वाढते तापमान दिवसेंदिवस असह्य करत असल्याचे चिन्ह.  Pudhari File Photo
बहार

होरपळणारे जग

पुढारी वृत्तसेवा

रंगनाथ कोकणे, पर्यावरणतज्ज्ञ

नेपाळपासून अमेरिकेपर्यंतच्या चार महाखंडांवरील वाढलेली उष्णता पाहून कमाल तापमानाचा नवा विक्रम प्रस्थापित होईल की काय? असे वाटू लागले आहे. सौदी अरेबियात सर्वाधिक तापमान नोंदले गेले असून, तेथे 900 पेक्षा अधिक बळी गेले. इजिप्तमध्ये 530 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 1 मार्च ते 18 जून या काळात 40 हजारांपेक्षा अधिक नागरिक उन्हाने आजारी पडल्याची नोंद झाली आहे.

यंदा उन्हामुळे हजारो लोकांचा मृत्यू

पृथ्वीवर नेपाळपासून अमेरिकेपर्यंतच्या चार महाखंडांवरील वाढलेली उष्णता पाहून यावेळचा उन्हाळा कमाल तापमानाचा विक्रम प्रस्थापित करेल की काय? असे वाटू लागले आहे. उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अगणित आहे. यंदा उन्हामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक आजारी पडले. एकट्या सौदीत सर्वाधिक तापमान नोंदले गेले असून, तेथे 900 पेक्षा अधिक बळी गेले. पैकी 70 पेक्षा अधिक भारतीय नागरिक आहेत. सौदीत 51 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहत असून, ही बाब हज यात्रेकरूंसाठी अडचणीची ठरत आहे. इजिप्तमध्ये 530 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 1 मार्च ते 18 जून या काळात 40 हजारांपेक्षा अधिक नागरिक उन्हाने आजारी पडले आणि त्यात शंभरपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. उष्णतेच्या लाटेने होणारे मृत्यू केवळ आशिया आणि आफ्रिका खंडापुरतेच मर्यादित नसून, युरोपियन देशांतदेखील मृत्यूचे आकडे धक्कादायक आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेतही. ‘यूएस नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमास्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या ‘अर्थ ऑब्जेव्हेटरी’नुसार भूमध्य सागराजवळील देशांना सध्या उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोर्तुगालपासून ग्रीसपर्यंत आणि अल्जेरियापर्यंतच्या जंगलांत वणवे पेटत आहेत. म्हणूनच जगाला वाजवीपेक्षा अधिक तापमानापासून वाचवायचे असेल तर सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे शास्त्रज्ञ म्हणत आहेत.

वाढते तापमान दिवसेंदिवस असह्य करत असल्याचे चिन्ह

वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूयॉर्कमध्येदेखील नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आणि म्हणूनच हे तापमान चिंताजनक स्थितीत आहे. या शहरात कधीकाळी उन्हाळा हा आल्हाददायक मानला जात असे. वास्तविक, भारत ते अमेरिकेपर्यंतची बहुतांशी शहरे आपली मूळ ओळख हरवत आहेत. न्यूयॉर्क शहरात अनेक कंपन्यांना वातानुकूलित यंत्रणा बसवावी लागली. शाळांतील मुलांना तर दुपार होण्यापूर्वीच घरी पाठविण्यात येऊ लागले. अमेरिकेतील अनेक प्रांतांतील तापमान 45 अंशांपेक्षा अधिक राहिले आहे. न्यू मेक्सिको येथे वाढत्या तापमानामुळे 23 हजार एकरांपेक्षा अधिक जमिनीवर आगीच्या घटना घडल्या आणि 500 पेक्षा अधिक घरांची हानी झाली. जगातील अनेक देशांतील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. ही आग केवळ पावसाने आटोक्यात येऊ शकते. वाढते तापमान हे पृथ्वीवरचे दिनमान दिवसेंदिवस असह्य करत असल्याचे चिन्ह आहे. असे का घडत आहे? वाढते तापमान हा जगापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. या जीवघेण्या उष्णतेला, तापमानाला कोण जबाबदार आहे? याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नेपाळसारखा देश की, अमेरिकेसारखी महाशक्ती? हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा अमेरिकेची भूमिका पाहून चिंता आणखीच वाढते.

पर्यावरणपूरक गोष्टींना महत्त्व देणे गरजेचे

अमेरिकेच्या मते, हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत नेपाळसारख्या देशांनीदेखील योगदान द्यायला हवे. तर भारत म्हणतो, हवामान बदलावर मार्ग काढताना येणार्‍या खर्चावर श्रीमंत देशांनी अधिक योगदान दिले पाहिजे. एकवेळ अमेरिकेने हवामान बदलापासून पळ काढण्यासाठी मागे राहण्याची भूमिका अंगीकारली होती. वाढते तापमान आपले काही बिघडू शकत नाही, असे अनेक श्रीमंत देशांना वाटते. पैसा आणि ऊर्जा स्रोतांमुळे बचाव करू शकतो, असे त्यांना वाटते; पण याच देशांत तापमान वाढत असून, आतातरी त्यांनी डोळे उघडले पाहिजेत आणि सत्य जाणून घेतले पाहिजे. हवामान बदलाला कारणीभूत ठरणार्‍या साधनांचा वापर कमी करत पर्यावरणपूरक गोष्टींना महत्त्व देणे आता क्रमप्राप्त झाले आहे. मात्र, हरित तंत्रज्ञानाच्या हस्तांतरात अजूनही खूप अडचणी असल्याचे भारताकडून वारंवार सांगितले गेले. हरित तंत्रज्ञान महागडे केले जात आहे. प्रदूषण रोखण्यास मदत करणारी विद्युत वाहने विकसनशील देशांत परवडणार्‍या किमतीत उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु, विकसित देश या ठिकाणीही आपला व्यावसायिक फायदा पाहत आहेत. अशा गंभीर स्थितीत स्वहित बाजूला ठेवले, तरच जगाला वाचविण्यासाठी होणारे सामूहिक प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, हे विकसित देशांनी लक्षात घ्यायला हवे.

गेल्या 125 वर्षांतील सर्वाधिक तापमान

अमेरिकी शास्त्रज्ञांच्या मते, जगातील कमाल सरासरी तापमान आजघडीला गेल्या 125 वर्षांतील सर्वाधिक आहे. औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत तापमानात 1.25 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 45 वर्षांत प्रत्येक दशकात तापमानात 0.18 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. 21 व्या शतकात पृथ्वीच्या सरासरी कमाल तापमानात 1.1 पासून 2.9 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी हवेतील सध्याच्या ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या प्रमाणावर संशोधन केले आहे. त्यात वाढत्या तापमानामुळे वातावरणातील ऑक्सिनजनचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांत ऑक्सिजनचे प्रमाण कमालीचे घटले आहे. आतापर्यंत वातावरणात 36 लाख टन कार्बन डायऑक्साईडची वाढ झाली असून, 24 लाख टन ऑक्सिजन संपुष्टात आले आहे.

अशीच स्थिती कायम राहिली, तर 2050 पर्यंत पृथ्वीवरचे तापमान सुमारे 4 अंश सेल्सिअसने वाढू शकते. हवामान आणि पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीचे तापमान ज्या वेगाने वाढत आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवले नाही, तर पुढील शतकात हेच तापमान 60 अंशांपर्यंत पोहोचू शकते. आजच्या स्थितीला आपण 45-50 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकत नाही. अशावेळी पारा 60 अंशांवर गेल्यास अक्षरशः माणसं भाजल्याशिवाय राहणार नाहीत.

गांभीर्याने विचारविनिमय करण्याची गरज

तापमानवाढीचे संकट एखाद-दुसर्‍या देशाच्या प्रयत्नांमधून दूर होऊ शकणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. याबाबतीत भारत आशियाई देशांचे नेतृत्व करू शकतो. जलवायू परिवर्तनामुळे होत असलेल्या या बदलांकडे हात बांधून पाहत राहण्याऐवजी त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी काय करता येईल, याबद्दल गांभीर्याने विचारविनिमय करण्याची गरज आहे. या उपाययोजनांमध्ये कोळशावर चालणार्‍या वीजनिर्मिती केंद्रांवरील अवलंबित्व कमीत कमी ठेवण्याबरोबरच पेट्रोल-डिझेलवर चालणार्‍या वाहनांचा वापर कमीत कमी करणे, सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देणे, हिरवाई वाढविण्याच्या कार्यक्रमांना सक्रिय मदत करून सर्वसामान्य लोकांना या चळवळीशी जोडून घेणे आदी उपायांचा समावेश आहे. यामध्ये घरांचे डिझाईन बदलण्याची गरज आहे, जेणेकरून घरांमध्ये पुरेसा उजेड आणि थंडावा राहू शकेल. देशाच्या बहुतांश भागांमध्ये वर्षातील 330 दिवस सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत घरगुती वापरासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. सायंकाळनंतर औष्णिक वा अन्य मार्गांनी मिळणार्‍या विजेचा वापर व्हायला व्हावा. असे केल्यास दिवसा निर्माण होणार्‍या विजेचा मोठा हिस्सा उद्योगांना आणि अन्य गरजेच्या गोष्टींना उपलब्ध करून देणे शक्य होईल. भारत याद़ृष्टीने वेगाने पावले टाकत आहे. परंतु, त्याचवेळी विकासाच्या नावाखाली होणारी पर्यावरणाची हानी आणि उंचावलेल्या जीवनशैलीमुळे होणारा वातानुकूलित यंत्रांसारख्या प्रदूषणकारी घटकांचा अतिवापर यामध्ये घट होण्याची नितांत गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT