प्रसाद पाटील
जगभरात पसरलेल्या तस्करीच्या साम्राज्याने अनेक गुन्हेगार, क्रूरकर्मा पोसलेले आहेत, हे वेळोवेळी घडलेल्या चकमकीतून किंवा छाप्यांमधून समोर आले आहे; पण मेक्सिकोतील अल मेंचोची कहाणी एखाद्या गँगस्टरहून अधिक भयावह आहे. मेक्सिकोच्या सुरक्षादलांनी त्याला नुकतेच कंठस्नान घातले. त्याचा अंत हा मेक्सिकोच नव्हे, तर जागतिक गुन्हेगारी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे; मात्र अमली पदार्थांची मागणी आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्था टिकून आहे, तोपर्यंत नवीन मेंचो जन्माला येत राहतील. मेंचोच्या साम्राज्याचा अस्त झाला असला, तरी त्याने मागे सोडलेला रक्ताचा आणि दहशतीचा वारसा मेक्सिकोला अजून किती काळ सोसावा लागेल, हे येणारा काळच ठरवेल.
जागतिक गुन्हेगारी जगतातील सर्वात क्रूर, शक्तिशाली आणि अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत अव्वल स्थानी असलेला मेक्सिकन ड्रग माफिया नेमेसियो ओसेग्वेरा सरवांटिस ऊर्फ ‘अल मेंचो’ अखेर सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत ठार झाला आहे. मेक्सिकोच्या सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका अत्यंत गोपनीय आणि धाडसी मोहिमेत हा कुख्यात तस्कर मारला गेल्याची अधिकृत घोषणा केली आणि तस्करीविश्वातला एका क्रूरकर्म्याचा अध्याय संपला; मात्र मेंचोच्या मृत्यूची बातमी वार्यासारखी पसरताच मेक्सिकोमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, त्याच्या जॅलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (सीजेएनजी) या संघटनेच्या समर्थकांनी संपूर्ण देशात हिंसाचाराचा तांडव सुरू केला. मेक्सिकोमधील किमान आठ राज्यांमध्ये सध्या आगीचे लोण पसरले. गाड्या, पेट्रोल पंप आणि सरकारी इमारती पेटवून देण्यात आल्या. अल मेंचोचा अंत एका अवाढव्य आणि रक्तरंजित साम्राज्याच्या कोसळण्याची ती सुरुवात मानली जात आहे.
अल मेंचोचा जन्म 1966 मध्ये मेक्सिकोच्या मिचोआकान प्रांतातील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. हा परिसर तसाही अफू आणि मारिजुआना शेतीसाठी आधीपासूनच कुख्यात होता. गरिबीत जन्मलेल्या मेंचोने सुरुवातीच्या काळात शेतात मजुरी केली; पण त्याचे डोळे नेहमीच मोठ्या स्वप्नांकडे लागलेले होते. हीच स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो बेकायदेशीररीत्या अमेरिकेत दाखल झाला. अमेरिकेत गेल्यानंतर तो सरळ मार्गाने जगण्याऐवजी अमली पदार्थांच्या तस्करीकडे ओढला गेला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हेरॉईन तस्करीच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आणि तिथे त्याने काही काळ तुरुंगवासही भोगला. अमेरिकन सरकारने त्याला शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मेक्सिकोत हद्दपार (डिपोर्ट) केले. मेक्सिकोत परतल्यानंतर मेंचोने सर्वांना धक्का देत चक्क पोलीस दलात नोकरी मिळवली; मात्र खाकी वर्दीतील त्याचे मन गुन्हेगारीच्या अंधार्या जगाचाच वेध घेत होते.
1996 हे वर्ष मेंचोच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्याने त्या काळातील कुख्यात ड्रग माफिया अरमांडो वैलेन्सिया ऊर्फ ‘माराडोना’ याची पुतणी रोसालिंडा गोंजालेज वैलेन्सिया हिच्याशी विवाह केला. या विवाहामुळे मेंचोचा प्रवेश मेक्सिकोच्या सर्वात मोठ्या ड्रग सिंडिकेटमध्ये झाला. त्याने सुरुवातीला ‘मिलेनिओ कार्टेल’मध्ये एक हिटमॅन म्हणजेच भाडोत्री खुनी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपले क्रौर्य आणि अचूक निशाणा यामुळे तो अल्पावधीतच टोळीचा सर्वात विश्वासू आणि घातक हस्तक बनला; मात्र मेंचोला केवळ कोणाच्या हाताखाली काम करायचे नव्हते. 2010 च्या सुमारास जेव्हा मेक्सिकोतील ड्रग टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली, तेव्हा त्याने संधी साधून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला जग ‘जॅलिस्को न्यू जनरेशन कार्टेल’ (सीजेएनजी) या नावाने ओळखते.
अल मेंचोची कार्यपद्धती ही इतर तस्करांच्या तुलनेत अत्यंत वेगळी आणि भीषण होती. ‘अल चापो’ गझमनसारख्या तस्करांना प्रसिद्धीची हौस होती. मेंचो मात्र नेहमीच पडद्यामागून सूत्रे हलवत असे. त्याने आपल्या संघटनेत सुमारे 15 ते 20 हजार सशस्त्र गुंडांची एक फौजच तयार केली होती. हे गुंड केवळ बंदूकधारी नव्हते, तर त्यांना लष्करी धाटणीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मेंचोच्या दहशतीचा अंदाज यावरून लावता येतो की, 2015 मध्ये जेव्हा सुरक्षा दलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या गुंडांनी चक्क रॉकेट लाँचरने मेक्सिकन लष्कराचे एक हेलिकॉप्टर पाडले होते. या हल्ल्यात अनेक जवानांचा मृत्यू झाला आणि मेंचो तिथून पसार होण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर मेक्सिको सरकारला समजले की, मेंचो हा केवळ एक तस्कर नसून तो समांतर लष्करी व्यवस्था चालवत आहे.
मेंचोच्या ‘सीजेएनजी’ कार्टेलने केवळ मेक्सिकोच नव्हे, तर अमेरिका, युरोप आणि आशियापर्यंत आपले जाळे विणले होते. अमेरिकेत दरवर्षी हजारो तरुणांचा बळी घेणार्या ‘फेंटानिल’ या घातक अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये या संघटनेचा सर्वात मोठा वाटा होता. अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशननुसार (डीईए) मेंचोचे साम्राज्य मेक्सिकोच्या 32 पैकी 21 राज्यांमध्ये पसरलेले होते. त्याच्या अटकेसाठी अमेरिकेने 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 136 कोटी रुपयांचे प्रचंड बक्षीस लावले होते. मेंचोवर केवळ ड्रग तस्करीचेच नव्हे, तर मानवी तस्करी, तेल चोरी, खंडणी आणि अवैध खाणकामाचेही गंभीर आरोप होते. त्याने मेक्सिकोच्या अनेक पोलीस अधिकार्यांना, न्यायाधीशांना आणि राजकीय नेत्यांना आपल्या पेरोलवर ठेवले होते, ज्यामुळे तो अनेक वर्षे कायद्याच्या कचाट्यातून वाचत राहिला.
मेंचोच्या व्यक्तित्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्याने निर्माण केलेली ‘रॉबिन हूड’ प्रतिमा. 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात होते, तेव्हा मेंचोच्या टोळीने मेक्सिकोच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अन्नाची पाकिटे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. यामुळे स्थानिक लोकांमध्ये त्याच्याबद्दल एक प्रकारचे आदरयुक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले. या सामाजिक कामांच्या जोरावर त्याने आपला जनाधार वाढवला आणि सुरक्षा दलांना त्याच्याबद्दल माहिती मिळणे कठीण झाले; मात्र या पडद्यामागे तो अत्यंत निर्दयी होता. आपल्या विरोधात जाणार्यांना तो भररस्त्यात फासावर लटकवण्यास किंवा त्यांचे शीर धडावेगळे करण्यास कधीही कचरत नसे. 2020 मध्ये त्याने मेक्सिको सिटीचे पोलीसप्रमुख उमर गार्सिया हारफच यांची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्यामध्ये पोलीसप्रमुखांचे दोन अंगरक्षक मारले गेले होते. ताजी कारवाई ही मेक्सिकन लष्करासाठी एक मोठे यश मानले जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी मेंचोच्या गुप्त तळाला वेढा घातला. यावेळी झालेल्या चकमकीत मेंचोच्या समर्थकांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला; पण अखेर सुरक्षा दलांच्या चिकाटीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मेंचोच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर संपूर्ण मेक्सिकोमध्ये हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. त्याच्या समर्थकांनी ‘नारको-ब्लॉकॅडस्’ (रस्त्यांवर वाहने जाळून केलेली अडवणूक) लावून अनेक प्रमुख महामार्ग बंद केले. जॅलिस्को, मिचोआकान, गुआनाहुआतो यांसारख्या राज्यांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली.
आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, अल मेंचोनंतर या अवाढव्य ड्रग साम्राज्याचा ताबा कोणाकडे जाणार? मेक्सिकोच्या ड्रग युद्धात नेहमीच असे दिसून आले आहे की, जेव्हा एखादा मोठा म्होरक्या मारला जातो, तेव्हा त्याच्या वारसदारांमध्ये सत्तेसाठी अंतर्गत युद्ध सुरू होते. मेंचोचा मुलगा रुबेन ओसेग्वेरा हा आधीच अमेरिकेच्या ताब्यात आहे, तर त्याची मुलगी ‘जेसिका’ हिलाही तुरुंगवास भोगावा लागला आहे. अशा स्थितीत सीजेएनजीच्या विविध गटांमध्ये रक्ताची होळी खेळली जाण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेचे माजी डीईए प्रमुख माईक विजिल यांच्या मते, मेंचो हा एखाद्या हुकूमशहासारखा कारभार पाहत होता आणि त्याच्या जाण्याने जागतिक ड्रग सिंडिकेटला असा धक्का बसला आहे, ज्यातून सावरणे त्यांना कठीण जाईल. अल मेंचोचा अंत हा मेक्सिकोच्या गुन्हेगारी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे; मात्र जोपर्यंत अमली पदार्थांची मागणी आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्था टिकून आहे, तोपर्यंत नवीन मेंचो जन्माला येत राहतील. मेंचोच्या साम्राज्याचा अस्त झाला असला, तरी त्याने मागे सोडलेला रक्ताचा आणि दहशतीचा वारसा मेक्सिकोला अजून किती काळ सोसावा लागेल, हे येणारा काळच ठरवेल.