File Photo
बहार

वाढते भूकंप आणि आपण

पुढारी वृत्तसेवा

प्रा. डॉ. संजय वर्मा

अलीकडील काळात जगभरामध्ये भूकंपाच्या घटना वाढल्याचे दिसून येते. भूकंपांमुळे होणारी हानी किती महाभयंकर असू शकते, याची अनेक उदाहरणे इतिहासात आपण पाहिली-अनुभवली आहेत. त्यातून बोध घेतल्यास या नैसर्गिक संकटापासून काही प्रमाणात स्वत:चा बचाव करू शकू. नैसर्गिक आपत्ती किंवा भूकंपापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सजगता आणि बचावाची सक्षम व्यवस्था होय.

गेल्या महिन्यात जपानच्या क्युशू बेटावर 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. हा 2025 मधील दुसरा मोठा भूकंप होता. त्याआधी भारताच्या शेजारी असणार्‍या तिबेटमध्ये भूकंपाने 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अलीकडेच इंडोनेशिया, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीमध्ये गेल्या 7 दिवसांत तीनवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा भूकंपापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सजगता आणि बचावाची सक्षम व्यवस्था. यासंदर्भात अनेक देशांचे दाखले आपल्यापुढे आहेत. जपानचे उदाहरण तर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अल्जेरियासारख्या देशातही आता शाळा, निवासी घरकुलांचे बांधकाम ‘सीस्मिक कोड’नुसार करण्यात येत आहे. परिणामी, भूकंपाच्या काळात हानीची तीव्रता कमी राहण्यास मदत मिळत आहे. आपल्याकडे मात्र एखाद्या भागात भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरू होते. काही दिवस काळजी घेतली जाते आणि खबरदारी म्हणून सजगताही पाळली जाते. कालांतराने ‘जैसे थे’ होते. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता चारच्या आसपास होती. हा काही अचानक झालेला नाही. त्याची पूर्वसूचना तिबेटच्या भूकंपाने दिली होती. परंतु, आपण गाफील राहिलो.

हिमालय आणि संलग्न भागात भूकंपाचा धक्का हा आता एकप्रकारे इशारा मानायला हवा; पण भूकंपाच्या सतत बातम्या येणे या गोष्टी चिंतेत भर घालणार्‍या आहेत. कदाचित यामुळेच भारतीय हवामानशास्त्र विभागाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिशन हवामानाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना भूकंपाचे अचूक अंदाज बांधणारी आणि इशारा देणारी प्रणाली विकसित करण्याचे आवाहन केले. यामागचा उद्देश विनाशकारी भूकंपामुळे कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होणे हाच आहे.

सुदैवाने 2015 नंतर उत्तर भारतात भूकंपाचा मोठा धक्का बसलेला नाही. मात्र, पर्वतीय राज्यांत प्रामुख्याने उत्तराखंडपासून ते देशाची राजधानी दिल्ली एनसीआरदरम्यान सध्या भूगर्भातील स्थिती चिंताजनक आहे आणि कोणत्याही क्षणी या भागात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसू शकतो, असे इशारे दिले जात आहेत. डेहराडून येथील ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी’च्या शास्त्रज्ञांच्या इशार्‍यानुसार, हिमालय परिसरात महातीव्रतेचा भूकंप कधीही येऊ शकतो. म्हणून मनुष्यहानी आणि वित्तहानी मर्यादित ठेवण्यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांच्या मते, पृथ्वीच्या भूगर्भात असणार्‍या भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यात घर्षण सुरू आहे. परिणामी, तेथे ऊर्जा निर्माण झाली आहे आणि ती कधीही मोठ्या स्फोटासह बाहेर पडू शकते. ही बाब विनाशकारी भूकंपाला कारणीभूत ठरू शकते. वाडिया इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञानुसार, हिंदुकुश पर्वतापासून ईशान्य भारतापर्यंत हिमालयाचा भाग हा भूकंप प्रवण आणि संवेदनशील आहे. या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी संबंधित राज्यांत परिणामकारक धोरणांचा अंमल दिसत नाही.

पृथ्वीच्या पोटात सुरू असलेल्या घडामोडींमुळे ज्वालामुखी फुटण्यापासून भूकंपापर्यंतचा धोका कायम राहिला आहे. परिणामी, पृथ्वीवर सुमारे दहा कोटी भूकंपाचे धक्के दरवर्षी जाणवतात, असे काही अभ्यासक सांगतात. यात हानिकारक भूकंपांची संख्या खूपच कमी आहे. मोठ्या भूकंपाची अशी ठराविक तारीख, वेळ निश्चित नसल्याचे शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून सांगत आले आहेत; पण आतापर्यंत भूकंपाची आगाऊ सूचना देणारी प्रणाली का विकसित होऊ शकली नाही किंवा होऊ शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात चांगले योगदान देऊनही मनुष्यप्राणी आजही पृथ्वीच्या उदरात चाललेल्या घडामोडींचे आकलन करण्यास अक्षम ठरला आहे. चार वर्षांपूर्वी भूकंपाबाबत सजगता आणण्यासाठी उत्तराखंडमध्ये पुढाकार घेतला गेला. 2021 मध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयआयटी रुरकीने एकत्र येत उत्तराखंड भूकंप अलर्ट अ‍ॅप तयार केले. यानुसार भूकंपाची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप लागू करणारे उत्तराखंड पहिले राज्य ठरल्याचा दावाही करण्यात आला. शिवाय, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांच्याही फीचर फोनवर भूकंपाची पूर्वसूचना मिळेल, असेही सांगण्यात आले. या अ‍ॅपमुळे लोकांना वेळीच यापासून बचाव करता येणे शक्य राहील, असे वाटू लागले. गेल्या दहा-पंधरा वर्षांत उत्तराखंडला भूकंपाचे 700 हून अधिक धक्के बसले. या पार्श्वभूमीवर या अ‍ॅपला एक वरदान म्हणून पाहिले जाऊ लागले. परंतु, प्रत्यक्षात या अ‍ॅपचा उत्तराखंडच्या नागरिकांना काहीच फायदा झाला नाही.

वास्तविक, हिमालय भागातील भौगोलिक स्थितीचे आकलन केले, तर तेथे भूगर्भातील हालचालींमुळे भूकंप येण्याचा धोका हा नेहमीच राहतो. तरीही भारत भूकंपाची पूर्वसूचना देणारी एकही विश्वसनीय प्रणाली विकसित करू शकला नाही. इतकेच नव्हे, तर जगभरात अशाप्रकारची कोणतीच प्रणाली अस्तित्वात नसल्याचे सरकारने सांगून टाकले आहे. त्यामुळे कोणताही देश, संघटना किंवा शास्त्रज्ञ भूकंप, ज्वालामुखी आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक संकटाची पूर्वसूचना देऊ, असे ठोसपणे सांगू शकले नाहीत. अशा स्थितीत लोकांना स्वत:च काळजी घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

एक घटना इटलीतील भूकंपाच्या पूर्वसूचनेशी संबंधित असून, या घटनेने जगभरातील शास्त्रज्ञांच्या गटाला अस्वस्थ केले. प्रत्यक्षात दीड दशकापूर्वी 2011 मध्ये सहा शास्त्रज्ञ आणि एका सरकारी अधिकार्‍याविरोधात हत्येचा खटला दाखल करण्यात आला. कारण, ते 6 एप्रिल 2009 मध्ये इटलीतील ला अकिला येथील भूकंपाचे योग्य भाकीत करू शकले नाहीत किंवा करण्यास अपयशी ठरले. ही मंडळी इटलीतील नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्य धोक्यावर देखरेख करणार्‍या समितीचे सदस्य आहेत. त्यांना ला अकिला येथील भूकंपाच्या एक दिवस अगोदर पाचारण करण्यात आले होते आणि येत्या काही दिवसांत भूकंप तर होणार नाही ना? अशी विचारणा केली गेली होती. त्यांना बोलावण्याचे कारण म्हणजे, संबंधित संवेदनशील भागात रेडॉन वायू बाहेर पडत होता; पण शास्त्रज्ञांनी संबंधित भाग रिकामा केला जावा, अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांंगितले. परंतु, दुसर्‍या दिवशी 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आणि त्यात 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. जगभरातील हजारो शास्त्रज्ञांनी सामुदायिक निवेदन देत या खटल्याला विरोध केला. त्यांच्या मते, शास्त्रज्ञांना बळीचा बकरा करू नये आणि त्याऐवजी सुरक्षेच्या उपायांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण, भूकंपाविषयीची अचूक भविष्यवाणी करणारी कोणतीही प्रणाली अद्याप विकसित झालेली नाही. रेडॉन गॅसचा मुद्दा पाहिला, तर ती भूकंपाचे भाकीत करणारी एक वादग्रस्त प्रणाली असून, अनेकदा फोलही ठरली आहे. तूर्त कोणत्या क्षणी आणि कोठे किती तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसेल, हे आताच सांगता येत नाही. त्याचे विकृत रूप भूकंपाच्या माध्यमातून वेळोवेळी पाहावयास मिळाले आहे. अर्थात, भूकंपापासून आपण काही धडे शिकलो, तर या नैसर्गिक संकटापासून काही प्रमाणात स्वत:चा बचाव करू शकू. दिल्ली आणि एनसीआरचा एक मोठा भाग भूकंपाच्या द़ृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. त्याचवेळी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, संपूर्ण बिहार हा घासणार्‍या हिमालय प्लेटचा एक भाग आहेत. भूकंपापासून बचाव करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे, सजगता आणि बचावाची व्यवस्था करणे. अनेक देशांत भूकंपरोधक इमारती तयार केल्या जात आहेत. अल्जेरियात बहुतांश इमारती या ‘सीस्मिक बिल्डिंग कोड’प्रमाणे तयार करण्यात आल्या आहेत. याप्रमाणे कॅनडातही ‘राष्ट्रीय बिल्डिंग कोड’ असून, तेथे रुग्णालय, शाळा आणि अन्य सरकारी निवासी इमारतींची उभारणीदेखील याच पद्धतीतून केली जाते. मध्य अमेरिकेत ‘सेंट्रल अमेरिका स्कूल रेट्रोफिटिंग प्रोग्राम’नुसार शाळेच्या बिल्डिंगला धोक्यापासून वाचण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. चिलीतील शाळेत मुलांना वर्षभरातून तीनदा भूकंपापासून बचाव करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चिलीत 2010 मध्ये 8.8 तीव्रतेचा भूकंप आला; पण यात शाळेचे नुकसान कमी झाले. कारण, या इमारतींनी ‘बिल्डिंग कोड’चे पालन केलेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT