Finland education system | शिक्षेवाचून शिक्षण... आनंदी शिक्षण!  
बहार

Finland education system | शिक्षेवाचून शिक्षण... आनंदी शिक्षण!

पुढारी वृत्तसेवा

श्रीराम ग. पचिंद्रे

फिनलँडमध्ये शिक्षणात गंमत असते, हे विद्यार्थ्यांना कृतिशील अभ्यासातून जाणवतं. तिथल्या शिक्षण व्यवस्थेची दखल आज जगानं घेतलेली आहे. युरोपीयन महासंघानं या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास सुरू केलेला आहे, तसेच जगभरातील शिक्षणतज्ज्ञ आता या शिक्षण पद्धतीचा शोध घेत आहेत. भारतातही असं होऊ शकेल का?

द़ृश्य क्रमांक एक : दिल्लीतील एक नामवंत आणि श्रीमंत पालकांच्या मुलांची शाळा. एका मराठी पालकांच्या मुलानं आत्महत्या केली. आपल्या प्राचार्या आणि इतर शिक्षिका आपला सतत अपमान करत असल्याचं त्या मुलानं आपल्या आत्महत्यापूर्व पत्रात लिहून ठेवलं होतं.

द़ृश्य क्रमांक दोन : वसईतील शाळेत एका विद्यार्थिनीला शिक्षिकेनं शंभर उठाबशा काढायला लावल्या. भयंकर शारीरिक शिक्षेचा तो ताण असह्य होऊन त्या मुलीचा मृत्यू झाला.

द़ृश्य क्रमांक तीन : छत्तीसगड येथील एका शिक्षिकेनं पाच वर्षांच्या विद्यार्थ्याला शिस्त लावण्याच्या नावाखाली झाडाला उलटं टांगलं.

बस्स! केवळ ही तीनच उदाहरणं आपल्या शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाच्या आणि गंभीर दोषांकडे बोट दाखवायला पुरेशी आहेत. शिक्षण ही शिक्षा आणि शाळा हे कारागृह आहे, ही आपल्या विद्यार्थ्यांची भावना असणं हे देशाला घातक आहे.

‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम’ ही ओळ घोकत घोकतच आपला समाज इथपर्यंत आलेला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा देणं, हे काही प्रसंगी आवश्यक असतं; पण ही शिक्षा जीवघेणी ठरावी असं कोणत्याही शिक्षणशास्त्रात लिहिलेलं नाही. शाळा हे विद्यार्थ्यांना आनंदाचं निधान वाटलं पाहिजे; पण तसे ते का वाटत नाही? घरातून पालकांनी शाळेत जाण्यासाठी मुलाला मारायचं आणि शाळेत गेल्यावर अभ्यास केला नाही किंवा तथाकथित शिस्त मोडली म्हणून शिक्षकांनी बेदम मारायचं ही पद्धत घातक आहेच शिवाय ती सामाजिक व्यवस्थेला बाधक आहे. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांची किंबहुना बाल्यावस्थेतील मुलांची आणि तरुण पिढीची सहनशीलता कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आत्महत्या करावी, त्यांना शाळा नकोशी व्हावी, किंबहुना जगणं नकोसं व्हावं इतपत शिक्षा देणं किंवा सतत त्यांचा अपमान करणं, त्यांना टोचून बोलणं हे शिक्षकांनी कटाक्षाने टाळायला हवंच.

शैक्षणिक द़ृष्ट्या अत्यंत प्रगत असून शिक्षण देण्याची पद्धत ही अतिशय आधुनिक आणि शिक्षणाचा आनंद वाटावा अशी असल्याच्या शाळा मी पाहिल्या त्या फिनलँडमध्ये. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत चिमुकला म्हणावा असा हा अतिशय सुंदर देश. ‘हेलसिंकी महानगरपालिका आपलं सहर्ष स्वागत करत आहे’ असा एकही फलक कुठेही दिसत नाही; पण तिथल्या प्रत्येक नागरिकाचे वर्तन हे बाहेरून येणार्‍या लोकांसाठी स्वागतशील असंच असतं, सौम्य आणि सौजन्यशील असतं. याचं कारण, तिथल्या शिक्षण पद्धतीत रुजलेलं आहे. 55 लाख लोकसंख्या असलेल्या या निसर्गसमृद्ध देशात प्रत्येक नागरिक ही आपली संपत्ती आहे, अशी शासनाची भावना आहे, तशीच कृतीही आहे. 1 लाख 80 हजार तलाव असलेल्या या देशात पाण्याबरोबरच इतर नैसर्गिक संसाधनांची विपुलता आहे. जगातील सर्वात आनंदी लोकांचा देश म्हणून सलग आठ वर्षे प्रथम क्रमांकावर राहिलेल्या फिनलँडमध्ये शिक्षण हे आनंदानं घ्यावयाचं असतं, हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या मनावर आपोआप ठसतं. त्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यापैकी कुणालाही काहीही करावं लागत नाही. आनंदी शिक्षण हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, असं इथली समाजव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्थाही मानते.

इथल्या साडेतीन हजार शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी हा हसत हसत शाळेला जातो आणि हसतच घरी परत येतो. कारण, इथल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही शिक्षा दिली जात नाही, एकही शिक्षक मुलांचा अपमान करत नाही, त्याला टोचून बोलत नाही, शिक्षेसाठी पालकांना घेऊन यायला सांगत नाही. जात, धर्म,पंथ, प्रांत, देश, काळा-गोरा असा कसलाही भेद तिथं केला जात नाही. गणवेश ही ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. ती फिनलँडमध्ये नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ‘हे राष्ट्र माझे आहे, मी राष्ट्राचा आहे. माझे राष्ट्र मला सुंदर ठेवायचं आहे. माझी मातृभाषा फिनिश आहे, ती मला प्राणपणानं जपायची आहे’ ही शिकवण शाळेत शिक्षकांच्या आणि घरात पालकांच्या वर्तनातून विद्यार्थ्यांच्या मनावर आपोआप ठसते.आमचे काही शिक्षक विद्यार्थ्यांना चड्डीत लघवी होईपर्यंत छडीने झोडपून काढायचे. आजही काढतात. फिनलँडमध्ये असा प्रकार झाल्याचे आढळलं, तर शिक्षकाला थेट कारावासाची तरतूद तिथल्या कायद्यात आहे. मारणं किंवा अपमान करणं, टोचून बोलणं या तर दूरच्याच गोष्टी; पण विद्यार्थ्याला हाक मारतानासुद्धा आवाजाची विशिष्ट मर्यादा ओलांडली, तर शिक्षकांना समज दिली जाते. घरात मुलाच्या आई-वडिलांनीसुद्धा त्याच्याशी ओरडून बोलायचं नाही असा तिथला दंडक आहे.

फिनलँडमधील शिक्षण हे कृतिशील आहे. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मुलांना डे केअर सेंटर मध्ये पाठवलं जातं. तिथं केवळ खेळ आणि दंगामस्ती एवढंच करायचं असतं. सात वर्षे झाल्यानंतर मुलाचा मेंदू शिक्षणासाठी आसुसलेला असतो म्हणून सातव्या वर्षीच त्याला पहिलीत दाखल केलं जातं. पहिली-दुसरीमध्ये गृहपाठ नावालाच असतो. इयत्ता तिसरीनंतर थोडा थोडा गृहपाठ दिला जातो. तो करून घेणं हे पालकांचं नव्हे, तर शिक्षकांचं काम असतं. झाडावर चढून कीटकांचं निरीक्षण करणं, जमिनीवरचे कीटक आणि फांद्यांवरील कीटक यातील साम्यभेदांचं निरीक्षण करणं हाही तिसरी- चौथीचा गृहपाठ असू शकतो. प्राथमिक शिक्षक होण्यासाठी पाच वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असतो. हा अभ्यासक्रम संशोधनावर आधारित असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिक्षकांना शाळेत शिकवता येत नाही. शिक्षक हे अभ्यास घेण्याबरोबरच स्वतः विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करतात. सहा महिने शिक्षक प्रत्येक विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांच्या वर्तनाचा अभ्यास करतात. विद्यार्थी आपल्या मित्रांशी कसा वागतो आणि त्याचे मित्र त्याच्याशी कसे वागतात, याचं निरीक्षण शिक्षक बारकाईनं करतात.

विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि गृहपाठ हा कृतीवर आधारित असतो. फिनलँडमधल्या विविध अभ्यासक्रमांना ‘नोकिया वे’ असं म्हटलं जातं. नोकिया कंपनीने पहिला मोबाईल तयार केला. आता मोबाईलचं उत्पादन होत नसलं, तरी नोकिया कंपनीतर्फे जगभर विविध वस्तू उत्पादित करून पाठवल्या जातात. ‘अँग्री बर्ड’ हा मुलांचा आवडता खेळ फिनलँडने जगात आणला. तसेच मुलांचे विविध संगणकीय खेळ फिनलँडनं तयार केलेले आहेत. फिनलँडमध्ये विश्वास हा शब्द परवलीचा आहे. समाजाचा शासनावर, शासनाचा शिक्षण संस्थेवर, शिक्षण संस्थेचा प्राचार्यांवर, प्राचार्यांचा शिक्षकावर, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थ्यांचा पालकांवर विश्वास असतो म्हणून पालकांचाही शाळेवर विश्वास असतो. इथे हे चक्र पूर्ण होतं. या विश्वासातूनच संशोधक वृत्ती बळावते, यावर फिनलँडचा विश्वास आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर सकारात्मक कृतिशीलतेचा प्रभाव असतो.

तिचं गणित शिकवलं जातं ते वर्गात नव्हे, तर मैदानावर. आधी शिक्षकांना उड्या मारणं, पळणं, खेळणं यामधून गणित शिकवलं जातं आणि शिक्षक त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना गणित शिकवतात. शिक्षणात गंमत असते, हे विद्यार्थ्यांना कृतिशील अभ्यासातून जाणवतं. तिथल्या शिक्षण व्यवस्थेची दखल आज जगानं घेतलेली आहे. युरोपीयन महासंघानं या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास सुरू केलेला आहे, तसेच जगभरातील शिक्षणतज्ज्ञ आता या शिक्षणपद्धतीचा शोध घेत आहेत. भारतातही असं होऊ शकेल का, यावरही संशोधन करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण ही आनंदाने करावयाची गोष्ट आहे, अशी भावना भारतीय विद्यार्थ्यांच्याही मनात निर्माण होणे, ही काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT