बहार

गंडिया आघाडी

Arun Patil

गुलबर्गा (कर्नाटक) विधानसभा मतदारसंघातून
सलग 9 वेळा विजयी झालेले,
कबड्डी, हॉकी, क्रिकेट (एकेकाळी) दणकून खेळणारे,
सिद्धार्थ बिहार ट्रस्टचे संस्थापक,
अंधविश्वास व रूढींविरोधात लढा देणारे,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष,
अ‍ॅडव्होकेट मल्लिकार्जुन मपन्ना खर्गे
बी.ए.एलएल.बी. वय वर्षे 82 यांचे चरणी

साष्टांग नमस्कार, विनंती विशेष…

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पलटूरामजी यांच्या पुढाकाराने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधी पक्ष एकत्र येतील आणि इंडिया आघाडी मजबुतीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उतरेल, या आपल्या अंधविश्वासास तडा गेल्याने आपणास वाईट वाटलेले आहे आणि आम्हालाही. नितीशकुमारांचा एकंदरीत राजकीय इतिहास पाहता, त्यांना कायम बॅटिंग करायची हौस असते, हे आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमीच्या लक्षात यावयास हवे होते; पण तुम्ही काँग्रेसवाले हुरळून गेलात आणि त्यांच्या पतंगाच्या दोराला ढील दिलीत. नितीशकुमारांना इंडिया आघाडीचे निमंत्रकपद हवे होते आणि नंतर साहजिकच 2024 मध्ये ही आघाडी जिंकली, तर पंतप्रधानपदावर त्यांचा डोळा होताच. तथापि, आघाडीचे निमंत्रकपद हुकल्यामुळे त्यांच्या अंधविश्वासास तडा गेला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी पलटी मारली. एकमेकांना गंडवणार्‍या या आघाडीला लोक आता 'गंडिया आघाडी' म्हणू लागले आहेत.

28 पार्ट्यांची इंडिया आघाडी हळूहळू पिछाडीवर जाते आहे. केजरीवाल, ममतादीदी, अखिलेश यादव या सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचे असल्यामुळे तेही आघाडीला पिछाडीवर नेण्यात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात पवार साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही महत्त्वाकांक्षा पालवलेल्या आहेत. (तथापि, एप्रिलमध्ये भिजण्याएवढा पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे.) आता ज्यावेळी जागावाटपाच्या बैठकीसाठी तुम्ही सगळे एकत्र बसाल, तेव्हा एकेक जण आपला रंग दाखवील. बार्गेनिंग करण्यात सगळेच आघाडीवर असतील. मनासारख्या जागा मिळत नसतील, तर एकेक पक्ष पतली गलीसे निकल जाएगा – खर्गेसाहेब, आपण कायद्याचे मोठे अभ्यासक आहात; पण हे कायद्याचे अभ्यासक आपणास वारंवार अडचणीत आणतील, असा आमचा होरा आहे. कबड्डी… कबड्डी… म्हणत ते एकमेकांच्या तंगड्या ओढतील आणि राजकीय हॉकीमध्ये एकमेकांवर गोल चढवतील. मोहब्बत की दुकान भागीदारीत चालवण्यास कुणीच तयार नाहीय, तेव्हा काँग्रेसने ते स्वतंत्रपणे एकट्यानेच चालू ठेवावे आणि त्यासाठी स्वतःच इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असा आमचा आपणास अनाहुत सल्ला आहे.

आम्ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे इंडिया आघाडीने जाहीर केले होते आणि आता इंडिया आघाडीची अब्रू वाचवण्याची वेळ आली आहे. तिकडे काँग्रेसचे प्रमुख नेते श्रीमान राहुल राजीव गांधी भारत जोडो न्याय यात्रा काढत पायपीट करत आहेत आणि इकडे इंडिया आघाडी तोडो फोडो यात्रा सुरू आहे. 2023 च्या ऑगस्टअखेरीस मुंबईच्या 'ग्रँड हयात' या पंचतारांकित हॉटेलमध्ये इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स अर्थात 'इंडिया' आघाडीची जेव्हा दोनदिवसीय बैठक झाली होती, तेव्हा जागावाटप प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे तुम्ही सर्वांनी ठरवले होते. हा तत्काळ 4 महिने होऊन गेले तरी अजून उजाडलेला नाही. तुमचे आघाडीचे हे जागावाटप होईपर्यंत बॅगावाटप होऊन गेलेले असेल. देणारे देतील, घेणारे घेतील आणि आणखी गळती लागत जाईल, हे तुम्ही लक्षात घेतलेले बरे. आगामी काळात निवडणूक प्रचारादरम्यान आघाडीचे सर्व घटकपक्ष एकत्रितरीत्या प्रचार करतील आणि देशातील नागरिकांचे मुद्दे उपस्थित करतील, असेही या बैठकीनंतर पत्रकारांना सांगण्यात आले होते. 'जुडेगा भारत, जितेगा भारत' हे ब्रीदवाक्य आणि थीम घेऊन इंडिया आघाडीचा प्रचार करण्यात येईल, असाही ठराव करण्यात आला होता; पण आता 'बुडेगा भारत, बीतेगा भारत' म्हणण्याची वेळ आघाडीवर आली.

तेव्हा आता निवडणूकपूर्व आघाडीचा विचार सोडून देऊन प्रत्येक पक्षाने स्वबळ अजमावणे हेच योग्य ठरेल. बेडूक कितीही फुगला, तरी बैल होत नाही कधी. निवडणुकीनंतर कोण बेडूक आणि कोण बैल हे दिसेलच. बैल जास्त निवडून आले, तर मगसुद्धा आघाडी करून मंत्रिमंडळ बनवता येईलच की. कुणी सांगावं, इंडिया आघाडी (निवडणुकीनंतर) सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाली, तर नितीशकुमार पुन्हा आघाडीत उडी मारतील. येनकेन प्रकारेन आपण सत्तेत पाहिजे असं ज्यांना वाटतं, त्यांना तुम्ही आयाराम म्हणा की, गयाराम म्हणा – काही फरक पडत नाही. 'ऐसा कोई सगा नहीं, जिसे हमने ठगा नहीं' हेच त्यांचं ब्रीदवाक्य असतं.

तेव्हा आता वेळकाढूपणा न करता, तत्काळ प्रभावाने काँग्रेसने 'गंडिया आघाडी' बरखास्त करत असल्याचे जाहीर करावे आणि 2024 च्या निवडणुकीत दणकून खेळावे, या आमच्या सूचनेचा तत्काळ विचार करावा, ही जाहीर विनंती.

– विनम्र बालक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT