England vs India | हिप हिप हुर्रेऽऽ Pudhari File Photo
बहार

England vs India | हिप हिप हुर्रेऽऽ

‘टीम शुभमन’ने केलेला पराक्रम क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल

पुढारी वृत्तसेवा

सुभाष वैद्य

इंग्लंडच्या अवघड-अनवट खेळपट्ट्यांवर ‘टीम शुभमन’ने केलेला पराक्रम क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. 21 शतके, 7,187 एकूण धावा, 19 शतकी भागीदार्‍या, तब्बल 9 फलंदाजांनी केलेल्या 400 हून अधिक धावा अशा अनेक वैशिष्ट्यांनी या मालिकेवर भारताने आपला अमीट ठसा उमटवला.

भारतीय कसोटी क्रिकेट संघासाठी सध्याचा काळ संक्रमणावस्थेचा मानला जात होता. कारण, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा या भारताच्या खंद्या फलंदाजांच्या विरामानंतर भारतीय संघामध्ये नवोदित किंवा तुलनेने कमी अनुभवी असणार्‍या खेळाडूंच्या खांद्यावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याची धुरा आली होती. मुळातच कसोटी क्रिकेट या क्रीडा प्रकाराला अलीकडच्या काळात काहीशी उतरती कळा लागल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. कारण, सध्याच्या जनरेशनला सतत हवे असणारे थ्रील या तुलनेने संथ गतीने खेळल्या जाणार्‍या सामन्यांमध्ये पाहायला मिळत नाही. प्रत्यक्षात कसोटी क्रिकेटचे क्रिकेटपटूंच्या जडणघडणीतील स्थान अनन्यसाधारण आहे; पण सध्याचा काळ हा धावांची बरसात करणार्‍या आणि धडाधड विकेट उडवून सहा तासांत थराराची अनुभूती देणार्‍या टी-20चा आहे. अशा काळात इंग्लंडमधील अवघड आणि अनवट मैदानांवर शुभमनच्या ‘टीम इंडिया’ने केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे ही मालिका भारतासाठी इतिहास घडवणारी ठरली. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधत भारताने इंग्लंडच्या भूमीवर सलग दुसर्‍यांदा मालिका न गमावण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे, अखेरच्या ओव्हल टेस्टमध्ये केवळ 6 धावांनी विजय मिळवत भारताने आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावांनी मिळालेल्या विजयाची नोंद केली. या विजयामध्ये अनेक बाबी निर्णायक ठरल्या. शुभमन गिलचे तरुण नेतृत्व, मोहम्मद सिराजचा भेदक मारा, के. एल. राहुलची अनुभवसंपन्न फलंदाजी आणि रवींद्र जडेजाची सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरी यामुळे ही मालिका ‘न भूतो...’ अशी ठरली.

खरे पाहता सुरुवातीला ही मालिका भारतासाठी अवघड जाणार, हा बहुतेकांचा कयास खरा ठरण्याच्या दिशेने जात होती. पहिल्या सामन्यात लीडस् येथे भारताने हार पत्करली. दुसर्‍या टेस्टमध्ये एजबेस्टनवर गिलच्या नेतृत्वाखाली भारताने जबरदस्त पुनरागमन करत मालिका बरोबरीत आणली; पण लॉर्डस्वर पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला, तर चौथ्या कसोटीमध्ये मँचेस्टरमध्ये सामना अनिर्णित राहिला. अशा स्थितीत ओव्हलच्या मैदानावरील मालिकेचा अंतिम सामना जिंकणे भारतासाठी अनिवार्य होते. तशातच या सामन्यात जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती होती; पण ‘टीम शुभमन’नेे हा सामना रोमहर्षकपणे जिंकून संपूर्ण क्रिकेटविश्वाला चकित केले. ही कसोटी मालिका ही टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वाधिक धावांची मालिका ठरली आहे. दोन्ही संघांनी मिळून 14 वेळा 300 हून अधिक धावा केल्या असून तब्बल 9 फलंदाजांनी 400 हून अधिक धावा केल्या. शुभमन गिल (754), रूट (537), राहुल (532), जडेजा (516), ब्रूक (481), पंत (479), डकेट (462), जेमी स्मिथ (434) आणि यशस्वी (411) यांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या. 50 हून अधिक अर्धशतके, 21 शतके, 19 वेळा शंभराहून अधिक धावांची भागीदारी यांसह अनेक वैशिष्ट्यांनी ही मालिका जगभरात प्रचंड गाजली.

शुभमन गिलने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पूर्ण वेळ कप्तानपदाची धुरा सांभाळली. त्याचा द़ृष्टिकोन आक्रमक; पण सखोल आणि सुबक होता. गिलने केवळ नेतृत्वच नाही, तर फलंदाजीतही जबरदस्त प्रदर्शन केले. 10 डावांत 75.40 च्या सरासरीने 754 धावा करत तो मालिकेतील सर्वोच्च धावा काढणारा खेळाडू ठरला. त्याने चार शतके ठोकली. यापैकी एजबेस्टनवरील शतकाचे रूपांतर त्याने द्विशतकात केले. त्याच्या या जबरदस्त खेळीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ हा किताबही मिळाला. जसप्रीत बुमराह तीनच सामने खेळून मालिकेतून बाहेर पडल्याने मोहम्मद सिराजवर खूप मोठी जबाबदारी होती; पण त्याने ती अत्यंत सन्मानाने निभावली. संपूर्ण मालिकेत 23 बळी घेत त्याने कारकिर्दीतील सर्वांत सुरेख कामगिरी केली. सिराजने इंग्लंडच्या भूमीवर एका कसोटी मालिकेत 23 बळी घेत बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी केली. 2021-22 मध्ये बुमराहनेही 23 बळी घेत धमाका उडवून दिला होता. अखेरच्या ओव्हल टेस्टमध्ये दुसर्‍या डावात सिराजने 5 बळी घेतले आणि इंग्लंडचा अखेरचा फलंदाज झटपट बाद करत सामना भारताच्या खिशात टाकला. सिराजने इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणार्‍या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. यावेळी शमीचा इंग्लंड दौर्‍यासाठी समावेश करण्यात आलेला नव्हता अन्यथा त्यांचा आकडा वाढला असता. त्याने 14 कसोटींमध्ये 25 डावांत 40.50 च्या सरासरीने 42 बळी घेतले आहेत; मात्र एकाही डावात पाच बळी मिळवलेले नाहीत. कपिल देव यांनी 13 कसोटींत 22 डावांत 39.18 च्या सरासरीने 43 बळी घेतले. त्यांनी दोन वेळा डावात पाच बळी घेतले आहेत. सिराजने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 11 कसोटी सामने खेळून 20 डावांत 46 बळी घेतले आहेत. यामध्ये याच मालिकेत दोन वेळा पाच बळी घेतले आहेत.

या मालिकेत रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर के. एल. राहुलला पुन्हा सलामीवीर म्हणून संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. 53.20 च्या सरासरीने 532 धावा करत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली. इंग्लंडच्या स्विंगिंग खेळपट्ट्यांवर नवा चेंडू खेळताना त्याने दाखवलेला संयम आणि अनुभवीपणाचे दर्शन अप्रतिम होते. राहुलच्या शांत फलंदाजीने मधल्या फळीतल्या खेळाडूंना मोठे स्कोअर उभारण्यासाठी मोकळीक मिळाली. या मालिकेत रवींद्र जडेजाने आपली भूमिका बदलत गोलंदाजीपेक्षा फलंदाज म्हणून अधिक प्रभावी कामगिरी बजावली. 586 धावा झळकवणार्‍या जडेजाने एक शतक व पाच अर्धशतके ठोकली. यासोबतच त्याने 7 बळीही घेतले. विशेष म्हणजे, जडेजा या मालिकेत 6 वेळा पन्नासपेक्षा अधिक धावांचे वैयक्तिक योगदान देणारा पहिला खेळाडू ठरला. या आणि अशा विक्रमांमुळे भारत-इंग्लंड कसोटी मालिका कमालीची उत्कंठावर्धक ठरली. या मालिकेत एकंदरीत 7,187 धावा झाल्या असून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसर्‍यांदा एका मालिकेत इतक्या धावा झाल्या आहेत. त्याचबरोबर तब्बल 14 वेळा सामूहिक धावसंख्या 300 पेक्षा अधिक गेली आणि 21 शतके लागली. हीदेखील दुसर्‍यांदा घडलेली ऐतिहासिक बाब. मालिकेत 19 शतकी भागिदार्‍या नोंदवल्या गेल्या असून हाही एक विक्रम ठरला आहे.

भारताचा तरुण सलामीवीर यशस्वी जायसवाल याने काही डावांत विस्कळीत कामगिरी केली; मात्र जेव्हा खेळला तेव्हा ठसा उमटवला. त्याने 410 धावा, दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली. इंग्लंडमधील वातावरणात दिसून आलेले त्याचे तंत्र आणि झुंजार वृत्ती भविष्यासाठी आशादायक ठरणारी आहे. ओव्हलच्या सामन्यामध्ये भारताच्या कसोटी इतिहासात प्रथमच अत्यंत कमी अंतराने विजय नोंदवण्यात आला. फक्त 6 धावांनी इंग्लंडला पराभूत करत भारताने इतिहास रचला. सिराज, कृष्णा आणि आकाशदीपने संपूर्ण ताकद लावून भारताला ओव्हलवर हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयापूर्वी 13, 28, 31 आणि 37 अशा काही लहान अंतराने मिळालेले विजय होते; पण ओव्हलवरचा हा सामना सर्वांत संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताचा पहिला डाव 224 धावांवर संपला. इंग्लंडने 23 धावांची आघाडी घेत 247 धावा केल्या; मात्र दुसर्‍या डावात भारताने कमबॅक करत 396 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य होते. इंग्लंडने बरोबरी करण्याचा गंभीर प्रयत्न केला आणि जो रूट व हैरी ब्रूक यांच्या फलंदाजीतून ते विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले; मात्र भारताच्या वेगवान मार्‍याने शेवटच्या 30 धावांत 4 बळी घेत सामना उलथवला. सिराजने अखेरचा बळी घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले.

या मालिकेने नव्या भारतीय क्रिकेट संघाची कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची जिद्द दिसून आली. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 ही मालिका भारतीय संघाच्या नवोन्मेषाचे, आश्वासक आणि आत्मविश्वासू नेतृत्वशैलीचे, नव्या दमाच्या खेळाडूंमधील सामर्थ्याचे आणि कसोटी क्रिकेटमधील भारताच्या वर्चस्वाच्या दाव्याचे सशक्त उदाहरण ठरली. ही मालिका भारताच्या नव्या पिढीतील क्रीडागुणांना पारखण्याची संधी होती आणि टीम शुभमनने या संधीचे चोख सोने केले.

तिसर्‍या स्थानाचे आव्हान

या मालिकेत साय सुदर्शन आणि करुण नायर या दोघांनी मिळून मिळवलेली धावसंख्या आणि सरासरी पाहता त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. सुदर्शनने 6 डावांत 140 धावा (सरासरी 23.33) केल्या, तर नायरने 4 डावांत 111 धावा (सरासरी 27.75) करताना एक अर्धशतक झळकावले. या दोघांनाही क्रमवारीच्या बाहेर फलंदाजी करावी लागली. सुदर्शनचा मुख्य लौकिक हा सलामीवीर म्हणून निर्माण झालेला असून, करुण नायरनेही आपल्या सर्वोत्तम खेळ्या सहसा नंबर 3च्या खालीच साकारल्या आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडून वरच्या क्रमवारीत खेळून डाव सावरण्याची अपेक्षा करणं तसं कठीणच, तरीही सध्याच्या स्पर्धात्मक युगात, जिथे प्रत्येक स्थानासाठी दोन-तीन उमेदवार सज्ज असतात, त्या ठिकाणी आपली योग्यता सिद्ध करून स्थान मिळवणं हेच खेळाडूंचं काम आहे. सुदर्शन आणि नायर या दोघांनाही याबाबत अपेक्षित यश आले नाही. संघ व्यवस्थापन सुदर्शनबाबत थोडा जास्त संयम दाखवेल. कारण, तो अजून तरुण आहे; पण 33 वर्षीय करुण नायरसाठी आणखी संधी मिळवणं अधिक कठीण ठरणार आहे. त्याने ओव्हलच्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वात कठीण परिस्थितीत केलेलं अर्धशतक कदाचित त्याला तारू शकेल; पण चेतेश्वर पुजाराने आपल्या शेवटच्या कसोटीत (जून 2023, ओव्हल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध) केलेल्या दमदार खेळीनंतर गेल्या दोन वर्षांत भारताने सहा वेगवेगळ्या फलंदाजांना या स्थानावर उतरवलं आहे. गेल्या 10 कसोट्यांत पाच विविध खेळाडूंना संधी देऊनही समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि केन विल्यमसन यांसारख्या महान फलंदाजांनी क्रमांक 3 या स्थानाला एक खास प्रतिष्ठा दिली आहे. हा क्रमांक म्हणजे सलामीवीर आणि मधल्या फळीला जोडणारा दुवा असून मॅचचा रंग आणि नूर बदलण्याची क्षमता या स्थानात आहे. सुरुवातीला गडी बाद झाले, तर डाव सावरायचा भार याच्यावर असतो. सुरुवात चांगली झाली, तर संधीचं रूपांतर मोठ्या धावसंख्येत करण्याची जबाबदारीही त्याच्यावर असते. या स्थानावर खेळणार्‍याकडे सलामीवीरासारखी तांत्रिक सफाई आणि मधल्या फळीतील संयम यांचं योग्य मिश्रण असावं लागतं. इंग्लंडमध्ये भारताला बहुतांश फलंदाजीस पोषक खेळपट्ट्यांचा लाभ मिळाला. त्यामुळे नंबर 3 स्थानावर असलेली कमकुवत बाजू काही प्रमाणात झाकली गेली; पण दरवेळी अशी खेळपट्टी मिळेलच, असं नाही. त्यामुळे या स्थानासाठी एक स्थिर, तांत्रिकद़ृष्ट्या सक्षम आणि मानसिकद़ृष्ट्या परिपक्व फलंदाज मिळणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT