प्रख्यात वन्यजीव संशोधक जेन गुडाल यांनी या अभ्यासाला एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. पर्यावरणाचे मानवी जीवनावर काय आणि कसे परिणाम होतात, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जेन गुडाल यांचे नुकतेच निधन झाले...
भौतिक सुविधांच्या हव्यासापोटी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांमुळे मानवाने पर्यावरणाचा विध्वंस करून पृथ्वीला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. आज पर्यावरण हाच सर्वाधिक चर्चेचा आणि ज्वलंत विषय आहे. 1970 च्या दशकात पहिल्यांदाच पर्यावरण वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकृत प्रयत्न झाला. तोपर्यंत निसर्ग सकारात्मक अभ्यासाकडे आणि वन्यजीवांच्या द़ृष्टिकोनातून पहिले जात नव्हते; पण त्यापूर्वीच म्हणजे 1960 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेली एक 26 वर्षांची महिला अफ्रिकेतील टांझानिया देशातील ‘गोम्बे नॅशनल पार्क’मध्ये सलग पाच महिने तळ ठोकून होती. चिम्पांझी माकडांवर ती संशोधन करीत होती. चिम्पांझींचे वर्तनशास्त्र हा तिचा विषय होता. ऐन तारुण्यात इंग्लंडमधील सुखासीन आयुष्याचा त्याग करून ती आफ्रिकेतील जंगलात राहत होती. त्यावेळेपर्यंत चिम्पांझी माकडांवर मूलभूत असे संशोधन झाले नव्हते. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने तिला अर्थसहाय्य केले व तिच्यासाठी फोटोग्राफर ह्युगो वैन लाविक यांना चित्रीकरण करण्यासाठी पाठवले. अनेक महिने प्रयत्न केल्यानंतर जेनला चिम्पांझींनी स्वीकारले. म्हणजे चिम्पांझी माकडांनी तिला आपल्या कळपामध्ये सामील करून घेतले व त्यामुळे जेनला त्यांच्या वर्तनाचे सखोल निरीक्षण करता आले. जेन गुडाल यांनी अनेक आश्चर्यकारक शोध लावले. चिम्पांझी मांस भक्षण करतात आणि वारुळातून काठीचा वापर करून किंवा गवताच्या काडीचा वापर करून मुंग्या खातात. तसेच झाडांच्या पानांचा चावून चोथा करून त्या चोथ्याचा स्पंजसारखा उपयोग पिलांना पाणी पाजण्यासाठी करतात. चिंपाझी आणि माणसांच्या वर्तनात खूप साम्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेन यांना अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी आपले संशोधन थांबवले नाही आणि प्राणी अभ्यासकांची झेप उडवणारे शोध लावले.
जेन गुडाल यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले; पण त्यांच्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाहीत. लहान असताना आफ्रिकेत गेलेल्या त्यांच्या एका मैत्रिणींच्या पत्रांमधून त्यांना अफ्रिकेतील प्राणी आणि निसर्गाविषयी माहिती मिळाली व तेथेच त्यांचे ध्येय निश्चित झाले. त्यांनी नैरोबीच्या ‘नॅशनल, म्युझिअम ऑफ नॅचरल हिस्टरी’चे क्युरेटर असलेले डॉ. लुईस लिकी यांच्याशी संपर्क केला आणि आपल्या आईबरोबर चिम्पांझीवर संशोधन करण्यासाठी टांझानियात दाखल झाल्या. त्यानंतर आयुष्यातील पंचेचाळीस वर्षे त्यांनी चिम्पांझीच्या सामाजिक आणि कुटुंब व्यवस्थेवर संशोधन करण्यात घालवली. त्यांच्या या संशोधनासाठी केंब्रीज विद्यापीठाने त्यांना ‘पीएच.डी’ दिली.
जेन गुडाल यांनी गोम्बेच्या जंगलातील चिम्पांझीवर (एक डझनपेक्षा जास्त) 17 पुस्तके लिहिली आहेत. ‘बियाँड इनोसन्स’ (इशूेपव खपपेलशपलश) हे त्यांचे आत्मचरित्र खूप लोकप्रिय झाले आहे. ‘माय फ्रेंडस् द वाईल्ड चिपांझीज’ (1969) ‘इनोसंट किलर्स’, ‘इन द शेंडो ऑफ मॅन’, ‘दि चिम्पांझीज ऑफ गोम्बे’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. ज्या दोन नर चिम्पांझींना त्या चांगल्या ओळखत होत्या. त्यांची नावं त्यांनी डेव्हीड ग्रेबियर्ड आणि गोलिएथ अशी ठेवली होती. जेन गुडाल यांनी लहान मुलांमध्ये वन्यजीवांची आवड निर्माण व्हावी म्हणून बालसाहित्याचीही निर्मिती केली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी ‘द होम’ हे शेवटचे पुस्तक लिहिले. खरे म्हणजे, जंगलांचा आणि वन्यजीवाचा होणारा र्हास बघून त्या निराश झाल्या होत्या; परंतु लोकांमध्ये आशावाद जागृत करण्यासाठीच त्यांनी ‘द होम’ हे पुस्तक लिहिले. 1980 नंतर चिम्पांझीच्या संशोधनातून म्हणजेच आफ्रिकेतून बाहेर पडून त्यांनी जेन गुडाल इन्स्टीट्यूही वन्यजीव संवर्धनाच्या कामासाठी स्थापन केली व अव्याहतपणे निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी त्या कार्यरत राहिल्या.
त्यांच्यापासून अनेक लेखकांना प्रेरणा मिळाली व अनेक प्रायमॅटोलाजिस्ट व अॅथ्रॉपोर्लोजिस्ट संशोधन करू लागले. त्यांच्या समकालीन जॉय अॅडमसन, इयान डग्लस हॅमील्टन, जॉर्ज शेल्लर, डिआन फौसी यांनी सुद्धा वन्यजीव संवर्धनासाठी मोठे काम केले आहे. मराठीमध्ये ‘सत्तांतर’ ही गाजलेली कांदबरीदेखील जेन गुडाल यांच्या संशोधनाने प्रेरित होऊन व्यंकटेश माडगूळ यांनी लिहिली आहे. जेन गुडाल यांना टेंपलटन प्राईज, टायलर प्राईज फॉर एन्व्हायर्र्न्मेेंटल अचिव्हमेंट, हुबार्ड मेडल इत्यादी मानाचे पुरस्कार मिळाले होते. जेन गुडाल आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करीत होत्या. आता पर्यावरणाविषयी जागरूकता खूप वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी पर्यावरणतज्ज्ञांच्या परिषदा होत आहेत; पण राजकीय इच्छाशक्तीअभावी वन्यजीवसृष्टीचा आणि पर्यावरणाचा र्हास सुरूच आहे, याची खंत त्यांना होती. जगातील तरुणाई निसर्गाभिमुख सरकारे निवडून देतील, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. नुकतेच त्यांचे अमेरिकेत कॅलिफोर्नियात निधन झाले. आपल्या शेवटच्या कार्यक्रमातील भाषणात त्यांनी आपल्या ‘द होप’ या पुस्तकातील आशावाद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आपण आज मोठ्या कठीण काळात जगतो आहोत (पर्यावरणाच्या द़ृष्टीने). आपण आपल्या मुलांना या काळात कसे काय आणू शकतो ? हवामान बदल, निसर्गाचा संहार, युद्धे यांचे आपण साक्षीदार आहोत; पण आशावादी असणं हेच मानवाच अस्तित्व आहे.