शरयू माने
आयआयटीच्या रुटॅग विभागाने हल्लीच जैविक कचर्यापासून काड्याचे इंधन बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. काड्या इंधन म्हणून वापरता याव्यात म्हणून सुधारित गॅसिफायरची निर्मिती करण्यात आली. आणखी एक व्यवसाय उदयास आला. या गॅसिफायरचा उपयोग समाईक स्वयंपाकगृहासाठी जास्त उपयुक्त ठरतो.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये इंधन पुरवठा विस्कळीत होणे, व्यवस्थापन त्रुटी यामुळे विस्कळीत जनजीवन ही परिस्थिती निर्माण होते. सध्याच्या इराण-अमेरिका युद्धामुळे अशा त्रुटी सर्वांनाच जाणवत असतील. त्रुटी आणि पर्यायी व्यवस्था या दुव्यांमध्ये आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान विकसित होते. नवीन शोध लागतात किंवा जुन्या वळचणींच्या परंपरांना नवीन ऊत येतो. त्यात नवीनीकरण करून वस्तू वापरात आणल्या जातात. अशावेळी पुरातन वस्तूंच्या पुनरुत्थापनाकडे महत्त्वाची वाटचाल होते. गॅस टंचाईमुळे चुली पुन्हा घरोघरी स्थापित होऊ लागल्या. स्थापत्यशास्त्रात पूर्वी चुलींना वगळून कोणत्याच घराची रचना दिसून येत नाही. आधुनिकीकरणानंतर समाधान चुली म्हणजे लांबलचक छतातून वर जाणार्या धुराड्याच्या चुली आल्या, ज्या चुली आपले अस्तित्व घरोघरी धुरातून पसरवायच्या त्या लाजून धुराड्यातून धूर बाहेर लोटू लागल्या. अगदी घराच्या वरपर्यंत बाहेर! नंतर रॉकेलवर पेटणारे स्टोव्ह! त्यानंतर गॅस शेगड्या, इलेक्ट्रिक शेगड्या, मायक्रोवेव्हसारखी विद्युत कॉईलवर चालणारी उपकरणे इत्यादी.
या उपकरणांना चालवण्यासाठी इंधनाची गरज असते. चुली लाकडाशिवाय, स्टोव्ह रॉकेल शिवाय, गॅस शेगड्या एल. पी. जी., सी.एन.जी., बायोगॅस शिवाय चालत नाहीत आणि इलेक्ट्रिक उपकरणे विजेवर चालतात. त्याशिवाय दुसरे पर्याय उपलब्ध नाहीत. पर्यायी इंधन हे त्या त्या वेळच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार प्रक्रियेने निर्माण केले गेले. त्यासाठी उपलब्ध गोष्टींचा आणि टाकाऊ आणि पुन्हा वापरात येण्यासारख्या वस्तूंचा विचार केला गेला. हे इंधन बनविण्यासाठी प्रयोग केले गेले. शास्त्रज्ञ विकसित तंत्रज्ञानावर लक्ष देत त्रुटींवर अभ्यास करू लागले. याचा परिणाम म्हणजे वेळेचं व्यवस्थापन आणि आधुनिकीकरणाला हातभार यावर झाला. धक्काधक्कीच्या जीवनात माणसांची विशेषतः स्त्रियांची काबाडकष्टांपासून सुटका होत गेली आणि त्याही आधुनिकीकरणातली स्थित्यंतरं सोबत घेऊन समाजात पुरुषांच्या बरोबरीने आर्थिकद़ृष्ट्या सक्षम बनून स्थिरावत आहेत. व्यवसायनिर्मिती ही घरापासूनच होते. छोट्या छोट्या गरजांतून करण्याचे व्यवस्थापन आणि व्यावसायिकीकरण हे एक महत्त्वाचे समीकरण घरापासूनच चालू होते.
कचर्याचा सर्वात मोठा हिस्सा व्यवसायाचा भाग बनलेला आहे गृहिणींच्या स्वयंपाक क्रियेतून. याचा एवढा मोठा साठा बनत असतो की, विल्हेवाट लावणे म्हणजे एक प्रक्रियेचा हिस्सा बनलेले आहे. हा सेंद्रिय कचरा प्रत्येक घरातून जाऊन महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडे व्यवस्थापनासाठी गोळा केला जातो. रोजचा कचरा फक्त साठवणे म्हणजे तेवढी जागा विस्तारित करणे निव्वळ निष्क्रिय बाब आहे. त्यातून शोध लावणे, मुळात विल्हेवाट लावणे गरजेचे झाले. शोध प्रक्रिया ही गरजेतून निर्माण झाली. या सेंद्रिय कचर्यामध्ये वेगवेगळे टाकाऊ घटक समाविष्ट असतात. स्वयंपाक घरातील, हॉटेलांतील ओला-सुका कचरा, खेडोपाडी जनावरांचे शेण, तसेच कागद, पालापाचोळा, शिवाय मेलेली जनावरं हा कचरा वेगवेगळ्या ऋतूंनुसार बदलणारा असतो. या कचर्यातून मिथेन तयार होते. या कचर्यापासून वीजनिर्मिती केली जाते आणि वाहतुकीच्या इंधन निर्मितीसाठी त्यावर वेगळी प्रक्रिया केली जाते. यामध्ये कोंबड्यांची विष्ठाही समाविष्ट असते. सेंद्रिय कचर्यापासून मिथेन आणि बायोगॅस सोबत बायोमास आणि बायोपेट्रोलचीही निर्मिती होते. सेंद्रिय कचर्यापासून पुढील काही प्रक्रियेत इंधने जी रोजच्या उपयोगात आणली जातात आणि त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो....
बायोगॅसनिर्मिती ही ओल्या सेंद्रिय कचर्यावर म्हणजे शेण आणि कुजलेले अन्न बारीक करून त्यात पाणी मिसळले जाते. एका बंद टाकीत ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत सूक्ष्म जीवांद्वारे प्रक्रिया करून जो मिथेन वायू तयार होतो, तो स्वयंपाकासाठी आणि वीजनिर्मितीसाठी वापरला जातो. बायोमास पॅलेटस्ची निर्मिती- कृषी अवशेष भुसा आणि पालापाचोळा यांपासून हायड्रॉलिक मशिनद्वारे कडक इंधन कांडी (पॅलेटस्) बनतात, ज्याचा वापर बॉयलर किंवा भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून होतो. बायो इथेनॉल डिझेल बनवण्यासाठी जैविक प्रक्रियेद्वारे सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर द्रव इंधनात केले जाते. ते वाहनांसाठी वापरले जाते.
या सर्व प्रक्रियांचा फायदा म्हणजे लँडफिल मधला कचरा कमी होण्यास मदत होते. पर्यावरणाला पूरक नूतनीकरण क्षमतेची ऊर्जानिर्मिती होण्यास मदत होते. यापासून तयार होणारा मिथेन म्हणजेच बायोगॅस स्वयंपाकासाठी अत्यंत स्वस्त किंवा मोफत गॅस म्हणता येईल. त्यातून शिल्लक राहणारा उर्वरित गाळ किंवा चिखल सेंद्रिय खत म्हणून शेतातील पिकांना उपयुक्त असतो. मानवी शरीरातील तीन सेंद्रिय कचरा म्हणजेच, युरिया, युरिक, आम्ल आणि क्रियेटिन यांचाही सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये समावेश होतो.
कचरायुक्त इंधन म्हणजे रिफ्यूज-डिराईव्हड फ्यूएल- कचर्यापासून बनवलेले इंधन, जे घरगुती आणि व्यावसायिक या संमिश्र कचर्यापासून तयार केले जाते, ज्यामध्ये जैव विघटन तसेच प्लास्टिकचा समावेश असतो. जगातील बहुतेक प्लास्टिक कचरा 79 टक्के इतका कचरा यार्डमध्ये आणि एकूण निसर्गाच्या कवेत पहुडलेला आहे. सुमारे 12 टक्के प्लास्टिक जाळून टाकण्यात आले, तर 10 टक्क्यांपेक्षा कमी प्लास्टिक कचर्यातून पुनर्वापरात आणलेले आढळते. काच आणि इतर धातू जे ज्वलनशील नाहीत त्यांना वेगळे केले जाते. उर्वरित पदार्थ बारीक केले जातात, ज्यामुळे इंधननिर्मितीची प्रक्रिया बाधित होत नाही.
इंधनाचा सर्वात स्वच्छ प्रकार म्हणजे हायड्रोजन वायू. जे इंधन स्वच्छ मानले जाते, यामागचं कारण म्हणजे हे जळताना हवेत पाण्याची वाफ तयार होते. त्यामुळे ते प्रदूषणरहित इंधन आहे. ते संकुचित वायूच्या स्वरूपात किंवा द्रवस्वरूपात साठवले जाते.
2 जी इथेनॉल वाहतूक इंधनात वापरतात जे पेट्रोल आणि डिझेलऐवजी वापरता येते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ते पेट्रोलमध्येदेखील मिसळतात.
ई 20 पेट्रोल हे एक इंधन मिश्रण आहे, ज्यामध्ये 80टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल असते. इथेनॉल मका किंवा ऊस यांसारख्या वनस्पती आधारित पदार्थांपासून मिळते. नंतर त्यावरआंबवण्याची प्रक्रिया होते.
अशा विविध प्रकारे इंधननिर्मिती विविध कारणांच्या द़ृष्टीने विचार करून केली जाते. कचर्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे पाणी त्याच बरोबर माती प्रदूषित होते. जागतिक तापमान वाढ शिवाय आर्थिक भार वाढतो. आंतरराष्ट्रीय सहकार्याने तांत्रिक प्रगतीमधील बाधा नाहीशी होऊन प्रगती वाढीस लागते. हल्ली सेंद्रिय खतनिर्मिती मोठ्या प्रमाणात चालू आहे. कारण, इंधन निर्मितीनंतर उरलेला कचरा व्यवस्थापित करण्यासाठी शेतीमध्ये तो खत म्हणून वापरला जातो. त्यामुळे तो पुन्हा मातीत मिसळतो नव्या उद्देशाने. या सेंद्रिय खतामध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, निंबोळी पेंड, ताग आणि धेंचाची खते, कोंबडी खत, माशांचे खत, हाडांचा चुरा आणि गोमूत्र यांचा समावेश आहे.
हल्लीच जैविक कचर्यापासून आयआयटीच्या रुटॅग विभागाने काड्याचे इंधन बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. काड्या इंधन म्हणून वापरता याव्यात म्हणून सुधारित गॅसिफायरची निर्मिती करण्यात आली. आणखी एक व्यवसाय उदयास आला. या गॅसिफायरचा उपयोग समाईक स्वयंपाकगृहासाठी जास्त उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, वसतिगृहे जिथे स्वयंपाक मोठ्या प्रमाणात केला जातो, अन्न भोक्त्यांची दैनंदिन संख्या जास्त असते तिथे गॅसिफायर आपलं स्वयंपाक उरकण्याचं कार्य इतर साधनांपेक्षा चोख बजावतो. या गॅसिफायरसाठी लाकूड खर्च आणि झाडतोडीला आळा घालण्यासाठी वनस्पती काड्या पालापाचोळा गोळा करून कांड्या बनवण्यात यश आले. अत्यंत कमी खर्चात म्हणजे निम्म्या खर्चात हे इंधन तयार होते. गॅसिफायरचा व्यवसाय गाव पातळीवर बचत गटांना सहायक ठरेल असा आहे. इंधन तयार करण्यासाठी सोबत नवनिर्मित उपकरणे आणि साधनेही तयार होत आहेत. हे पर्यायी यश म्हणायला हरकत नाही; पण त्यातूनही मोठा फायदा मिळवून देणारं आहे.