सौ. सविता पोतदार (कौटुंबिक समुपदेशक)
आपल्या देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक घटस्फोट होतात. त्यातून अनेक कौटुंबिक समस्या निर्माण होतात. प्रामुख्याने अपत्यांवर गंभीर परिणाम होतात. त्यांची मानसिकता अस्थिर होते. घटस्फोट का होतात? ते कसे टाळावेत, याविषयी...
आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाण जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे; पण महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण जास्त, म्हणजे सुमारे 18.7 टक्के इतकं वाढलेलं आहे. दरवर्षी राज्यात 1 ते 1 लाख 36 हजार घटस्फोट होतात, असं आकडेवारी सांगते. ही आकडेवारी असंही सांगते की, भारतात अजूनही विवाहसंस्था मजबूत आहे; पण शहरी भागात घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. घटस्फोट म्हणजे विवाहाचा विग्रह. प्रेमीयुगुलांची फाटाफूट म्हणजे ब्रेकअप आणि विवाहित जोडप्यांची फाटाफूट म्हणजे घटस्फोट. घटस्फोट झाल्यानंतर पती-पत्नी, मुलं कुटुंब एकमेकांपासून तुटतात. एक कुटुंब उद्ध्वस्त होतं.
लग्नापूर्वी एकमेकांना ओळखणारी जोडपी म्हणजे प्रेम करणारी जोडपी जेव्हा विवाह करून एकत्र येतात, तेव्हा काही दिवसांनी त्यांना एकमेकांमधले दोष दिसायला लागतात. प्रेम करत असताना ते भरपूर एकत्र फिरतात, सतत भेटतात, आणाभाका घेतात; पण प्रेमाच्या धुंदीत त्यांना एकमेकांमधले दोष दिसत नाहीत. काहीतरी तडजोड करून एकत्र राहावं, असंही त्यांना वाटत नाही. मग, घटस्फोट हा मार्ग उरतो. आपली मन जुळलेली आहेत, आपल्याला कोणीही तोडू शकत नाही, असं त्यांना लग्नापूर्वी वाटत असतं; पण लग्नानंतर मात्र ही भावना बदलते. जुळलेली मनं तुटायला वेळ लागत नाही. ठरवून केलेल्या लग्नात ‘लग्न ही तडजोड आहे’ हे दोघांनी आणि दोघांच्या कुटुंबीयांनी मान्यच केलेलं असतं. त्यामुळे ही जोडपी दीर्घकाळ संसार करत राहतात. अगदी असह्य होईपर्यंत ते एकमेकांच्या जवळ राहतात. भले एकमेकांची तोंड बघण्याची इच्छा नसली, तरीही कुटुंबीयांच्या सौख्यासाठी ते एकत्र राहतात. मध्यंतरी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका सुनावणीदरम्यान ‘प्रेमविवाहातूनच घटस्फोटाची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. कारण, या विवाहामध्ये अनेकदा कुटुंबापेक्षा वैयक्तिक निवडीला महत्त्व दिलं जातं. त्यातूनच नंतर समस्या निर्माण होतात,’ असं म्हटलेलं आहे.
प्रेमविवाह असो की ठरवून केलेलं लग्न असो, घटस्फोटांचं कारण काय, हा विषय महत्त्वाचा आहे. एकमेकांची मनं जुळलेली नसतानाही ती जुळलेली आहेत, असं आधी वाटतं आणि नंतर अपेक्षाभंग होतो. ‘सून आणावी गरिबांच्या घरची आणि लेक द्यावी श्रीमंतांच्या घरी’ असं आपल्याकडे म्हटलं जातं; पण श्रीमंतांच्या घरची हाव मोठी असते आणि ही कुटुंबं हुंडा, आलिशान कार, बंगला यासाठी सुनेचा छळ करून आत्महत्या करायला भाग पाडतात, हे अलीकडच्या काही उदाहरणांवरून दिसून आलेलं आहे. जी सून खून किंवा आत्महत्येला बळी पडत नाही, ती कणखरपणे घटस्फोटाला सामोरी जाते. अर्थात, त्यासाठी माहेरचा नैतिक आणि खंबीर पाठिंबा असावा लागतो.
नवरा व्यसनाधीन असेल, तर तो पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो. गुटखा, तंबाखू, दारू ही व्यसनं नवर्याचं शरीर आणि संसार हे दोन्ही पोखरतात. त्याचं व्यसन अनावर झाल्यास संसार उद्ध्वस्त होतो व पत्नी घटस्फोटाचा निर्णय घेते. घटस्फोटामुळं कुटुंबाची होरपळ होते. अशावेळी नवर्यानं सोडायला हवं, त्यासाठी योग्य ते उपाय करायला हवेत. पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यावर पहिला धक्का बसतो तो अपत्यांना. त्यांचं पालनपोषण, शिक्षण, वयोमानानुसार होणारे शारीरिक- मानसिक बदल यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. मुलगीचे माहेरी अतिलाड झालेले असतील, तर ती हट्टी असू शकते. नवर्याच्या परिस्थितीचा विचार न करता ती सासरी नांदते. तिचा जास्त ओढा माहेराकडे असतो. त्यातली मोठी समस्या म्हणजे मुलीच्या आईचा तिच्या संसारात हस्तक्षेप वाढत जातो. मार्गदर्शन करणं, सूचना करणं हे वेगळं आणि मुलीच्या सासरघरी हस्तक्षेप करणं वेगळं. अशा हस्तक्षेपामुळं चांगले चाललेले संसार मोडल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. मुलीच्या आई- वडिलांनी मुलीच्या संसारावर तटस्थपणे लक्ष ठेवावं. लागेल ते सहकार्य तिला करावं; पण ढवळाढवळ मात्र करू नये. मुलीचा सासरी छळ होतो का? तिला मारहाण होते का? सारख्या मुलीच होतात आणि आता मुलगाच हवा म्हणून त्रास दिला जातो का? अशा गोष्टींकडे मुलीच्या आई-वडिलांनी अवश्य लक्ष दिलं पाहिजे; पण एरव्ही प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप टाळावा.
लग्नाच्या सुरुवातीच्या काळात पतीला पगार कमी असू शकतो. चारचाकी गाडी नसते, बंगला नसतो. पत्नीची हौसमौज होत नाही म्हणून ती रुसते, हे साहजिकच आहे; पण रुसणं किती ताणवायचं? तुटेपर्यंत ताणायचं का, याचा विचार पत्नीनं केला पाहिजे. आणखी एक गोष्ट अशी की, पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत का? असतील तर ते तत्काळ बंद करायला हवेत. अशाप्रसंगी पतीची कामवासना अती आहे का, याचा विचार केला पाहिजे. याउलट मला काही अशीही उदाहरणं आहेत की, पत्नीला शरीरसुख आणि मूल देण्याची पतीची क्षमता नाही म्हणून पत्नीनं घटस्फोट घेतला. असे असेल, तर पतीनं योग्य ते समुपदेशन आणि औषधोपचार घ्यायला हवेत आणि पत्नीनंही संयम आणि सामंजस्य राखायला हवं. कोणत्याही कारणानं घटस्फोटापर्यंत प्रकरण ताणलं, तर पती-पत्नीने सामंजस्यानं वागायलाच हवं, शिवाय यात दोन्ही घरच्या वडीलधार्या मंडळींची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आगीत तेल ओतण्याऐवजी ती विझेल कशी, हे पाहायला हवं, तर संसार टिकेल.