विवेक कुलकर्णी
आगामी टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करताना शुभमन गिलला जो डच्चू देण्यात आला, तो भल्याभल्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला. शुभमन गिलसारख्या प्रस्थापित ‘पोस्टर बॉय’ला डच्चू देऊन निवडकर्त्यांनी हेच सिद्ध केले की, आता नाव किंवा ब्रँड व्हॅल्यूवर संघात जागा मिळण्याचे दिवस संपले. भारतीय क्रिकेटला दीर्घकाळ ग्रासलेल्या ‘स्टार कल्चर’ला छेद देणारा हा निर्णय जितका धाडसी, तितकाच व्यावसायिक. केवळ कागदावरचे मोठे खेळाडू निवडण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात विजयाचे समीकरण सोडवू शकणार्या ‘स्पेशालिस्ट’ योद्ध्यांवर यावेळी विश्वास दाखवण्यात आला, ही एका अर्थाने ‘स्टार कल्चर’ला सणसणीत चपराकच!
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा असे पाहिले गेले आहे की, खेळाडूला स्टारडम चिकटले की, अशा खेळाडूंच्या खराब फॉर्मकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मात्र, 2026 च्या टी-20साठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघाने हा पायंडा मोडीत काढला आहे. शुभमन गिलला संघातून वगळणे हा या संपूर्ण निवडीत केंद्रबिंदू ठरला. गिल हा मोठा खेळाडू असला, तरी टी-20 च्या बदलत्या स्वरूपात त्याचा स्ट्राईक रेट आणि सुरुवातीच्या षटकांत आक्रमकता दाखवण्याची मर्यादा संघासाठी अडथळा ठरत होती. हा निर्णय घेताना निवड समितीने कोणत्याही दडपणाला बळी न पडता संघाच्या हिताला प्राधान्य दिले. गिलचा खराब फॉर्म पाहता हा निर्णय योग्य आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे ठरते ते निवडकर्त्यांचे चौकटीपलीकडचे धारिष्ट्य!
यावेळी संघ निवडीत एक शब्द कमालीचा कळीचा ठरला, तो म्हणजे ‘युटिलिटी’ अर्थात उपयुक्तता! नेतृत्वाची धुरा सांभाळणारा सूर्यकुमार यादव हा स्वतः टी-20 क्रिकेटचा नवा माईलस्टोन. उपकर्णधार म्हणून अक्षर पटेलची निवड ही अत्यंत विचारपूर्वक केलेली दिसते. अक्षर केवळ एक गोलंदाज नसून, तो खालच्या फळीतील एक भरवशाचा फलंदाज आहे. आशियाई खेळपट्ट्यांवर त्याची फिरकी आणि फलंदाजीतील अष्टपैलूत्व भारतीय संघाला हत्तीचे बळ मिळवून देते. अशा खेळाडूंना संधी देणे हे भारतीय क्रिकेटमधील प्रगल्भतेचेही लक्षण.
संघाच्या फलंदाजीचा विचार केल्यास इशान किशनचे पुनरागमन ही आणखी एक रणनीती. सलामीला लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन आणि किशनची स्फोटक फलंदाजी भारताला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारून देऊ शकते. तसेच संजू सॅमसनला मिळालेली संधी त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा सन्मान आहे. मधल्या फळीत रिंकू सिंगसारखा अस्सल ‘फिनिशर’ असणे ही भारतीय संघाची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. गेल्या काही वर्षांत भारताला अशा फिनिशरची उणीव भासत होती, जी रिंकूने आपल्या शांत डोक्याने आणि टोलेबाजीने भरून काढली आहे. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यासारखे युवा फलंदाज आणि हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू संघाला मोठी खोली देतात.
गोलंदाजीच्या विभागात केवळ स्पीडस्टार्सवर अवलंबून न राहता कौशल्यालाही अधिक महत्त्व दिले गेले आहे. जसप्रीत बुमराह हा आक्रमणाचे नेतृत्व करेलच; पण त्याच्या सोबतीला हर्षित राणासारखा युवा आणि आक्रमकता असलेला गोलंदाज असणे ही एक जमेची बाजू ठरू शकते. हर्षित राणाकडे गतीसोबतच अचूक बाऊन्स टाकण्याचे कौशल्य आहे. फिरकीच्या आघाडीवर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन मनगटी फिरकीपटू प्रतिस्पर्ध्यांना कोणत्याही क्षणी जेरीस आणू शकतात. विशेषतः वरुण चक्रवर्तीची ‘मिस्ट्री’ आशियाई खेळपट्ट्यांवर निर्णायक ठरू शकते.
आता या निवडींच्या परिणामांवर आणि संघाच्या मानसिकतेवर नजर टाकणे गरजेचे आहे. ‘स्टार कल्चर’ला दिलेला हा धक्का केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय टी-20 क्रिकेटच्या भविष्यातील वाटचालीस दिशा देणारा आहे. जेव्हा मोठे खेळाडू बेंचवर बसतात किंवा संघातून वगळले जातात, तेव्हा उर्वरित संघाला एक स्पष्ट संदेश मिळतो की, इथे केवळ वर्तमान फॉर्म आणि संघासाठी आपण किती उपयुक्त आहात, यालाच महत्त्व आहे. यामुळे संघातील अंतर्गत स्पर्धा प्रत्येक खेळाडूला सजग राहण्यास भाग पाडते आणि प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम योगदान देण्यासाठी प्रेरणा देतो. हा द़ृष्टिकोन संघाची जिंकण्याची मानसिकता अधिक मजबूत करतो.
या विश्वचषकात भारतासमोर ऑस्ट्रेलियाची शिस्त, इंग्लंडची आक्रमकता आणि दक्षिण आफ्रिका, पाकिस्तानसारख्या अनप्रेडिक्टेबल फोर्सेेसच्या आव्हानांचा सामना करावा लागेल. सामने केवळ 20 षटकांचे असल्याने चुकांना वाव नसेल. प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. घरच्या मैदानावर खेळताना प्रेक्षकांचा पाठिंबा ही जशी ताकद असेल, तसेच त्याचे दडपणही खेळाडूंवर, पर्यायाने संघावर असेल. या परिस्थितीत संघाची लवचिकता आणि कर्णधाराचे मैदानावरील निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरतील.
तूर्तास, भारतीय संघाने एक धाडसी आणि व्यावसायिक संघ निवडला आहे. ‘स्टार’ संस्कृतीचा पडदा दूर सारून प्रत्येक खेळाडूची भूमिका निश्चित करण्यात आली आहे. निवड समितीने घेतलेले हे कठोर निर्णय भारताला पुन्हा एकदा जागतिक विजेतेपदाच्या सिंहासनावर बसवण्यासाठी मैलाचा दगड ठरावा, यासाठी पूरक ठरू शकतील. भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. आता प्रतीक्षा आहे ती या नव्या शिलेदारांच्या मैदानावरील पराक्रमाची!