Gold formation | सोनं कसं तयार झालं? 
बहार

Gold formation | सोनं कसं तयार झालं?

पुढारी वृत्तसेवा

शरयू माने

‘नासा’च्या संशोधकांच्या मते, असे न्यूट्रॉनचे स्फोट सुमारे 10 हजार वर्षांतून एकदाच घडतात. ते उडणारे न्यूट्रॉनचे कण पृथ्वीवरच पडतील आणि त्याचे सोने होऊन खाणी तयार होतील असे नाही. ते संपूर्ण आकाशगंगेत कुठेही, कोणत्याही ग्रहावर स्थिर होऊ शकतात. या क्रियेमुळे सोने पृथ्वीवरच नाही, तर इतर ग्रहांवरही काहीशा प्रमाणात उपलब्ध असू शकते.

सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत चालले आहेत. सोने मुबलक प्रमाणात घेणे आणि वापरणे ही भारताची परंपरा असली, तरी काही कारणामुळे सोने सर्वसामान्यांच्या आणि गरीब जनतेच्या वापरात दुर्मीळ होत चाललेले आहे. पुरातत्त्वशास्त्र आणि भौगोलिक पुराव्यानुसार मेसोपोटेमिया, इजिप्त, सिंधू घाटी, आणि चीन यांच्या प्राचीन संस्कृतीमध्ये इ. स. पू. 3500 ते 4000 च्या दरम्यान सोन्याचा वापर मुबलक प्रमाणात केला जात होता. नैसर्गिक रूपात सापडणार्‍या धातूंपैकी सोने हा पवित्र धातू म्हणून ओळखला जायचा. तज्ज्ञांच्या मते इजिप्तमध्ये फार पूर्वीच सोन्याचा शोध लागला असावा. तसे पुरावेही आहेत. सिंधू संस्कृतीतही सोन्याचा उपयोग अनेक कारणांसाठी होत असे. इतिहासातल्या नोंदी याची पुष्टी देतात. भारतीय संस्कृतीत सोन्याला देवतांचे प्रतीक मानलेले आहे. धार्मिक कार्यांमध्ये तसेच शुभकार्यात सोन्याचा वापर आजही प्रामुख्याने होतो. सुमेरियन संस्कृतीमध्ये इ. स.2500 च्या सुमारास सोने हे राजसत्तेचे आणि धर्माचे प्रतीक म्हणून वापरात होते. चीनमध्ये हान या राजवटीमध्ये तेथील राजपरंपरेत सोन्याचा वापर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केला जात होता. स्पॅनिश लुटारूंनी दक्षिण अमेरिका लुटली, तेव्हा त्यांना तेथे सोन्याचे खजिने सापडले. आजही इतिहासाच्या द़ृष्टीने ही घटना क्रूरतेचे प्रतीक आहे. सोन्याचा शोध अशा विविध घटनांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी लागत गेला. आजही खाणी बर्‍याच ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्या उत्खननामध्ये सापडतात. काही ठिकाणी जगामध्ये सोन्याचे साठे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, असे अंदाज वर्तवले जातात.

प्राचीन काळी ग्रीसमध्ये सोने हे पैसे किंवा धन स्वरूपात वापरले जायचे. ग्रीक लोक त्या कालावधीत भूमध्यसागरीय आणि मध्य पूर्व प्रदेशात 550 बीसीपर्यंत सोन्याच्या उत्खनन कार्यात गतिशील राहिले. अ‍ॅरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्या सिद्धांतानुसार सोने हे पाण्याशी संबंधित आहे. त्यांच्या तर्कानुसार सोने हे पाण्याच्या प्रवाहात सर्वप्रथम आढळले असे मानले जाते. दुसरी गोष्ट त्यासंबंधित अशी मानली जायची की, ते सूर्यप्रकाश आणि पाणी यांचे मिश्रण आहे. तसे पहिले तर जगात कुठल्याही वाहत्या नदीच्या पात्रात सोन्याचा स्रोत आढळू शकतो. प्रत्येक नदीमध्ये थोडेतरी सोने असतेच असे भूगर्भीय अहवालात स्पष्ट लिहिलेले आहे. सोने तयार होण्यासाठी तिथला खडक जास्त तापमानाला गरम होऊन लगेच थंड व्हावा लागतो. पृथ्वीच्या पोटातील उष्णतेमुळे सोन्याचे साठे तयार झालेले आहेत. बरेचसे सोने हे खडकाला चिकटून राहते, तेव्हा त्या खडकाचा भुगा करून पाण्याने तो स्वच्छ केला जातो. त्यातून सोने वेगळे केले जाते. समुद्रकिनार्‍यावरच्या वाळूतही सोने उपलब्ध असू शकते. अलास्काच्या बीचवर खूप प्रमाणात सोने मिळालेले आहे. सगळ्यात जास्त सोने उत्खननाचे काम चीनमध्ये होते. जागतिक स्तरावर आतापर्यंत सुमारे 2,44,000 टन सोन्याचा शोध लागलेला आहे. जमिनीखाली एकूण सोन्याचा स्रोत अजूनही सुमारे 57,000 टन इतका असण्याची शक्यता आहे. चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे सोन्याचे उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत. अमेरिकेमध्ये 8,133.46 टन इतका सोन्याचा साठा आहे. जर्मनी मध्ये 3,351.53 टन, इटलीमध्ये 2,451.84 टन, फ्रान्समध्ये 2,436.97 टन, रशिया 2,335 टन, स्वित्झर्लंड 1,040 टन, तर भारतामध्ये 880 पेक्षा काही अधिक टन सोन्याचे साठे आहेत.

चीनमधल्या हुनान प्रांतात उत्खननादरम्यान नुकताच सोन्याचा मोठा साठा सापडला. हुनानमधील पिंगजियांग काऊंटीमधील वांगु गोल्ड फिल्ड येथे मोठी सोन्याची खाण नुकतीच सापडली. या खाणीत 1000 टनांपेक्षा जास्त सोने असण्याची शक्यता आहे. या शोधामुळे चीनच्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण मानली जाते. चीनच्या लिओलिंग प्रांतात 1400 टनांहून अधिक सोने सापडले आहे. ही खाण सुमारे 6 लाख 91 हजार कोटी रुपये किमतीची असू शकते. चीनमध्ये कुनलून पर्वत भागात 1000 टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे. येथील शेडोंग प्रांतात लाओझोऊ येथील जियाडोंग मधील द्वीपकल्पावर 3,500 टनांपेक्षा जास्त सोने असल्याचे वर्तवले आहे. चीनमध्ये सापडलेले हे अनुक्रमे साठे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (ठइख) सोन्याच्या साठ्यापेक्षा तिप्पट आहे. गेल्या वर्षभरात भारताच्या शेजारी असणार्‍या चीन देशाला तब्बल तीनदा सोन्याचा खजिना मिळाला. सोन्याला देशाच्या आर्थिक मजबुतीचा आधार मानले जाते. कोणताही देश आपल्या केंद्रीय बँकेमध्ये सोन्याचा साठा जमा करून ठेवतो. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 880 टन सोने आहे. हे सोने देशाच्या परकीय चलन साठ्याचा भाग आहे. चीनचे सोन्याचे भांडार आजच्या स्थितीत भारतापेक्षा तिप्पटीने वाढले आहे. चीनच्या सोन्याच्या खाणीची किंमत 85.9अब्ज डॉलर्स इतकी आहे. या सोन्याच्या खाणीची तुलना दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध साऊथ डीप गोल्ड माईनशी केली जाते. जगातील एकूण सोने उत्पादनामध्ये चीनचा 10 टक्के इतका वाटा आहे.

जागतिक सोन्याच्या बाजारावर चीनचे वर्चस्व आहे. सोन्याने भरलेली एकूण 40 ठिकाणे चीनमध्ये 2 किलोमीटरच्या खोलीवर सापडली. 300 टन एवढे सोने तेथे सापडले. त्यानंतर थ्रीडी मॉडेलिंगच्या सहाय्याने माहिती घेतल्यानंतर आणखी एक सोन्याचा मोठा साठा निदर्शनास आला. या साठ्यांमुळे चीनच्या सोने उद्योगांवर मोठा फरक पडणार आहे. सोन्याचा उपयोग फक्त गुंतवणूक अगर चलन यामध्ये होत नसून त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस आणि हायटेक इंडस्ट्रीजमध्येदेखील होतो. आपल्या सूर्यमालेतील कोणताही ग्रह हा पूर्णपणे सोन्याने बनलेला नसला, तरी 16 सायकी या लघुग्रहामध्ये मात्र सर्वात आश्चर्यकारक प्रमाणात सोन्याशिवाय इतरही बरेच मौल्यवान धातू उपस्थित असल्याची शक्यता सांगितली जाते. मंगळ आणि गुरू ग्रहावर सोने या धातूची उपलब्धता कितीतरी ट्रिलियन किमतीची असू शकते; परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार सर्वात सुंदर सोने हे पृथ्वीवरच सापडते. त्याचे कारण असे की, सगळ्या तर्काला बाजूला केले, तर सोने हे पृथ्वीवर तयारच होते असे नाही; जरी त्याचे साठे, खाणी पृथ्वीवर असले, तरी त्याचा स्रोत लाखो प्रकाशवर्ष दूर असणार्‍या न्यूट्रॉन तार्‍यांमध्ये आहे. आतापर्यंत लोकांत हाच समज होता की, कोट्यवधी वर्षांपूर्वी सूर्यावर झालेल्या सौरस्फोटामुळे म्हणजेच सुपरनोवामुळे उडालेले कण वातावरणातून पृथ्वीवर आले. हे सारे कण म्हणजे सोने! असो..

असे काही नसले, तरी सोने हे 79 व्या क्रमांकाचे मूलद्रव्य आहे. तसेच सौर स्फोटामुळे प्लॅटिनम, पारा आणि अणुऊर्जेचा स्रोत युरेनियम धातू तयार झाले. या सर्व धातूंचा उगम पृथ्वीच्या वातावरणाबाहेर झाला असल्यामुळे सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू लाखो वर्षांपर्यंत आहे त्या स्थितीत राहतात. पृथ्वीवरील वातावरणामुळे त्यावर गंज चढत नाही. त्याची लवचिकता इतर कोणत्याही धातूपेक्षा प्रचंड क्षमतेची असते. न्यूट्रॉनच्या तार्‍यांमध्ये सूर्याइतकीच ऊर्जा स्थित असते. अब्जावधी वर्षापूर्वी झालेल्या न्यूट्रॉनच्या टकरींमुळे आगीचे लोळ तयार झाले. ते आकाशगंगेत विखुरले. त्याचे कण पृथ्वीतल्या मातीमध्ये मिसळले. हे कण म्हणजेच सोने होय. प्लॅटिनम, पारा आणि युरेनियम ही याच कथेचा एक हिस्सा आहेत. ‘नासा’च्या संशोधकांच्या मते, असे न्यूट्रॉनचे स्फोट सुमारे 10 हजार वर्षांतून एकदाच घडतात. ते उडणारे न्यूट्रॉनचे कण पृथ्वीवरच पडतील आणि त्याचे सोने होऊन खाणी तयार होतील असे नाही. ते संपूर्ण आकाशगंगेत कुठेही कोणत्याही ग्रहावर स्थिर होऊ शकतात. या क्रियेमुळे सोने पृथ्वीवरच नाही, तर इतर ग्रहांवरही काहीशा प्रमाणात उपलब्ध असू शकते. म्हणून सोने हा धातू दुर्मीळ आहे. त्याचे साठे कुठे मिळतील, हे अचूक ठरवणे कठीण आहे. योग्य माहितीद्वारे आणि पूर्वानुभवांचा अभ्यास करून पुरातत्त्व विभाग यामागे सक्रिय राहून या साठ्याचा शोध लावत असतात. सध्या चीनमध्ये या कामात यश मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT