प्रमोद बेरी
किचन हे माझ्या बायकोचं साम्राज्य होतं. पूर्वी चुकून आत गेलो व काही जरी चौकशी केली की, माझ्या किचनच्या साम्राज्यात हे कुठले 'मांजर' आले आहे या भावनेतून माझी हकालपट्टी व्हायची. त्यामुळे आत प्रवेश केल्यावर कुठे काय आहे, ते हुडकण्यापासून माझी तयारी होती. खरं सांगू... अलीबाबाच्या गुहेत शिरल्यासारखी माझी परिस्थिती झाली आणि किचनच्या आतलं दृश्य पाहून मी हादरलोच!
मान्सूनमधील निसर्गाचा नेहमीचा गारवा-ऊन-पाऊस खेळ चालू होता. सौभाग्यवती कॉलेजमध्ये पहिले लेक्चर देण्यासाठी जाण्याच्या जय्यत तयारीत होती. मी शांतपणे घराच्या सीटआऊटमध्ये बसून केव्हा एकदा मॅडम कॉलेजला शिकवायला जातील याची कधी नाही ती त्यादिवशी वाट पाहत होतो. कारण, माझ्या मनात काहीतरी वेगळेच खदखदत होते. ते पाहून सौभाग्यवतीने नेहमीप्रमाणे ‘काळजी’ने विचारले,'काय हो, एवढा कसला विचार करता आहात?'
'काही नाही,' मी उत्तर दिलं.
माझं 'काही नाही' म्हणजे काही तरी मुरतंय हे ओळखण्याइतकी ती संसारात तरबेज झाली होती. नवर्याच्या डोक्यात काय चालले आहे हे समजण्याचा हा ‘सिक्स्थ सेन्स’ फक्त बायकांना ईश्वराने बहाल केलेला असतो. त्यामुळे तिने नेहमीचा खास अविश्वासाचा चेहरा केलेला मी पाहूनही बेदखल केला.
मिसेसने कॉलेजला गमन केल्याचा गाडीचा स्टार्टर ऐकू आला आणि मी माझ्या कामाला लागलो. आज माझ्या मनात ‘कूक’ संचारला होता. फार पूर्वी अमेरिकेत वारंवार खाल्लेला 'हॅश ब्राऊन' हा ब्रेकफास्टचा पदार्थ मस्तपैकी करावा व पत्नी ११ वाजता परत आल्यावर तिला सरप्राईज द्यावे असा मनात बेत केला. यूट्यूबवरील 'हॅश ब्राऊन'ची डिश तयार करण्याची पद्धती आदल्या दिवशीच आत्मसात करून घेतली होतीच ती परत पाहिली. त्यामुळे आत्मविश्वासाने व मोठ्या इतमीनानात मी स्वयंपाकघरात प्रवेश केला.
माझ्या डोळ्यांसमोर पुढील दिवास्वप्ने चमकत होती... माझ्या तयार पदार्थाचा व्हॉट्सॲपवर टाकलेला फोटो... त्यामुळे नंतर येणारे मित्रांचे व परिवाराचे लाईक्स, कमेंट्स....
आणि काही दिवसांनी नंतर येणारे मित्रांचे फोन्स... आम्हाला पण पाककृती द्याल का? काही मिनिटे मी दिवास्वप्नामध्ये गुंगून गेलो.
किचन हे माझ्या बायकोचं साम्राज्य होतं. पूर्वी चुकून आत गेलो व काही जरी चौकशी केली की, माझ्या किचनच्या साम्राज्यात हे कुठले 'मांजर' आले आहे, या भावनेतून माझी हकालपट्टी व्हायची. त्यामुळे आत प्रवेश केल्यावर कुठे काय आहे, ते हुडकण्यापासून माझी तयारी होती. खरं सांगू...... अलीबाबाच्या गुहेत शिरल्यासारखी माझी परिस्थिती झाली आणि किचनच्या आतलं दृश्य पाहून मी हादरलोच!
कढया एका ड्राव्हरमध्ये, झाकणं दुसऱ्या ड्राव्हरमध्ये, चमचे आणि काटे तिसर्या ड्रॉव्हरमध्ये! दहा रंगांच्या छोट्या छोट्या डब्यांनी भरलेला मसाल्याचा गोल डबा...
वरच्या शेल्फवर एका बाटलीवर लवंगा लिहिलेलं, आत मिरी! एका डब्यात धणे; पण लेबल 'जिरे'! माझ्या ‘परफेक्शनिस्ट’ आत्म्याला हे सहन होईना. गरज ही शोधाची जननी म्हणतात. मी गप्प बसायला तयार नव्हतो. लागणारी सर्व उपकरणे लवकर गोळा कशी होतील, याबद्दल झालेला माझा त्रस्त चेहरा एका व्यक्तीने पाहिला.
माझी ही केविलवाणी अवस्था दुरून पाहत असलेला व आमच्याकडे फॅमिली मेंबर झालेला डोमेस्टिक हेल्प ‘केशव’ला माझी घालमेल लक्षात आली आणि ‘हनुमाना’सारखा तो मला मदतीला हजर झाला.
'बाबासाहेब काय हुडकता आहात?'
मी आज्ञा करताक्षणीच त्याने चार बटाटे, बारीक कापलेले कांदे, मसाल्याचा डबा, थोडे गव्हाचे पीठ या सर्व गोष्टी जादूगारासारख्या हजर केल्या. तसेच सर्व उपकरणे बाहेर काढून ठेवली. जीवात जीव आल्यावर मी पण थोडा धाडसी झालो. त्याला म्हणालो, ‘दोन कांदे बारीक चिरून दे. तोपर्यंत मी चार छोटे बटाटे किसून घेतो’. बटाटे किसणे हीपण एक कला आहे, हे तेव्हा मला समजले. तथापि, थोड्या प्रयत्नानंतर ते एकदाचे जमले.
पुढची पायरी होती किचन पेपरमध्ये किसलेला बटाटा कीस गुंडाळून त्यातील प्रत्येक आद्रतेचा थेंब काढायची! तेपण पार पडले. कांदे चिरून झाले होते. बटाट्याच्या किसाचा लगदा, कांदे, यूट्यूबमध्ये सांगितल्याप्रमाणे मसाले, लवंग, कोथिंबीर याचे मिश्रण मळले व नावाला गव्हाचे पीठ त्यात कालवून कणकेसारखा गोळा तयार केला. खराब हात वारंवार धुवून घ्यावे लागतात हापण धडा लक्षात आला.
पुढची पायरी होती फ्राईंग पॅन घेऊन त्यात थोडे तेल टाकून गरम करून घेऊन केलेल्या मोठ्या लगद्यातून सात-आठ छोटे छोटे पॅटीसवजा पीस परतून घ्यायची!
तथापि, योग्य पॅन काही केल्या सापडेना. तीन-चार ड्राव्हर ढुंडाळल्यावर एकदाचा सापडला. बाकी सर्व पॅन्स परत आत ठेवले. निवडलेल्या पॅनकडे पाहून मनात म्हणालो, 'याचे टेफलॉन थोडे उडून गेलेले दिसते.' ही बाब सांगून बायकोला आल्यावर खूश करण्याचा पण विचार आला.
मॅडम येण्याची वेळ जवळ येत होती. ती घरी यायच्या आत डिश तयार होणे आवश्यक होते.
सुदैवाने दोन्ही बाजूला छान खरपूस भाजलेले पॅटीस तयार झाले. मोठ्या झोकात एका डेकोरेटिव्ह डिनर प्लेटमध्ये ठेवून त्यावर ‘केचप’ टाकून पाककृतीसोबत माझा एक सेल्फी काढला. चवही ‘छान’च झाली होती. शेवटी तो क्षण आला.
मॅडम घरी आल्या. मी म्हणालो, 'सरप्राईज! हे पाहा. किती उत्तम डिश झाली आहे.' तथापि, ते पाहण्यापेक्षा तिचा इंटरेस्ट मी घाण केलेल्या तिच्या किचनमध्ये होता.
यापुढे मला सांगत चला. असा प्रचंड गोंधळ घालण्यापेक्षा तुम्ही काय सांगाल ते तयार करून नंतर मी कॉलेजला जाईन!
जगातील सर्व शहाण्या नवर्यांना समजते की, अर्धांगिनीचा युद्धाचा पवित्रा झाला की, माघार घेणेच शहाणपणाचे असते. वेळ न दवडता चूक सुधारायची ठरवली. मी तिच्यासमोर किचनची साफसफाई करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागलो.
‘तुम्ही बाहेर व्हा, आणखी घाण होण्यापेक्षा मी सगळे करते’.
नंतर मात्र पाककृती खाताना मॅडमचा चेहरा थोडा उजळला. मीही सुखावलो. म्हटलं, मोहीम फत्ते झाली.
आता म्हंटले काढलेला सेल्फी व्हॉट्सॲपवर टाकायला ‘हरकत नाही’. व्हॉट्सॲपवर टाकण्यापूर्वी ‘फोटोला’ थोडा ‘AI’ टच देऊन सर्व ग्रुपला टाकला.
मथळा टाकला 'सम्राट-ए-किचन'!
आणि काय आश्चर्य... दोनशेहून लाईक्स, तीस शेअर्स... आकडा वाढतच होता. आर्किटेक्ट म्हणून माझ्या हातातून उतरलेल्या नवनवीन इमारती पूर्वी ग्रुप्सवर टाकल्या होत्या, त्या आवडल्याच्या लाईक्सपेक्षा या अवाढव्या होत्या. सारं काही अविश्वसनीय! फावल्या वेळात ‘ब्रेकफास्ट डिशेस इन १५ मिनिट्स’च्या शोमध्ये भाग घेण्याचा विचार आहे. पाहूया, टीव्हीवाल्यांचे निमंत्रण केव्हा येते ते! (समाप्त)