डॉ. व्ही. एन. शिंदे
जग आज एका वेगळ्या संकटात सापडले आहे. ऑक्टोबरमध्येच महाराष्ट्रात हजारो टँकरनी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पिके करपली आहेत. २०२६-२७ च्या काळात तीव्र अल निनोमुळे निर्माण होणारे हे चित्र आहे. जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या अंदाजानुसार अल निनोची स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हा प्रभाव २०२७च्या सुरुवातीपर्यंत राहील. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांचा वैज्ञानिक माहितीच्या आधारे घेतलेला आढावा!
ऑक्टोबर २०२६मधील अमेरिकेच्या नोआ हवामान केंद्राच्या अंदाजानुसार अल निनो अधिक बळकट होत असून, २०२६च्या अखेरीस ते २०२७च्या सुरुवातीपर्यंत त्याची तीव्र स्थिती कायम राहील. पॅसिफिक महासागराच्या विशिष्ट भागांतील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढू शकते. काही भागांमध्ये त्याहून अधिक तापमानातील तफावतही नोंदवली गेली. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. याचा अर्थ संपूर्ण महासागराचे तापमान तीन ते चार अंशांनी वाढेल. हा आकडा विशिष्ट प्रदेशातील तापमान आणि त्याच्या दीर्घकालीन सरासरीतील फरक दर्शवतो. महासागरातील बदल पृथ्वीच्या हवामान व्यवस्थेवर मोठा परिणाम घडवू शकतो.
आता पुढचा प्रश्न, २०२७ हे वर्ष २०२४चा विक्रम मोडून इतिहासातील सर्वांत उष्ण वर्ष ठरणार का? याचे उत्तर आहे, अशी दाट शक्यता आहे; परंतु ते अद्याप निश्चित नाही. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, वातावरणात वाढत असलेले हरितगृह वायू. दुसरे म्हणजे अल निनोसारख्या नैसर्गिक हवामान प्रक्रियांमुळे जागतिक तापमानात होणारी अतिरिक्त वाढ. अल निनोच्या काळात महासागर आणि वातावरणातील उष्णतेची देवाणघेवाण बदलते. त्यामुळे जागतिक सरासरी तापमान वाढण्यास हातभार लागतो. जागतिक हवामान संघटनेच्या २०२६ ते २०३० या कालावधीविषयीच्या अंदाजातही २०२७ मध्ये तापमानाचा नवा विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता सांगण्यात आली होती; मात्र याचा अर्थ २०२७ निश्चितपणे सर्वांत उष्ण वर्ष असेल, असे नाही. अंतिम चित्र प्रत्यक्ष तापमान नोंदी आणि इतर हवामान घटकांवर अवलंबून असेल. जागतिक तापमान वाढत असताना तीव्र अल निनोची भर पडल्यास उष्णतेचे धोके अधिक गंभीर होतील आणि याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो.
भारतावर होणारे परिणाम
भारतासाठी अल निनोचा सर्वांत महत्त्वाचा परिणाम कोणता असेल, तर तो मान्सूनच्या पावसावर होणारा परिणाम. भारताची शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. सामान्यतः अल निनोच्या काळात भारतीय मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते; परंतु प्रत्येक अल निनोमध्ये भारतात दुष्काळ पडतोच असे नाही. हिंदी महासागरातील तापमान, स्थानिक हवामान प्रणाली आणि इतर अनेक घटक मान्सूनवर परिणाम करतात. केवळ अल निनोच्या आधारे संपूर्ण देशात पाऊस सरासरीच्या ९० टक्केच झाला, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही; पण आगामी काळातील संभाव्य धोके दुर्लक्षित करता येणार नाहीत. ज्या भागात पाऊस कमी झाला आणि त्यानंतर तापमान वाढले, त्या जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. विहिरी, तलाव आणि धरणांमधील पाणीसाठ्यावर ताण येत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पर्जन्यछायेतील काही भागांमध्ये पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व आणखी वाढते.
शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ स्पष्ट आहे- पावसाचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि स्थानिक हवामान अंदाजानुसार शेतीचे निर्णय घेणे महत्त्वाचे राहते. अल निनोचा परिणाम केवळ पाऊस आणि तापमानापुरता मर्यादित नसून त्याचा थेट संबंध ताटातील अन्नाशीही आहे. भारतामध्ये भात, मका, सोयाबीन, कडधान्ये आणि कापूस यांसारख्या अनेक पिकांना योग्य वेळी पाऊस मिळाला नाही. पेरणीनंतर पावसात मोठा खंड पडल्याने बियांची उगवण, पिकांची वाढ आणि उत्पादनावर परिणाम झाला. खरीप हंगामातील उत्पन्न कमी झाले. पुढे रब्बी हंगामासाठी धरणे आणि भूजल यांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे गहू, हरभरा आणि इतर पिकांचेही उत्पादन पुरेसे होणार नाही. पिकांचे उत्पादन घटल्याने बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होऊन अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या
आता महत्त्वाचा भाग- उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या. तापमान जास्त असताना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, कठीण होऊ शकते. त्यामुळे निर्जलीकरण, चक्कर येणे, थकवा आणि उष्माघात यांसारख्या समस्या निर्माण होतात. वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गर्भवती, बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि आधीपासून आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना विशेष धोका असतो. २०२६च्या अखेरीपासून २०२७च्या सुरुवातीपर्यंत उष्णतेचे असामान्य स्वरूप कायम राहिले, तर काही प्रदेशांमध्ये आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढणार आहे. अशा परिस्थितीत आपण शक्यतो दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळायला हवे. नियमितपणे पाणी प्यायला हवे. हलके कपडे वापरणे आणि शरीर थंड राहील अशा ठिकाणी थांबायला हवे. एखाद्या व्यक्तीला गोंधळल्यासारखे वाटत असेल, बेशुद्धी येत असेल किंवा उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. उष्णतेची लाट ही केवळ अस्वस्थ करणारी परिस्थिती नाही, ती जीवघेणीही ठरू शकते.
जगभरात होणारे परिणाम
सुपर अल निनोचा प्रभाव भारतापुरता मर्यादित नसतो. जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. आग्नेय आशियातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यास दुष्काळ आणि जंगलांना आग लागण्याचा धोका वाढेल. ऑस्ट्रेलियामध्ये काही प्रदेशांना अधिक उष्ण आणि कोरड्या परिस्थितीचा सामना करावा लागेल. मात्र, जंगलातील आगींची तीव्रता केवळ अल निनोवर अवलंबून नसते. वनस्पतींमधील कोरडेपणा, वारे आणि स्थानिक परिस्थितीही महत्त्वाची असते. दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील काही भागांत पावसाच्या पद्धती बदलू शकतात. काही ठिकाणी दुष्काळाचा धोका वाढेल, तर इतर भागांत अतिवृष्टी आणि पूर येऊ शकतो. नेपाळने दोन महिन्यांत दोन भीषण पूर पाहिले. आफ्रिकेतील काही प्रदेशांत पावसातील बदलांमुळे शेती, पिण्याचे पाणी आणि अन्नसुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, अल निनोमुळे जगभरात एकसारखे हवामान निर्माण होत नाही. एका भागात दुष्काळ, तर दुसऱ्या भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्र दुष्काळाने त्रस्त असताना नेपाळ आणि चिलीमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे.
आता प्रश्न असा की, अल निनो अधिक तीव्र झाला, तर आपण त्याचा सामना कसा करणार? सर्वप्रथम पाण्याचे नियोजन. घरगुती वापरात पाणी वाया जाऊ देऊ नये. पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपायांना प्राधान्य द्यायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे, शेतीचे नियोजन. शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाज, मातीतील ओलावा आणि उपलब्ध सिंचनाचा विचार करून निर्णय घ्यावेत. तिसरी गोष्ट, आरोग्याची काळजी. उष्णतेच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या वेळांमध्ये आवश्यक बदल करा आणि उष्णतेचा धोका असलेल्या व्यक्तींना मदत करा. चौथी गोष्ट म्हणजे, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे. हवामानाविषयी सोशल मीडियावर अनेकदा चुकीचे दावे पसरवले जातात. त्यामुळे भारतीय हवामान विभाग, जागतिक हवामान संघटना आणि इतर अधिकृत संस्थांचे अद्ययावत अंदाज पाहावेत. अल निनो ही नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. ती थांबवता येत नाही; पण योग्य नियोजन, पूर्वतयारी आणि वैज्ञानिक माहितीच्या मदतीने त्याच्या परिणामांमुळे होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
तीव्र अल निनोची स्थिती, जगासाठी आणि भारतासाठी निश्चितच गंभीर आहे. डिसेंबर २०२६ पासून २०२७च्या सुरुवातीपर्यंत अल निनोचा प्रभाव उच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानात वाढ, पावसाच्या पद्धतींमधील बदल, शेतीवरील ताण आणि उष्णतेशी संबंधित आरोग्याचे धोके या सर्व बाबींकडे गांभीर्याने पाहायला हवे. प्रत्येक अंदाज हा निश्चित भविष्यवाणी नसते. प्रत्यक्ष परिणाम प्रदेशानुसार बदलतात. हवामानाचे नवे अंदाज नियमितपणे प्रसिद्ध होतात. म्हणूनच हवामानातील बदलांबाबत जागरूक राहा. पाण्याची बचत करा. शेतकऱ्यांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवा. उष्णतेपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करा.
अल निनो म्हणजे काय?
पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय भागात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान नेहमीपेक्षा वाढते आणि त्यासोबत वातावरणातील वारे आणि हवेच्या हालचालींमध्ये बदल होतात. या नैसर्गिक हवामान प्रक्रियेला अल निनो म्हणतात. याचा परिणाम केवळ महासागरापुरता मर्यादित नसतो. जगभरातील पाऊस, तापमान आणि वादळांच्या पद्धतींवर त्याचा प्रभाव पडतो. जेव्हा ही स्थिती अत्यंत तीव्र होते, तेव्हा तिला ‘सुपर अल निनो’ म्हणतात.