फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीतून दोन्ही देशांनी विशेष जागतिक सामरिक भागीदारीची घोषणा केली. संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश, सागरी सुरक्षा आणि शिक्षण या क्षेत्रांत सहकार्याचा नवा आराखडा ठरला. बहुध्रुवीय जगात विश्वासू मित्र म्हणून भारत-फ्रान्स नाते अधिक बळकट झाले.
जागतिक राजकारणाच्या नकाशावर वेगाने बदल होत असून, अमेरिका-चीन स्पर्धा, युरोपमधील अस्थिरता, पश्चिम आशियातील संघर्ष आणि तंत्रज्ञानातील नव्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रांना आपापले विश्वसनीय सहकारी शोधावे लागत आहेत. अशा अस्थिर जागतिक वातावरणात भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्री ही निव्वळ औपचारिक राजनैतिक संबंधाची बाब उरलेली नाही, तर ती दूरदृष्टीच्या सामरिक भागीदारीत रूपांतरित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या चर्चेनंतर जाहीर झालेली ‘विशेष जागतिक सामरिक भागीदारी’ ही त्याच दिशेने टाकलेली ठोस पाऊल ठरले आहे.
भारत-फ्रान्स संबंधाची मुळे फार खोलवर रुजलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर लवकरच फ्रान्सने भारताशी जवळीक वाढवली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या मोजक्या देशांपैकी फ्रान्स हा एक. 1998 मध्ये भारताने अण्वस्त्र चाचण्या केल्यानंतर जगातील अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले; परंतु फ्रान्सने संतुलित भूमिका घेत संवादाची दारे उघडी ठेवली होती. त्या काळात रोवलेले हे विश्वासाचे बीज आज भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय लिहिणारे ठरले आहे.
सध्याच्या भेटीत दोन्ही देशांनी या नात्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला. ‘विशेष जागतिक सामरिक भागीदारी’ हा शब्दप्रयोग अलंकारिक नसून, याचा अर्थ असा स्पष्ट आहे की, दोन्ही देश जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांवर समन्वयाने भूमिका घेतील, सामरिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतील आणि तिसऱ्या देशांमध्ये संयुक्त प्रकल्प उभारतील. बहुध्रुवीय जगात समान विचारांच्या; परंतु स्वायत्त धोरण असलेल्या दोन राष्ट्रांची ही सांगड आहे. संरक्षण सहकार्य हा या नात्याचा प्रमुख आधार आहे. राफेल लढाऊ विमानांची खरेदी हा त्यातील सर्वात चर्चेत राहिलेला टप्पा. आता या व्यवहारात भारतनिर्मित घटकांचा वाटा वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे.
संरक्षण उत्पादनात स्वदेशीकरणाचा आग्रह भारताने सातत्याने धरला आहे. फ्रान्सनेही तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उत्पादनाच्या दिशेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जेट इंजिन तंत्रज्ञान, नौदल सहकार्य, पाणबुडी विकास, क्षेपणास्त्र प्रणाली यांसारख्या क्षेत्रांत परस्पर विश्वासाची पातळी लक्षणीय आहे. हिंद महासागरातील सागरी सुरक्षेसाठी दोन्ही देश नियमित संयुक्त सराव करतात. भारताच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याला आणि फ्रान्सच्या इंडो-पॅसिफिकमधील भूभागांना जोडणारी ही सुरक्षा साखळी केवळ द्विपक्षीय नसून प्रादेशिक स्थैर्यासाठीही महत्त्वाची आहे. इंडो-पॅसिफिक धोरणात भारत आणि फ्रान्स यांची भूमिका विशेष ठरते. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे या प्रदेशातील संतुलन ढळू नये, यासाठी दोन्ही देश नियमाधारित सागरी व्यवस्थेचा आग्रह धरतात. फ्रान्सकडे रीयुनियन, न्यू कॅलेडोनिया यांसारखे परदेशी भूभाग आहेत. भारत हिंद महासागराचा नैसर्गिक शक्तिकेंद्र आहे. या दोन शक्तींची सहकार्याची संरचना इंडो-पॅसिफिकमध्ये स्थैर्याचा संदेश देते.
तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातही नवे पर्व सुरू होत आहे. एआय प्रभाव शिखर परिषदेत मॅक्रॉन यांनी भारताच्या क्षमतेचे कौतुक करत भारताने जे उभे केले ते इतर कुणालाही शक्य झाले नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, स्वस्त डेटा, मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान स्वीकारणारा समाज आणि स्टार्टअप (नवोद्योग) परिसंस्था यामुळे भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. फ्रान्सकडे उच्च दर्जाचे संशोधन, प्रगत अभियांत्रिकी आणि युरोपीय संघातील तांत्रिक नेटवर्क आहे. या दोन शक्तींची सांगड म्हणजे ज्ञान आणि बाजारपेठ यांचे प्रभावी मिश्रण होय.
2026 हे भारत-फ्रान्स नवकल्पना वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय याच दृष्टीने महत्त्वाचा आहे. संशोधन संस्था, विद्यापीठे, स्टार्टअप्स, औद्योगिक समूह यांच्यात थेट संवाद वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे. फ्रान्सने 2030 पर्यंत 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी देण्याची घोषणा केली आहे. ही केवळ शैक्षणिक देवाणघेवाण नाही, तर भविष्यातील नेतृत्व तयार करण्याची गुंतवणूक आहे. विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिक यांच्यातील संपर्कामुळे दोन्ही समाजांमध्ये परस्पर समज वाढते. ऊर्जा आणि हवामान बदल हा आणखी एक महत्त्वाचा विषय. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची संकल्पना भारत आणि फ्रान्सने संयुक्तपणे पुढे नेली. स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमण, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा सहकार्य, शाश्वत पायाभूत सुविधा या क्षेत्रांतही चर्चा झाली आहे. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा आणि फ्रान्सच्या तांत्रिक कौशल्याची सांगड पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग दाखवू शकते.
अवकाश सहकार्य हे या नात्याचे आणखी एक वैशिष्ट्य. ‘इस्रो’ आणि फ्रान्सची अवकाश संस्था यांच्यात दीर्घकाळापासून सहयोग आहे. उपग्रह प्रक्षेपण, समुद्र निरीक्षण, हवामान अभ्यास, अवकाश तंत्रज्ञानातील संयुक्त संशोधन या क्षेत्रांत दोन्ही देश काम करत आहेत. अवकाश हे पुढील दशकातील सामरिक आणि आर्थिक स्पर्धेचे क्षेत्र ठरणार आहे. त्यामुळे या सहकार्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. आर्थिक संबंधाच्या बाबतीत अजून बरीच क्षमता शिल्लक आहे. फ्रान्स हा युरोपमधील प्रमुख गुंतवणूकदार देशांपैकी एक आहे. पायाभूत सुविधा, परिवहन, शहरी विकास, संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, लक्झरी उद्योग अशा विविध क्षेत्रांत फ्रेंच कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे; परंतु दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत व्यापाराचे प्रमाण मर्यादित आहे. त्यामुळे व्यापार वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. युरोपीय संघ-भारत मुक्त व्यापार कराराच्या चर्चांमध्ये फ्रान्सची सकारात्मक भूमिका भारतासाठी महत्त्वाची ठरू शकते.
या भेटीत बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उल्लेख वारंवार झाला. भारत आणि फ्रान्स दोघेही कोणत्याही एकाच महासत्तेच्या वर्चस्वाखाली जाण्यास तयार नाहीत. धोरणात्मक स्वायत्तता ही दोघांची समान भूमिका आहे. रशिया-युक्रेन संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील अस्थिरता, दोन्ही देश संवाद आणि संतुलित भूमिकेचा पुरस्कार करतात. संयुक्त राष्ट्रसंघातील सुधारणा, जागतिक दक्षिणेचा आवाज, दहशतवादविरोधी कारवाई, सायबर सुरक्षा या विषयांवरही सहमती दिसते.
भारतातील अंतर्गत क्षमतांचा फ्रान्सने केलेला गौरव हा कूटनीतिक शिष्टाचाराच्या पलीकडील आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत रचना, मोठ्या प्रमाणावरील कल्याणकारी योजना, वित्तीय समावेशन, उत्पादन क्षेत्रातील वाढ आणि लोकसंख्येचा तरुण घटक या सर्व बाबी भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत नवे स्थान देत आहेत. फ्रान्ससारख्या प्रगत देशाला भारत हा भागीदार म्हणून हवा आहे, हेच या भेटीचे मोठे यश मानावे लागेल.
या संबंधांना भावनिक ओलावाही आहे. पाँडिचेरीसारखा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक देवाणघेवाण, कला आणि साहित्य यामुळे दोन्ही समाजांमध्ये एक वेगळी जवळीक आहे. फ्रेंच भाषा शिकणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत आहे, तर योग, भारतीय तत्त्वज्ञान आणि चित्रपट यांना फ्रान्समध्ये चांगला प्रतिसाद आहे. सांस्कृतिक पूल मजबूत असेल, तर राजकीय आणि आर्थिक सहकार्याला नैसर्गिक आधार मिळतो. तथापि, या मैत्रीचे मूल्यमापन करताना वास्तववादी दृष्टी आवश्यक आहे. जागतिक राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात, तर कायमस्वरूपी हितसंबंध असतात.
भारतानेही या नात्याकडे धोरणात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. संरक्षण व्यवहारात स्वदेशीकरणाचा आग्रह, तंत्रज्ञान हस्तांतरणाची स्पष्ट अट, गुंतवणुकीत समतोल, व्यापारातील अडथळे दूर करणे आणि तिसऱ्या देशांतील संयुक्त प्रकल्पांमध्ये भारताचा योग्य वाटा सुनिश्चित करणे हे सर्व मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत. फ्रान्सलादेखील भारताच्या बाजारपेठेची आणि सामरिक स्थानाची जाणीव आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी परस्पर सन्मान आणि पारदर्शकतेने सहकार्य पुढे नेले, तर ही भागीदारी दीर्घकाळ टिकेल. विशेष जागतिक सामरिक भागीदारीची घोषणा ही सुरुवात आहे. खरी कसोटी अंमलबजावणीत आहे.
आज जग एका संक्रमणाच्या टप्प्यावर उभे आहे. जुने गटबाजीचे राजकारण मोडत आहे आणि नव्या संधी निर्माण होत आहेत. अशा वेळी भारत-फ्रान्स मैत्री ही स्थैर्य, स्वायत्तता आणि नवकल्पनेचा संगम ठरू शकते. विश्वास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि मानवी मूल्ये या चौकटीत उभे असलेले हे नाते बहुध्रुवीय जगात संतुलनाचा आधारस्तंभ बनू शकते. मॅक्रॉन यांच्या भारत भेटीने या नात्याला नवे परिमाण दिले आहे. आता पुढील दशक भारत आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांसाठी कसोटीचे असेल. घोषणांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रकल्प, संयुक्त संशोधन, उत्पादन आणि जागतिक मंचावर समन्वित भूमिका यातूनच या मैत्रीचे खरे मोल सिद्ध होईल.
भारत जागतिक पातळीवर उभारी घेत असताना फ्रान्ससारखा स्वायत्त आणि प्रगत भागीदार सोबत असणे हे निश्चितच आश्वासक आहे. बहुध्रुवीय जगात विश्वासार्ह मित्रांची किंमत वाढत जाते. भारत-फ्रान्स मैत्री ही त्या विश्वासाची, परस्पर आदराची आणि दीर्घकालीन सामरिक दूरदृष्टीची जाणीव करून देणारी नवी पर्वणी ठरली आहे, असे म्हटले तर त्यात काहीही चुकीचे ठरणार नाही.