IIT-Bombay Student Case | आयआयटीमधील आत्महत्या, जबाबदार कोण..? 
बहार

IIT-Bombay Student Case | आयआयटीमधील आत्महत्या, जबाबदार कोण..?

अरुण पाटील

डॉ. सुकृत खांडेकर

देशात सर्वत्र आयआयटीमध्ये विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत व गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत आहे. गेल्या वीस वर्षांत देशातील आयआयटीमध्ये १७१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आयआयटीमध्ये बुद्धिमान व तल्लख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा गुणांची जीवघेणी स्पर्धा असते. मग, या बुद्धिमान विद्यार्थ्यांवर आयआयटीत शिक्षण घेताना आत्महत्या करण्याची वेळ का येते?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या साहिल वाकोडे या बावीस वर्षांच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आणि विद्यार्थ्यांमधील असंतोषाला तोंड फुटले. ज्या दिवशी त्याने आत्महत्या केली, त्याच दिवशी त्याला परीक्षा केंद्रावर मोबाईलमधील चॅटजिपीटी आधारे कॉपी करताना पकडले होते, असे निवेदन आयआयटी बॉम्बेने प्रथम जारी केले होते; मात्र आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर निषेधाच्या घोषणा व बॅनर्स फडकवत मोर्चे धडकताच घाईघाईने केलेल्या निवेदनाबद्दल आयआयटीने माफी मागितली. आपल्या मुलाचा जातिवाचक छळ चालू होता व त्याला शिवीगाळ केली जात होती, असे आरोप साहिलचे वडील रवींद्र व आई सोनाली यांनी केल्यावर आंदोलनाला वेगळेच वळण लागले. साहिलचे आई-वडील थेट मुंबईतील वांद्रे येथील पोलीस क्राईम ब्रँचमध्ये येऊन थडकले व त्यांनी आयआयटीच्या अध्यापकांविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याखाली तक्रारच नोंदवली. सोनाली वाकोडे म्हणतात, माझ्या मुलाने जातीय छळामुळेच आत्महत्या केली आहे. मी त्याची आई आहे. मी एक शिक्षिका आहे. तो माझ्या काळाजाचा तुकडा होता. गेले काही महिने त्याचा जातीय छळ होत असल्याचे तो मला सांगत होता. तेव्हा मी त्याला, तुझे भविष्य तेथे उज्ज्वल होईल, तू दुर्लक्ष कर, असे सांगत होते.

मूळचा यवतमाळ जिल्ह्यात राहणारा साहिल बुद्धिमान विद्यार्थी होता. आयआयटीत प्रवेश मिळवणे हे काही सोपे नसते. खूप मोठी स्पर्धा असते. जेईई ॲडव्हान्स परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवताना त्याला अनुसूचित जाती प्रवर्गात देशात ६१४ वी रँक मिळाली होती. त्याची आयआयटी बॉम्बे, पवई येथे निवड झाली. तो हुशार व मेहनती होता. मग, तो परीक्षेत कॉपी करीलच कशाला, असा प्रश्न त्याचे पालक विचारत आहेत. साहिलचे काही मित्रही सांगतात, तो मनमोकळ्या स्वभावाचा होता. परीक्षा केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नसते. मग, तो मोबाईल घेऊन तेथे येईलच कसा, असा प्रश्न त्याचे मित्र विचारत आहेत. आंदोलनाची धार तीव्र होताच प्रशासनाने डीन प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना निलंबित केले. परीक्षा केंद्रावर त्या दिवशी प्रा. डुल्ला हे पर्यवेक्षक म्हणून ड्युटीवर होते. त्यांनीच साहिलाला मोबाईवरून कॉपी करताना पकडले होते असे प्रथम सांगितले गेले. चॅट जिपीटीवरून साहिल पेपरमधील प्रश्नाची कॉपी करीत होता, अशी माहिती पुढे आली. साहिलच्या आत्महत्येनंतर दोन दिवस तो परीक्षा केंद्रावर कॉपी करीत असताना पकडला गेला अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. एकीकडे आयआयटीमधे कॉपी पकडली गेली म्हणून वातावरण गढूळ झाले व दुसरीकडे साहिलला बदनाम करण्याठी कुभांड रचले जात आहे, अशा प्रचाराला धार चढली.

संपूर्ण देशभर आयआयटी बॉम्बे या संस्थेची नाचक्की झाली. ज्या संस्थेने नामवंत शास्त्रज्ञ, नोकरशहा, प्रशासकीय तज्ज्ञ देशाला व जगाला दिले, त्या संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. देशभरात २३ आयआयटी संस्था आहे. सर्व आयटीआय मिळून एकूण १८ हजार ९५१ जागा आहेत. या जागांसाठी १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसत असतात. दर्जेदार व गुणवत्ता संपन्न असे शिक्षण देणाऱ्या आयआयटीची ओळख जगभर आहे. आयआयटीतून शिक्षण पूर्ण केलेले शेकडो विद्यार्थी देशात व विदेशात सन्मानाच्या व संवेदनशील पदांवर काम करीत आहेत. या विद्यार्थ्यांनी जगात देशाचे नाव उंचावले आहे. आयआयटी म्हणजे उत्तुंग करिअरसाठी सर्व जगाचे दरवाजे खुले करून देणारी शिक्षण संस्था अशी प्रतिमा आहे. अशा संस्थेत विद्यार्थी परीक्षांमधे पेपर सोडवताना कॉपी करीत असतील किंवा वेगवेगळ्या कारणाने आत्महत्या करीत असतील, तर आयआयटीची प्रतिमा जगात काय होईल? अशा शिक्षण संस्थातून यशस्वी होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना जगाचे, सरकारी व खासगी क्षेत्रांचे मोठमोठ्या उद्योग समूहांची प्रवेशव्दारे खुली राहतील का? आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे पूर्वीसारखे जगात सर्वत्र स्वागत होईल का? आयआयटीच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला धक्का लागणार असेल, तर त्याचे मूल्य पूर्वीसारखे कायम राहू शकेल का?

आंदोलकांच्या प्रखर मागणीनंतर प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासानाने निलंबित केले. त्यांच्यावर पोलिसांनी एससी-एसटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. डीन प्रा. सूर्यनारायण डुल्ला आणि संचालक शिरीष केदारी यांच्यावर आंदोलकांचा राग आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. ज्यांच्यावर एफआयआर नोंदवला गेला आहे त्यांना अटक व्हावी, असे साहिल वाकोडेचे आई-वडील म्हणत आहेत; मात्र डुल्ला यांच्या समर्थनार्थ विज्ञान, ऊर्जा व अभियांत्रिकी विद्यार्थी व अध्यापकांनी कॅम्पसमधे शांती मोर्चा काढला. सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. आयआयटी खरगपूर, कानपूर, गुवाहटी, हैदराबाद येथील फॅकल्टी फोरम्सनी प्रा. डुल्ला यांना पाठिंबा दिला आहे. लेखक, पत्रकार सुधींद्र कुलकर्णी हे आयआयटीचे विद्यार्थी. केंद्रात वाजपेयी सरकार असताना ते पंतप्रधानांच्या कार्यालयात सेवेत होते. त्यांनी डुल्ला यांच्यावरील एसीएसटी कायद्याअंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. चौकशी निष्पक्ष व्हावी व दोष सिद्ध होईपर्यंत त्यांच्यावर कारवाई करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. ज्याने आजवर शंभरपेक्षा जास्त संशोधन प्रबंध सादर केले आहेत, स्वत:च्या नावावर सहा पेटंट आहेत, दहा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त आहेत, तीन हजार ठिकाणी त्यांच्या संशोधनाचे संदर्भ आहेत, असा विद्वान जाती भेदभाव करू शकेल का, असा प्रश्न त्यांचे समर्थक विचारत आहेत. दरम्यान, आयआयटीने जातिवाचक भेदभाव किंवा शिवीगाळ केल्याचा आरोप फेटाळला आहे. जातिवाचक भेदभाव, मोबाईलवरून कॉपी आणि आत्महत्या यांचा परस्पर संबंध आहे आहे का, याचा निष्पक्ष व पारर्शक तपास होणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांची आत्महत्या हा केवळ आयआयटी बॉम्बेपुरताच मर्यादीत प्रश्न नाही. देशात सर्वत्र आयआयटीमध्ये विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत व गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत आहे, याची आकडेवारी या निमित्ताने पुढे आली आहे. गेल्या वीस वर्षांत देशातील आयआयटीमधे १७१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आयआयटीमध्ये बुद्धिमान व तल्लख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा गुणांची जीवघेणी स्पर्धा असते. मग, या बुद्धिमान विद्यार्थ्यांवर आयआयटीत शिक्षण घेताना आत्महत्या करण्याची का वेळ येते? आयआयटीमधील आत्महत्यांवर राज्यांच्या विधिमंडळात किंवा संसदेत कधी सविस्तर चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही.

साहिल वाकोडेची ही आयआयटी बॉम्बेमध्ये घडलेली या वर्षातील ही तिसरी आत्महत्या आहे. या वर्षातील आयआयटी मधील ही नववी आत्महत्या आहे. गेल्या सहा वर्षांत सर्वात जास्त म्हणजे १६ आत्महत्या २०२५ मध्ये झाल्या होत्या. २०२१ मध्ये देशातील आयआयटीमध्ये ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. २०२२ मध्ये १२, २०२३ मध्येे १४ , २०२४ मध्येे १५ व २०२५ मध्येे १६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या पाच वर्षांत आयटीआयमधील पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत. देशाची मौल्यवान बौद्धिक संपदा आपण गमवत आहोत, असे वाटत नाही का? साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर आयआयटीमधील विद्यार्थ्यांमध्येे उघडपणे विभाजन पडले आहे. परीक्षा केंद्रावर कोणी कॉपी करीत असेल, तर पकडायचे नाही का? अध्यापकांनी यापुढे आपले कर्तव्य बजावायचे की नाही, हे जात विचारून ठरवायचे का, असे प्रश्न विचारले जात आहेत. आयआयटी पलक्कडचे बोर्ड ऑफ गव्हर्नसचे चेअरमन रमेश वेंकटेश्वरन यांच्या अध्यक्षतेखाली साहिल वाकोडेच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी दहा जणांची समिती नेमली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT