DK Shivakumar | सिद्धरामय्या गेले, शिवकुमार आले  
बहार

DK Shivakumar | सिद्धरामय्या गेले, शिवकुमार आले

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सुकृत खांडेकर

शिवकुमार यांची पक्षाला उपयुक्तता किती आहे, याची जाणीव हायकमांडला आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना शिवकुमार शांत राहिले; पण त्याचा अर्थ आपण कमजोर आहोत, असा नव्हे हे त्यांनी दाखवून दिले. हायकमांडनेही राजस्थान पॅटर्नपासून बोध घेतला आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला सलग तीन वर्षे चिकटून बसलेल्या सिद्धरामय्या यांना काँग्रेस हायकमांडने अखेर हटवले आणि कर्नाटकचा नवा कप्तान म्हणून डीके शिवकुमार यांनी राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सिद्धरामय्या गेले व शिवकुमार आले, हा केवळ काँग्रेसपुरता खेळ नाही. नेतृत्व बदलानंतर सिद्धरामय्या हे शांत बसतील काय, हा आता कळीचा मुद्दा आहे. सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले, तर राज्यात अस्थिरता निर्माण होईल असे त्यांच्या समर्थकांनी हायकमांडला बजावले होते. म्हणूनच शिवकुमार यांना प्रत्येक दिवस आव्हानांचा ठरणार आहे. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असावेत. पंधराशे कोटींपेक्षा अधिक त्यांची मालमत्ता आहे. दोन वर्षांनी राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने ते यापुढे भाजपच्याही रडारवर असतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांची कसोटी आहे.

कर्नाटकच्या राजकारणात एच. डी. देवेगौडा, बी. एस. येडियुरप्पा व सिद्धरामय्या हे मोठा जनाधार असणारे तीन नेते आहेत. देवेगौडा व येडियुरप्पा या दोन्ही नेत्यांवर वयाच्या ज्येष्ठतेनुसार मर्यादा आहेत. आता सिद्धरामय्या हे राजीनामा देऊन सत्तेच्या परिघातून बाहेर पडले आहेत. शिवकुमार हे सदैव काँग्रेसनिष्ठ राहिले. त्यांनी कधी पक्ष बदलला नाही. त्यांच्या मागे इडी किंवा इनमक टॅक्सचा ससेमिरा लागला, जेलमधे जावे लागले, तरी त्यांनी काँग्रेस सोडली नाही. पक्षाच्या हायकमांडचा आदेश नेहमीच मानला. ते मुख्यमंत्रिपदासाठी जबर महत्त्वाकांक्षी होते; पण सिद्धरामय्या त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांच्या विरोधात कधी शब्दही काढला नाही. त्यांना कधी दुखावले नाही किंवा जाहीरपणे आव्हान दिले नाही. उलट जेव्हा सिद्धरामय्या यांनी आपण मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणार असल्याचे सहकारी मंत्र्यांच्या बैठकीत जाहीर केले तेव्हा शिवकुमार यांनी चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद मागितले. राज्यातील दलित-मागासवर्गीय समाजात सिद्धरामय्या यांची ताकद मोठी आहे, याची जाणीव शिवकुमार यांना आहे.

२०२३ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हटवून कर्नाटकात काँग्रेसने सरकार बनवले. २२४ पैकी १३५ जागांवर काँग्रेसचे आमदार निवडून आले. सिद्धरामय्या मुख्यमंत्री व डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हापासून दोन्ही नेत्यांमधे शीतसंघर्ष राहिला आहे. सिद्धरामय्या व शिवकुमार हे प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असा तोडगा हायकमांडने काढला होता. सिद्धरामय्या अडीच वर्षांनंतर शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवतील असे गणित मांडले गेले; पण राजकारणात 'दोन अधिक दोन बरोबर चार' अशी बेरीज कधीच होत नसते. विरोधी पक्षात असलेल्या भाजप व जनता दल एसने सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्षावर यथेच्छ टीका केली. राज्यात अस्थिरता निर्माण होत आहे, असे आरोप केले. शिवकमार हे प्रदेशाध्यक्षही होतेच. त्यांनी सिद्धरामय्या यांनी पायउतार व्हावे असे थेट कधी म्हटले नाही; पण पाच वर्षे आपण काही प्रदेशाध्यक्षपदावर असणार नाही, असे ते सूचक बोलत असत. शिवकुमार नेहमी म्हणत, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पाच वर्षे चालेल; पण सिद्धरामय्या पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील का, या प्रश्नावर ते मौन पाळत.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक मार्च-एप्रिल २०२८ मध्ये अपेक्षित आहे. कर्नाटक हे दक्षिणेकडील मोठे राज्य हातातून निसटता कामा नये, याची काँग्रेसला चिंता आहेच. केवळ नेतृत्व बदल हाच मुद्दा नव्हता, तर कर्नाटकातून राज्यसभेवर तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे, तसेच विधान परिषेदच्या तीन जागांसाठी उमेदवार निश्चत करायचे आहेत. पक्षाचे नुकसान होता कामा नये, याची दक्षता घेणे जरुरीचे आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या हे वयाने ८० वर्षांचे होतील. अशावेळी सरकारचा कप्तान बदलणे आवश्यक आहे, असा विचार हायकमांडने केला असावा. शिवकुमार यांना पक्ष नेतृत्वाचे नेहमीच समर्थन मिळालेले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यात संघटन उत्तम उभारले आहे. सिद्धरामय्या हे जनता दल एसमधून काँग्रेसमध्ये आले आहेत. देवेगौडांनी त्यांचे पुत्र कुमारस्वामी यांना महत्त्व द्यायला सुरूवात केल्यावर सिद्धरामय्या यांचे मन तिथे रमेना. देवेगौडांनीच त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया करतात असा ठपका ठेवून पक्षातून काढून टाकले होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेली पन्नास वर्षे सिद्धरामय्या हे सत्तेच्या राजकारणात आहेत. दीर्घ काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा त्यांनी विक्रम केला आहे; पण २०२३ मध्ये झालेल्या समझोत्यानुसार अडीच वर्षे झाल्यानंतरही ते मुख्यमंत्रिपद सोडायला का कू करीत होते. हायमांडने सिद्धरामय्या यांना राज्यसभेत खासदार व्हा, विरोधी पक्षनेते पद संभाळा अशी ऑफर दिली होती; पण त्यांनी त्याला साफ नकार दिला; मात्र शिवकुमार यांच्या शपथविधीच्या आदल्या दिवशी त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

काँग्रेसला पुढील दहा- बारा वर्षे राज्यात सक्षमपणे काम करणारा, २०२८ ची विधानसभा निवडणूक जिंकून देणारा आणि २०२९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणू शकणारा नेता हवा आहे. याच निकषातून डीके शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेसचे १३५ आमदार (४३.२ टक्के मते) , भाजप ६६ (२६.३ टक्के मते) आणि जनता दल एसचे १९ आमदार (१३.४ टक्के मते) आहेत. भाजप व जनता दल एस यांची युती हे काँग्रेसपुढे आव्हान आहे.

ऑगस्ट २०१७ ला गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेसने सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना पाचव्यांदा खासदार बनविण्यासाठी उमेदवारी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत अहमद पटेल यांना राज्यसभेत पोहोचू द्यायचे नाही, असा चंग भाजपने बांधला होता. काँग्रेसचे बंडखोर आमदार बलवंतसिंग राजपूत यांना भाजपने निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरवले. तेव्हा गुजरातमधे काँग्रेसचे ५१ आमदार होते. शंकरसिंह वाघेलांसोबत सहा आमदारांनी बंड केले. त्यातले एक बंडखोर बलवंतसिंग राजपूत होते. त्यावेळी शिवकुमार यांनी काँग्रेसच्या ४४ आमदारांना विमानाने बंगळुरूला नेले व आपल्या रिसॉर्टवर ठेवले. तिथे त्यांचा पाहुणचार उत्तम केला.

मतदानाच्या दिवशी त्या सर्व आमदारांना गांधीनगरला आणले गेले. काँग्रेसच्या ४४ पैकी ४३ जणांनी अहमद पटेल यांना मतदान केले, एकाने क्रॉस व्होटिंग केले. दोन्ही बाजूंनी घेतलेल्या आक्षेपांनंतर मतमोजणी रोखण्यात आली. काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपच्या पोलिंग एजंटला मतपत्रिका दाखवून मतदान केले असा आरोप झाला. रात्री उशिरा ती दोन मते निवडणूक आयोगाने बाद ठरवली. अहमद पटेल यांना आयोगाने विजयी घोषित केले. शिवकुमार यांनी आमदारांनी बंगळुरूला नेले नसते तर काँग्रेसवर नामुष्की आली असती. २००२ मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे आमदार फोडण्याचे कारस्थान रचले गेले होते. तेव्हाही संकटमोचक शिवकुमार यांनीच राज्यातील काँग्रेस आमदारांच्या पाहुणचाराची व्यवस्था बंगळुरूला केली होती. शिवकुमार यांची पक्षाला उपयुक्तता किती आहे, याची जाणीव हायकमांडला आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना शिवकुमार शांत राहिले; पण त्याचा अर्थ आपण कमजोर आहोत, असा नव्हे हे त्यांनी दाखवून दिले. हाय कमांडनेही राजस्थान पॅटर्न पासून बोध घेतला आहे. तिथे अशोक गेहलोत मुख्यमंत्री पदावर होते. त्यांनाही सिद्धरामय्या यांच्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची ऑफर पक्षाने दिली होती. पुढील निवडणुकीत काँग्रेसला राजस्थानची सत्ता गमवावी लागली. कर्नाटकात अशी चूक होणार नाही याची काँग्रेसने काळजी घेतली असावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT