Mohopre Caves | महाडची अपरिचित मोहोप्रे लेणी 
बहार

Mohopre Caves | महाडची अपरिचित मोहोप्रे लेणी

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

सम्राट अशोकाच्या राजवटीत महाड हा त्याच्या साम्राज्याचा भाग होता. व्यापारी जहाजे बाणकोट खाडीतून सावित्री नदीतील गांधारी नदीपर्यंत येत असत.

रायगड हा सह्याद्री पर्वतरांगेतील एक जिल्हा आहे. येथे अग्निजन्य खडकांपासून बनलेले सह्याद्रीचे उंच पर्वत आढळतात. म्हणून रायगड परिसरातील सह्याद्रीच्या पट्ट्यात उत्तुंग पर्वतरांगांची साखळी दिसून येते, तिचं हे मूळ. या पर्वतांमुळेच येथे किल्ल्यांच्या उभारणीलाही चालना मिळाली. मग, रायगड, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, कोकणदिवा, दासगाव किंवा दौलतगड, कावळ्या किल्ला असे अनेक लहान-मोठे किल्ले उठावलेले दिसतात. त्यातल्या बहुतेकांच्या पोटात लेणीही सापडली आहेत. याचं एक कारण म्हणजे, येथील खडक काळ्या रंगाचा असून त्याचा थर कठीण आहे. सह्याद्रीमध्ये या अग्निजन्य खडकांची विपुलता असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गुहांची निर्मिती झालेली दिसते. अनावश्यक दगड काढून एकाच अखंड खडकातून या गुहा कोरल्या गेल्या.

दगडाच्या चांगल्या गुणवत्तेमुळे रायगड जिल्ह्यात असे अनेक ठिकाणी लेण्यांचे समूह पाहायला मिळतात. रायगडमधील ठाणाळे आणि नेणावली येथील लेण्यांमध्ये मात्र लाल रंगाचा खडकाचा पट्टा दिसून येतो. स्थापत्यकलेचा हा प्रकार प्रामुख्याने महाराष्ट्रात दिसून येतो. येथील शिलालेखांमध्ये समाजातील विविध स्तरांतील लोकांनी गुहा कोरण्यासाठी दिलेल्या दानाचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील गुहांमधील शिलालेख केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर भारताचाही आर्थिक इतिहास स्पष्ट करतात. यात भारतातील विविध व्यापारी संघटनांची माहिती मिळते. यात प्रामुख्याने तेली, लोहार, सुतार, सोनार, कोष्टी, सारथी, मणिकार, शेतकरी आणि वैद्य अशा विविध वर्गातील लोकांनी दिलेल्या देणग्यांचे तसेच प्रशासनातील अधिकारीवर्गाचे शिलालेख पाहायला मिळतात. यात महारथी, महाभोज, अमात्य, राजवैद्य, सैनिक, राजा आणि बौद्ध भिख्खू-भिख्खुणी यांनी दिलेल्या देणग्यांचेही उल्लेख आढळतात.

रायगड जिल्ह्यात आपला रायगड जसा प्रसिद्ध तशी महाडची गांधारपाले लेणी. मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडे जाताना डाव्या बाजूला डोंगरावर दिसणारी; पण रायगडाच्या वाटेवरचा चांभारगड, सोनगड तसे अपरिचित दुर्ग. तशीच तिथली लेणीही अपरिचितच. त्यातला सोनगड तर अगदीच लहानसा दुर्ग. आता वर पाहण्यासारखं गड म्हणून फारसं काही उरलेलं नाही; पण मोहोप्रे या तळाच्या गावातून गड चढताना वाटेत एक छोटा लेणीसमूह लागतो, तो मात्र दखल घेण्यासारखा आहे. ती म्हणजे मोहोप्रे लेणी. वाट तशी दुर्गमच; पण लेणी डोळ्यांसमोर ठेवून चढत राहिलं की, ती नजरेच्या टप्प्यात येतात. महाडमधील गांधारपाले आणि कोळ लेण्यांबरोबरच मोहोप्रे येथील हे एकल लेणं सोनगडच्या पायथ्याशी स्थित आहे. समोर सावित्रीचं खोरं आहे आणि सावित्री नदीच्या काठावर महाड हे प्राचीन ठिकाण वसलेले आहे.

त्याचं असं झालं, सातवाहन काळापासून पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रामुळे आणि सावित्रीसारख्या मोठ्या नद्यांमुळे येथे व्यापाराच्या मार्गांसाठी मोठी संधी उपलब्ध होती. महाड हे तेव्हा व्यापारी बंदर होतंच. व्यापारी मार्ग आला की, प्रवास आणि बौद्ध संप्रदायाचे भिक्षूही डोळ्यांसमोर येतात. मग, त्यांच्या वर्षावासासाठी बांधली जाणारी लेणी, त्यात असलेले व्यापाऱ्यांचे दानलेखरूपी शिलालेख असा सगळा तामझाम असतो, तसा इथंही आहे; पण अर्थात लहान प्रमाणावर. ही गुंफा सोनगड किल्ल्याच्या टेकडीच्या मध्यभागी असून प्रसिद्ध गांधारपाले बौद्ध लेणी समूहापासून ३ किमी. अंतरावर आहे. या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. पर्वतावरून वाहणाऱ्या एका लहान ओढ्याच्या मार्गानेच तिथे पोहोचता येते. केवळ एकाच मुख्य लेण्याचा समावेश असलेला स्थापत्य नमुना अंशतः सुस्थितीत असल्याचे दिसून येते. आता या लेण्याबद्दल सांगायचं झालं, तर ही बौद्ध संप्रदायाची बांधलेली लेणी आहेत. 'मोहोप्रे बौद्ध लेणी' या नावाने बौद्ध लेण्यांच्या समूहात आणखी एका नवीन लेण्याची भर पडली आहे, असं म्हणता येईल. ही गुंफा मोहोप्रे गावापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर वसलेली आहे.

यातील मूळ गुंफा अपूर्ण स्वरूपाची असून, येथे विहार आणि भिख्खू निवास यांची रचना केल्याचे दिसून येते. गुंफेत एक छोटा ओटा (व्हरांडा) आहे; पण अंगण नाही आणि ही रचनाही अपूर्ण आहे. गुहेची रचना विहार पद्धतीची असल्याने येथे डाव्या बाजूला आणि मागील बाजूस उजव्या बाजूला भिख्खू निवासासाठी जागा कोरलेली दिसते. गुहेत प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा आहे. विहारात बसण्यासाठी काटकोनात एक ओटा कोरलेला आहे. उजव्या बाजूला पुढच्या भागात भिख्खूू निवासाची रचना आहे. येथे भिख्खू निवासाकडे जाणाऱ्या दरवाजाचे अवशेष दिसतात. भिख्खू निवासाच्या डाव्या बाजूला आणि विहाराच्या समोरील भिंतीवर, वरच्या भागात दोन ओळींचा एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाची लांबी साधारणपणे ६ फूट आहे. यात एकूण चाळीस अक्षरे आहेत. या लेखाचे वाचन असे आहे : 'इयं महारकट जनपदस लकलस महारथिस्स पोतनीथ नकनकस्स लेणस...'

आणि शिलालेखाचा अनुवाद, 'महारकट' (आजचे महाड) जनपदातील 'लकलस' (लकुल) या महारथीने आणि 'पोतनिथ' (पोतनीथ) 'नागनक' यांनी ही लेणी दान केली, असा आहे. (शेवटची अक्षरे काहीशी अस्पष्ट असल्याने पूर्ण अर्थबोध होत नाही; परंतु हे एखाद्या मार्गाच्या दानाशी संबंधित असू शकते.)

या शिलालखात प्राचीन 'महाड'चा ऐतिहासिक संदर्भ आलेला आहे, ज्यामध्ये महाडचे प्राचीन नाव 'महारकट जनपद' असल्याचा उल्लेख वाचायला मिळतो. अशाप्रकारे प्राचीन भारताच्या इतिहासातील एका विस्मृतीत गेलेल्या महाजनपदाचा उल्लेख या शिलालेखात आढळतो. महारकट जनपद : भारताच्या प्राचीन इतिहासात, इसवी सनाच्या सहाव्या शतकापूर्वी २२ जनपदे अस्तित्वात होती आणि त्यानंतर १६ महाजनपदांची निर्मिती झालेली दिसून येते. त्या काळात 'जनपद' या नावाने असा उल्लेख इतरत्र कोठेही आढळत नाही. गुहेतील हा शिलालेख निश्चितच एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. महाड हे व्यापारी केंद्र असल्याने त्याला 'महा-हट्ट' असे म्हटले जात असे. अनेकांना असे वाटते की 'महा-हट्ट' या नावाचे रूपांतर 'महाड'मध्ये झाले; परंतु नवीन संशोधनानुसार, 'महाहरक्त' या नावाचेच कालांतराने 'महाड' असे परिवर्तन झाले असावे.

शिलालेखाची लिपी शुंग-सातवाहन काळातील ब्राह्मी लिपी असून शिलालेखाची भाषा प्राकृत आहे. या शिलालेखातील अक्षरवटिका पाहता या निश्चित अक्षरावरून त्याचा काळ इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा पूर्वार्ध असल्याचे अभ्यासकांकडून समजते. हा काळ शुंग-सातवाहन कालखंड मानला जातो. शिलालेखात 'जनपद' असा शब्द असल्याने येथे एखादा राजा असणे अपेक्षित आहे; मात्र या प्रदेशाची नेमकी राजधानी कोणती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात 'विष्णुपलित'चा उल्लेख आढळतो; परंतु तो राजा असावा, याची शक्यता कमी आहे. हा काळ गौतमीपुत्र सातकर्णीचा आहे आणि त्या काळात महाड हा प्रदेश 'अपरांत'चा भाग होता. सातकर्णीच्या साम्राज्याचा भाग असल्याने येथे राजा नसून एखादा अधिकारी असण्याची शक्यता अधिक आहे. या शिलालेखात 'महर्कट' जनपदातील 'महारथी' नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे जनपद सातवाहनांच्या अधिपत्याखाली होते आणि सातवाहन हेच या जनपदाचे शासक असल्याचे सिद्ध होते. कारण, इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा पूर्वार्ध हा सातवाहन राजांचा काळ आहे.

आतापर्यंत गुहेतील शिलालेखांमध्ये अशाप्रकारचा शिलालेख आढळलेला नाही. नाशिकच्या गुहांमध्ये गौतमीपुत्र सातकर्णीच्या राज्यातील काही ठिकाणांची नावे सापडली आहेत; परंतु जनपदाचा स्पष्ट उल्लेख असलेला हा एकमेव शिलालेख आहे. लेण्याच्या रचनेत विहार आणि भिख्खूंच्या निवासाचा समावेश आहे, जे बौद्ध मठाधिष्ठित जीवनपद्धतीचे निदर्शक आहे. या लेण्यात कोणतीही मूर्ती किंवा शिल्परचना नाही. त्यावरून या लेण्याची निर्मिती थेरवादी कालखंडात झाली असावी असा निर्देश करता येतो. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील थेरवाद परंपरेमुळे येथे बौद्ध लेणी निर्माण झाल्यानंतर त्यात बुद्ध स्तूप, चैत्यगृह, बोधीवृक्ष आणि विविध बौद्ध चिन्हे कोरलेली दिसतात. साधारणपणे हा काळ इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून ते इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंतचा आहे. टेकडीवरील ही गुंफा थेरवाद परंपरेतील असून येथील शिलालेख शुंग-सातवाहन काळातील आहे हे तिथल्या शिलालेखावरून समजतं. गुंफेची वास्तुकला ती थेरवाद परंपरेतील असावी.

'पेरिप्लस' आणि 'टॉलेमी' यांच्या नोंदींवरून हा व्यापारी मार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे समजते. तसेच ब्रिटिश काळातील जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन यांच्या 'द केव्ह अँड टेम्पल ऑफ इंडिया' या ग्रंथापर्यंत याचा उल्लेख आढळतो. तसेच 'बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर'च्या खंड ११ मध्येही याची नोंद आहे. यावरून असे स्पष्ट होते की, गांधारपाले आणि कोळ या दोन्ही लेण्यांच्या निर्मितीपूर्वी मोहोप्रे लेण्यांची निर्मिती झाली होती. कोकणातील अनेक व्यापारी बंदरांचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये महाड हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. सावित्री आणि गांधारी नद्यांच्या संगमावर वसलेले महाड हे एक शहर आहे. सम्राट अशोकाच्या राजवटीत महाड हा त्याच्या साम्राज्याचा भाग होता. व्यापारी जहाजे बाणकोट खाडीतून सावित्री नदीतील गांधारी नदीपर्यंत येत असत आणि तेथून भोरघाटाद्वारे माल पुणे ते पैठण आणि तेरमार्गे उत्तर भारताकडे नेली जात असत.

महाडमधील गांधारपाले येथील लेण्यांची नोंदही आपल्याला पाहायला मिळते. गांधारपाले येथील लेण्यांच्या समूहावरून असे दिसून येते की, या ठिकाणी भिख्खूंचा एक मोठा समुदाय वास्तव्यास होता. अनेक अभ्यासकांनी गांधारपाले लेण्यांच्या समूहाची नोंद घेतली आहे; पण या मोहोप्रेच्या लेण्यांचं अजून संशोधन होणं आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT