Water Scarcity | कमी होत आहेत गोड्या पाण्याचे स्रोत 
बहार

Water Scarcity | कमी होत आहेत गोड्या पाण्याचे स्रोत

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मंगेश कश्यप

भूपृष्ठावरून वाहत जाणारा पाऊस जो जमिनीतही मुरत नाही अथवा शिरकावही करत नाही किंवा वातावरणातही परत येत नाही, तो नद्या, नाले, तलाव, मोठी जलाशये यांच्यात जमा होतो आणि त्यातही नंतर तो समुद्राला जाऊन मिळतो. तिथे चार इंच खोल असलेल्या बर्फात एक तृतीयांश पावसाइतके पाणी असते.

आज जगात कुठेही गेले, तरी दोन प्रश्न अत्यंत गंभीरपणे चर्चिले, बोलले जातात. ते म्हणजे हवामान बदल आणि पाणी यासंदर्भाने भविष्यातील राष्ट्रा -राष्ट्रांमधील संबंध. कारण, या दोन गोष्टींवर आपल्या सर्वांचे जे काही आशावादी उज्ज्वल भविष्य आहे ते अवलंबून आहे. हे मी कठोरपणे लिहीत आहे. कारण, नैसर्गिक जलस्रोतांचे संगोपन, संवर्धन, संरक्षण, संयोजन करण्यात आपण जगभरातील सर्वच देश कमी-अधिक प्रमाणात कमी पडलो आहोत. त्यातल्या त्यात विकसित देशांनी भविष्यातील हा धोका ओळखून आपापल्या परीने काही सकारात्मक, धोरणात्मक बदल घडवून त्याप्रमाणे जीवनशैली घडविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. अर्थशास्त्राच्या द़ृष्टीने विचार करायचा झाला, तर उपलब्ध सर्वच नैसर्गिक साधनसंपत्ती स्रोत हे आर्थिक विकासाचा पाया आहेत. जगाच्या पाठीवर पाण्याविषयी काही तथ्य पाहू गेल्यास पाण्याचे महत्त्व आणि विषयाची गुंतागुंत तसेच त्यातील रंजकता ही निदर्शनास येते.

जगाच्या पाठीवर पाणी आणि पाणीच आहे फक्त. जगाच्या अथवा विश्वाच्या अंतरंगात पाण्याशिवाय काय आहे, याचा विचार पाहू जाता खूप काही आहे; पण पाण्याइतके महत्त्व अन्य कशालाच नाही. पाण्यापासूनच पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि अजून काही हजार वर्षांनी पाण्यातच पृथ्वीचा विलय ठरलेला आहे, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही. आपण वर्तमानाचा विचार केला, तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की, जगातील काही भाग अतिशय समृद्ध संपन्न आहेत, तर काही अगदी कोरडे रखरखीत आहेत आणि तेथे पिण्यायोग्य पाणीही नाही. हे असे का होते, याविषयीसुद्धा फारसे काही लिहिण्याची अथवा नव्याने काही सांगण्याची आवश्यकता नाही. पारिस्थितिक अर्थशास्त्र त्यातही पाण्याचे अर्थशास्त्र. नैसर्गिक साधनसामग्रीची अथवा नैसर्गिक विविध स्रोतांच्या किंवा उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या वापराच्या निर्णयावर मानवी मानसिकता कशी परिणाम करते व त्याचा आर्थिक विकासावर काय परिणाम होतो, हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे.

पृथ्वीचा पृष्ठभाग जवळजवळ 71 टक्के पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजेच 326 मिलियन क्युबिक माईल्स इतक्या पाण्याने ही वसुंधरा व्यापली आहे. त्यापैकी 97 टक्के इतके पाणी हे महासागरात उपलब्ध आहे. त्या 97 टक्के पाण्यापैकी थोड्याफार प्रमाणात त्या पाण्याचा वापर मत्स्य व्यवसाय, इतर औद्योगिक प्रक्रिया इत्यादींमध्ये करण्यात येतो. पिण्यासाठी हे पाणी अत्यंत खारे असल्यामुळे वापरात येत नाही. उर्वरित तीन टक्के पाणी हे निर्मळ, ताजे पाणी म्हणून आपण वापरू शकतो. त्यापैकी अडीच टक्के पाणी हेसुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाही. हे पाणी हिमनद्या, बर्फाचे ध्रुवीय पर्वत, बाष्प, वातावरण माती किंवा भूगर्भात खोल असे भूजल स्वरूपात आपणास पाहावयास मिळते. उर्वरित 0.5 टक्के पाणीच फक्त आपली तहान आणि इतर अत्यावश्यक गोष्ट भागवण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजेच जगाचा पाणीपुरवठा 100 लिटर असेल, तर गोड्या पाण्याचा आमचा वापर करण्यायोग्य पाणीपुरवठा फक्त 0.003 लिटर म्हणजेच दीड चमचा असेल आणि या 0.5 टक्के गोड्या पाण्याची आपण किंमत पाहायला गेलो, तर ती अमेरिकेच्या जीडीपीच्या काही पटीत होईल आणि अशी वेळ आलीच, तर विचार करा की, ही वसुंधरा आपल्याला किती प्रमाणात मोफत शुद्ध पाणी देते आहे आणि आम्ही तिच्या या अनमोल भेटीची किती हेळसांड करतो आहे. वास्तविक पाहता उपलब्ध गोड्या पाण्यापैकी प्रत्येक व्यक्तीसाठी आयुष्यभरासाठी 8.4 दशलक्ष लिटर एवढे पाणी प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येते आणि पृथ्वीकडून हे पाणी सातत्याने विविध स्वरूपांत गोळा केले जाते. शुद्ध केले जाते आणि जलविज्ञान चक्राच्या व्यवस्थेमार्फत जगात वितरीत केले जाते. याच्या वितरणाचे निसर्ग चक्र ही एक सखोल अभ्यासाची बाब आहे. हे वितरणाचे वसुंधरेचे गणित म्हणजे खर्‍याअर्थाने समन्यायी पाणी वाटप असे म्हणावे लागेल. महासागर 97 टक्के, हिमनद्या दोन टक्के, भूजल शून्य पॉईंट 62 टक्के, गोड्या पाण्यातील जलाशय 0.009 टक्के, अंतर्देशीय समुद्र 0.008 टक्के. म्हणजेच पृथ्वी 28 इंच व्यासाची असेल, तर पृथ्वीवरील सर्व पाणी एका कपापेक्षा थोडं कमी भरेल त्यातही एका कपात फक्त 0.03 टक्के इतके पाणी नद्या आणि गोड्या पाण्याच्या जलाशयांमध्ये आहे. म्हणजेच अजून थोड्याशा पाण्याने पृथ्वीवरील सर्व नद्या आणि तलावे भरतील आणि नेमके तिथेच मेख आहे. कारण, आपण ताज्या पाण्याचे स्रोत आधुनिकतेच्या नावाखाली बर्‍यापैकी बुजवून टाकले आहेत. गोड्या पाण्याचे स्रोत हे जगभरातच कमी होत चालले आहेत. भूजल पाणी जमिनीत खोलवर झिरपत एक्वाफर नावाच्या भूमिगत खडकांच्या माध्यमातून साठवले जाते, तसेच काही पाणी जमिनीच्या खाली खोलवर पाझरत जाते आणि काल-परवापर्यंत ते पाणी परवडणार्‍या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्याला उपलब्धही होऊ शकत होते. तसेच भूपृष्ठावरून वाहत जाणारा पाऊस जो जमिनीतही मुरत नाही अथवा शिरकावही करत नाही किंवा वातावरणातही परत येत नाही, तो नद्या, नाले, तलाव, मोठी जलाशये यांच्यात जमा होतो आणि त्यातही नंतर तो समुद्राला जाऊन मिळतो. तिथे चार इंच खोल असलेल्या बर्फात एक तृतीयांश पावसाइतके पाणी असते.

(लेखक, पाणी, पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत. तसेच पुणे स्थित सिरम ईएसआर फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT