National status in India: कसा ठरवला जातो राष्ट्रीय दर्जा?  Pudhari
बहार

National status in India: कसा ठरवला जातो राष्ट्रीय दर्जा?

राष्ट्रीय दर्जा हा त्या त्या गोष्टीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सहभाग याचा विचार करून ठरवला जातो

पुढारी वृत्तसेवा
शरयू माने

राष्ट्रीय दर्जा हा त्या त्या गोष्टीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सहभाग याचा विचार करून ठरवला जातो. शिवाय, त्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता याचाही विचार केला जातो. भारत हा संस्कृती आणि ऐतिहासिक ठेवा, परंपरा जपणारा समृद्ध देश असल्याने या गोष्टींना खूप महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी, फुले, फळे यांच्याशी भावनात्मक नाते जोडण्यास, इथली संस्कृती दृग्गोचर होण्यास मदत होते.

आपल्या देशात प्राणी, पक्षी , फळे, फुले इत्यादींचा राष्ट्रीय दर्जा कसा ठरवला जातो, याचे सामान्य माणसाला बरंच कुतूहल असतं. या साऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण त्यापैकी एका श्रेष्ठ असणाऱ्याला वर्गवारीप्रमाणे दर्जा देतो. फळाफुलांमध्येही प्रातिनिधिक बाबी असतात. त्यामुळे त्यांचीही माणसांप्रमाणे श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी वर्गवारी होते. ज्यामुळे त्यांचे मूल्य ठरते.

आंबा हा फळांचा राजा आहे. तो फळवर्गाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे उच्च उत्पन्न अथवा मध्यमवर्गीय आपल्या खरेदीच्या श्रेणीत त्याला प्रथम स्थान देतात. त्याच्या किमतीही जास्त असतात. त्यामुळे हा फळांचा राजा लिलाव स्वरूपात विक्रीसाठी बाजारात येतो. सर्वसामान्यांना याला वाजत गाजत घरी आणावं लागतं आणि हा इतर फळांच्या गर्दीत मावणारा नाही. त्यामुळे स्वतंत्र जागा करून अलगद शाही स्थान मांडून व्यवस्था करावी लागते. त्याचं खराब होणंही परवडणारं नसतं. शिवाय हा घरी आला याची शेजाऱ्याला तो स्वतः वर्दी देतो. कारण, याच्या विशिष्ट चवीनुसार त्याचा सुवास ओळखला जातो.

फुलांचा राजा गुलाब हाही तसाच. आपल्या अप्रतिम सुगंधासाठी आणि कोमेजून गेल्यानंतरही चवीसाठी उपयोगात आणला जातो. गुलकंद बनून तो मुखवासाच्या पदार्थांमध्येही डोकावतो. या शाही फुलाच्या अस्तित्वानंतर तो त्याच्या स्वाद निर्मितीसाठी पुन्हा मसालेपानाचा शाहीपणा सिद्ध करण्यासाठी पान दरबारात म्हणजेच दुकानात हजर होतो. त्याच्या अप्रतिम सुगंधाच्या दर्जामुळे तो अत्तर आणि अगरबत्त्या, सौंदर्य प्रसाधने, देवपूजेत, लग्नकार्यात, इतर समारंभांत, माणसाच्या शेवटच्या कार्यापर्यंत तो कुठे ना कुठे राजेशाही थाटाची ग्वाही देऊन जातो. कोणाच्याही यशामधे याचाच आधी वाटा असतो. मग, तो त्या यशाला घेऊन सर्वांपर्यंत संदेशासोबत पोहोचतो. हा यशाचा वाहक आहे. कृष्ण जसा अर्जुनाच्या यशासाठी सारथी झाला, तसा गुलाब यशानंतर संदेशापर्यंत पोहोचण्यासाठी वाहकाच्या स्थानावर रुजू होतो.

कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. शास्त्रीयदृष्ट्या नेलूंबो न्युसिफेरा म्हणून ओळखले जाणारे हे फूल भारतीय संस्कृतीमध्ये पवित्रता, सौंदर्य, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हे चिखलात उमलूनही अलिप्त आणि सुंदर राहते, जे दिव्यत्वाची भावना दर्शवते. प्राचीन भारतीय कला, पौराणिक कथा आणि धर्मग्रंथांमध्ये याला विशेष स्थान आहे. कमळ हे सामान्यतः गुलाबी, निळ्या आणि पांढऱ्या रंगात आढळते. त्याची धार्मिक बाबींमध्ये जास्त उपयुक्तता आहे. विष्णू आणि लक्ष्मीचे प्रतीक कमळाचे फूल आहे. अधिक प्रभाव दर्शविण्यासाठी या प्रतीकाचा उपयोग केला जातो. राजकारणातही या प्रतीकाला स्वीकृती दिली आहे. सत्ता प्रदर्शनासाठी, पौराणिक कथांमध्ये याचा समावेश दिसून येतो. कमळ हे सौंदर्य, विद्या आणि समृद्धीचे प्रतीक मानलेले आहे.

पक्ष्यांचा राजा मोर का असावा, हा प्रश्न पडणे चुकीचे ठरेल. कारण, मोर सौंदर्याचं, शौर्याचं, धार्मिक घटनांचं प्रतिनिधित्व दर्शवतो. श्रीविष्णू हे श्रीरामाच्या अवतारात असताना त्यांनी आपल्या पिसांच्या साहाय्याने मार्ग दर्शविण्यात योगदान दिले. त्याचं ऋण कृष्णावतारात फेडण्यासाठी मुकुटात मोराचे पीस धारण केले. तसे वचन रामाने मोराला दिले. धार्मिक बाबीत मोराला राजेमहाराजे, त्याही आधी देवादिकांच्या राज्यातही इतर पक्ष्यांपेक्षा उच्च स्थान दिले होते. आजही आहे; पण लांडोरपेक्षा मोर आपल्या पिसारा फुलविण्याच्या कौशल्यामुळे, सौंदर्य प्रदर्शनामुळे अधिक उठावदार ठरतो.

प्राण्यांमध्ये पूर्वी सिंह अग्रस्थानी होता. त्यामुळे त्याला प्राण्यांचा राजा म्हणून ओळखले जायचे. सर्वात जास्त ताकदवान आणि हिंस्र असल्यामुळे त्याची दहशत होती. आकारमानाने सर्वात मोठा आणि त्याच्या ऐटबाज आणि शिकारी वृत्तीमुळे त्याला तो दर्जा प्राप्त झालेला होता. इतर गोष्टींच्या मानाने प्राण्यांमधील वर्गवारी आणि श्रेष्ठत्व ठरवणे ही गोष्ट महत्त्वाची होती. कारण, सर्वात जास्त उपद्रव त्याची वर्गवारी ही प्राण्याच्या वर्गवारीला सहायक ठरणारी होती. गायीचा उत्पादन आणि संवर्धनात महत्त्वाचा सहभाग असला, तरी ताकदीप्रमाणे प्राण्यांची श्रेष्ठ, कनिष्ठ अशी वर्गवारी होत असल्याने सिंहाला प्रथम दर्जा मिळाला. जंगलांचे रक्षण, वन विभागाच्या संपत्तीमध्ये मोलाचा सहभाग हिंस्र प्राण्यांपैकी सिंहाचा वाटा जास्त होता.

आता त्याची जागा रॉयल बंगाली टायगर या वाघाच्या एका सर्वात ताकतवान प्राण्याने घेतली आहे. या रॉयल बंगाली टायगरच्या प्रजातीला 1972 मध्ये इंदिरा गांधी सरकारने राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले. या प्रजातीला नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी प्रोजेक्ट टायगर चालू करण्यात आले. याला ‌‘पँथेरा टायग्रीस‌’ असे संबोधतात. याचे शास्त्रीय वर्गीकरण म्हणजे ‌‘ढाण्या वाघ‌’ असे आहे. हा मर्जर कुळातला आहे. 2010 पासून 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दीन म्हणून ओळखला जातो. या संरक्षित प्राण्याची शिकार दंडनीय आहे. शिकार करणाऱ्याला शिक्षा दिली जाते. पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत, बालीपर्यंत वाघांची संख्या अधिकतम होती.

नंतर 20 व्या शतकाच्या सुरुवातीला वाघांची संख्या 93 टक्क्यांपेक्षा कमी आली. पश्चिम मध्य आशिया, जावा आणि बाली बेट आग्नेय, दक्षिण आशिया आणि चीनच्या मोठ्या भागातून वाघांची संख्या लोप पावली. सध्या वाघांची प्रजाती सुमात्रापासून ते उपउष्णकटिबंधीय ते उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. वाघाची प्रजाती ही लुप्त प्रजाती म्हणून सूचीबद्ध केलेली आहे. भारत हा सर्वात जास्त वाघांचे अस्तित्व असणारा देश आहे. जंगलं नष्ट झाल्यामुळे वाघांच्या संख्येवर परिणाम होताना दिसत आहे. तसेच, शिकार हाही त्यामागचं मोठं कारण आहे. त्यासाठी सरकारने वाघांच्या शिकारीवर बंदी आणली आहे. भारत हे वाघांचे माहेरघर मानले जाते. जंगली वाघ हा थायलंड, भारत, ब्रह्मदेश, चीन, रशिया या देशात आढळतो. वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग हा प्राणी संग्रहालयात आढळतो.

2019 पर्यंत वाघांची संख्या 2,967 इतकी झाली. 2014 मध्ये 2,226 वाघ होते. बिबट्याप्रमाणे वाघ हा कोणत्याही जंगलात राहणारा प्राणी नाही. सुंदरबनातील खारपुटीच्या विविध जंगलांमध्ये वाघाचे वास्तव्य आहे. त्याचे शिकारीचे क्षेत्र हे बिबट्यापेक्षा जास्त असते. साधारण 100 चौ.की.मी. इतके क्षेत्र वाघाला शिकारीसाठी लागते. त्यामुळे वाघ हा मोठ्या जंगलात वास्तव्यास असतो. बिबट्या शेतवडी आणि आड रस्त्याने कुठेही शिकारीसाठी फिरताना आढळून येतो. सायबेरियन वाघ सर्वात मोठा असतो. साधारणपणे 3.5 मीटर लांबी आणि 300 किलो वजन हे या वाघाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय वाघ 100 ते 180 किलो वजनाचे असतात. वाघांना ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याच्या अंगावरील पट्टे! वाघाच्या अंगावर किमान 100 पर्यंत गडद पट्टे असतात. प्रत्येक वाघाच्या पंजाची ठेवण वेगळी असते. तो 6 ते 8 इंच इतका मोठा असतो; पण वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते. त्याचे पायाचे ठसे जंगलात कुठेही लगेच ओळखून येतात.

एक वाघ दुसऱ्या वाघाला आपल्या क्षेत्रात येऊ देत नाही. वाघीण शावकाला म्हणजे बछड्याला अर्धमेल्या सावजाची शिकार करायला शिकवते. शिकारीचे प्रशिक्षण हे लहान असल्यापासूनच बछड्याला दिले जाते. वाघिणीचे शिकारीचे क्षेत्र 15 ते 20 चौ. की.मी. असते. मूत्राच्या फवाऱ्याने वाघ आपले क्षेत्र आखतात. वाघीण किंवा वाघ झाडांवर नखांच्या ओरखड्यानेही क्षेत्र आखतात. वाघ मांसभक्षक असून 1050 पीएसआय इतकी भक्ष चावून खाण्याची क्षमता त्याच्यात असते. वाघाची एक झेप 5 ते 6 मीटरपर्यंत जाते. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. आदिवासी लोक वाघाचे मंदिर करतात. त्याला पूजतात. वाघाला ते देव मानतात. कारण, त्याचा कोप होऊ नये, ही त्यामागची भावना असते. महिषासुरमर्दिनीचे वाहन म्हणून वाघ धार्मिक पूजेत विराजमान आहे. लहान मुलांसाठी तो जंगलाचा राजा आहे. वाघांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. त्यांच्या शिकारीवर नियंत्रण, उन्हाळ्यामध्ये कोरड्या पडलेल्या पाणवठ्यांवर जंगलांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून संरक्षणासाठी चौथरे आगर उंचावरील जागांची निर्मिती, वाघांचे पुनर्वसन करणे, एखाद्या जंगलामध्ये वाघांची संख्या जास्त झाली, तर त्यांचे दुसऱ्या जंगलात पुनर्वसन करणे, हे उपक्रम राबविले जातात. भारतातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रयत्न म्हणजे वाघांच्या विकासासाठी आदर्श उपाययोजना आहे.

राष्ट्रीय चलन म्हणजे 1 रुपया आहे. यावर डॉलरची किंमत वाढली की कमी झाली, याची सुनिश्चिती होते. अर्थात, डॉलर्स आणि रुपया हे चलन निर्धारित करण्याची साधने आहेत. भारतामध्ये रुपया हे राष्ट्राचे चलन आहे. या चलनाची डॉलरशी तुलना केली, तर 1 डॉलर सर्वसाधारणपणे 90 रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये कालांतराने बदल होत राहतो. भारताचे राष्ट्रगीत ‌‘जन गण मन‌’ आणि राष्ट्रीय गीत ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ हे आहे. ‌‘जन गण मन‌’ हे एखाद्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या सुरुवातीस आणि ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ हे कार्यक्रमाची सांगता करताना म्हटले जाते. त्यातून देशाच्या यशोगाथा गायिल्या जातात. यात गौरव प्रदान करणारे उल्लेख असतात. राष्ट्रीय झेंडागीत हे ‌‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा‌’ हे असून हे झेंड्याच्या सन्मानासाठी गायिले जाते. यात देशासाठी केलेला त्याग, देण्यात आलेले बलिदान, मिळवलेला विजय याचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT