डॉ. जयदेवी पवार
यंदाच्या वर्षी स्विडीश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांची निवड केली आहे. प्रलयकाळातही कलेची ताकद दाखवून देणार्या प्रभावी आणि दूरदर्शी साहित्यकृतींसाठी कास्नहोर्कई यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे.
दरवर्षी साहित्यातील नोबेल कुणाला जाहीर होणार, याकडे सर्व साहित्यप्रेमींचे, वाचनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. हा पुरस्कार जगभरातील साहित्य कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट साहित्याला दिला जात असल्याने त्याचे मोल अनन्यसाधारण असते. यंदाच्या वर्षी स्विडीश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांची निवड केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना स्विडीश अकादमीने व्यक्त केलेले मनोगत क्रॅस्नाहोरकाई यांच्याविषयी सर्व काही सांगून जाणारे आहे. त्यानुसार लास्झ्लो क्रॅस्नाहोर्काई यांचे कार्य अत्यंत प्रभावशाली आणि दूरदर्शी आहे. प्रलयकाळातही कलेची ताकद दाखवून देणार्या, प्रभावी आणि दूरदर्शी साहित्यकृतींसाठी क्रॅस्नाहोर्काई यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे. म्हणजेच अपोकॅलिप्टिक भयाच्या काळातही कला टिकून राहते, यावर विश्वास ठेवणार्या त्यांच्या द़ृष्टिवान लेखनासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
लास्झ्लो क्रॅस्नाहोर्काई यांचा जन्म 1954 मध्ये हंगेरीतील रुमानियाच्या सीमेनजीक असलेल्या द्युला शहरात झाला. झेगेद आणि बुडापेस्टमध्ये त्यांनी 1970च्या दशकात कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर ते साहित्यनिर्मितीकडे वळले. युरोप, आशिया आणि अमेरिका खंडांमध्ये त्यांनी विपुल प्रवास केला आहे. त्या काळात हा देश इतिहासाच्या दडपणाखाली थकलेला होता. या शांत पण वेदनादायी वातावरणातूनच त्यांच्या लेखनाचा जन्म झाला. त्यांच्या कादंबर्यांमध्ये नामशेष झालेला विश्वास, माणसाची थकलेली चेतना आणि तरीही जगण्याच्या पोकळीत टिकून राहण्याची जिद्द अनुभवास येते. त्यांची वाक्यरचना लांब आणि काहीशी दुर्बोध असली, तरी ती खोल विचारांनी भरलेली असते. त्यांची वाक्ये जणू प्रार्थनेसारखी वाटतात. त्यांच्या प्रसिद्ध कादंबर्या ‘सातांतांगो’, ‘द मेलँकली ऑफ रेसिस्टन्स’ आणि ‘वॉर अँड वॉर’ या केवळ कथा नसून प्रगतीच्या फसव्या चित्राचा भांडाफोड करतात. जग बदलत असलं, तरी माणसाची भीती, असुरक्षा आणि निराशा कायम आहे, हे या कादंबर्यांमधून ते दाखवून देतात. अमेरिकन लेखिका सुसान सॉनटॅग यांनी त्यांना अपोकॅलिप्सचा स्वामी म्हटले होते. त्यांच्या द़ृष्टीने अपोकॅलिप्स म्हणजे जगाचा अंत नाही, तर अर्थ हरवण्याची अवस्था आहे आणि हा अर्थ फक्त कलाच पुन्हा जिवंत करू शकते. क्रॅस्नाहोर्काई यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक बेला टार यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. त्यांच्या मते, क्रॅस्नाहोर्काई यांना मिळालेला नोबेल पुरस्कार हा मेणबत्तीची एक थरथरणारी ज्योत आहे, जी वार्यातही न विझता टिकून राहते.
क्रॅस्नाहोर्काईंचे लेखन वाचकाला आराम देत नाही, तर ते विचार करायला भाग पाडते. निराशेकडे पाहणे टाळू नका. तिच्याकडे थेट पाहा आणि तिच्यात लपलेला अर्थ समजून घ्या हा संदेश त्यांच्या वाचनातून मिळतो. त्यांच्या लेखनाची तुलना काफ्का, बर्नहार्ड आणि बेकेट यांच्यासोबत केली जाते. या सर्वांनी आधुनिक जगाच्या वेदनेला भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त केले; पण क्रॅस्नाहोर्कार्ईंची शैली स्वतंत्र आहे. मध्य युरोपच्या अंधुक वातावरणातून जन्मलेली आणि जगभरातील अस्वस्थांशी बोलणारी. त्यांचे अपोकॅलिप्स कोणत्याही धर्माचे नाही, कोणत्याही राष्ट्राचे नाही. ते मानवतेचे अपोकॅलिप्स आहे, जिथे माणूस आपल्या निर्मितीनेच गिळंकृत होत आहे.
2002 मध्ये हंगेरीचेच लेखक इम्रे केर्तेश यांनी नोबेल पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर सुमारे 20 वर्षे हंगेरी शांत होती. क्रॅस्नाहोर्कार्ईंच्या पुरस्कारामुळे ती शांतता पुन्हा एकदा बोलकी झाली आहे. आजचा काळ पुन्हा त्यांच्या कादंबर्यांसारखा झाला आहे. हुकूमशाही प्रवृत्ती जगभरात वाढत आहे. करुणा कमी होत आहे. अशा काळात त्यांचे गंभीर साहित्य मोलाचे ठरणारे आहे. क्रॅस्नाहोर्काई सांगतात की, निराशेकडे थेट पाहणे हेच धैर्य आहे आणि अंधारात लिहिणे हीच खरी आशा आहे. क्रॅस्नाहोर्काई शेवटांबद्दल लिहितात; पण त्यांच्या वाक्यांना शेवट नसतो. ती पुन्हा वळतात, पुन्हा सुरू होतात. जीवनचक्रही असेच सुरू असते. अव्याहत. त्या सातत्यावर, निरंतनतेवर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे. अर्थ हरवला, तरी भाषा अजूनही आश्रय देऊ शकते आणि त्या आश्रयाला क्रॅस्नाहोर्काई आशा म्हणतात.
व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी, त्यांच्या लोकशाही हक्कांसाठी केलेल्या अथक कार्याबद्दल आणि न्याय्य व शांततापूर्ण मार्गाने हुकूमशाही, दडपशाहीतून लोकशाहीकडे परिवर्तन करण्यासाठीच्या लढ्यातील योगदानाबद्दल मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याची घोषणा नॉर्वेजियन नोबेल समितीन केली आहे.
मारियांचा संघर्ष व्यक्ती, समाज, राजसत्ता यांच्यासाठी खर्याअर्थाने उद्बोधक आहे. स्वतःच्या जीवाला गंभीर धोका असूनही त्यांनी शांततेचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले आणि त्यांचे हे धैर्य लाखो लोकांसाठी प्रेरणादायी असल्याने नोबेल समितीने शांततेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या प्रमुख लोकशाही कार्यकर्त्या असून, त्या देशातील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्या लोकशाही हक्क आणि मानवी स्वातंत्र्यासाठी लढणार्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जातात.
व्हेनेझुएला एकेकाळी समृद्ध लोकशाही असलेला देश होता; पण सध्याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या नेतृत्वात एकाधिकारशाही शासनात बदलला. मादुरो यांनी विरोधकांना तुरुंगात टाकलेे आणि माध्यमांवर बंदी घालण्यात आली. हा देश आर्थिक दुर्गतीकडे जात होता. परिणामी, 80 लाखांहून अधिक लोकांना देश सोडण्यास भाग पाडले गेले. मचाडो यांनी निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लोकशाही सहभाग वाढवण्यासाठी दोन दशकांपूर्वी सुमाते या नागरिक समूहाची स्थापना केली. मागील वर्षी निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखल्यावर त्यांनी विरोधी उमेदवार एडमंडो गोंजालेज उरुतिया यांना पाठिंबा दिला. त्यांनी स्वतंत्र मत मोजणीत मादुरो यांना पराभूत केले; मात्र सरकारने निकाल मान्य करण्यास नकार दिला.
मागील एक वर्षापासून त्यांना लपून राहावे लागले, तरीही त्यांनी देशातील विरोधी पक्षांचे समन्वय कार्य सुरू ठेवले. नोबेल समितीने त्यांचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, अधिनायकवादी किंवा हुकूमशाही प्रवृत्ती जेव्हा सत्ता हस्तगत करतात, तेव्हा त्यांचा निकराने सामना करण्यासाठी उभ्या राहणार्या आणि प्रतिकार करणार्या धैर्यशील रक्षकांची ओळख करणे गरजेचे ठरते. कारण, अंतिमतः लोकशाही ही अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणार्यांच्या जीवावरच टिकून राहते. मारियांनी नेमके हेच केले.
56 वर्षीय मचाडो या माजी खासदार आहेत. मादुरो यांच्या सर्वोच्च टीकाकार म्हणून त्या ओळखल्या जात असल्या, तरी लोकशाहीवादींसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. विरोधी पक्षातील प्राथमिक निवडणुकीत जिंकूनही त्यांना 2024 च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखले गेले. या निर्णयाचा पश्चिमी देश आणि मानवाधिकार संघटना यांनी तीव्र विरोध केला. मारिया यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता; पण तरीही त्यांनी व्हेनेझुएला न सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला. मारियांच्या पुरस्काराने म्यानमारमधील आंग स्यान स्यू की यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनीही म्यानमारमधील लष्करशाही विरुद्ध निकराचा लढा देत लोकशाही स्थापनेसाठी संघर्ष केला होता. दमनकारी सत्तांविरुद्ध उभ्या राहणार्या या रणरागिणींचा धिरोदात्तपणा आणि प्रचंड बिकट कामातही शांततामय मार्गाचा अवलंब करण्याचा निर्धार जगाला नवी दिशा दाखवणारा आहे. या रणरागिणी अन्यायाचा अंधकार दूर करणार्या ज्योती आहेत.