बहार

महान जादूगार हॅरी हुदिनी

Arun Patil

हॅरी हुदिनीला कुणी जादूगार म्हणत होता, तर कुणी त्याला देव मानायचे. शतकानुशतके त्याच्या जादूची चर्चा होत राहिली; पण अखेरीस त्याचा झालेला मृत्यू रहस्यमय बनून राहिला. जादूच्या दुनियेत नवनवे कारनामे करणारा हुदिनी अमेरिकेचा पहिला जादूगार सुपरहिरो बनला होता.

हॅरी हुदिनीचा जन्म 24 मार्च 1874 साली बुडापेस्ट येथे झाला होता. तो मूळचा अत्यंत कमालीचा स्टंट कलाकार होता. तो धावण्यातही सुपरमॅन होता. वास्तविक, त्याचं खरं नाव एरिक वेरेसज असे होते. हुदिनीला त्याचे मित्र एरी किंवा ह्यारी असे बोलवू लागले होते. वयाच्या नवव्या वर्षापासून हुदिनी एक ट्रापिन कलाकार म्हणून काम करू लागला होता. तारुण्यात क्रॉस कंट्रीचा उत्तम धावक, अ‍ॅथलिट म्हणून त्याची ओळख बनली होती. तो स्वत:ला एरिच तसेच द प्रिन्स ऑफ एर म्हणू लागला. जेव्हा तो 4 वर्षांचा होता त्याचे कुटुंबीय अमेरिकेत गेले. नंतर विस्कनसिनमध्ये राहिले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने सर्व कुटुंबीय न्यूयॉर्क शहरात आले.

हुदिनी 1891 मध्ये आपल्या जादूचे प्रयोग करू लागला. तो अनेक संग्रहालये, सर्कसच्या ठिकाणी जादूचे प्रदर्शन करू लागला. दरवेळी धोकादायक आणि चित्तथरारक नवीन जादूचे प्रयोग सादर करणे, हे हुदिनीचे वैशिष्ट्य होते. 1894 मध्ये एका स्टेजवर त्याने आपले नाव हॅरी हुदिनी ठेवणे सुरू केले. 'हाऊदिनी' नावाचा संगीतकार हॅरीला आवडायचा. त्याच्यावरून हॅरीने आपले नाव हुदिनी असे ठेवले. बालपणापासूनच हुदिनीला जादू या विषयाची अतिशय गोडी होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने आपल्या भावासोबत मिळून 'द ब्रदर्स हुदिनी' नावाचा एक जादू शो करणं सुरू केलं. हॅरी आणि त्याचा भाऊ एका ठिकाणी काम करत असताना त्याची बेस नावाच्या एका नर्तकीशी भेट झाली. भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. एका वर्षानंतर त्यांनी लग्न केले. बेस आणि हॅरीने 'द हॉडिनिस' नावाने आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली. पुढे बेस हॅरीची सहायक म्हणून काम करू लागली.

आपल्या व्यवस्थापकाच्या – मार्टिन बेकच्या सल्ल्यानुसार, हॅरी आपल्या धावण्याकडे लक्ष देऊ लागला. अनेक प्रकारच्या वस्तू तो आपल्या जादूच्या कलेत उपयोगात आणू लागला. जसे की, हातकड्या, स्ट्रेटजॅकेट आणि दोरी. सुरुवातीला आपली जादू दाखवण्यासाठी हॅरीने इंग्लंडचा प्रवास केला. पहिल्यांदा खूप कमी यश त्याला मिळाले. तेव्हा त्याने स्कॉटलंड यार्डमध्ये ब्रिटिश पोलिसांना आव्हान दिले. हॅरी पळून गेला होता; पण पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला शोधून काढले. त्याला तुरुंगात बंद केले. हॅरीला विश्वास होता की, तो बेड्यांतून निसटून तुरुंगातून नक्कीच बाहेर पडेल. काही मिनिटांतच हॅरी सुटला आणि तुरुंगाचेही कुलूप काढून बाहेर पडला. पोलिसांना विश्वास बसत नव्हता; पण तो कुलूप उघडून पळून गेला होता. हा त्याचा अद्भुत चमत्कार प्रत्येकाला पाहायचा होता. हॅरीने संपूर्ण युरोपचा प्रवास केला. या पलायनानंतर हॅरी हुदिनी प्रसिद्ध झाला; पण लोक म्हणू लागले की, हॅरी हुदिनीने एक डुप्लिकेट चावी आपल्या जवळ ठेवलीय. जेलरने त्याचे सर्व कपडे उतरवले.

एक खास बनवलेली जाडजूड हातकडी लावली. ही बेडी किल्लीने उघडण्यासही कठीण जायचे. यावेळी हॅरीला ज्या तुरुंगात घातलं होतं, ते तीन कुलपांनी बंद केलं होतं. बाहेर आणखी एक अवजड आणि अत्यंत मजबूत असा दरवाजा होता, ज्याला एक भलेमोठे मजबूत कुलूप लावले होते. आता चमत्कार सुरू होण्याची वेळ होती. लोक एकटक त्याच्याकडे पाहत होते. त्याला दरदरून घाम सुटला होता. लोकांना वाटलं की, आता हुदिनीचे डोके ठिकाणावर येईल. लोक निघून जाऊ लागले. तोपर्यंत हॅरी हुदिनी उठून उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावर विजयी हास्य होतं. लोक जागच्या जागी उभे राहिले होते, त्याला पाहतच राहिले. त्या अवजड बेडीतून हुदिनी अलगद निसटला होता.

इथे खेळ संपला नव्हता. जेलरला हुदिनी तुरुंगात तर दिसला नाही; पण त्याच्या आजूबाजूचे सात बंदिजनांचे तुरुंगाचे कुलूप उघडे होते. या कलाबाजीने हुदिनीला रातोरात स्टार बनवले होते. यानंतर तो जगातील सर्वात प्रसिद्ध जादूगार बनला. हुदिनीने युरोपमधील तमाम तुरुंगांत आपले कौशल्य दाखवले होते.

लंडनमध्ये त्याने अनेक शो केले. तिथेही अफाट यश मिळवलं. त्याला मिळालेल्या अफाट प्रसिद्धीनंतर लंडनच्या एका वृत्तपत्रात एका पत्रकाराने आव्हान दिलं होतं की, एका लोहाराची आपल्या पाच वर्षांच्या मेहनतीने बनवलेली हातकडी उघडून दाखवावी. हुदिनीने आव्हान स्वीकारलं आणि चार हजार माणसांसमोर कोणत्याही किल्लीशिवाय पाच मिनिटांत ती बेडी खोलून दाखवली.

असेही म्हटले जाते की, जर्मनीमध्ये एक अधिकारी हुदिनीचा शत्रू बनला होता. कारण, हुदिनी एक यहुदी असल्याचे म्हटले जात होते. यहुद्यांचा द्वेष करणारा एक अधिकारी हुदिनीच्या मागे लागला होता. हुदिनीने जर्मनीमध्ये आपली कला दाखवली, तर त्याच्यावर फ्रॉडची केस घातली. न्यायाधीशांनी हुदिनीकडे तो निर्दोष असल्याचा पुरावा मागितला, तर हुदिनीने स्वतः न्यायाधीशांचे लॉकर उघडून दाखवले. या कृत्याने हुदिनीला जगातील सर्वात मोठा एस्केप आर्टिस्ट बनवले.

जादूगार असण्याबरोबरच हुदिनीने कमालीचे आविष्कार दाखवणे सुरू केले होते. अनेक क्षेत्र आणि त्याने बनवलेल्या यंत्राने तो कमाल दाखवू लागला होता. सुरुवातीला तो हातकड्यांमधून सुटायचा. पुढे त्याने आपली कला उंच पातळीवर नेली. त्याची सर्वात आवडती जादू होती- काचेच्या बंदिस्त पेटीमध्ये कैद होऊन पाण्यात बुडणे; पण क्षणभरात तो आपली या पेटीमधून सुटका करून घेत असे. हुदिनीने दुसरी ट्रिक दाखवणे सुरू केले. त्याच्या नव्या शोचे नाव होते- चायनीज टॉर्चर चेंबर.' त्याने लोकांना चॅलेंज दिले की, तो कुठल्याही बंदिस्त पेटीमधून बाहेर पडू शकतो.

हुदिनीने आपल्या कलेचे अनेक नवे व्हर्जन काढले. एकदा तर हुदिनीला मृत व्हेल माशामध्ये हातकड्यांसोबत घालण्यात आले; पण तो त्यातूनही सुटून बाहेर आला. नंतर त्याला खोल 6 फूट खड्ड्यात घालण्यात आले, तिथूनही तो बाहेर पडला. एकदा तर एका थिएटरमध्ये महाकाय हत्तीला त्याने गायब केले होते. त्याच्या या जादूचे रहस्य कुणीही कधीही उघड करू शकले नाही. असेही म्हटले जाते की, पहिल्या महायुद्धाच्या काळात हुदिनीने अमेरिकन सैन्यांना काही जादू शिकवल्या होत्या. त्याचबरोबर, हुदिनीने ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिससाठी एक गुप्तहेर म्हणून काम केले असावे, असे म्हटले जाते.

हुदिनीशी संबंधित एक रहस्यदेखील त्याच्या मृत्यूनंतर जोडले गेले. हुदिनीच्या मृत्यूविषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात. अनेक लोक मानतात की, त्याने ज्या फ्रॉड गुरूंची पोल खोलली होती, त्याने हुदिनीची हत्या केली. दुसरीकडे, असेही म्हटले जाते की, पोटात जोरदार बुक्क्या बसल्याने त्याचा मृत्यू झाला. सन 1926 ची गोष्ट आहे. हुदिनी थिएटरच्या मागील खोलीत शो सुरू होण्याची वाट पाहत गप्पा मारत होता. तेव्हा दोन माणसे त्याला भेटायला आली. त्याने विचारलं की, खरंच, पोटात बुक्क्या मारल्यावर तुझ्यावर काही परिणाम होत नाही? हुदिनी म्हणाला- हो. समोरच्याने चार बुक्क्या हुदिनीच्या पोटात मारल्या.

हुदिनी बेसावध होता. त्याने तो मार सहन करण्याची कोणतीही मानसिक, शारीरिक तयारी केली नव्हती. अचानक झालेल्या प्रसंगाने हुदिनीच्या पोटात तीव्रपणे दुखू लागले होते. तो वेदनेने कळवळत होता. तरीही त्याने शो पूर्ण केला. पुढे डॉक्टरला दाखवल्यानंतर डॉक्टरांनी अपेंडिक्स फुटल्याचं सांगितले. लवकरात लवकर उपचार घ्यायला डॉक्टरांनी सांगितले; पण तरीही हुदिनीने ऐकलं नाही. त्याने आपले शो सुरूच ठेवले. हुदिनीने आपला शेवटचा शो 24 ऑक्टोबरला केला होता. जेव्हा अखेरीस त्याची तब्येत खूप खराब झाली, तेव्हा हुदिनी शस्त्रक्रियेसाठी तयार झाला होता. मात्र, तोपर्यंत खूप वेळ झाला होता. 31 ऑक्टोबर, 1926 रोजी जगाचा महान जादूगार हॅरी हुदिनीचा मृत्यू झाला. योगायोगाने त्या दिवशी हॅलोविन होता. लोक म्हणू लागले की, हुदिनीने आपल्या मृत्यूचा हॅलोविन हा नेमका दिवस निवडला. तर तो नक्कीच परत येईल.

हुदिनीच्या मृत्यूविषयी एक प्रसंग सांगितला जातो की, हुदिनीने आपल्या पत्नीसोबत एक करार केला होता, तो असा की, त्यांच्यापैकी जो कुणी पहिल्यांदा मृत्यू पावेल तो मृत्यूनंतर भेटायला येईल. हुदिनीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी 10 वर्षे त्याच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून ठेवायची. प्रत्येक वर्षी हॅलोविनच्या दिवशी त्याच्या आत्म्याला बोलावण्याचा प्रयत्न व्हायचा. शेवटचा प्रयत्न 1936 मध्ये झाला; पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्याच्या पत्नीने मेणबत्ती विझविली. ही हुदिनीची शेवटची जादू होती. अशाप्रकारे हा महान जादूगार मृत्यूनंतरही लोकांच्या सदैव चर्चेचा विषय ठरला.

– ऋतुपर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT