विवेक कुलकर्णी
काही विजय मैदानावर मिळतात, तर काही विजयांसाठी आधी आयुष्याच्या मैदानावर संघर्ष करावा लागतो. काही पदकांचे मोल त्यांच्या रंगात नसते, तर ती जिंकण्यासाठी घेतलेल्या कष्टात, सहन केलेल्या वेदनांत आणि अंगी बाणवलेल्या जिद्दीत असते. जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी याच जिद्दीचे दर्शन घडवले. ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य अशी एकूण ११४ पदके जिंकून भारताने या स्पर्धेतील स्वतःचाच सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडला.
जपानमधील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील भारतीयांच्या यशाकडे केवळ पदकांच्या आकड्यांमधून पाहणे म्हणजे खेळाडूंच्या संघर्षाचा खरा अर्थ दुर्लक्षित करण्यासारखे आहे. प्रत्येक पदकामागे असंख्य तासांचा सराव, अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद, शारीरिक मर्यादांशी दिलेली झुंज आणि कुटुंबाने दिलेला आधार दडलेला आहे. या खेळाडूंनी जगाला दाखवून दिले की, शरीराला काही मर्यादा असू शकतात; मात्र मनाने स्वीकारलेल्या ध्येयाला मर्यादा नसतात. 'वाटेत कितीही अंधार असू दे, चालण्याची जिद्द हवी; पायांना मर्यादा असल्या, तरी स्वप्नांना उंच भरारी हवी' हेच जणू त्यांचे ब्रीद होते.
अपघाताने स्वप्न मोडले; जिद्दीने नवे स्वप्न उभे केले
हरियाणाचा भालाफेकपटू सुमीत अंतिल याची कहाणी याच जिद्दीचे ठळक उदाहरण आहे. लहानपणी त्याचे स्वप्न कुस्तीपटू बनण्याचे होते; मात्र २०१५ मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी झालेल्या दुचाकी अपघातात त्याला डावा पाय गमवावा लागला. रुग्णालयातील उपचार, कृत्रिम पायाशी जुळवून घेण्याचे आव्हान आणि भवितव्याविषयी निर्माण झालेली अनिश्चितता या सर्वातून त्याला मार्ग काढावा लागला.
अपघातानंतर त्याच्या क्षमतेविषयी साशंकता व्यक्त करणारेही अनेक होते; पण सुमीतने परिस्थितीपुढे हार मानली नाही. त्याने पॅरा ॲथलेटिक्सचा मार्ग निवडला आणि भालाफेकीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदकांसह त्याने जागतिक स्तरावर आपले सामर्थ्य सिद्ध केले. नागोया येथेही त्याने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले. अपघाताने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली; पण ध्येय गाठण्याची त्याची इच्छा बदलू शकली नाही.
वयाच्या सहाव्या वर्षी हात गमावला; तरी उंच भरारी कायम
हिमाचल प्रदेशातील निशाद कुमार याच्या संघर्षाची सुरुवात बालपणीच झाली. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी चारा कापण्याच्या यंत्रात उजवा हात अडकल्याने त्याला हाताचा काही भाग गमवावा लागला. अशा प्रसंगानंतर एखाद्या मुलाच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होणे स्वाभाविक होते; मात्र निशादच्या कुटुंबाने त्याला परिस्थितीपुढे झुकू दिले नाही.
आईकडून मिळालेली प्रेरणा आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर निशादने उंच उडी या प्रकारात कारकीर्द घडवली. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत पॅरालिम्पिकमध्येही पदके जिंकली आहेत. नागोया स्पर्धेत त्याने उंच उडी आणि लांब उडी या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके मिळवली. उंच उडीतील २.०४ मीटरची कामगिरी ही स्पर्धेतील विक्रमी कामगिरी ठरली. शरीरातील एका अवयवाची कमतरता त्याच्या स्वप्नांच्या आड आली नाही. उलट प्रत्येक उडीने त्याने स्वतःच्या क्षमतेची नवी उंची गाठली.
'पडला तरी पुन्हा उठतो, तोच खरा शूर; परिस्थितीशी लढणाऱ्याच्याच पावलांत असतो विजयाचा नूर' हेच त्याने जणू अधोरेखित केले.
पोलिओवर मात; वयाच्या ३८व्या वर्षी सुवर्णवेध
राजस्थानच्या मोना अग्रवाल हिचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिला पोलिओची बाधा झाली. त्यामुळे दोन्ही पायांवर परिणाम झाला. कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे राहिले; मात्र आजीने तिच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर अडथळ्यांवर मात करता येते, हा विश्वास मोनाच्या मनात रुजला.
मोनाने शिक्षण पूर्ण केले, नोकरी केली आणि स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये तिने पॅरा ॲथलेटिक्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक अशा प्रकारांत कौशल्य दाखवले. पुढे रायफल नेमबाजीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला रायफलचा भार सांभाळणेही तिच्यासाठी आव्हान होते; मात्र सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. पॅरिस पॅरालिम्पिकनंतर नागोया येथेही तिने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली. वय, शारीरिक मर्यादा किंवा आयुष्यातील अडचणी यांपैकी कोणतीही गोष्ट स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंतिम अडथळा ठरू शकत नाही, हे मोनाने दाखवून दिले.
नजरेसमोरील अंधारावर वेगाने मात
दृष्टिदोष असलेल्या सिमरन शर्मा हिचाही संघर्ष विसरता येणार नाही. मुदतपूर्व जन्मामुळे तिला जन्मापासूनच दृष्टीविषयक अडचणींचा सामना करावा लागला. बालपणी चालण्यावरून आणि दिसण्यावरून चेष्टा केली जात होती. अशा अनुभवांमुळे आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो; पण सिमरनने याचा स्वतःच्या जिद्दीवर यत्किंचितही विपरीत परिणाम होऊ दिला नाही.
पती गजेंद्र यांची साथ आणि स्वतःच्या मेहनतीच्या बळावर तिने धावपटू म्हणून कारकीर्द घडवली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकत आपली क्षमता सिद्ध केली. नागोया येथे महिलांच्या १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतींत सुवर्णपदके जिंकताना स्पर्धेतील विक्रमही नोंदवले. दृष्टीची मर्यादा असतानाही वेग, एकाग्रता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवले.
११४ पदके; पण खरी कमाई आत्मविश्वासाची
भारताच्या या कामगिरीत पॅरा ॲथलेटिक्सने सर्वाधिक ६५ पदकांचे योगदान दिले. पॅरा बॅडमिंटनमध्ये १६, तर पॅरा जलतरणात ११ पदके मिळाली. पॅरा टेबल टेनिस, तिरंदाजी आणि नेमबाजीतील खेळाडूंनीही भर घातली. विशेष म्हणजे, भारताने २०२३ मधील हॅंग्झू स्पर्धेतील १०८ पदकांचा टप्पा मागे टाकला. यंदा भारताने १६८ खेळाडूंचा तुलनेने छोटा संघ पाठवला होता, तरीही पदकांची संख्या वाढवली.
तसे पाहता समाजात आजही दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेविषयी गैरसमज आढळतात. त्यांच्या गरजांकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते; पण त्यांना समान संधी, योग्य सुविधा आणि सक्षम व्यासपीठ देण्याची गरज अनेकदा दुर्लक्षित होते. पॅरा खेळाडूंचे यश या दृष्टिकोनात बदल घडवण्याची ताकद अधोरेखित करते.
शाळांपासून क्रीडा संस्थांपर्यंत सर्वत्र सुलभ सुविधा, प्रशिक्षित मार्गदर्शक, आधुनिक उपकरणे आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध झाले पाहिजे. खेळाडूंच्या पदकांचा गौरव करतानाच त्यांच्या सरावासाठी आणि भविष्यातील कारकिर्दीसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचीही काळजी घेतली पाहिजे. कारण, पदक जिंकल्यानंतर होणारा सत्कार महत्त्वाचा असला, तरी त्या पदकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली संधी अधिक महत्त्वाची असते.
संस्कृत सुभाषितात म्हटले आहे, 'उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥'
अर्थात, केवळ इच्छा करून कार्य सिद्ध होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडातही शिकार आपोआप प्रवेश करत नाही. सिंहाला झडप ही घालावीच लागते.
भारतीय पॅरा खेळाडूंनी या सुभाषिताचा अर्थ आपल्या कामगिरीतून प्रत्यक्ष दाखवून दिला आहे. त्यांच्या आयुष्यातील अडथळे, वेदना आणि संघर्ष यांची जागा आज पदकांनी घेतली आहे; मात्र त्यांची खरी ओळख पदकांपेक्षा मोठी आहे. कारण, त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा लाखो लोकांना दिली आहे.
११४ पदके ही भारताच्या क्रीडा इतिहासातील अभिमानाची नोंद आहे; पण या पदकांमागील जिद्द हीच या यशाची खरी ओळख आहे. या खेळाडूंनी देशाला पदके जिंकून दिलीच, शिवाय संकटांशी लढण्याची नवी उमेदही दिली. 'मर्यादा शरीराच्या असतात, स्वप्नांच्या नाहीत; जिद्द जिवंत असेल, तर अशक्य असे काहीच नाही' हे त्यांनी दाखवून दिले. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची कामगिरी हाच या विचाराचा जिवंत पुरावा आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम!