सोनम परब
गणपती ही बुद्धीची देवता आहे, तशीच ती कलेची देवता आहे. त्यामुळे सिनेकलाकृतींमध्येही गणेशोत्सवाचे प्रतिबिंब उमटले आहे. ‘अष्टविनायक’, ‘वास्तव’, ‘सत्या’, ‘अग्निपथ’, ‘डॉन’, ‘शोर इन द सिटी’, ‘माय फ्रेंड गणेशा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये गणेशोत्सव किंवा गणेशासंबंधी कथा केंद्रस्थानी राहिल्याचे दिसून आले.
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान लाभले आहे. विशेषत: गणेशोत्सवाचा विचार केला, तर हा उत्सव महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारतात पसरला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हा उत्सव सार्वजनिक बनला आणि तेव्हापासून सामूहिक प्रार्थना, मंडप, सांस्कृतिक कार्यक्रम आणि एकत्रितपणा या माध्यमातून हा उत्सव लोकांच्या मनामनात घर करून आहे. उत्तरोत्तर गणेशोत्सवातील लोकसहभाग वाढत चालला आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.
चित्रपटांमध्ये नेहमीच समाजात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. त्यानुसार, गणेशोत्सवाचा प्रभावही हिंदी-मराठी सिनेसृष्टीवर दिसून येतो. हिंदी चित्रपटांनी गेल्या चार-पाच दशकांत गणेशोत्सवाला फक्त धार्मिक सोहळा म्हणून न पाहता कथानकाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून स्वीकारले आहे. कधी तो नायकाच्या संघर्षाचा साक्षीदार ठरतो, कधी नात्यांना जोडणारा दुवा बनतो, तर कधी समाजातील राजकारण, गुन्हेगारी आणि विरोधाभास उलगडून दाखवतो.
गणेशोत्सवाचा प्रथम उल्लेख 1980 मध्ये आलेल्या ‘टक्कर’ या हिंदी चित्रपटामध्ये झाल्याचे नोंदीत आढळते. जितेंद्र, संजीवकुमार आणि विनोद मेहरा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात एक आंतरराष्ट्रीय तस्कर गणेशमूर्तीच्या आड प्राचीन वस्तू लपवतो. कथानकाचा उत्कर्षबिंदू म्हणजेच क्लायमॅक्स गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंगतो. त्यामुळे धार्मिकतेसोबत गुन्हेगारी आणि नायकांचा विजय अशी त्रिसूत्री या प्रसंगात साकारते. यानंतर 1986 मध्ये आलेल्या ‘अंकुश’ या एन. चंद्रा दिग्दर्शित चित्रपटात गणेशमंडळातील राजकारण, बेरोजगार तरुणांचे वास्तव आणि मुंबईतील समाजजीवन अधोरेखित करण्यात आले. नाना पाटेकर आणि इतर कलाकारांनी साकारलेली पात्रे म्हणजे आर्थिक-सामाजिक असमानतेत वाढणार्या युवकांचे प्रतिनिधित्व होते. येथे गणेशोत्सव हा केवळ धार्मिकतेचा भाग नसून राजकारणाचा भाग बनलेला दाखवण्यात आले.
गणेशोत्सवाच्या वातावरणाचा सर्वाधिक प्रभावी वापर करणारे काही चित्रपट म्हणजे ‘अग्निपथ’ (1990), ‘सत्या’ (1998) आणि ‘वास्तव’ (1999). ‘अग्निपथ’मध्ये अमिताभ बच्चनच्या व्यक्तिरेखेचा गावाकडे परतण्याचा निर्णायक प्रसंग गणेश विसर्जनाच्या गोंगाटात दाखवला आहे. नंतरच्या आधुनिक आवृत्तीत ऋतिक रोशनसोबतही विसर्जन द़ृश्य उच्चांक ठरले. ‘देवा श्रीगणेशा’ हे गीत या द़ृश्याला अद्वितीय बनवणारे ठरले. मुळातच धर्मा प्रॉडक्शन्सचा हा चित्रपट रंगतदार कृती द़ृश्यांसाठी ओळखला जातो; मात्र प्रेक्षकांच्या मनात ठसलेली गोष्ट म्हणजे ‘देवा श्रीगणेशा’ हे गीत. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ऋतिक रोशन साकारलेला नायक हिंस्र संघर्षात उतरतो. ढोल-ताशांचा गजर, ऊर्जेने भारावलेले गीत आणि नायकाच्या भावना या तिन्हींच्या संगमातून गणेशोत्सव हा केवळ धार्मिकच नव्हे, तर कथानकाच्या उत्कर्षाचा प्रतीक म्हणून उभा राहतो. या द़ृश्याने आधुनिक बॉलीवूडमध्ये गणेशोत्सवाचे चित्रण अधिक भव्य, नेत्रदीपक आणि लोकप्रिय बनवले.
‘सत्या’ या रामगोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपटातील नायक असणारा सत्या आपल्या मित्राचा सूड घेताना भ्रष्ट नेत्याचा खून गणेश विसर्जनाच्या गर्दीत करतो. हजारो भक्तांच्या जयघोषात हा खून घडतो आणि ‘विघ्नहर्ता’ गणेशाचा आशय अप्रत्यक्षरीत्या या प्रसंगाशी जोडला जातो. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ हा केवळ गुन्हेगारीवर आधारित चित्रपट नव्हता, तर तो समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब होता. संजय दत्तची रघुनाथ ही व्यक्तिरेखा एका सामान्य तरुणापासून माफियात परिवर्तित होतो. या प्रवासात गणेशोत्सवाला विशेष स्थान आहे. शेवटच्या दिवशी होणारी आरती, त्याच वेळी गुन्हेगारी जाळ्यात अडकलेला नायक आणि त्याचा कडवा शेवट या सर्वांचे चित्रण प्रेक्षकांच्या मनात खोलवर कोरले गेले. आधुनिक काळात 2011 मध्ये आलेल्या ‘शोर इन द सिटी’ या राज-डीके दिग्दर्शित चित्रपटात गणेशोत्सव हा केवळ पार्श्वभूमी नव्हता, तर कथानकाला दिशा देणारा उत्प्रेरक ठरला. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात गणेशोत्सवातील उत्साह, गर्दी, गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे संघर्ष यांचे वास्तव चित्रपटात उमटते, तर ‘अतिथी तुम कब जाओगे’ आणि ‘एबीसीडी’सारख्या हलक्याफुलक्या चित्रपटांत गणेशोत्सवाने नातेसंबंधांतील दरी भरून काढण्याचे आणि पात्रांना पुन्हा जोडण्याचे काम केले. कधी कुटुंबातील स्नेह अधोरेखित झाला, तर कधी नृत्य व कलात्मकता यांचा उत्सव साजरा झाला.
2007 मध्ये आलेला ‘माय फ्रेंड गणेशा’ हा बालचित्रपटांच्या इतिहासात विशेष स्थान मिळवणारा चित्रपट गणेशभक्तीचा एक निरागस आविष्कार होता. छोट्या मुलाचे एकटेपण, त्याची स्वप्ने आणि त्याच्या आयुष्यात आलेला गणेशा यांची हळुवार गोष्ट या चित्रपटात सांगितली आहे. या चित्रपटात गणेशोत्सव हा मुलांच्या भावविश्वाला आधार देणारा, सांत्वन करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा मित्र म्हणून उभा राहतो. यामुळे हा चित्रपट शहरी मध्यमवर्गीय कुटुंबांत लोकप्रिय ठरला. प्रत्येक गणेशोत्सवाला या चित्रपटाची आठवण येते, हेच त्याच्या यशाचे मोठे कारण आहे. अश्विनी धीर दिग्दर्शित ‘अतिथी तुम कब जाओगे’हा कौटुंबिक विनोदी चित्रपट प्रत्यक्षात पाहुणचार आणि त्रास यांवर आधारित असला, तरी त्याच्या शेवटाला गणेशोत्सवाचा रंग दिला आहे. संपूर्ण दहा दिवसांच्या उत्सवात होणारे छोटे-छोटे तपशील, घरातील पूजा, मुलांचे मंडपात जाणे, आरतीचा गजर यांमुळे चित्रपट वास्तवाशी जोडला गेला. गणेशोत्सव हा इथे पाहुण्याच्या आगमनाने झालेल्या तणावाला शमवणारा घटक ठरतो. देवाप्रतीची श्रद्धा कुटुंबीयांना पुन्हा एकत्र आणते, असा संदेश या चित्रपटातून मिळतो.
फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन’ या 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या थरारपटात शाहरूख खानचा प्रवेश प्रसंग अविस्मरणीय ठरतो. ‘मोरया मोरया’ या गाण्याद्वारे विजयची व्यक्तिरेखा प्रथमच समोर येते. गर्दीच्या लाटांमध्ये, उंचावलेल्या मूर्तीसमोर, ढोलांच्या तालावर घडणारा हा प्रसंग प्रेक्षकांना थेट उत्सवाच्या मध्यभागी नेतो. ‘डॉन’सारख्या थरारपटातही गणेशोत्सवाचा समावेश करणे हे या उत्सवाची लोकप्रियता आणि प्रेक्षकांवरचा प्रभाव अधोरेखित करणारे उदाहरण आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘एबीसीडी 2’ या रेमो डिसूझा दिग्दर्शित या नृत्यप्रधान चित्रपटात गणेशोत्सवाचे चित्रण ऊर्जेने भारलेले आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा यांची नृत्य रचना प्रेक्षकांना थेट विसर्जनाच्या मिरवणुकीत घेऊन जाते. ढोल-ताशा, नृत्यकला आणि तरुणाईचा उत्साह या चित्रपटात एकत्र येतो. इथे गणेशोत्सव हा तरुणाईच्या स्वप्नांना बळ देणारा आणि कला साकार करणारा उत्सव ठरतो.
‘शोर इन द सिटी’ या 2011मध्ये आलेल्या चित्रपटाची कथा मुंबईच्या गोंधळात आणि गुन्हेगारीत गुंतलेली असून ती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उलगडते. शहरातील रस्ते, गर्दी, नृत्य करणारे लोक, लाऊडस्पीकरचा आवाज हे सर्व चित्रपटात वास्तवतेने उतरवले आहे. पात्रांच्या संघर्षांना दिशा देणारा आणि शहराच्या धावपळीचे प्रतिबिंब दाखवणारा घटक म्हणून गणेशोत्सव येथे महत्त्वाचा ठरतो. राज-डीके दिग्दर्शक जोडीने सामाजिक आणि धार्मिक वास्तवाची उत्कृष्ट सांगड घातली आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचा प्रतीक आहे. काळ बदलला, तरी हा उत्सव लोकांना एकत्र आणत राहिला. चित्रपटसृष्टीनेही याचा लाभ घेत कथानकांना वास्तवदर्शी आणि प्रभावी बनवले. गणेशोत्सवाच्या द़ृश्यांतून मुंबईसारख्या शहराचे सामाजिक जीवन उलगडण्याचा प्रयत्न चित्रपटांच्या माध्यमातून झाला. दिग्दर्शकांनी उत्सवाचा वापर क्लायमॅक्ससाठी, नायकाच्या भावनांच्या उलगड्यासाठी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी केला. विघ्नहर्ता गणेश अडथळे दूर करणारे मानले जातात. त्यामुळे अनेक चित्रपटांत नायकाचा विजय किंवा संघर्षाचा टप्पा विसर्जनाच्या द़ृश्यात दाखवला गेला.