योगेश मिश्र, ज्येष्ठ विश्लेषक, स्तंभलेखक
भारतातील 70 कोटी लोक वेळ, मेंदू आणि डेटा खर्च करून सोशल मीडिया चालवत आहेत; पण या महासमुदायाच्या कमाईचा खरा आनंद परदेशस्थ मिळवत आहेत. जग म्हणते भारत डिजिटल बाजाराचा राजा बनला आहे; पण...
मानव सुरुवातीपासूनच संवाद साधण्याचे नवे मार्ग शोधत आला आहे. कालौघात संवादाचे प्रारूप बदलत गेले. गुफांमध्ये चित्रे काढणे, बोलणे, चिठ्ठ्या लिहिणे, सांकेतिक भाषा वापरणे, ई-मेल पाठवणे असा हा प्रवास सुरू असतानाच नव्वदीच्या दशकामध्ये संगणक आले आणि त्यानंतर इंटरनेटचे आगमन झाले. यामुळे संवादाची प्रक्रिया काहीअंशी बदलली. त्यानंतर आला सोशल मीडिया. समाजमाध्यमांवर सुरुवातीला सगळे फक्त चॅटिंगपुरतेच मर्यादित होते; पण 2004 मध्ये फेसबुक, त्यानंतर ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटस् आल्या आणि सोशल मीडियाने जणू रॉकेटची गती पकडली. ती इतकी वेगवान झाली की, आज जगातील जवळपास पाच अब्ज लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सोशल मीडिया वापरत आहेत.
हा विस्तार जितका सुपरफास्ट आणि प्रचंड वेगाने बदलणारा होता, तितकीच त्याची पकडही जबरदस्त होती. जगातील सर्वाधिक व्यसन लावणार्या गोष्टींशी तुलना करण्यासारखी ही पकड मजबूत ठरली. मुले-मुली, स्त्री-पुरुष, वृद्ध यापैकी कोणीही या पकडीतून बचाव करू शकले नाही. नशा किंवा व्यसन हे असेच असते. अवघ्या दोन दशकांत या व्यसनाचे व्यसनाधिनतेत रूपांतर झाले. परिणामी, आज अनेक देश सोशल मीडियावर निर्बंध घालू लागले आहेत. सुरुवात मुलांपासून केली जात आहे, जेणेकरून ते लहान वयातच या व्यसनात अडकू नयेत. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी लागू केली आहे. तिकडे मलेशिया पुढच्या वर्षी असाच निर्णय अमलात आणणार आहे. प्रगत म्हणवल्या जाणार्या युरोपियन युनियनमध्येही अशा बंदीचा प्रस्ताव आला आहे. संपूर्ण जगात याबाबतीत पुढे असलेला चीन तर आधीपासूनच कडक बंदी लावून बसला आहे. कारण एकच. प्रत्येकाला चिंता आहे आपल्या मुलांची आणि देशाच्या भविष्याची. कारण, सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकून देशाचे कर्णधारच मानसिकद़ृष्ट्या कमजोर झाले, आजारी पडले, भ्रमित झाले किंवा त्यांची विचारसरणीच बदलली, तर नंतर राष्ट्राचे काय होणार?
लांब कशाला जायचे? आपल्या आसपासचे वातावरण पाहिले, तरी सहजगत्या याची कल्पना येते. भवताली नजर टाकून पाहा. सर्वजण आज मोबाईलच्या स्क्रिनमध्ये गढून गेलेले दिसतात. ते पाहिल्यानंतर थोडे स्वतःचेही आत्मपरीक्षण करा. बोलणे किंवा संवाद साधणे हे आता फोनचे ‘एक्स्ट्रा फिचर’ झाले आहे. मूळ काम झाले आहे स्क्रोलिंग. बाथरूमपासून प्रवासापर्यंत आणि ऑफिसपासून बेडरूमपर्यंत प्रत्येक जण स्क्रोलिंग करताना दिसतो. दुर्दैवाची बाब म्हणजे यापैकी कुणालाच आपण काय शोधत आहोत, याची कल्पना नाही; पण तरीही स्क्रोलिंग अव्याहत सुरू आहे. याहून मजेशीर म्हणजे जेन झेड म्हणवली जाणारी आजची संपूर्ण पिढी रिल्स बनवण्यात व्यस्त आहे. मुलं-मुलीच कशाला सासवा-सुना, आई-मुलगी अशा टीम्स बनवून ट्रेंडिंग ऑडिओवर डान्स करत आहेत. रिल्स संस्कृतीने सामाजिक वर्तनही उलटेपालटे करून टाकले आहे. लोक वाटेत अनोळखी व्यक्तींसमोर डान्स करतात; पण घरी आपल्या माणसांसमोर दोन शब्द बोलायलाही संकोचतात किंवा त्यांना वेळ नसल्यासारखे दाखवतात. लग्न समारंभ, वाढदिवस, यात्रा हे सारे आता कंटेंट झाले आहेत. लोकांना स्वादिष्ट, रुचकर पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटण्याऐवजी किंवा त्यांचा आस्वाद घेण्यासाठी आगतिक होण्यापेक्षाही या पदार्थांचे फोटो आणि व्हिडीओ कधी काढेन आणि सोशल मीडियावर कधी टाकेन, यासाठीची घाई झालेली असते.
याचे कारणही स्पष्ट आहे. लाईक्स वाढताना पाहणे हीदेखील एक ‘किक’ आहे. त्यातही यामधून पैसे मिळू लागले, तर मग सोन्याहून पिवळे. या स्क्रीनवरील लोकप्रियतेने लाज—संकोच सारे काही धुवून काढले आहे. शिकण्याची, समजून घेण्याची आवडच संपवली आहे. सोशल मीडियाने लोकांना प्रसिद्ध कमी केले आहे, ‘फेम-हंग्री’ जास्त बनवले आहे. प्रत्येकाला एका व्हायरल आयटमची आस लागून राहिली आहे. किंबहुना, आजच्या जगात तीच प्रतिष्ठा आणि ओळख बनली आहे. डिग्री वगैरे असणे आता सामान्य झाले आहे. (अर्थात, तिचे महत्त्व काय आहे, हेही सार्यांना माहीत आहे.)
सोशल मीडियाने सगळेच असोशल केले आहे. इतके की, उद्या सोशल मीडियावर बंदी घातली, तर अनेकांचा श्वासोच्छ्वासच अडेल. ईएमआयवर घेतलेले 50-60 हजारांच्या स्मार्टफोनचे काय करायचे? ओळखीचे संकट? कमाई थांबेल? अख्खी पिढी डिप्रेशनमध्ये जाईल. नेपाळमध्ये हेच घडले. सोशल मीडियावरील दोन दिवसांच्या बंदीने देशभर हलकल्लोळ उडाला. भारतामध्ये 70 कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात आणि त्यातील बहुतांश लोक काय करतात हे सर्वांना माहीतच आहे. आकडे सांगतात की, भारतातील सर्वात जास्त वापरले जाणार्या व्हॉट्सअॅपच्या प्लॅटफॉर्मवर आजघडीला 53 कोटी 14 लाख सक्रिय वापरकर्ते आहेत. त्यानंतर इंस्टाग्राम51 कोटी 69 लाख, फेसबुक 49 कोटी 27 लाख, टेलिग्राम38 कोटी 40 लाख, फेसबुक मेसेंजर 34 कोटी 39 लाख; आणि ट्विटर म्हणजे एक्स29 कोटींहून अधिक वापरकर्ते अशी डोळे दीपवणारी यादी आहे. सोशल मीडियाच्या विश्वात बुडून गेलेल्यांना यामागच्या अर्थकारणाची जराही कल्पना नसते. किंबहुना, त्याविषयी जाणून घेण्याचीही इच्छा नसते. पण वाचकहो, आज कोट्यवधी लोक दिवसरात्र स्क्रोल करत बसतात, लाईक्स मोजतात; पण याचा लाभ घेत कमाई करणारे खेळाडू वेगळेच आहेत. भारतातील सोशल मीडिया बाजार आता 30-35 हजार कोटींचा झाला आहे. यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी फक्त स्क्रीन चमकवत असतात ते प्लॅटफॉर्मसर्वात मोठा हिस्सा मिळवतात. सोशल मीडियाच्या विश्वात अव्वल स्थानी असणारे युट्यूब भारतातून 20 हजार कोटी रुपये मिळवते. यातील फक्त चार-पाच हजार कोटी क्रिएटर्सना दिले जातात. म्हणजेच उरलेले 15 हजार कोटी शांतपणे युट्युबकडून आपल्या खात्यात टाकले जातात. इंस्टाग्राम आणि फेसबुक तर ‘कमाई आमची, नाचा तुम्ही’ असेच म्हणत असतात. एकूण गणित असे की या बाजारातील 80-85 टक्के कमाई सोशल मीडिया कंपन्या घेऊन जातात आणि क्रिएटर्सना उरलेले 15-20 टक्के देऊन त्यांच्या माध्यमातून अख्ख्या समाजाला वेडे बनवले जाते.
खरी बोच आणखी खोल आहे. भारतातील 70 कोटी लोक वेळ, मेंदू आणि डेटा खर्च करून सोशल मीडिया चालवत आहेत; पण या महासमुदायाच्या कमाईचा खरा आनंद परदेशस्थांनाच मिळतो. मार्क झुकरबर्गच्या ‘मेटा’चे एकट्याचे भारतातून वार्षिक उत्पन्न 18-20 हजार कोटी रुपये आहे आणि भारतीय क्रिएटर्सना देण्याच्या नावाखाली त्यांच्या खिशातातून जातो मोठ्ठा भोपळा ! म्हणजेच जवळपास शून्य !. ब्रँड डील्स आणि प्रमोशनचा थोडा फार पैसा मिळतोही, पण त्यातील 70 टक्के रक्कम टॉप-1 टक्के क्रिएटर्सकडे जातात. उरलेल्या 99 टक्क्यांच्या वाट्याला येते लाईक्सची नशा, फॉलोअर्सची भ्रमितावस्था आणि व्हायरल होण्याची अपूर्ण आशा. जग म्हणते भारत डिजिटल बाजाराचा राजा बनला आहे, पण प्रत्यक्षात हा बाजार भारतीयांपासून कमाई करून अब्जावधी रुपयांचे विदेशी ट्रान्सफर करत आहे. यातील शोकांतिका अशी की, या बाजारात लाखो जण ‘आपण ‘फेमस’ होत आहोत’ या आनंदात मश्गूल आहेत आणि कोट्यवधी जण त्यांना पाहण्यात अमूल्य वेळ वाया घालवत आहेत. आजघडीला भारतीय माणूस दररोज सरासरी तीन तास सोशल मीडियावर आणि सुमारे सात तास इंटरनेटवर घालवतो. अशा आकडेवार्या खूप आहेत, वेगवेगळ्या आहेत. पण निष्कर्ष एकच- जनता, विशेषतः तरुण पिढी, मोबाईल-इंटरनेट-सोशल मीडियात पूर्ण बुडालेली आहे.
मोफत धान्य, स्वस्त डेटा आणि एक स्मार्टफोन हेच सध्या जीवन झाले आहे. एआय आधारित अल्गोरिदम आता हे व्यसन आणखी तीव्र करत आहेत. तुम्ही जितके स्क्रोल कराल, तितका पुढचा डोपामिन डोस तुमच्या मेंदूला दिला जात आहे. माणसाला स्क्रीनला चिकटवून ठेवणे हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. हे बनवणारे त्यात अजून मसाला घालण्याच्या शोधात आहेत. अशा वेळी हा प्रवाह आपणच थांबवू शकतो. बंदी हा फक्त तात्पुरता उपाय झाला. त्यातून पळवाटा काढण्यास वेळ लागत नाही. म्हणून बदल आपणच करावा लागेल. आपल्या मनात कोरून ठेवायला हवे की हातात मोबाइल धरून सतत स्क्रोल करत बसण्याने ना आपले भले होणार आहे, ना आपल्या आप्तेष्टांचे, ना राष्ट्राचे ! पण त्यातून विदेशी कंपन्यांची चांदी होणार आहे !