Venezuela | संकटमोचक व्हेनेझुएला 
बहार

Venezuela | संकटमोचक व्हेनेझुएला

पुढारी वृत्तसेवा

व्ही. के. कौर

तेलसंपन्न आखाती देशांच्या परिघाबाहेर असणारा व्हेनेझुएला हा देश अलीकडील काळात भारतासाठी संकटमोचक ठरला आहे. भारताला ऊर्जा पुरवठ्याच्या स्रोतांमध्ये वैविध्य आणावयाचे आहे, तर व्हेनेझुएलाला स्थिर आणि मोठी बाजारपेठ हवी आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परपूरक ठरतात. मे २०२६ मध्ये भारताने व्हेनेझुएलाकडून सुमारे ४.१७ ते ४.२७ लाख बॅरेल प्रतिदिन इतके तेल आयात केले. सौदी अरेबिया आणि अमेरिकेकडून होणार्‍या आयातीपेक्षाही ही तेल आयात जास्त ठरली. अलीकडेच व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांनी भारताला दिलेली भेट ही ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात काही संबंध सतत चर्चेत राहतात, तर काही संबंध प्रकाशझोतात नसतानाही दीर्घकालीन परिणाम घडवून आणत असतात. भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध हे दुसर्‍या प्रकारातील मानावे लागतील. दोन्ही देशांमधील संबंधांनी कधी मोठ्या मथळ्यांमध्ये स्थान मिळवले नाही; परंतु गेल्या काही वर्षांतील घडामोडी पाहिल्यास ही भागीदारी सातत्याने अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसते. विशेषतः ऊर्जा सुरक्षेच्या बदलत्या समीकरणांमध्ये आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर या संबंधांचे महत्त्व अधिक वाढले आहे.

अलीकडे व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांनी भारताला दिलेली भेट याच दृष्टीने महत्त्वाची ठरते. ही त्यांची भारतातील सहावी भेट होती. एखाद्या देशाचा सर्वोच्च नेता पुन्हा पुन्हा एखाद्या देशाला भेट देतो, यामागे दीर्घकालीन हितसंबंध निर्माण करण्याचे आणि परस्पर सहकार्याचे बंध घट्ट करण्याचे उद्दिष्ट असते. डेल्सी रोड्रिग्ज यांच्या भेटीत व्हेनेझुएलाचे परराष्ट्र, अर्थ, विज्ञान-तंत्रज्ञान, दळणवळण आणि वाहतूक मंत्रालयांचे मंत्रीही उपस्थित होते. त्यामुळे हा केवळ सदिच्छा दौरा नव्हता, तर विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या शक्यता तपासण्याचा गंभीर प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंधांचा सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे ऊर्जा क्षेत्र. भारत जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा आयातदारांपैकी एक आहे. देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे ९० टक्के गरज आयातीद्वारे भागवली जाते. अनेक दशकांपासून भारताची तेल आयात मुख्यतः पश्चिम आशियातील देशांवर अवलंबून राहिली आहे; मात्र अलीकडील संघर्ष, सामुद्रधुनींवरील तणाव आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांनी या अवलंबित्वातील जोखीम अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलाचे महत्त्व पुन्हा वाढले. जगातील सर्वांत मोठ्या तेलसाठ्यांपैकी काही साठे व्हेनेझुएलाकडे आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे अनेक वर्षे हा देश जागतिक ऊर्जा बाजाराच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला. भारतानेही काही काळ सावध भूमिका घेतली होती; परंतु बदलत्या परिस्थितीत भारताने पुन्हा व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी वाढवली. मे २०२६ मध्ये व्हेनेझुएला हा भारताचा तिसरा सर्वांत मोठा कच्चे तेल पुरवठादार ठरला. आजपासून सुमारे ५८ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी व्हेनेझुएलाची राजधानी काराकस या ऐतिहासिक शहराला भेट दिली होती. त्या काळात कदाचित कोणी विचारही केला नसेल की, हा देश भविष्यात भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी इतका महत्त्वाचा आणि धोरणात्मक भागीदार बनेल.

भारताला ऊर्जापुरवठ्याच्या स्रोतांमध्ये वैविध्य आणावयाचे आहे, तर व्हेनेझुएलाला स्थिर आणि मोठी बाजारपेठ हवी आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परपूरक ठरतात. जागतिक राजकारणात अनेकदा विचारसरणीपेक्षा राष्ट्रीय हितसंबंध अधिक महत्त्वाचे ठरतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी विदेश या कंपनीने २००८ पासून व्हेनेझुएलामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत सुमारे ८०० दशलक्ष डॉलर्सच्या आसपासची गुंतवणूक विविध तेल क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. तथापि, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकटे आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे या गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळालेले नाहीत. उलट सुमारे ६०० दशलक्ष डॉलर्सचे लाभांश अद्यापही प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. तरीदेखील भारताने या संबंधांमधून माघार घेतलेली नाही. यामागे दूरगामी विचार आहे. ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक ही अनेकदा दशकांच्या कालावधीत फळ देणारी असते. व्हेनेझुएलातील प्रचंड तेलसाठे लक्षात घेता भविष्यातील संधी भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे अल्पकालीन अडचणी असूनही भारताने आपली उपस्थिती कायम ठेवली आहे.

या संबंधांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, अमेरिकेची भूमिका. व्हेनेझुएलावर अमेरिकेने दीर्घकाळ निर्बंध लादले होते. अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाकडून तेल किंवा वायू खरेदी करणार्‍या देशांवर अतिरिक्त शुल्क लावण्याची धमकीही दिली होती. अशा स्थितीतही भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील उच्चस्तरीय संवाद सुरू राहणे हे महत्त्वाचे आहे. भारत आपले राष्ट्रीय हित लक्षात घेऊन स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम असल्याचा संदेश यातून दिला गेला आहे. मध्यंतरी अमेरिकेने या देशावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर भारताने तेलाची आयात वाढवली. कारण, यामुळे भारताला मध्यपूर्वेवरील अवलंबित्व कमी करण्याची अतिरिक्त संधी मिळाली. व्हेनेझुएला भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्चे तेल पुरवठादार बनला. मे २०२६ मध्ये भारताने व्हेनेझुएलाकडून सुमारे ४.१७ ते ४.२७ लाख बॅरेल प्रतिदिन इतके तेल आयात केले. सौदी अरेबिया आणि अमेरिकेकडून होणार्‍या आयातीपेक्षाही ही तेल आयात जास्त ठरली.

भारतीय परराष्ट्र धोरणातील हा एक व्यापक बदल मानला जातो. शीतयुद्धोत्तर काळात भारताने बहुध्रुवीय जगाच्या संकल्पनेला सातत्याने पाठिंबा दिला आहे. कोणत्याही एका महासत्तेवर अवलंबून न राहता विविध देशांशी संतुलित संबंध राखण्याचा प्रयत्न भारत करीत आहे. व्हेनेझुएलासोबतचे संबंध याच दृष्टिकोनाचा भाग म्हणून पाहिले जाऊ शकतात. तथापि, भारत-व्हेनेझुएला संबंध केवळ तेलाभोवती फिरत नाहीत. अलीकडील चर्चांमध्ये औषधनिर्मिती, आयुष, डिजिटल तंत्रज्ञान, वाहतूक, वाहन उद्योग आणि सांस्कृतिक सहकार्य अशा अनेक विषयांचा समावेश होता. व्हेनेझुएला अनेक वर्षांपासून आरोग्यसेवा आणि औषधांच्या उपलब्धतेच्या समस्यांना सामोरे जात आहे. जगातील सर्वात मोठ्या जेनेरिक औषध उत्पादक देशांपैकी एक असलेल्या भारतासाठी येथे मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे भारताने विकसित केलेली डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था आज अनेक विकसनशील देशांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. आधार, यूपीआय आणि डिजिटल सेवा वितरणाच्या भारतीय अनुभवाचा अभ्यास करण्याची उत्सुकता अनेक देशांनी दाखवली आहे. व्हेनेझुएलाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे भविष्यात डिजिटल सहकार्याचे नवे मार्ग खुले होऊ शकतात.

या संबंधांचा आणखी एक व्यापक अर्थ आहे. भारत आणि व्हेनेझुएला हे दोन्ही देश स्वतःला ग्लोबल साऊथचा भाग मानतात. विकसनशील देशांच्या हितसंबंधांना आंतरराष्ट्रीय मंचांवर अधिक प्रभावीपणे मांडण्याची गरज दोघांनाही वाटते. त्यामुळे ऊर्जा आणि व्यापाराच्या पलीकडेही या संबंधांना राजनैतिक महत्त्व प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतिहासात काही भागीदार्‍या अचानक निर्माण होत नाहीत. त्या हळूहळू, सातत्याने आणि परस्पर विश्वासाच्या आधारावर विकसित होतात. भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध आज अशाच टप्प्यावर पोहोचलेले दिसतात. एकीकडे ऊर्जा सुरक्षेची गरज, दुसरीकडे आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याच्या संधी आणि त्यासोबत ‘ग्लोबल साऊथ’मधील सहकार्याची सामायिक भूमिका यामुळे ही भागीदारी अधिक व्यापक होत आहे.

भविष्यात या संबंधांचे स्वरूप किती विस्तारेल, हे अनेक घटकांवर अवलंबून असेल. जागतिक ऊर्जा बाजारातील बदल, अमेरिकेची धोरणे, व्हेनेझुएलातील अंतर्गत परिस्थिती आणि भारताच्या आर्थिक गरजा यांचा त्यावर परिणाम होईल; परंतु एक गोष्ट निश्चित आहे. जगाचे लक्ष नसतानाही भारत आणि व्हेनेझुएला यांच्यात शांतपणे उभी राहत असलेली ही भागीदारी आगामी काळात अधिक महत्त्वाची ठरू शकते. कधीकधी आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वांत प्रभावी घडामोडी या गाजावाजा न करता घडत असतात. भारत-व्हेनेझुएला संबंध हे त्याचेच एक उदाहरण मानावे लागेल. रशिया, मध्यपूर्व आणि व्हेनेझुएला या तिन्ही दिशांनी पुरवठा ठेवून भारत भविष्यातील कोणत्याही जागतिक संकटासाठी स्वतःला तयार करत आहे.

व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे सिद्ध तेलसाठे आहेत. त्यामुळे भारतासाठी हा केवळ अल्पकालीन पुरवठादार नाही, तर पुढील अनेक दशकांसाठी ऊर्जा भागीदार ठरू शकतो. व्हेनेझुएलाचे तेल हे हेवी क्रूड असल्यामुळे ते ब्रेंटच्या तुलनेत सवलतीच्या दरात मिळते. व्हेनेझुएलाकडे तेलाचा महासागर असला, तरी ते तेल सहज वाहणारे नाही. आपल्याकडील जड तेल उपसण्यासाठी आणि ते विकण्यायोग्य बनवण्यासाठी व्हेनेझुएलाला आधी इतर देशांकडून नॅफ्थासारखे हलके हायड्रोकार्बन आयात करावे लागतात. हे हलके हायड्रोकार्बन जड तेलात मिसळल्याशिवाय ते पाईपलाईनमधून वाहू शकत नाही. विशेष म्हणजे, भारत ही सध्या जगातील एक अग्रगण्य आणि सर्वात मोठी रिफायनिंग शक्ती असून आपल्याकडे दरवर्षी कोट्यवधी टन नॅफ्थाचे उत्पादन केले जाते. गुजरात, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये असलेल्या देशातील अजस्र रिफायनरी स्थानिक गरजा पूर्ण करूनही मोठ्या प्रमाणावर नॅफ्थाची निर्यात करण्यासाठी सक्षम आहेत. यामुळे भारत हा व्हेनेझुएलासाठी तेल उद्योगातील सर्वात मोठ्या समस्येचे निवारण करू शकणारा एक अत्यंत महत्त्वाचा व्यावसायिक भागीदार ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT