मोबाईल वापरत असाल, तर एव्हाना ‘घिब्ली’ हा ट्रेंड तुम्हाला कळला असेलच. गेले काही दिवस सोशल मीडियावर घिब्ली स्टाईल फोटोंचं अक्षरशः तुफान आलंय. जगभरात बहुतेकांनी स्वतःचे ‘कार्टून’ केलेले हे फोटो अपलोड केले. या फोटोंनी जगभर हवा तर केलीच; पण अब्जावधी रुपयांचा धंदाही केला. यातून वादही निर्माण झाले आणि ‘माणूस विरुद्ध यंत्र’ हे द्वंद्वही अधोरेखित केलं गेलं.
मार्च महिन्याच्या अखेरीस चॅट जीपीटी या एआय चॅटबॉटनं जीपीटी-4 ओ हे अत्याधुनिक मॉडेल लाँच केलं आणि जगभर एकच हलकल्लोळ माजला. त्याला कारण होतं, घिब्ली! चॅट जीपीटीचा वापर करून घिब्ली स्टाईले आपले फोटो अवघ्या काही क्षणात कार्टून स्वरूपात रूपांतरित करणारी ही जादू सुपर व्हायरल झाली. जो तो आपले फोटो घिब्ली स्टाईलमध्ये तयार करून स्टेटस ठेवू लागला, प्रोफाईल करू लागला, सोशल मीडियावर शेअर करू लागला. या घिब्ली स्टाईलचे फोटो करण्यासाठी एवढे लोक चॅट जीपीटीवर आले की, काही काळ त्यांची यंत्रणाच कोलमडून गेली. असं सांगतात की, अवघ्या एका तासात तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंसाठी चॅट जीपीटीला भेट दिली. असेच फोटो ग्रोक या एक्सच्या एआय चॅटबॉटवर करून मिळताहेत, अशीही चर्चा सुरू झाली. त्यामुळे तिकडेही गर्दी वाढली. जगभरातील नेते, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती इथपासून ते अगदी शाळा-कॉलेजच्या पोरांपर्यंत अनेकजणांनी हे फीचर वापरलं.
चॅट जीपीटी आणि ग्रोक यांच्या समर्थकांमध्येही या घिब्लीवरून सोशल मीडियावर जुंपली. या दोन्हीपैकी चांगलं कुठलं? त्याची मर्यादा काय, तोटे काय, कसे अमर्याद वापरता येईल वगैर वगैरे अशा अनेक बातम्या, व्हिडीओ, रील्स बनू लागले. या सगळ्या चर्चेत सगळ्यात मोठी चर्चा होती ती म्हणजे घिब्ली हा ट्रेंड म्हणजे एआय कंपन्यांचा डेटा मिळवण्यासाठी रचलेला सापळा आहे याची. तसंच घिब्लीच्या मूळ निर्मात्यांनीही त्याविषयी नाराजी व्यक्त केल्याचाही मुद्दा चांगलाच रंगलाय. हाताने काढलेली चित्रे, त्यांना दिलेलं अॅनिमेशन, पेस्टल रंगसंगती आणि निवडलेले संवेदनशील विषय, यामुळे घिब्लीचे सिनेमे लोकांच्या पसंतीला उरतले. या सिनेमांचे विषय विशेषत: तरुण मुली किंवा महिला आणि पर्यावरणवाद, युद्धविरोधी भूमिका मांडणारे आणि कौटुंबिक नात्याला महत्त्व देणारे आहेत. त्यांच्या ‘स्पिरिटेड अवे’ आणि ‘द बॉय अँड द हेरॉन’ या सिनेमांसाठी त्यांना अकादमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
घिब्लीच्या लोकप्रियतेमुळे त्याच्यासारख्या पात्रांच्या पद्धतीनं आपले फोटो पाहण्यात लोकांना वेगळाच आनंद मिळू लागला. त्यामुळेच घिब्लीची ही स्टाईल जेव्हा विनामूल्य एआयच्या स्वरूपात सहज मिळू लागली, तेव्हा लोकांनी त्यावर उड्याच मारल्या. अवघ्या काही तासांत ज्यांनी कधीच चॅट जीपीटी, ग्रोक वगैरे वापरलं नव्हतं त्यांनी या एआय प्लॅटफॉर्मवर स्वतःची अकाऊंट बनवली. या सगळ्या चॅटबोट वापरणार्यांची संख्या एका दिवसात लक्षावधींनी वाढली. हे सगळं होत असताना, घिब्ली स्टाईलचे मूळ निर्माते हयाओ मियाझाकी यांनी मात्र एआय तंत्रानं चित्र बनवण्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या. 2016 मध्ये त्यांना जेव्हा ही एआय चित्रे दाखवली होती, तेव्हा त्यांनी हा ‘माझ्या जीवनाचा अपमान’ असं विधान करून, संताप व्यक्त केला होता. कितीही काहीही झालं तरी एआय हे मानवी अनुभव आणि भावनांची नक्कल करू शकत नाही, जे अस्सल कलाकृतीसाठी आवश्यक आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चैतन्य हरवलेली आणि मानवता नसलेली कला निर्माण होईल. घिब्लीचे चित्रपट हे हाताने रेखाटलेल्या सुंदर द़ृश्यांसाठी ओळखले जातात, ज्यामागे अनेक कलाकारांचे कठोर परिश्रम असतात. एआय काही क्षणात त्यांची नक्कल करून चित्रे तयार करत असल्याने, हा माणसाच्या श्रमाचा अनादर आहे, असंही मत मियाझाकी यांनी मांडलं होतं.
एकीकडे घिब्लीनं कलेचा अपमान केलाय हा वाद पेटला, तर दुसरीकडे घिब्लीचं गाजर दाखवून एआय कंपन्या आपला डेटा चोरताहेत, अशी दुसरी चर्चा तापली. सर्व अटी मान्य करून अनेकांनी चॅट जीपीटी, ग्रोक आदी चॅटबॉटवर लॉगईन केलं. त्यामुळे आपण आपले फोटो, वैयक्तिक माहिती थेट या कंपन्यांना शेअर केली. आता या डेटाचं काय करायचं, हा त्यांचा अधिकार झाला, असं अनेकांचं मत आहे.
घिब्ली ट्रेंडच्या निमित्तानं जगभरात अब्जावधी फोटो एआय प्लॅटफॉर्मवर अपडेट करण्यात आले. या फोटोंसोबत, आपलं लोकेशन, कुटुंबातील माहिती, एचडी फोटो, प्रत्येक भागातून आलेल्या फोटोंमधील वैशिष्ट्ये ही सगळी माहिती या कंपन्यांकडे गेलीय. याचाच अर्थ, तुमची परवानगी न घेता तुमच्या या डेटाचा वापर एआय कंपन्या स्वतःसाठी करू शकतात. त्यामुळे हा घिब्ली ट्रेंड म्हणजे प्रत्यक्षात एआय कंपन्यांची डेटा संकलन मोहीम असू शकते. आता खरंच हा डेटा चोरला जातोय का, यावर अनेक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. कोणीही छातीठोकपणे हे खरं किंवा खोटं असं सांगू शकत नाही. कारण, आज जीपीएस, सीसीटीव्ही, मोबाईल आदी गोष्टींमुळे प्रत्येक माणूस काय बोलतो, काय खातो, कुठे जातो या सगळ्या गोष्टी फारशा वैयक्तिक राहिलेल्या नाहीत. अनेकजण आमचा डेटा सुरक्षित असल्याच्या गोष्टी करत असले, तरी त्यातील फोलपणाही अनेकदा उघडकीस आला आहे. त्यामुळे घिब्लीमुळेच हा डेटा चोरला जातोय, यावरून एवढी ओरड करणं किती योग्य आहे, असाही प्रश्न अनेकजण विचारताहेत.
घिब्लीचा हा ट्रेंड जरी नवा असला, तरी असे ट्रेंड काही नवे नाहीत. आजवर असे अनेक ट्रेंड ऑफलाईन आणि ऑनलाईन जगात अनेकदा आलेत आणि गेलेत. तरीही घिब्ली या ट्रेंडमध्ये असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा ट्रेंड माणसाच्या आजवरच्या इतिहासात महत्त्वाचा ठरलाय. एआयचा वापरही काही नवीन नाही; पण घिब्लीमुळे आज एआय काय करू शकतं, याची मोठ्या प्रमाणात जगाला जाणीव झालीय. पूर्वी एखाद्या माणसाची मस्करी करण्यासाठी त्याला कार्टून म्हणून हिणवलं जायचं; पण आज स्वतःचं कार्टून कसं दिसेल, हे पाहण्यासाठी जगभरातील कोट्यवधी लोक आपली चॅट जीपीटीची लिमिट कधी संपणार, याची वाट पाहाताहेत. माकडापासून माणसापर्यंत आलेला हा प्रवास आता आपण एआयच्या हातात द्यायला सज्ज झालो आहोत. विचार करणं ही माणसाच्या उत्क्रांतीची प्रेरणा आहे, तीच जर आपण एआयकडे दिली, तर मोठा गोंधळ होऊ शकतो, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जोआना मॅसिजेव्स्का या सुप्रसिद्ध पोलिश लेखिकेनं याबद्दल आपली ठाम भूमिका मांडलीय. त्या म्हणतात की, ‘मला वाटते की, एआयने माझी धुणीभांडी आणि कपडे धुवावेत, जेणेकरून मी कला आणि लेखन करू शकेन, एआयने माझी कला आणि लेखन करावे आणि मी धुणीभांडी करावी, असे मला वाटत नाही.’ म्हणूनच एआय हे माणसाच्या हातातील साधन असलं पाहिजे. माणसानं एआयचं साधन बनू नये, याची काळजी आज घिब्लीच्या ट्रेंडवर स्वार झालेल्यांना घ्यावी लागेल.
घिब्ली हा शब्द आपल्यातल्या अनेकांना नव्यानं कळला असला, तरी स्टुडिओ घिब्ली हे चित्रपट क्षेत्रातील मंडळींना, विशेषतः अॅनिमेशन चित्रपट पाहणार्यांसाठी मोठं नाव आहे. जपानी अॅनिमेशन हे तुफान लोकप्रिय असून, या अॅनिमे कॅरेक्टरची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. त्यातही स्टुडिओ घिब्लीच्या सिनेमांनी जगावर मोठा प्रभाव टाकलाय. या स्टुडिओची स्थापना 1985 मध्ये दिग्दर्शक हयाओ मियाझाकी आणि ईसाओ ताकाहाता आणि निर्माते तोशियो सुझुकी यांनी केली.
आता हा शब्द घिब्ली कुठून आला, त्याचीही एक रंजक गोष्ट आहे. या स्टुडिओचे प्रमुख संस्थापक मियाझाकी यांच्या वडिलांची विमानाचे भाग बनवणारी कंपनी होती. त्यामुळे त्यांना विमानांमध्येही रस होता. सहारा वाळवंटात वापरल्या जाणार्या कॅप्रिओनी विमानांना, स्थानिक अरेबिक भाषेत म्हणायचे घिब्ली. त्याचा त्या स्थानिक भाषेतील अर्थ होता गरम हवा. त्यावरूनच मियाझाकी यांनी आपल्या स्टुडिओचं नाव ठेवलं घिब्ली.