Iran Israel cyber war Pudhari
बहार

iran israel war: अत्याधुनिक रणसंग्रामाचा थरार

israel iran war cyber and electronic warfare operations: शत्रूच्या मानसिकतेवर आघात करण्यापासून ते सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यापर्यंत या सायबर वॉरफेअरची व्याप्ती वाढली आहे.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. योगेश प्र. जाधव

आखातातील संघर्षाने दुसर्‍या महिन्यात प्रवेश केला असून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांनुसार हा संघर्ष इतक्यात संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. तांबडा समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे जागतिक इंटरनेट केबल्सचे मुख्य मार्ग आहेत. तांबड्या समुद्रातून जाणार्‍या 17 केबल्स युरोप, आशिया आणि आफ्रिकेला जोडतात. इराणने या केबल्सना लक्ष्य केले, तर त्याचे परिणाम भयावह असतील. 2024 मध्ये लाल समुद्रातील केबल दुरुस्त करण्यासाठी सहा महिने लागले होते. आता तर हा प्रदेश युद्ध क्षेत्र बनल्याने विशेष दुरुस्ती जहाजे तिथे जाणे अशक्य आहे.

आखातातील युद्धामध्ये इराण, इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती, कतार, ओमान यांसह विविध देशांमधील साधनसंपत्ती, नैसर्गिक संसाधने, स्थावर मालमत्ता, तेल शुद्धीकरण प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. द़ृश्य रूपात दिसणार्‍या या घनघोर संघर्षामागे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने छुपे युद्धही तितक्याच जोरदारपणे सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा, अल्गोरिदमचा, मालवेअर्सचा या युद्धातील वापर तंत्रज्ञानाची संहारकता किती भेदक आहे, याची प्रचिती देणारा ठरला आहे. शत्रूच्या मानसिकतेवर आघात करण्यापासून ते सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यापर्यंत या सायबर वॉरफेअरची व्याप्ती वाढली आहे.

मे 2021 मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धाला इस्रायली माध्यमांनी ‘जगातील पहिले एआय युद्ध’ असे संबोधले होते. तेव्हापासून आजपर्यंत मध्य पूर्वेतील लष्करी मोहिमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ वाढलाच नाही, तर तो अत्यंत गुंतागुंतीचा आणि घातक झाला आहे. आज इस्रायलपासून इराणपर्यंत आणि अमेझॉनपासून गुगलसारख्या बड्या तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत सर्वच घटक या ‘एआय’ युद्धाच्या जाळ्यात ओढले गेले आहेत; मात्र या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे उल्लंघन होत असून, नागरी वस्त्या आणि निष्पाप लोकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

इराणचे सर्वेसर्वा असणार्‍या अयातुल्ला खोमेनी यांना अचूकपणाने टिपण्यात इस्रायल आणि अमेरिकेला मिळालेल्या यशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने मोलाची भूमिका बजावली. इराणने आपल्या देशांतर्गत सुरक्षेसाठी इंटरनेटवर कडक निर्बंध लादले आहेत; मात्र हेच निर्बंध त्यांच्यासाठी ‘बूमरँग’ ठरले. सर्व इंटरनेट डेटा एका विशिष्ट केंद्रामधून जात असल्याने इस्रायली हॅकर्सना या एकाच केंद्रावर हल्ला करून संपूर्ण देशाच्या माहितीवर ताबा मिळवणे सोपे झाले आहे. या शिरकावामुळे इस्रायलला इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस् आणि लष्करी तळांमधील सर्व गुप्त चर्चा ऐकता आल्या.

इस्रायलकडील प्रगत तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे एखादे क्षेपणास्त्र डागले जाते, तेव्हा त्या क्षेपणास्त्राला हवेत असतानाही सूचना दिल्या जातात. शत्रूने आपले ठिकाण बदलले, तर क्षेपणास्त्र स्वतःचा मार्ग बदलून नवीन ठिकाणी जाऊन धडकते. या अचूकतेमुळेच इस्रायलने गेल्या काही काळात इराणमधील 250 हून अधिक वरिष्ठ नेत्यांना आणि लष्करी अधिकार्‍यांना अचूक टिपले आहे. या मोहिमेला ‘डीकॅपिटेशन कॅम्पेन’ (नेतृत्व संपुष्टात आणण्याची मोहीम) असे नाव देण्यात आले होते.

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’मध्ये अवघ्या 24 तासांत इराणमधील 1,000 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये एआयच्या मदतीने पाळत ठेवून अतिशय वेगाने निर्णय घेण्यात आले. आधुनिक प्रणाली डेटाचे विश्लेषण इतक्या वेगाने करते की, मानवी डोळ्यांना किंवा मेंदूला तेवढ्या वेळात निर्णय घेणे अशक्य असते. या लष्करी तंत्रज्ञानाच्या मागे अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एआय यांसारख्या बलाढ्य व्यावसायिक कंपन्यांचे जाळे आहे. ‘प्रोजेक्ट निंबस’ अंतर्गत इस्रायलने अमेझॉन आणि गुगलसोबत 1.2 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. या करारानुसार इस्रायलच्या संरक्षण कंपन्यांना या कंपन्यांच्या ‘क्लाऊड सर्व्हिसेस’ वापरणे अनिवार्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कंपन्यांनी आपल्या वापराच्या नियमांमध्ये हळूच बदल करून राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली शस्त्रास्त्रे आणि पाळत ठेवण्यासाठी एआय वापरण्याची परवानगी दिली आहे.

इराणची तंत्रज्ञान क्षमता कदाचित रशिया किंवा अमेरिकेच्या तोडीची नसेल; मात्र त्यांची ‘असिमेट्रिक’ युद्धपद्धती अत्यंत प्रभावी आहे. ते कमी खर्चात जास्तीत जास्त नुकसान करण्यावर भर देतात. इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या प्रमुखांच्या पत्नीचा फोन हॅक करून माहिती सार्वजनिक करणे असो किंवा इस्रायली बँकांवर सायबर हल्ले करणे असो, इराण सातत्याने इस्रायलच्या ‘सॉफ्ट टार्गेट’ना लक्ष्य करत आहे. इराणशी संबंधित सुमारे 50 हॅकिंग गटांनी अमेरिका आणि इस्रायलमधील 5,800 हून अधिक कंपन्यांवर सायबर हल्ले केले आहेत. ‘चेक पॉईंट’ या सुरक्षा संस्थेच्या मते, इराण सायबर हल्ल्यांचा वापर करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी अचूक दिशादर्शन मिळवत आहे. सायबर तंत्रज्ञान आणि लष्करी शक्तीचे हे एक घातक मिश्रण आहे.

नुकत्याच झालेल्या इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी इस्रायली नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी एक नवीन पद्धत वापरण्यात आली. इस्रायलमधील हजारो नागरिकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश प्राप्त झाले. हे संदेश इस्रायली लष्कराकडून (आयडीएफ) आल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. क्षेपणास्त्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी हे अ‍ॅप डाऊनलोड करा, असे आवाहन त्यात करण्यात आले होते. प्रत्यक्षात तो एक सापळा होता. त्याच्या माध्यमातून लोकांची अत्यंत खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न झाला. यानंतर सुरू झाली ती धमक्यांची मालिका. ‘नेतान्याहू यांचा अंत झाला आहे, आता नरकाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले आहेत,’ अशा आशयाचे संदेश पाठवून संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न इराणच्या सायबर सैन्याने केला. हे केवळ हिमनगाचे टोक आहे. इराणचे सायबर सैन्य ही आजच्या काळात त्यांची सर्वात मोठी शक्ती मानली जाते. त्यांच्या हातात रायफली नसल्या, तरी त्यांचे ‘कोडिंग’ क्षेपणास्त्रांइतकेच भेदक आहे. इराणचे सायबर योद्धे अहोरात्र कार्यरत असून ते अमेरिकन आणि इस्रायली फायरवॉल्स भेदण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहेत.

या सायबर युद्धाची उद्दिष्टे बहुआयामी आहेत. यात केवळ गोंधळ माजवणे किंवा गुप्त माहिती मिळवणे इतकाच हेतू नसून, क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी अचूक समन्वय साधणे हादेखील एक मोठा भाग आहे. इराणचे हे सायबर संचलन प्रामुख्याने ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी) आणि त्यांच्या गुप्तचर मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली चालते. यामध्ये अनेक स्वतंत्र हॅकर्स आणि स्वयंसेवी संस्थांचाही समावेश आहे, जेणेकरून कोणत्याही हल्ल्याची अधिकृत जबाबदारी इराणवर टाकता येणार नाही. या युद्धाची दाहकता एका ताज्या घटनेवरून स्पष्ट होते. अमेरिकेतील ‘स्ट्रायकर’ या मोठ्या वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनीवर इराणशी संबंधित ‘हंडाला’ या हॅकिंग गटाने हल्ला केला. यामुळे हजारो कर्मचार्‍यांचे संगणक लॉक झाले आणि अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. इतकेच नव्हे, तर या गटाने एफबीआय संचालक काश पटेल यांची खाजगी माहिती चोरल्याचा दावाही केला आहे.

अमेरिका आणि इस्राईलने 2009 मधील ‘स्टक्सनेट’ व्हायरसने इराणच्या अणुप्रकल्पाचे कंबरडे मोडले होते, हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. आताच्या संघर्षातही इस्रायलने इराणच्या अंतर्गत यंत्रणांमध्ये मोठी घुसखोरी केली आहे. इस्रायलने तेहरानमधील जवळजवळ सर्व ट्रॅफिक कॅमेर्‍यांचे नियंत्रण मिळवले होते. या माहितीचा वापर करून इराणच्या सर्वोच्च नेत्यांवर पाळत ठेवणे आणि लष्करी हालचालींवर लक्ष ठेवणे इस्रायलला शक्य झाले. इतकेच नाही, तर इराणमधील एका लोकप्रिय धार्मिक अ‍ॅपच्या माध्यमातून लाखो इराणी नागरिकांना ‘शरणागती’ पत्करण्याचे संदेश पाठवून इस्रायलने मानसिक युद्धात बाजी मारण्याचा प्रयत्न केला.

या सर्व संघर्षात इराणने अद्याप इस्रायल किंवा अमेरिकेच्या मुख्य ऊर्जा किंवा पाणीपुरवठा यंत्रणांवर मोठा हल्ला केलेला नाही; पण इराणने अशा यंत्रणांमध्ये गुप्तपणे शिरकाव केला असून ते योग्य संधीची वाट पाहत असावेत अशी भीती व्यक्त केली जाते.

पहिला बळी सत्याचा
आधुनिक युद्धात पहिला बळी सत्याचा जात आहे. एआयच्या मदतीने तयार केलेले ‘डीपफेक’ फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरवले जात आहेत. अमेरिकन युद्धनौका बुडाल्याचे किंवा एखादा मोठा विजय मिळाल्याचे खोटे व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचवले जाताहेत. यामुळे सैनिकांचे मनोधैर्य खचते आणि सामान्य जनतेत गोंधळ निर्माण होतो. रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी या तंत्रात प्राविण्य मिळवले असले, तरी इराणही या शर्यतीत मागे नाही. त्यांनी अमेरिकन निदर्शकांचे बनावट ‘प्रोफाईल्स’ तयार करून इस्रायलविरोधी निदर्शने भडकवण्याचे प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

आणखी एका भीतीने सध्या संपूर्ण जगाला घेरले आहे, ते म्हणजे इंटरनेट केबल्स ! इराणने 28 फेब्रुवारी 2026 रोजी स्वतःचे इंटरनेट जवळपास 99 टक्क्यांनी बंद करून जगाला चकित केले. ही एका मोठ्या जागतिक रणनीतीची रंगीत तालीम होती, असे मानले जात आहे. स्वतःभोवती डिजिटल तटबंदी उभारून इराण आता जगाची ‘लाईफलाईन’ कापण्याच्या तयारीत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

इराणने गेल्या दीड दशकात अत्यंत चिकाटीने ‘नॅशनल इन्फॉर्मेशन नेटवर्क’ (एनआयएन) नावाचे एक समांतर डिजिटल जग उभे केले आहे. 2010 पासून चीनच्या ‘हुवेई’ कंपनीच्या मदतीने सुमारे 700 दशलक्ष ते 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीतून हे जाळे विणले आहे. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे इराणचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटला, तरी देशांतर्गत बँकिंग, सरकारी सेवा आणि संरक्षण दलांचे दळणवळण अखंडित सुरू राहाते. ‘डीप पॅकेट इन्स्पेक्शन’सारख्या चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून इराणने स्वतःचे एक वेगळे बेट तयार केले आहे. त्यामुळेच इस्रायल आणि अमेरिकेचे हल्ले सुरू झाले, तेव्हा इराणने जागतिक इंटरनेटचा त्याग करून आपल्या देशांतर्गत ‘अफ्रानेट’ सारख्या नेटवर्कवर संपूर्ण भार सोपवला.

सायबर युद्धाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘डिनिएबिलिटी’
सायबर युद्धाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘डिनिएबिलिटी’ किंवा नाकारता येण्याची क्षमता. सीमेवर गोळीबार झाला, तर तो कोणी केला, हे स्पष्ट असते; मात्र सायबर हल्ल्याचा उगम शोधणे अत्यंत क्लिष्ट असते. हॅकर्स अनेक देशांमधील सर्व्हरचा वापर करून आपला पत्ता लपवू शकतात, ज्यामुळे हल्ला करणार्‍या देशाला आपला सहभाग सहज नाकारता येतो. यामुळे हे युद्ध अधिक धोकादायक बनले आहे.

या घटनेमुळे अमेरिका, इस्राईलसह संपूर्ण जगामध्ये भीतीची लाट पसरली. याचे कारण लाल समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे जागतिक इंटरनेट केबल्सचे मुख्य मार्ग आहेत. तांबड्या समुद्रातून जाणार्‍या 17 केबल्स युरोप, आशिया आणि आफ्रिकेला जोडतात. इराणने या केबल्सना लक्ष्य केले, तर त्याचे परिणाम भयावह असतील.

2024 मध्ये लाल समुद्रातील केबल दुरुस्त करण्यासाठी सहा महिने लागले होते. आता तर हा प्रदेश युद्धक्षेत्र बनल्याने विशेष दुरुस्ती जहाजे तिथे जाणे अशक्य आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या एएई-1 आणि टाटा-टीजीएनसारख्या प्रमुख केबल्स इराणने पाणबुडी किंवा नौदलाच्या साहाय्याने कापल्या, तर अमेरिका, युरोप आणि विशेषतः भारताचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.

फोनवर लिंक
मार्चच्या सुरुवातीला इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, तेव्हा इस्रायली नागरिकांच्या फोनवर एक संदेश आला. त्यात 'जवळच्या सुरक्षित निवारा केंद्राची माहिती' देणारी एक लिंक होती. जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या फोनमध्ये 'स्पायवेअर' डाऊनलोड झाले. या स्पायवेअरमुळे हॅकर्सना लोकांच्या फोनचा कॅमेरा आणि माईकचा ताबा मिळाला. यामुळे लोक काय बोलत आहेत आणि कुठे लपले आहेत, हे शत्रूला थेट समजत होते.

भारताचा पश्चिमेकडील सुमारे एक-तृतीयांश इंटरनेट ट्रॅफिक हा होर्मुझच्या मार्गावरूनच जातो. या केबल्स कापल्या गेल्या, तर भारतीय नौदलाकडे त्या त्वरित दुरुस्त करण्यासाठी स्वतःचे समर्पित जहाज उपलब्ध नाही. 3,000 ते 4,000 कोटी रुपयांचे असे जहाज घेण्याचे प्रस्ताव अजूनही लालफितीत अडकलेले आहेत. त्यामुळे भारताला आता केवळ पश्चिमेकडील मार्गावर अवलंबून राहून चालणार नाही. सिंगापूरमार्गे पॅसिफिक केबल्सचा वापर करून ‘ईस्ट-रूट डायव्हर्सिफिकेशन’ करणे ही आता काळाची गरज बनली आहे. कारण येणार्‍या काळात 2008 च्या इंटरनेट संकटापेक्षाही अधिक गंभीर स्थिती उद्भवण्याच्या शक्यता गडद झाल्या आहेत.

विसाव्या शतकातील युद्धे ही रणगाडे, विमाने आणि पायदळाच्या जोरावर लढली जात होती. मात्र, एकविसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात युद्धाची व्याख्या आणि स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष हे याचे जिवंत उदाहरण आहे. आजच्या काळात शत्रूचा पराभव करण्यासाठी केवळ सीमेवर गोळीबार करून चालत नाही, तर शत्रूच्या डिजिटल प्रणालीत शिरकाव करून त्याला निकामी करणे अधिक प्रभावी ठरत आहे.

अद्ययावत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर युद्धाने पारंपारिक लष्करी डावपेचांना मागे टाकले असून, हे ‘अदृश्य युद्ध’ आता मानवी इतिहासातील सर्वात संहारक वळणावर येऊन पोहोचले आहे. जोपर्यंत इंटरनेट आहे आणि भू-राजकीय तणाव कायम आहेत, तोपर्यंत हा ‘डिजिटल कुरुक्षेत्राचा’ अध्याय सुरूच राहील. उलटपक्षी भविष्यात हे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्याचे परिणाम कल्पनातीत आणि महाभयावह असू शकतात. येणार्‍या काळात ज्याच्याकडे सर्वात शक्तिशाली सर्व्हर आणि सर्वात हुशार अल्गोरिदम असेल, तोच विजेता ठरेल, हाच या आधुनिक युद्धाचा संदेश आहे. ज्या देशाकडे भक्कम सायबर संरक्षण कवच असेल, तोच देश या डिजिटल युगात आपले सार्वभौमत्व टिकवून ठेवू शकेल. पण जागतिक शांतता एका ‘क्लिक’वर अवलंबून आहे, याचे स्मरण सदैव ठेवावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT