राजीव मुळ्ये
हिमालयीन मोनाल हा भारताच्या पर्वतीय जैवविविधतेतील सर्वांत देखणा पक्ष्यांपैकी एक. नर मोनालच्या पिसांवर जणू इंद्रधनुष्य उतरलेले असते. सूर्यप्रकाशात त्याच्या डोक्यापासून पाठीपर्यंत हिरवा, निळा, जांभळा, तांबूस आणि सोनेरी रंग चमकतो. मादी मात्र तपकिरी आणि तुलनेने साध्या रंगाची असते. घरट्यात बसताना आसपासच्या जमिनीत आणि वनस्पतींमध्ये मिसळून जाण्यासाठी ही रंगरचना उपयोगी ठरते. यामुळे शत्रूंपासून तिचे रक्षण होते. उत्तराखंडचा हा राज्यपक्षी ओक आणि रोडोडेंड्रॉनची जंगले, उपअल्पाईन आणि अल्पाईन प्रदेश, बुग्याल तसेच उंच पर्वतीय उतारांमध्ये आढळतो. मोर आणि तितर कुळातील (फेझंट) हा पक्षी प्रामुख्याने भारत, नेपाळ, भूतान आणि दक्षिण तिबेट या भागांतील उंच पर्वतीय प्रदेशात आढळतो. नेपाळमध्ये याला ‘दानफे’ असे म्हणतात आणि तो नेपाळचा राष्ट्रीय पक्षी आहे. समुद्रसपाटीपासून २,१०० ते ४,५०० मीटर उंचीवर राहणार्या मोनालचे कीटक, लहान भुंगेरे, वनस्पतींची मुळे आणि बिया हे मुख्य अन्न आहे. तो आपल्या मजबूत चोचीने जमीन उकरून अन्न शोधतो. आता याच पक्ष्याच्या आवाजात माणसामुळे बदल होत असल्याचे वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे. शांत वातावरणात स्पष्ट ऐकू येणारा त्याचा नैसर्गिक आवाज मानवनिर्मित कोलाहलात हरवून जाऊ नये, यासाठी हा पक्षी मोठ्या आवाजात ओरडण्याचा प्रयत्न करत आहे.
हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात मानवनिर्मित आवाज अधिक असलेल्या भागातील हिमालयीन मोनाल आपल्या हाकेची सर्वोच्च वारंवारता वाढवत असल्याचे आणि काही प्रमाणात हाकेचा कालावधीही लांबवत असल्याचे आढळले. याबाबतचे संशोधन 'बिहेवियरल प्रोसेसेस' या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. अभ्यासात मोनालच्या ७१९ हाकांच्या ध्वनिमुद्रणांचे विश्लेषण करण्यात आले. ध्वनिमुद्रणे एप्रिल २०२३ ते जून २०२४ या काळात करण्यात आली होती. संशोधकांनी तुलनेने शांत असलेल्या मदमहेश्वर खोर्यातील मोनालच्या आवाजाची तुलना केदारनाथ कस्तुरीमृग अभयारण्यातील चोपटा खोर्यातील आवाजाशी केली. चोपटा परिसर रस्त्याच्या जवळ आहे. यात्रेकरू, पर्यटक, ट्रेकर्स, वाहने आणि इतर मानवी हालचालींमुळे तेथील पार्श्वध्वनी तुलनेने अधिक आहेत. मानवनिर्मित आवाज वाढल्यावर पक्ष्याने आपला आवाज उच्च वारंवारतेकडे नेल्याचे ध्वनिमुद्रणांच्या विश्लेषणातून दिसले.
यामागील कारण समजणे महत्त्वाचे आहे. वाहतूक, इंजिने आणि अनेक मानवी यंत्रांचा आवाज प्रामुख्याने कमी वारंवारतेच्या पट्ट्यात असतो. पक्ष्याची हाक त्याच ध्वनीपट्ट्यात राहिली, तर ती झाकली जाऊ शकते. साथीदार, पिल्ले किंवा इतर पक्ष्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी त्याला स्वतःच्या आवाजाची वारंवारता बदलावी लागू शकते. अभ्यासात नैसर्गिक अधिवासातील हाकेच्या तुलनेत गोंगाट असलेल्या परिसरातील मध्यम सर्वोच्च वारंवारता सुमारे १७१ हर्ट्झने अधिक असल्याचे आढळले. उच्च वारंवारतेच्या टोकाला आवाजाचा परिणाम अधिक स्पष्ट होता आणि सांख्यिकीय प्रतिमानाने तेथे सर्वोच्च वारंवारतेतील बदलांपैकी सुमारे ७३.४ टक्के बदल स्पष्ट केला. पहिल्या नजरेत ही बाब मोनालच्या अनुकूलन क्षमतेचे उदाहरण वाटू शकते. वातावरण बदलले आणि पक्ष्याने आपली संवादपद्धती बदलली, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो; मात्र अनुकूलन म्हणजे संकट संपले असा अर्थ होत नाही. पक्ष्याला माणसाच्या आवाजातून मार्ग काढण्यासाठी स्वतःचा नैसर्गिक स्वर बदलावा लागत आहे, हे पर्यावरणीय ताणाचे लक्षण आहे.
हिमालयातील जंगल कधीच पूर्ण शांत नसते. वार्यात हलणारी झाडे, ओढे, धबधबे, कीटक, सस्तन प्राणी आणि इतर पक्ष्यांच्या आवाजांनी तेथील नैसर्गिक ध्वनिविश्व तयार झाले आहे. या आवाजांसोबत पर्वतीय जीवसृष्टी हजारो वर्षे विकसित झाली. वाहनांचे इंजिन, मोठ्या आवाजातील संगीत, बांधकाम आणि हेलिकॉप्टर यांचा ध्वनी मात्र त्या नैसर्गिक परिसंस्थेचा भाग नाही. त्यामुळे प्रश्न केवळ डेसिबलचा नसून नैसर्गिक ध्वनिविश्वात नव्याने घुसलेल्या आवाजाचा आहे. मोनाल पक्ष्याच्या आयुष्यात आवाजाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो आणि मादी त्याला प्रतिसाद देत; मात्र पर्यटनाचा गोंगाट आणि गाड्यांच्या कर्कश आवाजामुळे या नराचा आवाज मादीपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. प्रजननाची ही हाक वेळेवर आणि स्पष्टपणे पोहोचली नाही, तर पक्ष्यांच्या पुढील पिढीच्या जन्मावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. संशोधकांनी अजून या बदलाचा प्रजननावरील थेट परिणाम पूर्णपणे सिद्ध केला नसला, तरीही वाढता गोंगाट पक्ष्यांच्या जैविक साखळीला धोका निर्माण करत आहे.