Diwali Festival | दिवाळीचा भावार्थ 
बहार

Diwali Festival | दिवाळीचा भावार्थ

पुढारी वृत्तसेवा

विद्याधरशास्त्री करंदीकर, पंचांगभास्कर

दिवाळी हा सण हिंदुस्थानात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत थोड्याफार फरकाने सर्वत्रच अत्यंत उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो. हा सण शरद ऋतूच्या मध्यभागी येत असतो. या काळात नव्या धान्याची पिके तयार होऊन, काढणी आणि इतर कामे होऊन नवीन धान्य घरात येण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे सर्वत्र आनंद असतो आणि या आनंदाचा उत्सव म्हणजेच दिवाळी. ज्याप्रमाणे दीप हा स्वतः प्रकाशित होऊन दुसर्‍याला प्रकाश देतो, त्याचप्रमाणे दिवाळीचा आनंदही केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सर्वांना तो मिळणे अपेक्षित आहे.

लक्ष-लक्ष दिव्यांनी अवघा आसमंत उजळणारी, प्रकाशमान करणारी दिवाळी संपूर्ण भारतवर्षात आनंदाने, उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळी सणानिमित्त अनेक पौराणिक कथा आहेत. तसेच धर्मग्रंथांमध्येही दिवाळीविषयी अनेक संदर्भ, परंपरा यांचा उल्लेख आहे. काही ग्रंथकारांच्या मते, दिवाळी ही तीन दिवसांची असते, तर काही ग्रंथकार फक्त प्रतिपदा आणि अमावस्या हे दोनच दिवस दिवाळी असल्याचे सांगतात. धर्मशास्त्रामध्ये अश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ असे म्हणतात. धनत्रयोदशी हा दिवस दिवाळीच्या सणाला जोडून येतो; पण दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशीची गणना होत नाही. धनत्रयोदशीच्या तिथीला आपल्या दीर्घायुष्यासाठी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करण्यास सांगितले गेले आहे. दीपदानामुळे माणसाला अपमृत्यू येणार नाही, असे सांगितले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरातील अलंकार, सोने-नाणे हे सर्व स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. तसेच या दिवशी कुबेर, लक्ष्मी आणि विष्णू यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे. याच दिवशी आयुर्वेदाचे प्रवर्तक श्री धन्वंतरी जयंतीही साजरी केली जाते.

रुढार्थाने दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून 16 सहस्र नारींची मुक्तता केली. त्यामुळे हा दिवस आनंंदाने घालवावा, असा एक त्यातला भाग आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करावे आणि तेही अरुणोदयापूर्वी करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळेच नरक चतुर्दशीच्या दिवशी पंचांगात आपल्याला चंद्रोदय दिलेला असतो, याचे कारण म्हणजे चंद्रोदयापूर्वी आपले स्नान झालेले असावे. या दिवशी अमावास्या असल्याने सूर्य आणि चंद्र एकाच ठिकाणी असतात. त्यामुळे आपल्याला चंद्र दिसत नाही. त्यामुळे असेही म्हटले जाते की, सूर्योदयापूर्वी आपले स्नान झालेले असावे.

अभ्यंगस्नानानंतर या दिवशी फराळ करण्याची प्रथा आहे. यामध्ये प्रामुख्याने तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात असतात. याचे कारण पुढे येणार्‍या थंडीच्या काळासाठीची ऊर्जा त्यातून मिळावी, असे अपेक्षित आहे. दिवाळीचा फराळ हा एकट्याने वा कुटुंबानेच घ्यावयाचा असे अभिप्रेत नाही, तर समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला हा आनंद आपण दिला पाहिजे. म्हणूनच मित्रमंडळी, आप्तेष्ट, शेजारी-पाजारी यांच्या समवेत या दिवसात फराळ करावा किंवा त्यांच्या घरी फराळाचे पदार्थ द्यावेत. त्याचबरोबर ज्यांना हा फराळ बनवणे शक्य नसते त्यांनाही तो द्यावा, अशी परंपरा आहे. समाजातील समानता टिकून राहावी, अशा भावनेने फराळाचे आदान-प्रदान हे या दिवसांत होत असते.

नरक चतुर्दशी दिवशी अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाची 14 तर्पणे करायला सांगितली आहेत. तर्पण फक्त पितरांसाठीच करायचे असते असा अनेकांचा समज आहे; पण देवांसाठीही तर्पण केले जाते. यम हा आद्य पितर आहे. यम, धर्म, मृत्यू, अंतक, वैवस्यत, काल, सर्वभूतक्षयकर, औदुंबर, नील, परमेश्वर, रूपदोर, चित्र आणि चित्रगुप्त आदी 14 नावांनी या दिवशी तर्पण करावयाचे असते. नरक चतुर्दशी आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी ही तर्पणे करावीत. ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांनी पाण्यात तीळ घालून, ज्यांचे वडील हयात आहेत, त्यांनी पाण्यात अक्षता घालून तर्पण करावे, असे शास्त्रात सांगितले आहे.

नरक चतुर्दशीनंतर येणारा दिवस लक्ष्मीपूजनाचा. हा दिवस अमावास्येचा आहे. लक्ष्मीपूजनाला अमावस्या चालते. मग, इतर पूजनाच्या दिवशी का चालत नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो; पण हा मुहूर्तशास्त्राचा विषय आहे. मुहूर्तशास्त्राने अमावास्येला वर्ज्य सांगितले आहे; पण धर्मशास्त्राप्रमाणे समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला तो अमावास्येच्या दिवशी. दुसरी गोष्ट म्हणजे बली राजाने सर्व देवांना कैद केले होते, त्यावेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून सर्व देवांची सुटका केली. या बंदिवासात लक्ष्मीही होती आणि याच दिवशी तिचीही मुक्तता झाली. म्हणूनही या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. अथर्व वेदामध्ये यासंदर्भात एक सूक्त दिलेले आहे. ‘सर्व देव माझ्या ठिकाणी निवास करतात. त्यात साध्यादीदेव, इंद्रादी देव हे वेगवेगळे देव माझ्यामध्ये राहतात. त्यामुळे मी इतकी पवित्र आहे की, माझे पूजन हे झालेच पाहिजे.’ त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, असे धर्मशास्त्र सांगते. पूर्वी खासकरून व्यापारीवर्गच प्रामुख्याने लक्ष्मीपूजन करायचा. आता सर्वच घराघरांतून लक्ष्मीपूजन केले जाते. ही पूजा प्रदोष काळात करावी. साधारणपणे प्रदोष काळ हा त्या त्या गावाच्या सूर्यास्तानंतर अडीच तास असतो. त्या अडीच तासांतच ही पूजा आपल्याला करायची असते. धर्मशास्त्राने लक्ष्मीपूजनासाठी नियम सांगितले आहेत. लक्ष्मी पूजनासाठीची अमावास्या घेताना ती प्रदोषकाळ व्यापिनी घ्यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे ही पूजा प्रदोषकाळातच केली पाहिजे. पुराणकथांप्रमाणे या दिवशी लक्ष्मी रात्रभर संचार करत असते. तिला राहण्यासाठी घर शोधत असते. जिथे तिला स्वच्छता, सौंदर्य, चारित्र्यसंपन्नता, कर्तव्यदक्षता, सयंमीधर्मनिष्ठा असे गुण दिसतात तिथे ती वास करण्यास जाते.

लक्ष्मीपूजनानंतरचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. इथेही प्रदोषकाळात बळीराजाची पूजा करायला सांगितली आहे. बळीराजा हा देवांचा राजा इंद्र आहे, असे धर्मशास्त्र सांगते. बळीराजाची पूजा करताना , ‘विरेचनपुत्र बळीराजा, तुला माझा नमस्कार असो! भविष्यातील इंद्र व आसुर शत्रू आहेस, तू माझ्या पूजेचा स्वीकार कर’ अशी प्रार्थना करावी. बळीराजा हा अत्यंत सुंदर राज्य करणारा होता. तो प्रल्हादाचा मुलगा असल्याने त्यावर विष्णुभक्तीचे झालेले संस्कार होते. त्यामुळे तो विष्णुभक्तही होता आणि एक कुशल प्रशासकही होता. भाद्रपद महिन्यात वामनद्वादशी असते. त्या वामनद्वादशीच्या कथेत हे सर्व सांगितले गेलेले आहे. त्याचा संदर्भ इथेही येतो. बळीराजा अत्यंत दानशूर होता. विष्णूने दानासाठी मागितलेली तीन पावले जागा देण्यास बळीराजाने सहमती दर्शवली. या तीन पावलात भगवान विष्णूंनी दोन पावलात स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली आणि तिसरा पाय बळीराजाच्या डोक्यावर ठेवला. बळीराजाला त्याच्या सर्व सतकृत्यांबद्दल वर्षांतून एकदा या तिथीला त्याची पूजा करण्यात येईल, असा वर भगवान विष्णूंनी दिला. त्यामुळे या प्रतिप्रदेला बळीराजाचे पूजन केले जाते. या बलिप्रतिपदेदिवशी वहीपूजन केले जाते. या दिवशी विक्रम संवत्सराला प्रारंभ होतो. पूर्वी व्यापार्‍यांचे वर्ष हे आश्विन अमावास्येला संपत असे आणि कार्तिक प्रतिपदेला सुरू होत असे. जुन्या सर्व खतावण्या या कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासूनच सुरू होणार्‍या असत. आजही गुजरात प्रांतात निघणार्‍या पंचांगांची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासूनच होते. कारण, त्यांच्याकडे विक्रम संवत्सर आहे. आपल्याकडे शालिवाहन शक आहे. असो, काही लोकांच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच वहीपूजन होते, तर काही जण अमावास्येच्या रात्री आणि प्रतिपदेच्या पहाटे वहीपूजन करतात.

बलिप्रतिप्रदेच्या दिवशी घरातील स्त्रिया आपल्या पतीला ओवाळत असते. याला दिवाळी पाडवा असे म्हणतो. याच दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते. श्रीकृष्णाने इंद्राच्या कोपापासून गावकर्‍यांच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलून सर्वांना अभय दिले, याची आठवण म्हणून या दिवशी घरात पर्वताची प्रतिकृती तयार करून त्याची प्रतीकात्मक पूजा केली जाते. भगवंताने केलेल्या या पराक्रमाबद्दल त्याला वेगवेगळ्या पदार्थांचा अन्नकूट बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. बलिप्रतिप्रदेच्या दुसर्‍या दिवशी भाऊबीज येते. याला यमद्वितीयाही म्हटलेले आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमीच्या घरी भोजनाला गेले. म्हणून या दिवशी प्रत्येक भावाने या दिवशी आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करावे आणि तिचा सत्कार करावा, भेटवस्तू द्याव्यात, असे शास्त्र सांगते. ज्याला सख्खी बहीण नसेल त्यांनी अन्य बहिणीच्या हातचे भोजन करावे, असे सांगितलेेले आहे. ज्या स्त्रियांना भाऊ नसतो, त्या चंद्राला आपला भाऊ म्हणून ओवाळतात. यमद्वितीयेच्या दिवशी यमधर्म, यमदूत, यमी, चंद्रगुप्त, मार्केंडेय आणि पितर यांची पूजा करायला सांगितली आहे. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी स्त्रिया दारावर कावेने भाऊ-बहिणीचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. यावेळी पूजा करणारी स्त्री आपल्या हातात मुसळ घेऊन ते जमिनीवर जोराने आपटते आणि ‘जो माझ्या भावाचा द्वेष करेल, त्याचे तोंड मी मुसळाने फोेडेन’, असे म्हणते. भावाप्रती असलेल्या बहिणीच्या प्रेमाचा हा एक भाग आहे. भगिनी हा शब्द धन, यश, स्त्री यावरून आलेला आहे. ज्याला बहीण आहे तो खरोखरच धनवान आहे, यशवान आहे असे म्हटले जाते. त्याद़ृष्टीने भाऊबीज हा सण महत्त्वाचा ठरतो.

अशी ही दीपावली. हा सण शरद ऋतूच्या अगदी मध्यभागी येत असतो. महाराष्ट्रातील किंवा भारतातील हवामान, पर्जन्यमानाच्या द़ृष्टिकोनातून आपल्याकडील बहुतांश पिके या कालावधीत काढणीयोग्य झालेली असतात. संस्कृतमध्ये भाताला अन्न ही उपाधी दिलेली आहे. हे भाताचे पीक दिवाळीच्या आसपास पूर्ण तयार होते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीही आपल्याला अग्रायणी करायला सांगितलेली आहे. त्यामुळेच कोजागरीला नवान्न पौर्णिमाही म्हटले जाते. या दिवशी नव्या धान्याचे पदार्थ केले जातात. या पौर्णिमेपासून सुगीचे दिवस सुरू होतात. नव्या धान्याची पिके तयार होऊन काढणी आणि इतर कामे होऊन, नवीन धान्य घरात येण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे सर्वत्र आनंद असतो आणि या आनंदाचा उत्सव म्हणजेच दिवाळी.

दिवाळी हा उत्सव खासकरून दिव्यांचा उत्सव आहे. त्यामुळेच दिवाळीतील तिन्ही दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावून हा उत्सव साजरा करतो. त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिन्ही दिवशी माणसाने अपमृत्यू टळावा, यासाठी दिवे लावावेत असे धर्मशास्त्र सांगते. यानिमित्ताने ‘दीप’ या शब्दाची व्याख्या जाणून घेणे आवश्यक आहे. ‘दीप्यते दीपयती वा स्वं परंचेती’ म्हणजे जो स्वतः प्रकाशतो किंवा दुसर्‍याला प्रकाशित करतो तो दीप. दीप हा अग्नी किंवा तेजाचे प्रतीक आहे. हा दीप धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विद पुरुषाथर्र् मिळवून देणारा आहे. हा तेजोमय आहे. आपण रोजच संध्याकाळी आपल्या घरातील देवघरात दिवा लावतो; पण दिवाळीतील दिवे आनंद व्यक्त करण्यासाठी लावले जातात. आपल्याकडे दिवा ओवाळण्याची प्रथा आहे. या ओवाळणीला औक्षण असे म्हटले जाते. औक्षण याचा अर्थ आयुष्यवर्धन असा होतो. ज्याला आपण ओवाळतो त्याचे आयुष्य वाढते असा यामागचा अर्थ आहे. म्हणूनच आपल्याला निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या दिव्यांनी औक्षण करण्यास सांगितले आहे.

दिव्यांचेही प्रकार असतात. देवळात लावल्या जाणार्‍या दिव्याला नंदादीप किंवा लामणदिवा म्हटले जाते. विवाहाच्या वेळी ऐरणी दान येते त्यावेळी आपण पिठाचे दिवे बनवतो. त्याला पिष्ठदीप असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी ओवाळण्यासाठी लामण दिवा असायचा. जुन्या घरांमध्ये हा लामणदिवा दोन खोल्यांतील उंबरठ्यावर लावलेला असे. त्याचा उजेड हा दोन्ही खोल्यांतून पडावा हा त्यामागचा उद्देश असे.

याकडे प्रतीकात्मकतेने पाहिल्यास दिवाळीचा आनंद जसा माझ्या घरात निर्माण व्हायला हवा तसाच आनंद दुसर्‍याच्या घरी मी निर्माण करणे हेही आवश्यक आहे. म्हणूनच दिवाळी किंवा दीपोत्सव हा वैयक्तिक किंवा एका कुटुंबाचा सण नसून सार्वजनिक सणाप्रमाणे आपण साजरा केला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT