विवेक गिरधारी
उद्धव हे कमालीचे आतल्या गाठीचे आणि हटवादी म्हणून त्यांच्या वर्तुळात ओळखले जातात. राज यांचा ईगो - अहंकार त्यांच्या कथित वलयापेक्षा आणि पक्षापेक्षाही मोठा आहे म्हणतात. आपले हे पिंडदोष ठाकरे बंधू जपून आहेत, हे या विजयी मेळाव्याच्या निमित्तानेही दिसले. दोघात राजकीय भाऊबंदकीचे हाडवैर आहे. रक्तामांसाच्या जखमा लवकर भरतात. त्यांचा विसरही पडतो. हाडाचे दुखणे मात्र ठणकत राहते, हेही तितकेच खरे!
उद्धव आणि राज ठाकरे स्थानिक निवडणुकांत एकत्र येणार, अशी जबरदस्त हवा महाराष्ट्रात आहे. आम्ही एक आहोत आणि यापुढेही एक असू, असे ते हिंदी सक्ती उधळून लावणार्या विजयी मेळाव्यात जाहीर करतील, असे महाराष्ट्राला वाटले होते. तसे झाले नाही. राज ठाकरे यांनी आपल्या अवघडलेल्या भाषणात महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याचा शब्दही उच्चारला नाही. उद्धव ठाकरेंनीही मराठी माणसाच्या मनात असेल तेच होईल. आज (तरी) आम्ही दोघे भाऊ मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत, असे नेहमीचेच पुन्हा ऐकवले; पण स्वतःच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता लागू दिला नाही. उद्धव हे कमालीचे आतल्या गाठीचे आणि हटवादी म्हणून त्यांच्या वर्तुळात ओळखले जातात. राज यांचा ईगो - अहंकार त्यांच्या कथित वलयापेक्षा आणि पक्षापेक्षाही मोठा आहे म्हणतात. आपले हे पिंडदोष ठाकरे बंधू जपून आहेत, हे या विजयी मेळाव्याच्या निमित्तानेही दिसले. दोघांत राजकीय भाऊबंदकीचे हाडवैर आहे. रक्तामांसाच्या जखमा लवकर भरतात. त्यांचा विसरही पडतो. हाडाचे दुखणे मात्र ठणकत राहते. हिंदी सक्तीविरोधातला मोर्चा रद्द झाला आणि उद्धवसोबत एकत्र येणे टळले म्हणून राज सुस्कारा सोडत नाहीत तोच संजय राऊत यांनी विजयी मेळाव्याचा घाट घातला आणि तो राज यांच्या गळी उतरवला. यानिमित्ताने ठाकरे बंधूंच्या खुर्च्या शेजारी शेजारी लागल्या, तरीही भाऊबंदकीचा ठणका जाणवत राहिला.
संयुक्त विजयी मेळावा घेतला म्हणून हे ठाकरे बंधू एकत्र आले, असे म्हणता येत नाही. कारण, दोघांत शब्दाचाही संवाद नाही. रद्द झालेल्या हिंदी सक्तीच्या विरोधातल्या मोर्चासाठी त्यांनी एकमेकांना फोन केला नाही. विजयी मेळावा घेऊ म्हणूनही ते एकमेकांशी बोलले नाहीत. संजय राऊत हेच मधल्या निरोप्याचे काम करत होते आणि ‘नवरा-नवरीपेक्षा करवली जोरात’ असे दोन्ही ठाकरे परिवारांचे फोटुसेशन सुप्रिया सुळेंनी मेळाव्यात करून घेतले. व्यासपीठावरून ऐकू येणार्या हाडाच्या ठणक्यावर इलाज कुणाकडे आहे?
तुम्ही म्हणाल, दोघा भावांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, हात उंचावून एकीची पोझ दिली. शेजारी बसून कानगोष्टी केल्या. त्याला वरळी डोमची सभा साक्षी आहे. हे बंधूमिलन नाही तर काय?
जाहीर सभांचे ते शास्त्र असते. अशा जाहीर सभांत पक्का वैरी बाजूला चुकून बसलाच, तर काही हरकती लोकलज्जेस्तव कराव्या लागतात. आपलेपणा दिसेल अशी देहबोली दाखवावी लागते. शेजारीच खुर्ची लावली म्हटल्यावर काहीही बोलण्यासारखे नसले, तरी कानाजवळ जाऊन बोलावे लागते. इच्छा नसताना हसावे लागते. चंद्रबळ आणून नारे-इशारेही द्यायचे असतात. ही सारी नाटके ठाकरे बंधूंनी या विजयी मेळाव्यात वठवली. नाटकच ते; टिकणार कसे? आता त्यांना प्रत्यक्षात एकत्र येऊन दाखवावे लागेल. एकमेकांशी बरोबरीने बोलावे लागेल. कुणी दादू नाही की, कुणी राजा नाही! कुणी सिकंदर नाही की, कुणी पुरू राजा नाही.
रणभूमीवर पराभूत पुरूला सिकंदराने विचारले, ‘तुला मी कसा वागवू ते सांग?’ पुरू म्हणाला, ‘सिकंदरा, तू मला एका राजासारखे वागव.’ हे उदाहरण गैरलागू वाटेलही. कारण, उद्धव जिंकलेले सिकंदर नाहीत; पण राज ठाकरेंच्या तुलनेत विजयाचे माप त्यांच्या बाजूने झुकते आहे. नऊ-दहा खासदार राज्यभरातून निवडून आले, वीस आमदार विधानसभेवर गेले. विरोधकांच्या एकूण 46 आमदारांत निम्मे उद्धव सेनेचेच आहेत. या तुलनेत राज ठाकरे पराभवाच्या अखंड मालिकेत स्वतःचा शोध घेत चाचपडत आहेत. ना नगरसेवक, ना आमदार ना कुणी राजकीय मित्र! तरीही, राज यांना एका पक्षप्रमुखाचा मान द्यावा लागेल. त्याशिवाय उद्धव यांच्यासमोर अन्य पर्याय नाही. कारण, दोन्ही भावांच्या कमी-जास्त राजकीय परिस्थितीत एक साम्य आहे. दोघांचे राजकारण ‘आज आहे, उद्या नाही’ अशा अस्तित्वाच्या संघर्षावर येऊन उभे आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायची म्हणून महाशक्तीने शिंदे सेना जन्मास घातली. या बंडावर मात करत उद्धव यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग करत अडीच वर्षे राज्य मिळवले. लोकसभा जिंकली. विधानसभेच्या निकालात गडबड आहे हा सार्वत्रिक प्रवाद मान्य केला, तरी शिंदे सेना वरचढ ठरली. आता महापालिका निवडणुका आणि त्यातही मुंबई महापालिका गमावल्यास उद्धव सेनेच्या आजूबाजूला जे मोजके मूठभर नेते दिसतात, ते तसे दिसण्याची शक्यता कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विस्ताराचा प्रश्न खुद्द राज यांना कधी पडला नाही; मात्र 2009 च्या विधानसभेवर 13 आमदार निवडून आणणारी मनसे आज शून्यात जमा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने उभे राहिले, तरी भाजपने अस्पृश्य ठरवले आणि मोदींच्या विरोधात प्रायोजित सभा घेऊनही महाविकास आघाडीने जागा दिली नाही. आता ठाकरे युतीचा एकमेव प्रयोग राज यांना आणि ओघानेच उद्धव यांनाही तारू शकतो. त्यासाठी 2025-2026 हेच वर्ष महत्त्वाचे. ते पुन्हा मिळणार नाही. कारण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेना स्थापनेची षष्ठ्यब्दीपूर्ती वर्ष आहे. ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे तो याच वर्षात. महापालिका निवडणुकांत तो सोडवावा लागेल. अन्यथा पाच वर्षांनी विधानसभा-लोकसभा निवडणुका लागतील तेव्हा आज 64 वर्षांचे उद्धव सत्तरी पार गेलेले असतील आणि 56 वर्षांचे राज एकसष्टीत! शिवसेनाप्रमुखांचा वारसा ठाकरेंकडेच आजच्या आणि उद्याच्या ठाकरेंसाठी टिकवायचा, तर उद्धव-राज यांना एकत्र यावेच लागेल. तसे झाले, तरच ठाकरे बंधूंच्या युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम संभवतात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि त्यांच्या सेनेचे बरे चालले होते, ते बिघडेल. शिंदे सेनेत शिंदे यांच्याशिवाय अन्य नेते, दुसर्या-तिसर्या फळीतले नेते, कार्यकर्ते यांना ठाकरे बंधूंच्या आघाडीचा नवा पर्याय खुला होईल. ठाकरे आणि शिवसेना हे अतूट समीकरण महाशक्तीने तोडू पाहिले आणि शिवसेनेत शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना केली. भवन सोडून शिंदे छत्रीखाली गेलेली शिवसेना ठाकरेंकडे परतण्यास सुरुवात होईल. प्रदेश भाजप आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यातल्या फटीत आपला जम बसवू पाहणार्या शिंदेंचा महायुतीतला प्रभाव ओसरू लागेल. पडद्यामागच्या डावपेचांसाठीच शिंदे ओळखले जातात. भाजपचे धुरीण, नेते त्यांच्याकडे तसेही दीर्घकालीन मित्र म्हणून पाहत नाहीत. शिंदेही ते जाणून आहेत. भाजप श्रेष्ठींच्या दिल्ली दरबारात आपली जागा टिकवण्यासाठी सतत चिंतेत असलेल्या शिंदे यांची चिंता ठाकरे बंधूंनी आताच वाढवली आहे. ठाकरेंच्या विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत शिंदे यांनी दिलेला ‘जय गुजरात’चा नारा या चिंतेतूनच निघाला असू शकतो. शिंदे सेनेचा विस्तार व्हायचा असेल, तर भाजपला त्यासाठीची किंमत मोजावी लागेल. यातून शिंदे विरुद्ध प्रदेश भाजप हा सुप्त संघर्ष धुमसत असताना शिंदे यांचे वजन घटवण्यासाठी ठाकरे बंधूंच्या युतीला चालना देण्याची भूमिका भाजप घेऊ शकतो. सेनेची मते एकाच वेळी दोन-तीन सेनांमध्ये विभागली जावीत, असे भाजपला वाटते. हे लक्षात आल्याने भाजपसोबत सत्तेत असूनही राजकीय उपेक्षा वाट्याला येऊ नये म्हणून शिंदे एकाचवेळी राज ठाकरेंना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील. प्रदेश भाजपशी खडाखडी करत भाजप श्रेष्ठींची मर्जी राखण्याचीही धडपड सुरू ठेवतील. त्यामुळेच आपण भाजपचे ज्येष्ठ नेते आहोत, असा भास त्यांना अनेकदा होतो. अलीकडेच एका जाहीर मुलाखतीत, ‘मी जेव्हा शिवसेनेत होतो...’ अशी सुरुवात त्यांनी एका उत्तराची केली आणि शिंदे यांच्यासोबत प्रश्न विचारणारे पत्रकारही बेचैन झाले. काळ बेचैन करणाराच आहे, तो असा!
ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजपचा अश्वमेध रोखू शकतील का, या प्रश्नाचे उत्तर खुद्द भाजप सावधगिरीने शोधताना दिसतो. 288 पैकी 132 आमदार मजबुतीने निवडून आणणारा भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राजकारणावर यापुढेही पक्की मांड ठोकून असेल. हिंदी सक्तीने महामुंबई प्रदेशात मराठी मते ठाकरे बंधूंच्या बाजूने एकवटली, तरी हक्काची मराठी मते आणि हिंदी व्होट बँक सोबत राहील, असे भाजपला वाटते. केवळ 30-32 टक्के मराठी मतांवर मुंबई जिंकता येत नाही, हे ओळखून भाजपने हिंदी सक्तीचा डाव खेळला आणि हिंदी मते पक्की केली, असा अंदाज बांधला जातो. तो मुंबईपुरता खरा मानायचा, तर राज्यातील सत्तर टक्के मराठी भाषकांवर हिंदी सक्ती लादून भाजपने काय मिळवले? ठाकरेंना नवे मैदान मात्र दिले! या मैदानात एक दीड टक्का मते फिरली, तरी निकाल बदलतो हा अनुभव भाजपने लोकसभा आणि विधानसभेला घेतला. आता ठाकरे युतीच्या प्रयोगाच्या बाजूने मुंबई, ठाणे, पुणे, नाशकात भाजपची किंचित मते फिरली, तरी त्याचे गंभीर परिणाम संभवतात. मुंबई महापालिका ठाकरे सेनेकडून खेचून घेण्याचे पाव शतकाचे स्वप्नही धोक्यात येऊ शकते. उद्धव यांचे हिंदुत्व मवाळ म्हणायचे, तर त्यांच्या जोडीने राज यांचे आक्रमक मराठी बाणा घेऊन उभे कडवट हिंदुत्व कसे परतवून लावणार, या प्रश्नाचे उत्तर नसल्यानेच भाजप अजूनही राज यांच्याबद्दल सावध आणि सबुरीची भूमिका बाळगून आहे. ठाकरे बंधू एकत्र आले आणि यशस्वी झाले, तर शिंदे छत्रीचे पंख आपोआप छाटले जातील, हा तत्कालिक लाभ भाजपला दिसतो; मात्र जिथे एक शिवसेना संपवायची होती तिथे दोन-तीन सेनांचे आव्हान उभे राहील. त्यामुळे राज यांना स्वतंत्र, स्वबळावर मैदानात उतरवणे भाजपसाठी श्रेयस्कर ठरेल. एकीकडे उद्धव यांच्यासमोर युतीसाठी हात पुढे करताना राज रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्री फडणवीस यांना हॉटेलात जाऊन भेटतात, याचा अर्थ आज उद्या कळणारच आहे. बंद दाराआडच्या रात्री-बेरात्रीच्या भेटींनी महाराष्ट्राचे राजकारण गढूळले. ते इतक्यात स्वच्छ होण्याची आशा नाही.
ठाकरेंच्या संभाव्य युतीने शिंदे छत्री धोक्यात, भाजप सावध आणि काँग्रेस मात्र कमालीची चिंतेत आहे. राज उद्धव एकत्र आले, तर काँग्रेसची सारी मदार असलेल्या महाविकास आघाडीचा खुळखुळा होईल. हिंदी सक्तीविरोधात रान पेटले तेव्हा काँग्रेस मराठी अस्मितेसोबत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जाहीर केले होते. मराठी अस्मितेचे राजकारण करणारे राज ठाकरे मात्र काँग्रेसला चालत नाहीत. भाजपची जी अडचण तीच काँग्रेसची. राज सोबत घेतले, तर हिंदी, मुस्लीम आणि सेक्युलर मते धोक्यात येतील असे काँग्रेसला वाटते. त्यामुळे राज यांना टाळी द्यायची, तर उद्धव यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडणे भाग आहे. तसे झाले, तर महाविकास आघाडी फुटली म्हणून टाळ्या वाजवायच्या की ठाकरेंच्या युतीचे नवे आव्हान समोर उभे ठाकले म्हणून कपाळावर हात मारून घ्यायचा, हे महायुतीला ठरवावे लागेल.
मनसेची निवडणूक राजकारणाची ताकद ती किती, असा हेटाळणीचा सवाल अगदीच माजघरातील ठरेल. ठाकरे बंधूंची युती महापालिका निवडणुकांच्या तोंडावर होऊ घातली आहे. 2006-2009 च्या पहिल्या महापालिका निवडणुका मनसेने लढवल्या. 12 महापालिकांत मनसेचे 45 नगरसेवक तेव्हा निवडून आले. मतांचा टक्का होता 5.87 टक्के. त्यात नाशिक, पुणे आणि मुंबईत मनसेने मजबुतीने पाय रोवले. मुंबईतला मत टक्का 10.43 टक्के होता. या पहिल्या पालिका निवडणुकीत मनसेचे मुख्य प्रतिस्पर्धी ठरले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. 63 जागांवर मनसे दुसर्या क्रमांकावर राहिली. 2009-2014 च्या महापालिका निवडणुकांत मनसेने 26 महानगरपालिका लढवल्या आणि 12.43 टक्के मते घेत 162 नगरसेवक निवडून आणले. नाशिक, पुणे, मुंबई , कल्याण डोंबिवली हे मनसेचे बालेकिल्ले राहिले. नाशकात बाहेरून पाठिंबा घेत मनसेने आपली सत्ताही आणली. 2014-2019 च्या महापालिका निवडणुकांत 27 पैकी 21 महापालिका लढवणार्या मनसेने फक्त 26 जागा जिंकल्या. मत टक्काही 3.56 टक्क्यांवर घसरला.
गेल्या विधानसभेला मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. 2009 ला 13 आमदार निवडून आणणार्या मनसेला 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येकी एका आमदारावर समाधान मानावे लागले. 2014 ला 16.65 टक्के मते घेणारी मनसे आज 1.8 टक्के मतांवर घसरली आहे. या घसरगुंडीत पक्षाची मान्यता आणि आरक्षित इंजिन देखील धोक्यात आले. अशी मनसे भाजप किंवा उद्धव सेनेच्या किती उपयोगी पडेल, असा प्रश्न उपस्थित केला जातो, त्यांनी मनसेच्या पालिका निवडणुकांचा हा जय -पराजयाचा इतिहास जरूर तपासावा.
आज राज यांच्याकडे एक पक्ष म्हणून गमावण्यासारखे काही शिल्लक नाही. उद्धव यांच्याकडे पक्ष म्हणून जे काही होते, त्यापैकी फार थोडे शिल्लक आहे. हे दोघे भाऊ स्वतंत्र लढले, तर उरलेसुरले गमावून बसतील. ठाकरे नावदेखील लावण्याची परिस्थिती त्यांच्या बाजूने उभी नसेल. ठाकरे म्हणून एकत्र आले, तर ठाकरे नावाचा ब्रँड नव्या ताकदीने उभा राहील आणि दोन्ही ठाकरे बंधू आपल्या पुढल्या पिढीच्या हाती हा ठाकरे ब्रँड वारसा म्हणून सोपवू शकतील.
ठाकरे ब्रँडसाठी एकत्र यायचे की, दुसर्याच्या वरातीत आपली सेना पुन्हा नाचवायची, हा निर्णय राज यांना घ्यायचा आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेपेक्षा आतल्या गाठी जपायच्या की, दोन पावले मागे जात राज यांना बरोबरीने सोबत घ्यायचे, हे उद्धव यांना ठरवायचे आहे. पंतप्रधान मोदींच्या विरोधात सभा घेण्याचे धाडस फक्त राज यांनी दाखवले हा दाखला कुणी देत असेल, तर तो इतिहासजमा झाला आहे. मध्ये ‘इडी’चा फेरा येऊन गेल्यानंतर राज पुन्हा मोदींच्या बाजूने बिनशर्त पाठिंबा देत उभे राहिले. आता उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्याची इच्छा राज यांनी सर्वप्रथम जाहीर केली; मात्र या दोन्ही भावांना एकत्र येऊ द्यायचे की, राज यांना स्वतंत्र उभे करून मतविभागणी करायची, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल. महाराष्ट्राच्या मनात काय असेल-नसेल, आज तरी देवाजींच्या मनात येईल तसेच घडेल. कारण, उद्धव आणि राज यांना युतीचा निर्णय घेण्याचे समान अधिकार नाहीत. महाविकास आघाडी सोडून महापालिका स्वबळावर लढवण्याचा विचार उद्धव यांनी यापूर्वीच बोलून दाखवला. त्यांना आघाडी सोडणे अवघड नाही. आघाडीलाच उद्धवशिवाय मैदानात उतरणे कठीण वाटते. याउलट राज यांना भाजप आपला मित्र मानतो; पण मित्रपक्ष म्हणून महायुतीत मात्र घेत नाही. भाजप ज्यांना मित्र मानतो त्या पक्षांना निर्णयाचे स्वातंत्र्य नसते. ते भाजपचे अंकित पक्ष असतात. मनसेच्या पायात भाजपच्या बेड्या प्रेमाच्याच म्हणायच्या; त्या तोडणे राज यांना किती शक्य होईल?
‘एक उसके प्यार की
कैद ही काफ़ी हैं सनम...
वो जंजीर तो हिला देता हैं,
लेकिन आजाद नहीं करता’
भाजपने प्रेमाने जखडून ठेवलेल्या राज यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.