जगाला हादरवणारी मैत्री ते वैमनस्य ! File Photo
बहार

जगाला हादरवणारी मैत्री ते वैमनस्य !

एलॉन मस्क आणि सर्वात ताकदवान सत्ताधीश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यातील वैमनस्य वाढत जाणार की व्यवहार्य तोडगा निघून समेट होणार

पुढारी वृत्तसेवा
अनिल टाकळकर

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क आणि सर्वात ताकदवान सत्ताधीश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यातून आता विस्तव जात नसला, तरी यापुढे हे वैमनस्य वाढत जाणार की व्यवहार्य तोडगा निघून समेट होणार, हा कळीचा मुद्दा झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मस्क यांनी ‘एक्स’द्वारे, तर ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’ या आपल्या समाजमाध्यमातून परस्परांवर भरपूर तोंडसुख घेतले असून अनेक आरोप-प्रत्यारोप, धमक्या दिल्या गेल्याचे धक्कादायक वास्तवनाट्य सार्‍या जगाने पाहिले आहे. ही या दोघांच्या द़ृष्टीने हितावह बाब नसून या वैयक्तिक वादामुळे परस्परांचे नुकसान करण्याचा प्रयत्न होणे शक्य आहे. त्याचा फटका केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर अप्रत्यक्षपणे जगालाही बसू शकतो.

अमेरिकेचे राजकीय वातावरण आणि जागतिक धोरणावरही त्याचे परिणाम होण्याची भीती म्हणूनच व्यक्त होत आहे. राजकारणात मित्राचा शत्रू होणे किती हानिकारक होते, याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. हाही अहंकारातून निर्माण झालेला संघर्ष त्याला अपवाद नाही. सरकारमधील सर्वोच्च उच्चपदस्थ आणि धनाढ्य उद्योगपती यांनी एकत्र येण्याने हितसंबधाबाबत संघर्ष (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) निर्माण होणे अपरिहार्य होते. त्याचीच परिणती या दोघांच्या तथाकथित मैत्रीमुळे झाली; पण तूर्त तरी दोघांमध्ये ‘शस्त्रसंधी’ झाल्यासारखे वातावरण आहे .

स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडालेल्या (नार्सिसिस्ट) या दोघा वेगवेगळ्या अर्थांनी शक्तिशाली व्यक्तींच्या भांडणात नेमकी कोणाची सरशी होईल, याविषयी उलटसुलट तर्कवितर्क केले जाणे स्वाभाविक आहे. मस्क लहरी, विक्षिप्त असले, तरी तंत्रज्ञान क्षेत्रातील त्याची प्रतिभा नाकारता येणार नाही; पण राजकारणाचा गंध नसल्याने त्यांना डोजच्या (डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट एफिशिअन्सी) कामकाजात अपयश आले. घिसाडघाईने लाखो सरकारी कर्मचारी त्यांनी कमी केले, तरी त्यांना अपेक्षित 2 लाख कोटी डॉलर्स एवढी सरकारी खर्चात बचत करता आली नाही. ते अवघी 180 अब्ज डॉलर्स एवढ्या खर्चाला कात्री लावू शकले.

शिवाय, त्यातून त्यांना सरकारी कर्मचार्‍यांचा रोष ओढवून घ्यायला लागला, तो वेगळाच. त्या तुलनेत ट्र्म्प आता मुरब्बी राजकारणी झाले असल्याने त्यांनी परिस्थिती स्वत:साठी अनुकूल करून घेतलेली दिसते. राजकारणात जनमत, आघाड्यांचे राजकारण आणि तत्त्वांशी तडजोडी याची तार्किक संगती बड्या उद्योगपतींनाही लावता येत नाही. राजकारणात फिजिक्सचे फॉर्म्युलेही चालत नसतात, याचा अनुभव हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन, स्टीव्ह जॉब्ज अशा उद्योगपतींनी घेतला आहे. मस्कसारखे इंजिनिअर संदिग्धता, दुविधा आणि गोंधळ (अ‍ॅम्बिग्युअटी) दूर करण्याचा प्रयत्न करतात; पण राजकारण मात्र त्यावरच पोसले जाते. हा फरक लक्षात न आल्याने मस्क डोजमध्ये फसले. त्यामुळे ते कितीही श्रीमंत असले, तरी ट्र्म्प यांच्याविरुद्धची लढाई जिंकणे त्यांना अवघड आहे.

ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी मस्क यांनी अध्यक्षीय निवडणुकीत सुमारे 27 कोटी 50 लाख डॉलर्स खर्च केले आहेत. इतकेच नव्हे, तर दर दोन वर्षांनी म्हणजे 2026 मध्ये होणार्‍या काँग्रेसच्या निवडणुकीसाठी 10 कोटी डॉलर्स खर्च करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला होता. आता बदलत्या परिस्थितीत ते हा खर्च कितपत करतील. रिपब्लिकन उमेदवारांना पाठिंबा देण्याऐवजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही रक्कम ते खर्च करतील का, ही मोठी चिंता आहे. ‘रिपब्लिकनांविरोधात लढण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना अर्थिक मदत दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा म्हणूनच ट्र्म्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले, मोठ्या प्रमाणावर कर कपात सुचविणार्‍या बिग अँड ब्युटीफूल बिलाला मस्क यांनी तिखट टिकेचे लक्ष्य केल्याचा त्यांना राग आहे. किळसवाणे, घृणास्पद (डिसगस्टिंग अबॉमिनिशन) अशी जहरी टीका त्यावर करताना त्यांनी या विधेयकामुळे अंदाजपत्रकीय तूट 2.5 लाख कोटी डॉलर्सने वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. त्यावर सरकारी खर्चात अब्जावधी डॉलर्सची बचत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मस्क यांना दिली गेलेली सरकारी कंत्राटे आणि अर्थिक सवलती रद्द करण्याचा आहे, असा पलटवार ट्र्म्प यांनी केला आहे. मस्क यांच्या कंपन्यांना 2003 पासून दिली गेलेली कंत्राटे आणि आर्थिक सवलती (कर्जे, सबसिडी आणि टॅक्स क्रेडिटस्) सुमारे 36 अब्ज डॉलर्सच्या घरात जातात. ट्रम्प प्रशासनाने हा टेकू काढून घेतला, तर मस्क यांच्या कंपन्या अडचणीत येऊ शकतात; पण हे करणे सोपे नाही.

कारण, अमेरिकन संरक्षण खाते (पेटॅगॉन) आणि नासा मस्क यांच्या स्पेस एक्सवर पूर्णपणे अवलंबून आहेत. ही रॉकेट लाँच आणि स्पेस बेस्ड कम्युनिकेशन कंपनी अंतराळातील मोहिमांसाठी आणि सरकारी डेटा जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी अमेरिकेच्या द़ृष्टीने महत्त्वाची आहे. ट्रम्प यांनी बाह्य प्रक्षेपणास्त्र रोखणारी जी महत्त्वाकांक्षी अंतराळस्थित प्रणाली (गोल्डन डोम) विकसित करण्याची घोषणा केली आहे, त्यासाठी डझनावारी उपग्रह अवकाशात सोडावे लागतील. शत्रूकडून सोडली गेलेली प्रक्षेपणास्त्रे रोखण्यासाठी अंतराळस्थित ऑब्झरव्हेशन आणि डेटा ट्रान्समिशन सिस्टीम लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत स्पेस एक्सला तूर्त तरी पर्याय नाही. अलीकडे ब्ल्यू ओरिजिन, रॉकेट लॅब आदी कंपन्या नव्याने रॉकेट तयार करू लागल्या असल्या, तरी स्पेस एक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटच्या गुणवत्तेच्या पासंगाला त्या पोहोचत नाहीत.

अमेरिकन सरकारने मस्क यांच्या स्पेस एक्सला 18 अब्ज डॉलर्स दिले असून नासा आणि पेटॅगॉनची सर्वाधिक कंत्राटे यात समाविष्ट आहेत. (नासाच्या प्रमुखपदी आपल्या मर्जीतील जेरेड आयझकमन यांची नियुक्ती व्हावी म्हणून मस्क का आग्रही होते, हे यावरून स्पष्ट होते; पण त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षालाही देणग्या दिल्याचे मस्क विरोधकांनी निदर्शनास आणून दिल्यावर ट्रम्प यांनी या नियुक्तीस नकार दिला. उभयताच्या भांडणाचे हेही एक कारण आहे. टेस्लाच्या कर सवलती काढून घेतल्या, हेही मस्क यांच्या नाराजीचे आणखी एक कारण असल्याचे सांगितले जाते.) या कंपनीला कंत्राटे दिली गेली नाहीत, तर अंतराळात तसेच चंद्रावर माणसे पाठविण्याच्या कार्यक्रमाला खीळ बसू शकेल. शिवाय ही कंत्राटे रद्द केली, तर नासासारख्या एजन्सीजना जी टर्मिनेशन फी मस्क यांना द्यावी लागेल, ती लक्षात घेतली, तर कंत्राट पुढेही चालू ठेवणे हे कमी खर्चिक असेल. यात आपला फायदा असल्याने स्पेस स्टेशनवर अंतराळवीर पाठविण्यासाठीची उड्डाणे थांबविण्याची आधी दिलेली धमकी मस्क यांनी आता मागे घेतली आहे.

मात्र, मस्क यांच्या अनेक कंपन्यांना सरकारी कायद्यांचा भंग केल्याच्या आरोपांना अजूनही सामोरे जावे लागत आहे. ट्रम्प यांच्या निकटवर्तीय वर्तुळात आल्याने त्याच्या चौकशीची गती मध्यंतरी मंदावली होती; पण ट्रम्प यांनी इशारा दिल्यास ही प्रक्रिया गतिमान होऊ शकते. बायडेन यांच्या राजवटीतील आपल्या काही टीकाकारांच्या विरोधात ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’चे शस्त्र ट्रम्प यांनी वापरले होते. ते मस्क यांच्या विरोधात वापरल्यास ते स्पेस एक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करू शकणार नाहीत, तसेच सरकारबरोबरही त्यांना काम करणे अशक्य होईल. परदेशातील सरकारांच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्काबाबतची माहिती मस्क यांनी उघड केली नसल्याची शंका पेटॅगॉनला आहे.

सिक्युरिटी क्लिअरन्ससाठी ही अट लागू आहे. भविष्यात नवीन कंत्राटे जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनला किंवा बोईंग लॉकहीड यांच्या भागीदारीला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मस्क यांचा जन्म दक्षिण अफ्रिकेतील असून अमेरिकेचे ते नॅचराईल्ज्ड सिटीझन आहेत. ते बेकायदेशीर स्थलांतरित असल्याची शंका ट्र्म्प यांचे माजी चीफ स्ट्रॅटेजिस्ट स्टीव्ह बॅनन यांनी व्यक्त केली असून त्यांची चौकशी करून देशातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मस्क यांच्या अमली पदार्थांच्या सेवनाचा विषय ट्रम्प यांनीही उपस्थित केला असून बॅनन यांनी त्याच्या तसेच चीनबाबतच्या गुप्त माहितीचे ब्रिफिंग पेटॅगॉनकडून मिळविण्याच्या प्रयत्नाच्या चौकशीचा आग्रह धरला आहे.

दुसरीकडे मस्क हे एक्सद्वारे ट्रम्पविरोधाची धार तीव्र करू शकतात. नवीन पक्ष काढण्याचे सूतोवाच त्यांनी एक्सद्वारेच केले होते. ट्रम्प यांच्या इम्पिचमेंटचा विषय तसेच कोवळ्या मुलींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आरोपी जेफ्री इप्स्टीन यांच्या फाईल्समध्ये ट्रम्प यांचा उल्लेख असल्याचा आरोप याच व्यासपीठावरून मस्क यांनी केलेला होता. या फाईल्स लोकांपुढे येऊ नयेत म्हणून त्याची प्रक्रिया ट्रम्प प्रशासन लांबणीवर टाकत आहे, असाही मस्क यांचा दावा आहे. ट्र्म्प यांचे कर कपातीचे विधेयक सिनेटमध्ये मंजूर होऊ नये म्हणून अधिक खर्च कपातीचा आग्रह धरणार्‍या काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरण्याचा प्रयत्नही ते करण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या सत्ताकालाची अवघी साडेतीन वर्षे आहेत, तर ‘मी अजून किमान 40 हून अधिक वर्षे असेन’ असे म्हणताना आपला राजकीय संघर्ष दीर्घकालीन चालेल, असे मस्क यांनी सूचित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT