Rohtash Khileri | आकांक्षांपुढती जिथे... File Photo
बहार

Rohtash Khileri | आकांक्षांपुढती जिथे...

पुढारी वृत्तसेवा

विनायक सरदेसाई

हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रोहताश खिलेरी याने जागतिक गिर्यारोहण क्षेत्रात एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एल्ब्रुसवर 5 हजार 642 मीटर उंचीवर विनाप्राणवायू 24 तास वास्तव्य करण्याचा पराक्रम त्याने केला आहे. हे शिखर सर करणे म्हणजे मृत्यूच्या दारात राहून निसर्गाच्या जटिल आव्हानांशी दिलेली झुंज होती.

गिर्यारोहण क्षेत्रात शिखराची चढाई करणे आणि तिथून त्वरित खाली उतरणे हा सर्वसाधारण नियम असतो; मात्र प्रतिकूल हवामानात आणि विरळ प्राणवायूमध्ये एखाद्या शिखरावर दीर्घकाळ मुक्काम करणे हे जीवावर बेतू शकते. रोहताश खिलेरी या गिर्यारोहकाने युरोपमधील सर्वोच्च शिखर असलेल्या 5,642 मीटर उंचीच्या माऊंट एलब्रूसवर 24 तास राहून नवा जागतिक कीर्तिमान रचला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या संपूर्ण कालावधीत कृत्रिम प्राणवायूची मदत घेतली नाही. हा पराक्रम म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आठ वर्षांच्या कठोर परिश्रमांचे फळ आहे. यापूर्वी अनेक भारतीय गिर्यारोहकांनी या शिखरावर पाऊल ठेवले असले, तरी इतक्या प्रदीर्घ काळ तिथे थांबणारा रोहताश हा पहिलाच मानव ठरला आहे.

माऊंट एलब्रूस हे रशियातील कॉकेशस पर्वतरांगेत स्थित आहे. हे शिखर त्याच्या तीव्र उतारांसाठी, वेगवान वार्‍यांसाठी आणि गोठवणार्‍या थंडीसाठी ओळखले जाते. 18,510 फूट उंचीवर असलेल्या या शिखरावर हवेचा दाब अत्यंत कमी असतो. यामुळे फुफ्फुसांना आवश्यक प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. साधारणपणे 5000 मीटरच्या पुढे प्राणवायूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होते. अशा स्थितीत मानवी शरीराची कार्यक्षमता कमालीची घटते; मात्र रोहताश खिलेरी यांनी या नैसर्गिक आव्हानांचा सामना करत स्वतःला सिद्ध केले. त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगताना नमूद केले की, हा प्रवास अत्यंत वेदनादायक आणि संघर्षाचा होता. हा केवळ एक विक्रम नसून त्यांच्यासाठी ते एक वेडे स्वप्न होते. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपल्या शरीराची पर्वा केली नाही.

विज्ञानाच्या द़ृष्टिकोनातून पाहिले, तर अशा उंचीवर 24 तास राहणे ही शरीरशास्त्राची मोठी परीक्षा असते. शास्त्रज्ञांच्या मते, गिर्यारोहक जेव्हा वेगाने शिखर चढतात आणि उतरतात, तेव्हा त्यांच्या शरीराची झीज मर्यादित असते. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती तिथे स्थिर राहते, तेव्हा शरीरातील प्राणवायूची कमतरता किंवा हायपोक्सिया वाढू लागतो. रक्तातील तांबड्या पेशींची निर्मिती वाढली, तरी हृदयावर येणारा ताण असह्य होतो. रोहताश यांनी या आव्हानाचा सामना करण्यासाठी विशेष मानसिक प्रशिक्षण घेतले होते. अशा उंचीवर मेंदूची निर्णयक्षमता मंदावते आणि भ्रम होऊ लागतात. थंडीमुळे शरीरातील उष्णता वेगाने कमी होते आणि हायपोथर्मियाचा धोका निर्माण होतो. उणे 40 ते उणे 50 अंश सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या थंडीत आणि तासी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यात रोहताश यांनी स्वतःला जिवंत ठेवले, हे खरोखरच अविश्वसनीय वाटावे, असे साहस आहे.

रोहताश यांनी 2018 पासून या शिखरावर चढाई करण्याचे अनेक प्रयत्न केले होते; मात्र कधी खराब हवामानामुळे, तर कधी आपत्कालीन परिस्थितीमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. एका मोहिमेदरम्यान त्यांना फ्रॉस्टबाईटचा फटका बसला आणि त्यांना त्यांच्या हाताची दोन बोटे गमवावी लागली. शारीरिक अपंगत्व आले, तरी त्यांच्या मनातील जिद्द कमी झाली नाही. उलट त्या अपयशाने त्यांना अधिक बळ दिले. यावेळी त्यांनी एकट्याने चढाई करण्याचा निर्णय घेतला. इतक्या भीषण थंडीत त्यांच्यासोबत थांबायला कोणीही तयार नव्हते, तरीही ते मागे हटले नाहीत. शिखरावर तिरंगा फडकवत त्यांनी संपूर्ण जगाला भारताच्या आणि भारतीयांच्या सामर्थ्याची प्रचिती करून दिली. या विक्रमाचे महत्त्व केवळ गिर्यारोहणापुरते मर्यादित नाही. याचे वैज्ञानिक महत्त्व अंतरिक्ष विज्ञान आणि ध्रुवीय संशोधनात मोलाचे ठरणार आहे. अंतराळवीर जेव्हा प्राणवायू मर्यादित असलेल्या ठिकाणी काम करतात, तेव्हा त्यांच्या शरीरावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी रोहताश यांचा हा अनुभव अत्यंत उपयुक्त ठरेल, असे काहींचे म्हणणे आहे. तसेच, बचाव पथकांना अतिउंचीवर काम करताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यावर मात कशी करायची, यासाठी या विक्रमातून मिळणारी माहिती मार्गदर्शक ठरू शकेल. मानवी शरीराच्या कार्यक्षमतेच्या सीमा नेमक्या कुठे आहेत, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

माऊंट एलब्रूसवर याआधीही भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. जून 2025 मध्ये पंजाबच्या अवघ्या 7 वर्षांच्या तेगबीर सिंगने हे शिखर सर केले होते. तसेच नरेंद्र यादव यांनी तीन वेळा या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अंकित मलिक यांनी 78 मीटर लांबीचा तिरंगा या शिखरावर फडकवला होता, तर शरद कुलकर्णी यांनी 59 व्या वर्षी हे शिखर सर करून आपली जिद्द दाखवून दिली होती. या सर्वांच्या कामगिरीमध्ये रोहताश खिलेरी यांचा 24 तासांचा मुक्काम हा एक वेगळा आणि अत्यंत कठीण टप्पा मानला जात आहे.

हा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर रोहताश यांनी समाजमाध्यमांवर आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, हा आठ वर्षांचा प्रवास, संघर्ष आणि प्रतीक्षा आज सफल झाली आहे. त्यांच्या चेहर्‍यावर बर्फाचे थर साचलेले असतानाचा व्हिडीओ पाहून त्यांनी किती कठीण परिस्थितीचा सामना केला असेल, याची कल्पना येते. हा विजय त्यांनी आपल्या समर्थकांना आणि प्रशिक्षकांना समर्पित केला आहे. रोहताश खिलेरी यांची ही कथा येणार्‍या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. मानवी इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर निसर्गाच्या कोणत्याही संकटावर मात करून अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करता येते, हेच यातून सिद्ध होते.

या संपूर्ण प्रक्रियेत मानसिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे असते. शारीरिक शक्तीपेक्षाही मनाची एकाग्रता अशावेळी कामाला येते. विरळ हवेत श्वास घेताना येणारी अडचण आणि शरीरातील ऊर्जेचा होणारा वेगवान र्‍हास यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोहताश यांनी केलेल्या योगाभ्यासाचा आणि शिस्तीचा मोठा वाटा आहे. गिर्यारोहण हा केवळ क्रीडा प्रकार नसून ती एक जीवनशैली आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे जागतिक गिर्यारोहण नकाशावर भारताचे नाव पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. त्यांच्या या विक्रमामुळे केवळ गिर्यारोहकांनाच नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीत लढणार्‍या प्रत्येक व्यक्तीला नवी उमेद मिळाली आहे. निसर्गाचे रौद्र रूप समोर असूनही शांत चित्ताने आपल्या ध्येयावर ठाम राहणे, हाच संदेश या विक्रमातून मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT