भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच मे महिन्याच्या उत्तरार्धातच वरुणराजाने आगमन करत धुवाँधार बरसात केली खरी; पण त्यानंतरही मान्सूनधारा कोसळू लागल्याने पेरण्यांसाठी खोळंबलेला शेतकरी संभ्रमात पडला आहे.
‘मान्सून’ हा शब्द मूळ अरबी भाषेतील ‘मौसिम’ या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थच हंगाम असा होतो. अरबी सागरात वाहणार्या हंगामी वार्यांसाठी अरबी खलाशी या शब्दाचा वापर करायचे. भारतात शेती, पाण्याचा साठा आणि संपूर्ण कृषी आराखडा याच मान्सूनवर अवलंबून असतो. यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात उष्णतेच्या झळांनी होरपळून निघणार्या वसुंधरेला आणि घामाने भिजणार्या नागरिकांना मान्सूनच्या आगमनाने दिलासादायक गारवा दिला. दुष्काळी भाग समजल्या जाणार्या मराठवाड्यात मे महिन्यात सर्वदूर धुवाँधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. मे महिन्यात देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईत तब्बल 85 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला. या पावसाने 1951 नंतर पहिल्यांदाच मुंबईतील मे महिन्यातलं तापमान 22 अंश इतकं कमी नोंदवले गेले. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ऐन वैशाखात अवघा महाराष्ट्र ओलाचिंब झाला. काही ठिकाणी धबधब्यांचे जलप्रपातही दिसून आले. आधीच हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचे अनुमान वर्तवल्यामुळे सर्वच जण आनंदात होते; मात्र मे महिन्यातील दोन-चार दिवसांमध्ये बरसून गेल्यानंतर मान्सूनने दडी मारली आहे. परिणामी, परंपरेनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार्या पेरण्यांबाबत शेतकरी संभ्रमात पडला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था आणि सामाजिक रचना यांचे मान्सूनशी अतूट नाते आहे. लवकर सुरू झालेल्या पावसामुळे तापमानाचा काहीसा परिणाम कमी झाला असला, तरी हवामान बदलामुळे असा अनियमित मान्सून सातत्याने सुरू राहिला, तर देशातील अनेक समीकरणे कोलमडू शकतात. यंदा केरळमध्ये मान्सून नेहमीच्या 1 जूनच्या तुलनेत तब्बल आठ दिवस आधी म्हणजेच 24 मे रोजीच दाखल झाला. मुंबईतही 11 जूनच्या सरासरी तारखेऐवजी 26 मे रोजी मान्सून आला. कर्नाटकमध्ये जिथे 1 ते 5 जूनच्या दरम्यान मान्सून येतो, तिथेही 26 मे रोजीच ढगांनी आकाश व्यापले. हा पाऊस मान्सूनचा असला, तरी तो अवेळी पडल्यामुळे त्याला अवकाळी म्हणण्यात आले. या पावसाने राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही मान्सूनची गती मंदावलेली असून, राज्यात 12 ते 13 जूनपासून मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मान्सूनचा लहरीपणा भारतासाठी नवा नाही. त्यामुळेच हवामान खात्याच्या अनुमानामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असला, तरी त्याचे आगमन आणि वितरण या गोष्टी शेती क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरतात. अन्यथा, पावसामध्ये पडणारे मोठे खंड किंवा कमी कालावधीत धो-धो बरसणारा पाऊस या दोन्हीही गोष्टी शेतीला उपकारक ठरण्याऐवजी मारक ठरतात. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे होणार्या हवामानबदलांमुळे मान्सूनचे चक्र बाधित झाले आहे. पाऊस लवकर येण्याची प्रक्रिया ही पर्यावरण आणि हवामानात होणार्या बदलांची चिन्हे आहेत. सध्याचा हवामान बदल हा जागतिक तापमान आणि सागरी स्थितीच्या एकत्रित परिणामाचे प्रतीक आहे. सागरी तापमान सामान्यापेक्षा अधिक राहिल्याने पावसासाठी पोषक असणारे पश्चिम वारे वेगाने सक्रिय झाले आहेत. पाऊस लवकर येणे ही कृषी आणि उद्योगांसाठी चांगली बाब असू शकते; मात्र या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे महापूर, भूस्खलन, पाण्यापासून होणारे आजार, महासाथ यासारख्या समस्या उत्पन्न होण्याचादेखील धोका असतो.
ला नीना आणि अल नीनो हे प्रशांत महासागरातील तापमानाशी संबंधित मुद्दे असून जेव्हा प्रशांत महासागरातील तापमान वाढते तेव्हा त्याला अल नीनो असे म्हणतात आणि त्यामुळे भारतातील पावसाळा कमी राहतो. जेव्हा महासागर थंड होतो तेव्हा त्यास ‘ला नीना’ असे म्हणतात आणि त्यामुळे पावसाळा चांगला राहतो. यावर्षी ना अधिक थंडी आहे ना अधिक उष्णता, म्हणजेच वातावरण मध्यम असल्याने ही स्थिती भारतातील पावसाळ्यासाठी फायदेशीर आहे. तसेच काही शास्त्रज्ञांच्या मते, ‘आयओडी’ (इंडियन ओशन डायपोल) अरबी समुद्रात आर्द्रता वाढविण्याचे काम करतो आणि त्यामुळे मान्सूनचे वारे वेगात वाहतात. हा घटक पाऊस लवकर येण्यासही कारणीभूत ठरतो. काही शास्त्रज्ञांच्या मते, याचा संबंध हिंद महासागराच्या पश्चिम म्हणजे आफ्रिकेतील आणि पूर्वेकडील इंडोनेशियातील पाण्याच्या तापमानाशी संबंधित आहे. वास्तविक दोन्हीकडील तापमानात फरक दिसून येतो. पश्चिम भाग उष्ण असेल, तर पूर्व भाग थंड असतो म्हणजे त्यास पॉझिटिव्ह ‘आयओडी’ असे म्हणतात. ही बाब पावसासाठी चांगली असते. म्हणजेच ढग जमणे, पाऊस वाढविणे यासारख्या घटना घडतात. याउलट पश्चिम भाग थंड असेल आणि पूर्व भाग उष्ण असेल, तर त्यास ‘निगेटिव्ह आयओडी’ असे म्हणतात आणि ते पावसाला अडविण्याचे काम करतो. 2025 मध्ये अजूनही आयओडी न्यूट्रल आहे. हवामान खात्याच्या मते, ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तो काही प्रमाणात सकारात्मक राहू शकतो आणि तो पावसाचे प्रमाण वाढवू शकतो.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागराचे तापमान वाढत आहे, ज्यामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. एका संशोधनानुसार, पृथ्वीच्या तापमानात प्रति 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्यास वातावरणातील आर्द्रता 6 ते 8 टक्क्यांनी वाढते. ही वाढलेली आर्द्रता मान्सून वार्यांना वेगाने सक्रिय करते. मान्सून लवकर येण्यामागे काही जागतिक घटकही कारणीभूत आहेत. मॅडेन-जुलियन ऑसिलेशन ही हिंद महासागरात ढगांची आणि पावसाची स्थिती प्रभावित करणारी जागतिक हवामान घटना आहे. तिच्या अनुकूल टप्प्यांमुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होते. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, सोमाली जेट. मॉरिशस आणि मादागास्करच्या आसपासून वाहणारी ही खालच्या थरातील वार्यांची तीव्र धारा आहे, जी पश्चिम किनार्यावर केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात प्रचंड आर्द्रता वाढवते. यंदा या जेटने असामान्य ताकद दाखवली. तिची तीव्रता मानवजन्य हवामान बदलांशी संबंधित आहे, असे मानले जाते.
ही झाली शास्त्रीय कारणमीमांसा; पण लवकर आलेल्या पावसामुळे देशातील महानगरांमधील नागरी सुविधांचे पितळ उघडे पाडले. चेन्नई, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये पूरसद़ृश स्थिती निर्माण झाली; मात्र खरा फटका बसला तो शेतकर्यांना. भारतात आजही शेती ही अर्थव्यवस्थेची कणा आहे. शेतकर्यांना मान्सून एका विशिष्ट वेळेला येईल अशी अपेक्षा असते. तो वेळेआधी आला, तर शेताची मशागत, बियाणे पेरणी, योग्य पिकांची निवड या सगळ्याची पूर्वतयारी पूर्ण झालेली नसते. पेरणीनंतर अवकाळी मुसळधार पाऊस झाला, तर कोवळी रोपे वाहून जातात, मातीचा वरचा थर निघून जातो. यामुळे झाडांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो.
एखादे पीक तयार झाले असेल किंवा कापणीच्या उंबरठ्यावर असेल आणि त्यावेळी मान्सून आला, तर ही पिके खराब होतात, बुरशी लागते किंवा ती शेतातच सडतात. काही पिकांना कोरड्या हवामानाची आवश्यकता असते आणि लवकर आलेला पाऊस त्यांचे नैसर्गिक चक्र बिघडवतो. यंदाच्या मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी यांच्यासह भाज्या आणि बाजरी, मका यासारख्या धान्य पिकांचेही नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्यांना फटका बसला आहे. त्यामुळे मान्सूनमधील कोणताही अतिरेक किंवा विचलन दीर्घकालीन परिणाम घडवू शकते. शेती, ग्रामीण उपजीविका, संपूर्ण अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य यावर याचे परिणाम होतात. हवामानातील हे बदल कृषीपासून ते सार्वजनिक आरोग्य व नागरी पायाभूत सुविधा यांच्यापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये अनपेक्षित आणि नकारात्मक परिणाम घडवू शकतात.
सध्याच्या हवामान बदलांच्या काळात भारताला आता हवामान-संवेदनशील धोरणे आखण्याची गरज निर्माण झाली आहे. वैज्ञानिक आणि धोरणकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून हवामानाच्या या नव्या वास्तवाला सामोरे जाण्याचे उपाय शोधले पाहिजेत अन्यथा येणारी वर्षे अधिक कठीण ठरू शकतात.
भारतात आजही शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकर्यांना मान्सून एक विशिष्ट वेळेला येईल अशी अपेक्षा असते; पण हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागराचे तापमान वाढत आहे. पृथ्वीच्या तापमानात प्रति 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्यास वातावरणातील आर्द्रता 6 ते 8 टक्क्यांनी वाढते आणि ती मान्सून वार्यांना वेगाने सक्रिय करते. मे महिन्यातील पाऊस नागरिकांना सुखावून गेला असला, तरी शेतीसाठी मारक ठरला. या पावसामुळे आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी यांच्यासह भाज्या आणि बाजरी, मका यांसारख्या धान्य पिकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्यांना फटका बसला आहे. हवामान बदलांच्या काळात असे प्रकार वाढणार असल्याने आपल्याला शेती धोरणांमध्ये बदल करावा लागणार आहे.