पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर.  File Photo
बहार

Imran Khan vs Munir | इम्रान विरुद्ध मुनीर

इम्रान यांचे मुनीर यांच्या वर्चस्वाला आव्हान

पुढारी वृत्तसेवा
प्रसाद पाटील

पाकिस्तानातील अस्थिरतेचे वातावरण आता निर्णायक वळणावर आले आहे. फिल्ड मार्शल असीम मुनीर हे देशाचे लष्करप्रमुख आहेत. तसेच संसद, न्यायव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण यावर त्यांची पकड भक्कम आहे. दुसर्‍या बाजूला इम्रान खान आहेत, जे माजी पंतप्रधान असूनही तुरुंगात आहेत. तेथूनही ते पाकिस्तानी जनतेच्या न्यायासाठी संघर्ष करत आहेत.

सध्या पाकिस्तानचे राजकीय चित्र पाहिले, तर एकीकडे फिल्ड मार्शल असीम मुनीर असून त्यांच्यासमवेत पाकिस्तानचे सैन्य आहे. लष्कराबरोबरच त्यांची पकड संसद, न्याय प्रणाली आणि परराष्ट्र धोरणावरही आहे. दुसर्‍या बाजूला माजी पंतप्रधान आणि सध्या रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात असलेले इम्रान खान राज्यसत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत आणि पाकिस्तानातील मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे. रस्त्यावर, लोकांच्या मनात आणि डिजिटल विश्वात त्यांचा आवाज घुमत आहे. पाकिस्तानची ढासळती व्यवस्था पाहता इम्रान खान यांनी देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, फिल्ड मार्शल मुनीर यांचा प्रभाव वाढलेला असताना, अनेक सरकारी संस्थांवर त्यांचा वचक निर्माण झालेला असताना तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचे तारणहार म्हणून ते नावारूपास येत असताना इम्रान यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. इम्रान यांचे हे पाऊल मुनीर यांच्या संपूर्ण वर्चस्वाला आव्हान देणारे आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत व्हाईट हाऊसमध्ये गुप्त चर्चा केली. या बैठकीत पाकिस्तानमधील अंतर्गत स्थैर्य आणि इम्रान खान यांसह अन्य काही मुद्द्यावर चर्चा झाली. शिवाय इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावावरदेखील चर्चा झाली. विशेष म्हणजे, ट्रम्प आणि मुनीर यांच्या भेटीनंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांचा पक्ष ‘पीटीआय’साठी राखीव असलेल्या जागा सत्ताधारी पीएमएल-एन आणि पीपीपी आघाडीकडे सोपविल्या. परिणामी, संसदेत त्यांना दोन तृतियांश बहुमत मिळाले. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेला जनादेश हा पूर्णपणे नाकारला गेला.

पाकिस्तानमधील वरिष्ठ कायदे विश्लेषकांनी या घटनेचा न्यायिक प्रक्रियेच्या माध्यमातून राजकारणावर चालवलेला वरवंटा असा उल्लेख केला आहे. मुनीर हे वॉशिंग्टन, रियाध आणि बीजिंगच्या दौर्‍यावर पाकिस्तानचा चेहरा म्हणून जात असले, तरी पाकिस्तानातील आणि परदेशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या मनात अजूनही इम्रान खान यांची लोकप्रियता मोठी आहे. ‘पीटीआय’ या इम्रान यांच्या पक्षाची मोहीम परदेशात ऑनलाईन व्यासपीठावर क्रांती करणारी आहे. ब्रिटन, आखाती देश आणि उत्तर अमेरिकेतील हजारो कार्यकर्ते इम्रान खान यांच्यावर झालेला अन्याय, त्यांच्यावरील निर्बंध आणि जनमताची चोरी यावर अभियान राबवत आहेत. यूट्यूब, टेलिग्राम आणि एक्ससारख्या व्यासपीठावर इम्रान खान यांच्या पक्षाने डिजिटल फ्रंटलाईन तयार केली असून ती सरकारच्या दमनशाहीला आव्हान देत आहे.

मुनीर यांना जागतिक मान्यता असल्याचे भासत असले, तरी पाकिस्तानचा इतिहास पाहिला, तर अय्यूब खान, झिया उल हक आणि परवेज मुशर्रफ यांच्यासारख्या लष्करप्रमुखांनाही आंतरराष्ट्रीय वैधता मिळाली होती; पण देशांतर्गत उद्रेकामुळे त्यांना शेवटी पदावरून जावे लागले. वास्तविक, आज पाकिस्तानची जनता ही महागाईने, निर्बंधांनी आणि लोकशाहीविरोधी तत्त्वांनी त्रस्त झाली आहे. इम्रान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरत असतील आणि असंतोष वाढत असेल, तर मुनीर यांची सत्तेवरची पकडही कमी होऊ शकते.

पाकिस्तानात शहाबाज शरीफ यांच्याकडे पंतप्रधानपद असले, तरी ते प्रभावहीन आहेत. त्यामुळेच खरी लढाई संस्थात्मक शक्ती बाळगून असलेले मुनीर आणि लोकमान्यता असलेले इम्रान यांच्यातच आहे. एकीकडे बंदुकीची ताकद, तर दुसरीकडे जनमत आणि चाहत्यांची शक्ती. फिल्ड मार्शल मुनीर हे पाकिस्तानवर राज्य करत असले, तरी इम्रान खान हे तुरुंगातून का होईना पाकिस्तानच्या राजकीय भविष्याची दिशा निश्चित करणार्‍या संघर्षाची धार कायम ठेवत आहेत.

मुनीर आणि इम्रान खान यांच्यातील वैर हे आजचे नाही. या संघर्षाची पाळेमुळे 2019 मध्ये दडलेली आहेत. असीम मुनीर हे तत्कालीन काळात ‘आयएसआय’चे प्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान पदावर असणार्‍या इम्रान खान यांना त्यांच्या निकटवर्तीयांच्या भ्रष्ट कारभाराची माहिती दिली. यात इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबीचे निकटवर्तीय फराह गोगी आणि अन्य सहकार्‍यांचे नाव समोर आले. हा अहवाल इम्रान खान यांना पचला नाही आणि त्यांनी मुनीर यांना आयएसआयच्या प्रमुखपदावरून तत्काळ हटविले. केवळ आठ महिन्यातच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. आयएसआय प्रमुख या नात्याने हा खूपच कमी काळ होता. तेथेच मुनीर आणि इम्रान यांच्यात वैरत्वाची ठिणगी पडली.

एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणत त्यांना बाजूला हटवण्यात आले; पण यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात सैन्याचा वाढलेला हस्तक्षेप जगासमोर आला. त्यातून खुद्द पाकिस्तानात चुकीचा संदेश गेला आणि नाराजीचे सूर उमटले. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाने खुलेपणाने लष्कराविरोधात रोष व्यक्त केला आणि सत्ता बदलाला सैन्य नेतृत्वाला जबाबदार धरले. जेव्हा असीम मुनीर यांना नोव्हेंबर 2022 मध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केले, तेव्हाच इम्रान खान यांच्याविरोधात लष्कर आघाडी उघडणार, असे वाटू लागले. मुनीर यांच्या नियुक्तीला इम्रान खान यांच्या राजकीय पुनरागमनातील मोठा अडथळा म्हणून पाहिले गेले.

इम्रान खान यांनी असीम मुनीर यांच्या नियुक्तीनंतर लष्कर आणि आयएसआयविरोधात खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी वारंवार खरा गुन्हेगार हा रावळपिंडीत बसल्याचे सांगितले. इम्रान यांचा मुनीर यांच्याकडे अंगुलीनिर्देश होता. मे 2023 मध्ये जेव्हा इम्रान खान यांना अटक करण्यात आली, तेव्हा पाकिस्तानात हिंसाचार आणि आंदोलनांचा भडका उडाला. परिणामी, ‘पीटीआय’विरोधात दमन मोहीम सुरू झाली. हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेकांना पक्ष सोडण्यास सांगितले. प्रसारमाध्यमांत इम्रान खान यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला गेला.

फेब्रुवारी 2024 च्या निवडणुकीत ‘पीटीआय’ला प्रचंड बहुमत मिळाले असले, तरी प्रचार, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग यांच्या मदतीने संपूर्ण कल इम्रानच्या विरोधात झुकवला; पण अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने पीटीआय पक्षासाठी राखीव असलेल्या जागा शहाबाज शरीफ यांच्या आघाडी सरकारकडे सुपूर्द केल्या. यामुळे सत्तेचे संपूर्ण नियंत्रण सैन्यांच्या बाजूने गेले. आता असीम मुनीर यांना फिल्ड मार्शलचा दर्जा देण्यात आल्याने ते आता निरंकुश सत्तेचे प्रतीक बनले आहेत; मात्र इम्रान खान यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. प्रामुख्याने तरुण, अनिवासी नागरिक आणि सोशल मीडियावर इम्रान यांची लोकप्रियता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर या संघर्षाचा शेवट कोणत्या बाजूने होईल, हे आताच सांगणे घाईचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT