Mental health awareness | नका उचलू आत्महत्येचे पाऊल... 
बहार

Mental health awareness | नका उचलू आत्महत्येचे पाऊल...

पुढारी वृत्तसेवा

कावेरी गिरी

शाळकरी मुले आणि तरुणांमध्ये वाढणार्‍या आत्महत्या ही गंभीर बाब बनत चाललीय. आज आपण सोशल मीडियावर पाहतो विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेच्या, घराच्या इमारतीवरून उडी मारून आपले आयुष्य संपवतात. काही अगदी वयानं सज्ञान मुले, तरुणदेखील आपले जीवन संपुष्टात आणतात.

आज भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात शाळकरी मुलं व तरुण विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही 11वी-12वीची मुलं, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी किंवा अगदी इयत्ता 8वी-9वीतील मुलांनीही आत्महत्येचा मार्ग निवडल्याच्या बातम्या आपल्या नजरेत वारंवार येतात. हा विषय अतिशय गंभीर आहे आणि याकडे अपयश, कमकुवत मन म्हणून पाहणं केवळ चूकच नाही, तर धोकादायकही आहे. मुलं अशी टोकाची पायरी का गाठतात? त्यांची मानसिकता काय असते? त्यांची सहनशीलता खरंच कमी झाली आहे का, हे सर्व जाणून घेणं आवश्यक आहे.

सरकारच्या नोंदी सांगतात की, देशात दरवर्षी हजारो विद्यार्थी आत्महत्या करतात. महाराष्ट्रात तर हा आकडा अनेक वर्षे सर्वाधिक आहे. याचा अर्थ ही समस्या एखादं अपवादात्मक प्रकरण नसून, ती वेगाने वाढणारी सामाजिक समस्या आहे. मुलं आत्महत्या का करतात? कारणं काय असतात? अभ्यासाचा ताण, परीक्षा, मार्क्स, अपयशाची भीती! आजच्या काळात प्रत्येक मुलावर परीक्षेत टॉप करायचंय, जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत. टॉपर व्हायचंय असा अद़ृश्य दबाव आहे. परीक्षेत कमी गुण आले, प्रगतिपुस्तकात अपेक्षित निकाल नाही, मित्रांपेक्षा मागे राहिलो, पालकांची किंवा शिक्षकांकडून मिळालेली वागणूक यामुळं नंतर आलेली निराशा, या गोष्टी मनावर इतका भार टाकतात की, मुलांना वाटतं, मी अयशस्वी आहे. माझ्यामुळे आई-बाबा नाराज आहेत, मी निरुपयोगी आहे. ही भावना पुढे जाऊन आत्मघातकी विचार बनू शकते.

मुलांचं पहिले जग ः घरात वाद, राग, सततचा ताण, आर्थिक त्रास असल्यास मुलं तो खोल मनातून अनुभवतात. बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांकडून खूप अपेक्षा ठेवतात, काही जास्त ओरडतात, काही मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, तर काही घरातच चिंता किंवा असुरक्षितता वाढवत ठेवतात. अशा वातावरणामुळे मुलांना बोलायला माणूसच मिळत नाही. मनातील गोंधळ वाढत जातो आणि ते भिंतींसारखं बंद होत जातात. एकटेपणा ः बोलायला कोणी नसणे हे तर त्याहून भयानक. मोबाईल, सोशल मीडिया, ट्यूशन, प्रोजेक्ट, करिअर यामुळे मुलांच्या आयुष्यात खर्‍या भावना बोलण्यासाठी वेळच राहत नाही. मित्रांशी स्पर्धा, सोशल मीडियावरची तुलना, ‘इतरांचे आयुष्य परफेक्ट आहे’ अशी चुकीची समजूत, यामुळे मुलांना आपणच कमी आहोत, आपणच अपयशी आहोत अशी भावना निर्माण होते. एकटेपणा ही आजच्या काळातली मोठी समस्या आहे. त्यांच्याबाबतीत मानसिक आरोग्याचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. मन निराश असेल, सतत चिंता असेल, स्वतःबद्दल नकारात्मक भावना असेल, झोप नीट होत नसेल, आत्मविश्वास कमी असेल, तर हे सर्व मानसिक आरोग्याच्या समस्येची लक्षणं आहेत. आपण शरीराला आजार होतो तेव्हा डॉक्टरांकडे जातो. मग, मन दुखतं तेव्हा मात्र का लपवतो? ही चूक आहे; परंतु मुलांना हे सांगणारा, समजून घेणारा कोणी नसल्याने ते गोंधळात पडतात.

सामाजिक दडपण येणं, आपण आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असे विचार येणे आणि आपली दुसर्‍याशी तुलना करणे... पुढच्या घरातला मुलगा इंजिनिअर झालाय, डॉक्टर झालाय, इतरांचे गुण 98 टक्के येतात, तुला का नाही इतके चांगले गुण पडत? अशी तुलना मुलांच्या मनाला जखम करते. त्यांना वाटतं, मी कितीही प्रयत्न केला, तरी मी चांगला नाही. मुलांची मानसिकता नेमकी काय असते, त्यांना नेमकं काय वाटतं? मुलं बहुतेक वेळा अशी टोकाची पायरी अचानक चढत नाहीत. त्यांचं मन खूप दिवस दुखत असतं; पण व्यक्त होत नाहीत. त्यांना वाटतं की, कोणी मला समजणार नाही. मी सांगितलं तर ओरडतील. मी आई-बाबांना त्रास देतोय, लोक मला कमजोर समजतील, त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही, नापास झालो म्हणून आई-बाबा घराबाहेर काढतील, अशा भावना मनात दडत जातात. कधीकधी एखादी छोटी घटना, शिक्षकांचे रागावणे, मारणे, मित्रांनी चेष्टा करणे, घरी ओरडा हा शेवटचा धक्का ठरतो. बरेच लोक म्हणतात, आजची मुलं नाजूक झाली आहेत. मग, मुलांची, तरुणांची सहनशीलता कमी झाली आहे का? ते नकार पचवू शकत नाहीत का, असे प्रश्न आपसूकच पडतात.

शैक्षणिक स्पर्धा प्रचंड वाढली आहे. प्रत्येक गोष्टीचं गणित, तुलना, रँकिंग, सोशल मीडिया सतत दडपण वाढते. कुटुंबात संवाद कमी झाला आहे. म्हणून सहनशीलता कमी नाही, तर ताण जास्त आहे आणि ताण पचवण्यासाठी आवश्यक आधार, संवाद, जवळीक, शांतीचं वातावरण मुलांना कमी मिळत आहे. ही केवळ ‘मुलांची समस्या’ नाही, तर आपण सगळ्यांची जबाबदारी आहे. आत्महत्या म्हणजे एका मुलाचं नाही, तर एका कुटुंबाचं, एका समाजाचं मोठं नुकसान आहे. प्रत्येक मुलाच्या भावना महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक मुलाला प्रेम, आधार, ऐकून घेणारा कान आणि विश्वास हवा असतो. काय करावे? सोपे, प्रत्यक्षात करता येतील असे उपाय म्हणजे मुलांशी दररोज बोला काय झाले? एवढा प्रश्न पुरेसा असतो. त्यांना नीट ऐका. त्यांच्या भावना समजून घ्या. त्यांच्या प्रश्नांचे, शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न करा. सल्ला देण्यापूर्वी त्यांचं बोलणं मनापासून ऐकले, तर अर्धा ताण कमी होतो.

मुलांना अपयश चालतं हे शिकवा. त्यामुळे जीवनातील चढ-उतारात नकार पचवण्यास सोपे जाईल. परीक्षा, मार्क, यश हे आयुष्याचे छोटे भाग आहेत. मुलांना हे पटवून द्या की, अपयश म्हणजेच शिकण्याची संधी आहे. त्यामुळे लगेच आयुष्य संपलं नाही. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुलना करू नका. प्रत्येक मुलाचं वेगळं व्यक्तिमत्त्व, वेगळी ताकद, वेगळं स्वप्न असतं. तुलना म्हणजे मुलाच्या आत्मविश्वासावर वार करण्यासारखं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शाळेत आणि घरी मानसिक आरोग्याबद्दल बोललं पाहिजे. मनाला आजार होऊ शकतो हे जसं पोटदुखी, ताप यांसारखंच सामान्य आहे. शाळांनी समुपदेशन केंद्र ठेवावं. विद्यार्थ्यांना भावना सांगणे शिकवलं पाहिजे. मुलांवरच्या अभ्यासाचे ओझे कमी असावे. ट्यूशन, होमवर्क, प्रोजेक्ट, परीक्षा हे सर्व ताण न देता किंवा घेता समजून घेतलं पाहिजे. सकारात्मक वातावरण तयार करा. मुलांना त्यांच्या आवडी काय आहेत, छंद काय आहेत, ते कशात आनंद मानतात, हे समजून घेण्यासाठी वेळ द्या. चांगली परिस्थिती, वातावरणातून आत्महत्या टाळता येते प्रत्येक मुलाला वाचवता येते.

शांत, उदास, एकटा बसणे, पूर्वीसारखा उत्साह नसणे, झोप-भूक कमी होणे अशी लक्षणे किंवा बदल दिसू लागले की, सतर्क व्हावे. मी कोणालाच उपयोगाचा नाही असं म्हणणे, अचानक राग, चिडचिड, अस्ताव्यस्त वर्तन, अभ्यास किंवा आवडीतील रस कमी होणे, अशावेळी लगेच त्याच्याशी संवाद साधावा, समुपदेशकाची मदत घ्यावी. यात लाज वाटण्यासारखं काही नाही. हेच पाऊल त्याचं आयुष्य वाचवू शकते. एकूण काय तर मुलांचं मन वाचलं, तर मुलाचं जीवन वाचेल. आत्महत्या ही एक प्रवृत्ती नसून आकांत, ताण आणि एकटेपणातून केलेली शेवटची हाक असते. म्हणूनच मुलांच्या मनात काय चाललं आहे, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्यांना समजावून घेणं, त्यांचा ताण कमी करणं, त्यांना आधार देणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण वेळेत लक्ष दिलं, संवाद वाढवला, आणि मुलांना आत्मविश्वास दिला, तर अनेक जीव वाचतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT