Water Management | पाणीसंकट नको, जलसमृद्धी हवी 
बहार

Water Management | पाणीसंकट नको, जलसमृद्धी हवी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. व्ही. एन.‍ शिंदे

पाणी केवळ नैसर्गिक संसाधन नाही, तर मानवी जीवन, शेती, उद्योग, जैवविविधता आणि आर्थिक विकासासाठीची मूलभूत गरज आहे. पाणी पावसातून उपलब्ध होते. जगाच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विस्तीर्ण नदीखोरी, मोठी धरणे आणि भरपूर पर्जन्यमान असूनही दरवर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागते. २०२६मध्ये तर अल निनोमुळे राज्यात पाऊस कमी पडला आणि त्याचा परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर झाला. विशेष म्हणजे, कोल्हापूरसारख्या तुलनेने अधिक पाऊस पडणाऱ्या आणि नद्यांचे जाळे असलेल्या भागालाही बदलत्या जलस्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली.

यावर्षी २०२६च्या जून ते सप्टेंबरमध्ये नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या कालावधीत महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा फारच कमी पाऊस पडला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरीपेक्षा सुमारे १९ टक्के पाऊस कमी पडला. मराठवाड्यात ही तूट सुमारे ४० टक्के, विदर्भात २३ टक्के, कोकणात १४ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात ११ टक्के इतकी आहे. यावर्षीचा पाऊस सर्वत्र, सारख्याच प्रमाणात कमी पडला नाही. काही ठिकाणी कमी कालावधीत अतिवृष्टी झाली आणि पाणी वाहून गेले, जमिनीत ओलावा मुरलाच नाही. काही भागांत अनेक आठवडे पाऊस न पडल्याने पाणी मुरलेच नाही. त्याचा परिणाम नद्या, नाले, तलाव व भूजल पुनर्भरणावर झाला.

पाऊस कमी पडण्याचा थेट परिणाम राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला. महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या १७ नोव्हेंबर २०२६च्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये ९२३.६० टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. हा साठा एकूण उपयुक्त क्षमतेच्या सुमारे ६४ टक्के आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा १,३०९.९३ टीएमसी म्हणजेच सुमारे ९० टक्के होता. मागील वर्षाच्या तुलनेत साठ्यातील तूट ३८६.३३ टीएमसी इतकी आहे. विभागनिहाय परिस्थिती पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात सुमारे ३६ टक्के, अमरावती विभागात ५२ टक्के, नागपूर विभागात ५६ टक्के, कोकण विभागात ८१ टक्के, पुणे विभागात ७५ टक्के आणि नाशिक विभागात ७४ टक्के पाणीसाठा आहे.

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील तुलनेने अधिक पर्जन्यमान असणारा जिल्हा आहे. या भागाला येथील नैसर्गिक संसाधनांच्या समृद्धतेमुळे, भारताचे जलपुरूष राजेंद्रसिंह राणा ‘देवाचे लाडके लेकरू’ म्हणतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड आणि भुदरगड या तालुक्यातील घनदाट वन क्षेत्र आणि पंचगंगा, वारणा, दूधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा यासारख्या नद्यांमुळे जिल्ह्याला जलसमृद्धीचा नैसर्गिक वारसा लाभला आहे; मात्र २०२६मध्ये कोल्हापूर भागातील पावसाने चिंता वाढवली. २५ सप्टेंबरपर्यंतच्या हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील पावसाची तूट सुमारे ४९ टक्के होती. विशेष म्हणजे, राधानगरी तालुक्यात ६१ टक्के, चंदगडमध्ये ६१ टक्के, आजऱ्यात ४५ टक्के, गगनबावड्यात ४० टक्के आणि पन्हाळ्यात ३४ टक्के पावसाची तूट दिसून येते. यातही काही तालुक्यांमध्ये काही दिवसांत अतिवृष्टी झाली; मात्र पावसातील मोठे खंड आणि अनियमित पर्जन्यमानामुळे अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. याचा जलव्यवस्थापनावरही परिणाम झाला आहे.

१७ नोव्हेंबर २०२६च्या उपलब्ध जलसाठा नोंदींनुसार, जिल्ह्यातील ७३ धरणांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा सुमारे १६,९६,३४० दशलक्ष लिटर म्हणजे ८५.९९ टक्के होता. एकूण उपयुक्त क्षमता सुमारे १९,७२,६५६ दशलक्ष लिटर आहे. यामध्ये दूधगंगा प्रकलपात ८६.९५ टक्के, राधानगरी धरणात ८५.९५ टक्के, तुळशी धरणात ८९.७७ टक्के आणि तिलारी धरणात ९०.५७ टक्के इतका पाणीसाठा होता. राधानगरी धरणात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात उपयुक्त पाणीसाठा ९८.१८ टक्के होता, तो आज ८६.०३ टक्के इतका आहे. राज्यातील अन्य भागांच्या तुलनेत या भागातील पाणीस्थिती चांगली दिसत असली, तरी ती अत्यंत गंभीर मानायला हवी. तसेच ही परिस्थिती सर्व भागात सारखीच नाही. धरणातील पाण्यावर अवलंबून नसणारी गावे, विहिरी, बोअरवेल, लहान नद्या आणि शेतीचा स्वतंत्र विचार करताना कोल्हापूर भागातील काही गावांना टँकरने पाणी पुरवावे लागेल, असे चित्र समोर येते.

पाण्याची टंचाई केवळ पाऊस कमी पडल्यामुळे निर्माण होत नाही. त्यामागे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा अनेक कारणांचा एकत्रित परिणाम असतो. यातील पहिले कारण म्हणजे, पावसाचे अनियमित पडणे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि नंतर अनेक दिवसांचा खंड यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वेगाने वाहून जाते. दुसरे कारण म्हणजे, जंगलतोड आणि जमिनीची धूप. वृक्षराजी, गवताळ प्रदेश आणि नैसर्गिक पाणलोट क्षेत्र नष्ट झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले. माती वाहून धरणामध्ये गाळ वाढतो. तिसरे कारण म्हणजे, भूजलाचा अतिरेकी वापर. शेती, उद्योग आणि वाढत्या नागरीकरणामुळे विहिरी व कूपनलिकांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसले जाते; मात्र उपसलेल्या पाण्याइतके पुनर्भरण होत नाही. चौथे कारण म्हणजे, पाण्याचा अपव्यय. पारंपरिक पाटपाणी सिंचन पद्धती, पाण्याची गळती, अयोग्य सिंचन आणि पाण्याचा अमर्याद वापर याचा परिणाम उपलब्ध साठ्यावर ताण येण्यामध्ये होतो. जलटंचाई निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, बदलते हवामान. जागतिक तापमानवाढ, पावसाच्या पद्धतीतील बदल आणि बाष्पीभवनात सातत्याने होणारी वाढ यामुळे जलचक्रावर परिणाम होतो.

त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी केवळ नवीन धरणे बांधून उपयोग नाही. कारण, धरणे भरून वाहिली, तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी २०२५ चा पाऊस आणि उन्हाळा आठवला तरी पुरेसे आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे, जमिनीत मुरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, ही खरी गरज आहे. यासाठी प्रत्येक घर, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आणि औद्योगिक इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करायला हवे. डोंगर उतारांवर समतल चर, कंटूर बंडिंग, लहान बंधारे, शेततळी आणि नालाबांधणी करायलाच हवी. सह्याद्रीतील नैसर्गिक जंगल, देवराई, गवताळ प्रदेश आणि नदीकाठची वनसंपदा जपण्याची गरज आहे. विहिरींचे पुनर्भरण, रिचार्ज शाफ्ट, पाझर तलाव आणि जलसंधारणाच्या पारंपरिक पद्धतींचा वापर गरजेचा आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कमी पाण्यात येणारी पिके आणि पीक नियोजनाला प्राधान्य द्यायला हवे. शहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्याने, उद्योग आणि शेतीसाठी वापरल्यास शुद्ध पाण्यावर पडणारा ताण कमी होईल. नदीपात्रातील अतिक्रमणे, वाळू उपसा, प्रदूषण आणि नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करण्याची गरज आहे. प्रत्येक गावाने ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचा वार्षिक ताळेबंद तयार करावा. यात पाणी उपलब्धता, पाण्याचा वापर आणि पाण्याची मुरवण याचा हिशेब ठेवावा.

यापुढे दोन महत्त्वाच्या कारणांमुळे आपण पाणी अडवले, जिरवले, काटकसरीने वापरले, तरीही पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यातील पहिले कारण आहे बाष्पीभवन. ते कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखायला हव्यात. आज ती गोष्ट नियंत्रित करणे आपल्या हाती नाही. दुसरा भाग आहे तो कूपनलिकांतून होणारा पाणी उपसा. कूपनलिकांबाबत असणाऱ्या शासननियमांचे काटेकोर पालन होण्याची गरज आहे. कूपनलिका दोनशे फुटांपेक्षा जास्त खोदता येत नसतानाही आज कूपनलिका कशा खोदल्या जातात, याचा विचार करायला हवा. तीच बाब दोन कूपनलिकांतील अंतराबाबत आहे. कूपनलिकांतून उपसल्या जाणाऱ्या अमर्याद पाणी उपशामुळे जमीन शुष्क होत आहे आणि धरणातील पाणी वेगाने कमी होते. धरणाजवळच्या जमिनीतून भूजल जितके जास्त उपसले जाईल, तितका धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होतो. त्यामुळे कूपनलिकावर निर्बंध तातडीने आणायला हवेत.

निसर्गसंपत्तीचा योग्य वापर आणि तिचे संरक्षण हीच शाश्वत विकासाची पायाभरणी आहे. पाऊस पडणे निसर्गाची प्रक्रिया आहे; परंतु त्या पावसाचे पाणी साठवणे, त्याचे नियोजन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन, ही आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वसा आणि वारसा लाभलेल्या कोल्हापूरने पाणी समृद्धता टिकवून आदर्श निर्माण करायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT