे शासन आल्यानंतरही भारत अफगाण नागरिकांच्या पाठीशी उभा राहिला. ही मानवीय मदत फक्त एका संकटकाळातील सहकार्य नव्हे, तर दोन देशांच्या दीर्घकालीन मित्रत्वाचा आणि सामरिक हितांचा भाग होती. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये स्थायी मित्र किंवा शत्रू असतात असे काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. सर्व राष्ट्रे आपले व्यवहार आणि धोरणे वेळेप्रमाणे आणि परिस्थितीनुसार ठरवतात. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतासाठी अफगाणिस्तान एक सामरिक द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा देश आहे. तालिबानला अनेक देशांनी आतंकी संघटनेची मान्यता दिलेली असली, तरी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय जगाशी संवाद साधून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतापर्यंत फक्त रशियानेच त्यांना मान्यता दिली आहे. भारताने अद्याप तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी हे उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारताच्या दौर्यावर आले होते. या काळात त्यांनी विविध पैलूंवर उपयुक्त चर्चा केली. या सर्व चर्चेच्या आदानप्रदानातून नवे, फलदायी, सुसंवादी आणि सहकारी भागीदारीचे नवे पर्व उदयास आले आहे. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर प्रथमच काबूल येथील भारतीय दूतावासाचे कामकाज पुन्हा नव्याने सुरू होणार आहे, ही सर्वात महत्त्वाची जमेची बाजू होय. त्यामुळे अफगाणिस्तानातील काही कट्टरपंथी पाकवादी गटांना चांगलाच हादरा बसला आहे.
भारताने अफगाणिस्तानला गेल्या काही वर्षांपासून गहू आणि अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. शिवाय, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण भूकंपातही भारत अफगाणिस्तानच्या मदतीला धावून गेला होता आणि हे मदतकार्य पुढेही चालू राहणार आहे; पण आता उभय राष्ट्रांतील संबंधांच्या अनेक नव्या दिशा द़ृष्टिपथात येत आहेत. विकासाच्या आघाडीवर शिक्षण, मनुष्यबळ विकास, क्रीडा आणि सांस्कृतिक हितसंवर्धन तसेच खनिज संपत्तीचा शोध अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत दोन्ही राष्ट्रे परस्पर सहकार्यासाठी जोमाने आणि उत्साहाने पुढे आली आहेत. ही सर्वात मोठी उपलब्धी होय. शेती आणि उद्योग याप्रमाणेच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनवीन संदर्भात विकासाच्या भागीदारी प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न या दौर्यामुळे शक्य झाला आहे, हे उभय राष्ट्रांनी प्रकाशित केलेल्या संयुक्त पत्रकावरून स्पष्ट होते.
आमिर खान यांच्या या दौर्याचे एक मोठे फलित म्हणजे अफगाण परराष्ट्रमंत्र्यांनी आपली भूमी भारतविरोधी कार्यासाठी वापरली जाणार नाही, याबाबत खात्री दिली आहे. तसेच कोणत्याही प्रकारे भारताच्या विरोधात हालचाली करण्यास अफगाणिस्तान मज्जाव करेल, याबाबत दिलेला विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तालिबान सरकारने निषेध केला आहे, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. उभय नेत्यांनी दहशतवाद रोखण्यासाठी समान निर्धार आणि समान प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. ही या दौर्यातील सर्वात मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे.
पाकिस्तान आणि चीन यांची वाढती जवळीक पाहता भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी अफगाणिस्तानाशी संबंध सुधारणे अत्यंत आवश्यक होते. अलीकडे दक्षिण आशियाच्या राजकारणात तालिबान सरकार एकाकी पडले होते. त्यांना आर्थिक, व्यावसायिक आणि व्यापारी मदत करण्यात भारताशिवाय दुसरा कोणताही विश्वासू मित्र नाही. त्यामुळे दक्षिण आशियाच्या राजकारणात एक सक्रिय भागीदार म्हणून अफगाणिस्तानने भारताची निवड केली आहे. गतकालीन अफगाणिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून नेहमीच भारताशी सहकार्य टिकून राहिले आहे. येथील शैक्षणिक विकास असो, क्रीडा विकास असो की सांस्कृतिक विकास असो, या सर्व बाबतीत भारताचे सक्रिय योगदान अफगाण प्रजेच्या समान हितासाठी उपयुक्त ठरले आहे. प्रशासकीय ध्येयधोरणांच्या अंमलबजावणीत भारताचे सहकार्य तालिबानला जागतिक पातळीवर अत्यंत वरदान ठरणार आहे. त्या अर्थाने आमिर खान यांचा हा उच्चस्तरीय दौरा एका नव्या, फलदायी विकासपर्वाची सुरुवात म्हणून महत्त्वाचा आहे.
भारताच्या द़ृष्टीने विचार करता, असे दिसते की, भारताला एक बफर स्टेट म्हणून अफगाणिस्तानचे विशेष महत्त्व आहे. कारण, पाकिस्तानमधील अस्थिरता, अंतर्गत कलह, दंगली आणि कमालीचे अस्थिर राजकारण पाहता शत्रूच्या शेजारचा देश आपला विश्वासू मित्र असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी सात दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. त्यांच्या या भेटीत फारच सावधगिरीने पावले उचलली जाताना दिसली. मुत्ताकी यांच्या भारत प्रवासात उत्तर प्रदेशमधील दारुल उलूम देवबंदसारख्या इस्लामी संस्था, विविध पत्रकार परिषदांमध्ये सहभाग घेणे यांचा समावेश होता. पहिल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश न मिळाल्यामुळे काही वाद निर्माण झाले; परंतु दुसर्या पत्रकार परिषदेत सर्वांनाच आमंत्रित करून योग्य तो न्याय मिळवून देण्यात आला.
मुत्ताकी यांच्या भारत भेटीचा एक महत्त्वाचा परिणाम असा झाला की, भारताने दक्षिण आशियातील पाकिस्तानविरोधी धोरणात एक नवीन कूटनीतिक फायदा मिळविला आहे. अफगाण परराष्ट्रमंत्र्यांनी या दौर्यादरम्यान स्पष्टपणे जम्मू-कश्मीरला भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितल्यामुळे पाकिस्तानला जबर धक्काच बसला. कदाचित त्यामुळेच संतापून पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला; परंतु तालिबान सैन्याने योग्य ती कारवाई करून पाकिस्तानच्या 58 सैनिकांचा बळी घेतला आणि अनेक चौक्यांवर ताबा मिळवला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपले लष्कर परत आणण्याचे आणि सत्ता तालिबानला हस्तांतरित केल्यानंतर संपूर्ण दक्षिण आशियामध्ये भय, आतंक आणि असुरक्षिततेचा वातावरण निर्माण झाले होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता पुन्हा आल्याने चीन आणि पाकिस्तान अत्यंत समाधानी झाले. त्यांना वाटले की, नव्या तालिबान सरकारवर त्यांचा प्रभाव राहील. पाकिस्तानने आशा धरली होती की, तालिबानच्या मदतीने जम्मू-कश्मीरवर ताबा मिळवून शरिया कायदा लागू करू शकतील; परंतु परिस्थिती बदलल्याने पाकिस्तानची ही योजना पूर्णपणे धोक्यात आली. आज भारताचे तालिबानशी संबंध अधिक चांगले झाले आहेत. कारण, भारत फक्तराष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन धोरण आखत आहे.
तालिबान सरकारशी मैत्री साधणे ही केवळ कूटनीतिक किंवा राजनैतिक गरज नाही, तर सामरिक द़ृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. दक्षिण आशियामधील सर्व शेजारी देश सध्या अस्थिरतेत आहेत आणि अशा स्थितीत भारतासाठी एक स्थिर आणि सामरिक द़ृष्टीने महत्त्वाचा भाग तयार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानशी संवाद साधून भारताने एक नवा मार्ग उघडला आहे. दक्षिण आशियातील धोरणात्मक संतुलन राखण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. भूराजनीतिक द़ृष्ट्या भारतासाठी अफगाणिस्तान एक बफर स्टेट असल्याने दोन्ही देशांची भागीदारी संरक्षणात्मक आणि सामरिक द़ृष्टीनेही महत्त्वाची ठरते. पाकिस्तानमधील आंतरिक संघर्ष, सीमावर्ती तणाव आणि प्रादेशिक राजकारण पाहता अफगाणिस्तानमध्ये स्थिरता निर्माण होणे भारताच्या संरक्षणात्मक धोरणासाठी आवश्यक आहे. भारताने अफगाण प्रशासनाला मदत करून शिक्षण, आरोग्य आणि आधारभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून अफगाण सरकारच्या जागतिक मान्यता वाढविण्यात हातभार लावला आहे. अफगाणिस्तानातील बगराम विमानतळाचा कब्जा घेण्याबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेला 11 देशांनी विरोध केला असून त्यात भारतही सहभागी झालेला आहे. त्यामुळे तालिबानशी मैत्री ही एकाच वेळी पाकिस्तान, अमेरिका आणि चीनलाही शह देणारी आहे.