आनंद महिंद्रा, ज्येष्ठ उद्योजक
काही दशकांपूर्वी जागतिक मंचावर भारताची आर्थिक मजल ही अनेकांना दिवास्वप्न वाटत होती; मात्र आज भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा बहुमान मिळवला आहे. भारतातील कोट्यवधी लोकांची महत्त्वाकांक्षा आणि त्यांची उपजत बुद्धिमत्ता हे आपल्या यशाचे सर्वात मोठे इंधन आहे. सध्याच्या दुभंगलेल्या आणि परस्परविरोधी जगात 'कनेक्टर' म्हणून काम करू शकतील अशा देशांच्या आणि शक्तींच्या हातूनच पुढील जागतिक व्यवस्था आकाराला येईल असे दिसते. विविध देशांमधील, विचारसरणींमधील आणि आर्थिक गटांमधील दरी ओलांडून भारत 'कनेक्टर इकॉनॉमी' म्हणून पुढे येऊ शकतो.
आजचे जग एका मोठ्या वैचारिक आणि भौगोलिक अनिश्चिततेच्या गर्तेतून जात आहे. जागतिक पातळीवर निर्माण झालेली ही अस्थिरता तात्कालिक नाही. ती जागतिक पुरवठा साखळी आणि आर्थिक समीकरणांचे एक दीर्घकालीन पुनर्गठन आहे. अशा या गुंतागुंतीच्या आणि खंडित होत चाललेल्या जागतिक व्यवस्थेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारताची मजबूत आर्थिक स्थिती, धोरणात्मक स्थान आणि वाढती जागतिक विश्वासार्हता या देशास एका नव्या भूमिकेसाठी तयार करत आहेत. तिला आपण एक 'कनेक्टर इकॉनॉमी'ची भूमिका म्हणू शकतो. भारताची ही प्रगती म्हणजे संपूर्ण जगाला एकत्र जोडणारा एक महत्त्वाचा पूल बनण्याची ही सुवर्णसंधी आहे.
जेव्हा आपण भारताच्या या आर्थिक प्रवासामागील टप्प्यांकडे पाहतो तेव्हा लक्षात येते की, आपण मोठी मजल मारली आहे. काही दशकांपूर्वी जागतिक मंचावर भारताची आर्थिक मजल मारणे हे अनेकांसाठी एका स्वप्नासारखे होते; मात्र आज आपल्या देशाने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा बहुमान मिळवला आहे. ही साधी कामगिरी नाही. जपानसारख्या आर्थिक महासत्तेची उत्पादकता आणि लवचिकता जगभर प्रसिद्ध राहिली आहे. अशा देशाला मागे टाकून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. भारतातील कोट्यवधी लोकांची महत्त्वाकांक्षा आणि त्यांची उपजत बुद्धिमत्ता हे आपल्या यशाचे सर्वात मोठे इंधन आहे.
असे असले, तरी या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचल्यानंतर आपण समाधानी होऊन बसू शकत नाही. भारताचा विकास हा फक्त जीडीपीच्या आकड्यांपुरता मर्यादित न राहता दरडोई उत्पन्नाच्या पातळीवर अधिक उंचावणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपले खरे ध्येय साध्य होणार नाही. आपल्या देशात आजही सुधारणांना वाव आहे आणि विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आपल्याला प्रशासकीय सुधारणा, उत्तम पायाभूत सुविधा, मजबूत उत्पादन क्षेत्र आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे या मुद्द्यांवर सातत्याने काम करत राहावे लागेल. भारताची खरी ताकद आपल्या लहान शहरांमध्ये, गावोगावी पसरलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये दडलेली आहे. हे छोटे व्यावसायिक आणि उद्योजक कोणत्याही प्रसिद्धीशिवाय अत्यंत प्रामाणिकपणे देशाच्या आर्थिक पायाला मजबूत करण्याचे काम करत आहेत. जेव्हा हे छोटे उद्योग जागतिक दर्जाचे बनतील, तेव्हा भारताचा खरा आर्थिक विस्तार होईल.
सध्याच्या काळात जागतिक राजकारणात आणि व्यापारात बदल होत आहेत. अशा स्थितीत भारतासाठी स्वतःला एका विश्वासू भागीदार म्हणून सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. पूर्वीच्या काळात अलिप्ततावादाचा पुरस्कार करणार्या भारताने आता बदलत्या युगानुसार ‘बहुआयामी युती’ आणि संवादाच्या धोरणाचा स्वीकार केला आहे. आज जगातील अनेक देश कठोर व्यापारी गटांच्या सीमा ओलांडून एकात्मिक सहकार्याकडे पाहत आहेत. अशावेळी भारताची लोकशाही व्यवस्था, राजनैतिक स्थिरता आणि सर्वच विचारसरणीच्या देशांसोबत जुळवून घेण्याची क्षमता आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारी आहे. आपण चीनच्या आर्थिक प्रभावाला आणि पुरवठा साखळीच्या आव्हानांना तोंड देणारा भूराजकीय व आर्थिक आधारस्तंभ म्हणून उभे आहोत. या सर्व घडामोडींमध्ये भारताची अंतर्गत बाजारपेठ ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्या देशातील विविध राज्यांची संस्कृती और विकासाचे टप्पे वेगवेगळे असले, तरी ती आपली विविधता हीच आपली ताकद आहे. एकाच साच्यात सर्वकाही बसवण्यापेक्षा प्रादेशिक भिन्नतेचा सन्मान करत एक विकेंद्रित आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पैशांची आवक वाढते आणि तरलता सुधारते, तेव्हा मंदीच्या किंवा अनिश्चिततेच्या काळातही अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो.
भविष्याचा विचार करताना आपण हे विसरता कामा नये की, आव्हाने संपलेली नाहीत. जागतिक पातळीवर होणार्या उलथापालथींना ‘समुद्रमंथन’ म्हणा किंवा ‘मंथन २.०’, अनिश्चितता ही आता अपवादात्मक बाब न राहता ती सामान्य बाब (नियम) बनली आहे. ‘ब्लॅक स्वान’ (अत्यंत दुर्मीळ आणि अनपेक्षित) घटना आता कालबाह्य ठरल्या आहेत. उलट आता तो तलावच ‘ब्लॅक स्वान्स’नी भरून गेला आहे. आजच्या काळात बदलांचा अंदाज घेणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. अशा सतत बदलणार्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चपळता आणि लवचिकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे, तरीही या अनिश्चिततेच्या काळातही भारताकडे एक महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती म्हणून उदयास येण्याची संधी आहे. विखुरलेल्या जगात जे घटक ‘जोडणारे’ ठरू शकतील, त्यांच्याकडूनच कदाचित पुढील जागतिक व्यवस्था घडवली जाईल. यामुळे भारतासाठी विविध गटांमधील दरी सांधणारी ‘कनेक्टर इकॉनॉमी’ बनण्याची संधी निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षभरात ‘सर्वांसाठी सद्भावना’ हा संयमित दृष्टिकोन स्वीकारून भारताने तशी ओळख निर्माण करण्यास सुरुवातही केली आहे. त्यात भारताची लोकशाही आणि राजकीय स्थिरता, चीनच्या विरोधात राजकीय आणि आर्थिक संरक्षक कवच म्हणून असलेले भौगोलिक स्थान, मोठी अंतर्गत बाजारपेठ आणि विविध वैचारिक गटांमध्ये निर्माण झालेला विश्वास या गोष्टींची भर घातली, तर ती एका परिपूर्ण ‘कनेक्टर इकॉनॉमी’ची व्याख्या ठरते. भारतानेच जगाला अलिप्ततावादाची संकल्पना दिली होती; मात्र आजची परिस्थिती आपल्याला पुढे जाण्याची नवी दिशा दाखवत आहे. केवळ ‘अलिप्त’ राहण्यापासून ‘बहुविध संलग्नता’ स्वीकारण्याच्या दिशेने भारताने वाटचाल करण्याची हीच योग्य वेळ आहे. कोणत्याही एका गटाशी बांधील न राहता अनेक देशांसाठी विश्वासार्ह भागीदार बनणे, ही भारताची ताकद ठरू शकते. ‘नव्या मंथनातून’ भारत ‘अमृत’ मिळवणे सुरू ठेवू शकेल का, याचा विचार करता भारतासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आज भारताची प्रगती ज्या प्रकारे होत आहे, ती जगाच्या बदलत्या रचनेशी सुसंगत ठरत आहे. मार्क कार्नी आणि इतर अनेक जागतिक नेत्यांनी जगाला कठोर व्यापार गटांच्या पलीकडे जाऊन अनेक आघाड्यांवर आधारित सहकार्याकडे वळण्याचे आवाहन केले आहे आणि सध्या तसे घडतानाही दिसत आहे.
मागील ‘मंथना’च्या तुलनेत आताच्या संधी अधिक महत्त्वपूर्ण आहेत. ही वेळ केवळ मार्गक्रमण करण्यापलीकडे जास्त वेगाने आगेकूच करण्याची आहे. आदर्श परिस्थितीत ‘ओव्हरटेकिंग’ (पुढे जाणे) कठीण असते. कारण, त्यावेळी सर्वजण एकाच वेगाने धावत असतात; पण पाऊस किंवा धुक्यासारखी कठीण परिस्थिती असते, तेव्हा मोजमाप करून वाढवलेला वेग तुम्हाला विजयाकडे नेऊ शकतो. भारताचा उदय हा आता कोणतीही भविष्यातील शक्यता राहिलेला नाही. ती वास्तविकता आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचा फायदा घेऊन किती वेगाने आणि किती व्यापक स्वरूपात आपले भविष्य घडवतो, यावर येणार्या काळाची दिशा ठरणार आहे. यासाठी आपल्याला उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे लागेल, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करावा लागेल आणि आपल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी निर्मिती करावी लागेल. आपण या सगळ्या गोष्टींवर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित केले, तर येणारे दशक हे पूर्णपणे भारताचे असेल आणि जागतिक आर्थिक पटलावर भारत एक अपरिहार्य शक्ती म्हणून स्वतःचे स्थान अधिक मजबूत करेल, यात शंका नाही. (अनुवाद : विधिषा देशपांडे)