कैलाश सत्यार्थी, नोबेल पुरस्कार विजेते
‘उम्मीद पे दुनिया कायम हैं’ अशी एक जुनी म्हण आहे. असा हा अनंत शक्यतांनी भरलेला सकारात्मक भाव आहे; मात्र या आकांक्षा वास्तवात उतरवायच्या असतील, तर प्रामाणिकपणा, कठोर इच्छाशक्ती, वास्तवाची समज, व्यावहारिक रणनीती आणि कृतिशीलता या घटकांची तितकीच गरज असते. मागील काही वर्षे ही अकल्पनीय यशांची आणि अनपेक्षित संकटांची ठरली. कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात गाठलेली नवी शिखरे, जागतिक आर्थिक समृद्धी, शिक्षणातील प्रगती या उपलब्धी एका बाजूला आहेत, तर दुसर्या बाजूला कोरोना संकट, युद्धसंघर्षात झालेली वाढ आणि त्यात हजारो निरपराध मुले, महिला आणि सामान्य नागरिकांचे गेलेले बळी, पर्यावरणीय संकट, धार्मिक आणि राजकीय अतिरेक, तसेच वाढती आर्थिक विषमता अशी गंभीर आव्हाने उभी आहेत.
अर्थात, मी नेहमीच आशावादी राहिलो आहे. त्यामुळे आज जगात उपलब्ध असलेले प्रचंड संसाधनसाठे, अत्यंत गंभीर समस्यांविषयी असलेली माहिती आणि त्यावरील उपायांची समज, प्रगत तंत्रज्ञान आणि माहितीचा अफाट खजिना, जागतिक विकासाचा स्पष्ट अजेंडा तसेच मानवी स्वातंत्र्य आणि न्यायासाठी अस्तित्वात असलेले कायदे हे सारे मिळून 2026 हे वर्ष पूर्वीपेक्षा अधिक चांगले घडवू शकणार नाही, असे मानायला मी तयार नाही. दुर्दैवाने, आज प्रत्येक पातळीवर नैतिक जबाबदारीची तीव्र कमतरता दिसते. त्यामुळे एकमेकांच्या समस्या जाणून घेणे, त्या स्वतःच्या असल्याप्रमाणे अनुभवणे आणि प्रामाणिकपणे त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. समस्यांची केविलवाणी तक्रार करत बसण्याऐवजी उपायांची संस्कृती निर्माण करावी लागेल. हीच खरी करुणा आहे. म्हणूनच अनेक जागतिक नेते आणि नोबेल पुरस्कार विजेत्यांसोबत मी ‘करुणेचे जागतिकीकरण’ ही चळवळ सुरू केली आहे. अवघ्या दीड-दोन वर्षांत या चळवळीला जगभरातून जेवढा प्रतिसाद मिळाला आहे, त्याने 2026 बाबतच्या माझ्या आशा अनेक पटींनी वाढवल्या आहेत.
माझ्यासाठी आशेचा सर्वांत मोठा किरण आहे ती आजची तरुण पिढी. अतिशय गरीब कुटुंबांतील मुलेही आज दर्जेदार शिक्षणासाठी आसुसलेली आहेत. ती स्वतःसाठी मोठी स्वप्ने पाहू लागली आहेत. पूर्वीच्या तुलनेत बाह्य जगाविषयीची त्यांची जाण वाढली आहे. त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढला आहे. किशोरवयीन आणि तरुणांचा मोठा वर्ग समाज आणि राजकारणाची सखोल समज ठेवतो. ही पिढी जगाची सामायिक संपत्ती आणि ताकद आहे. सरकारे आणि समाज यांची जबाबदारी आहे की, या शक्तीला अर्थपूर्ण, सकारात्मक आणि समाजोपयोगी दिशेने वळवण्यासाठी ठोस प्रयत्न केले जावेत. मुला-मुलींच्या आणि तरुणांच्या शिक्षणात, नवोन्मेषात आणि संशोधनात गुणवत्ता आणि गती यासाठी सरकारे आणि जागतिक समुदायाने पुरेशी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
धर्म, पंथ आणि विचारसरणीच्या नावाखाली पसरवले जाणारे खोटेपण, धर्मांधता, उन्माद, हिंसा, द्वेष, अवैज्ञानिकता आणि अश्लीलता यांसारख्या दिशाभूल करणार्या प्रवाहांपासून तरुणांना वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक आणि रचनात्मक विचार करणार्या तरुणांना प्रोत्साहन देत विविध क्षेत्रांत नेतृत्वाची संधी देण्याची आवश्यकता आहे. आज आर्थिक विषमता आणि बेरोजगारी ही मोठी आव्हाने उभी आहेत. सरकारे, उद्योगजगत आणि समाज यांनी परस्पर विश्वास, सन्मान आणि सहभागाच्या आधारे या समस्यांवर तोडगा काढावा, अशी अपेक्षा आहे.
भारताचे उदाहरण घेतले, तर 2026 मध्ये एक वर्षासाठी भारत ब्रिक्सचा अध्यक्ष असेल. ही मोठी संधी आहे. हा गट जगाला एकध्रुवीय किंवा द्विध्रुवीय होण्यापासून रोखू शकतो. डॉलरच्या तुलनेत ब्रिक्सची नवी मुद्रा जागतिक आर्थिक रचना आणि पाश्चिमात्य देशांच्या दबदब्यावर आधारित राजकारणाला वेगळे वळण देऊ शकते. भारताने आपली पारंपरिक गटनिरपेक्ष भूमिका धाडसाने निभावत नेतृत्वाची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
‘विकसित भारत 2047’ हे लक्ष्य साध्य करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असले पाहिजे. राजकारणी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या विचारसरणी आणि निवडणुकीच्या गणिताच्या पलीकडे जाऊन विविध मतपंथांचे नेते आणि गुरू यांनी आपल्या मर्यादित चौकटीतून बाहेर पडून, तसेच समाजातील प्रत्येक घटकाने विकासाच्या रांगेत मागे राहिलेल्या मुले-मुली, भगिनी आणि बांधवांना सोबत घेऊन हा महान स्वप्नपूर्तीचा प्रवास पूर्ण करावा, अशी मनापासून अपेक्षा आहे.