धनंजय कुलकर्णी
आपले युग निर्माण केलेले ‘ही मॅन’ धर्मेंद्र हे देहाने पोलादी असले, तरी मनाने हळवे होते. त्यांनी आपल्या खासगी आयुष्यात अनेकांना सहाय्य केले. आपले गुरू बिमल रॉय यांना त्यांनी दिलेले वचन रॉय यांच्या निधनानंतर पूर्ण केले. धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यानिमित्त हे स्मरण...
अभिनेता धर्मेंद्रने सिनेमाच्या दुनियेत इतरांना मदत केल्याचे अनेक किस्से सिनेमातील जाणकार मंडळी कायम सांगत असतात; पण अगदी सुरुवातीच्या काळात धर्मेंद्रला एका मराठी कलाकाराने मोठी मदत केली होती, ज्यामुळे त्याचा पुढचा प्रवास सुखकर झाला. एक दिलचस्प किस्सा आहे आणि त्याचबरोबर धर्मेंद्रने ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचे अधुरे स्वप्न कसे पूर्ण केले, याचीदेखील एक सुखद आठवण आहे. हे दोन्ही किस्से एकमेकांशी इंटर कनेक्टेड असल्यामुळे आपण सुरुवातीला धर्मेंद्रला मदत केलेल्या एका मराठी कलाकाराचा किस्सा बघूया! आयुष्याच्या वळणावर एखाद्या छट्या व्यक्तीने केलेली मदतदेखील भाग्योदय करून टाकणारी असते. अभिनेता धर्मेंद्रच्या बाबतीतला हा किस्सा आहे आणि एका मराठी कलाकाराने त्याला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला. 1960 च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’पासून अभिनयाची यात्रा चालू झाली. रमेश सैगल यांच्या ‘शोला और शबनम’चं (1961) शूटिंग चालू होतं. धर्मेंद्र आता मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम मिळेल का, हे शोधत होता. त्याच वेळी त्याला बिमल रॉय त्यांच्या आगामी ‘बंदिनी’ करिता एका नव्या चेहर्याच्या शोधात आहेत, असे समजले. तो तडक बिमलदा यांना जाऊन भेटला.
बिमलदांनी त्याचं काम अजून पाहिलं नव्हतं. त्यांनी धर्मेंद्रला ‘तू सध्या काम करीत असलेल्या सिनेमाचे काही सीन्स आणून दाखव. ते काम बघून मगच मला विचार करता येईल’, असं सांगितले. धरम रमेश सैगलकडे गेला व शूट झालेल्या एक-दोन रिळांची मागणी केली. त्यावेळी रमेश सैगल भडकले. ते म्हणाले, ‘बिमलदा कितीही मोठे असले, तरी मी कुणी ऐरागैरा नाही. सिनेमा इंडस्ट्रीत माझीही एक पोझिशन आहे. माझ्या अंडर प्रॉडक्शन सिनेमाची रिळे मी कुणालाही दाखवत नाही. देणार तर मुळीच नाही!’ झालं... धर्मेंद्र निराश झाला. रडकुंडीला आला. आता बिमलदांना काय दाखवायचे? कुठेतरी आशेचा एक किरण दिसत होता, तोदेखील लुप्त झाला. दु:खी मनाने तो स्टुडिओच्या बाहेर पडत असताना एक हात त्याच्या पाठीवर पडला. तो हात रमेश सैगलच्या ‘शोला और शबनम’चे संकलक अनंत आपटे याचा होता. तो धरमला म्हणाला, ‘तू अजिबात काळजी करू नको. मी संकलक असल्याने सर्व रिळे माझ्या ताब्यात असतात .त्यातली काही रिळे कुणालाही कळू न देता मी तुला देतो. ती तू बिमलदांना दाखव.’ असं म्हणत त्याने ती रिळं गुपचूपपणे धरमला दिली. बिमलदांनी बघितली आणि.. रेस्ट इज हिस्ट्री! हा अनंत आपटे म्हणजे मराठी सिनेमात तोतरे बोलून हसविणार्या मधू आपटेचा भाऊ होता. त्या अर्थाने अनंत आपटे धरमचा भाग्यविधाता ठरला!
‘बंदिनी’ हा चित्रपट 1963 मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर अभिनेता म्हणून धर्मेंद्र रसिकांच्या आणि व्यावसायिकांच्या नजरेत आला. तिथून त्याच्या रूपेरी कारकिर्दीचा यशाचा आलेख कायम चढता राहिला. बिमल रॉय धर्मेंद्रसाठी खर्याअर्थाने गुरू ठरले. ‘बंदिनी’नंतर बिमलदा यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी नायक म्हणून धर्मेंद्रलाच घेतले. नायिका शर्मिला टागोर होती. बिमल रॉय यांचा हा ‘चैताली’ (आधी या सिनेमाचे नाव ‘सहारा’ होते.) हा चित्रपट बंगाली लेखिका या अन्नपूर्णा देवी यांच्या कादंबरीवर आधारित होता. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले; पण दुर्दैवाने दिग्दर्शक बिमलदा यांचे निधन झाले आणि चित्रपट अपूर्णच राहिला. लोक आपापले पेमेंट घेऊन हळूहळू या चित्रपटातून दूर जाऊ लागले.
शर्मिलादेखील बाहेर पडली; पण बिमलदा यांची पत्नी मनोबिना रॉय हिला मात्र हा आपल्या पतीचा अपूर्ण राहिलेला प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता; पण प्रश्न पैशाचा होता. बरीच वर्षे निघून गेली. त्यानंतर एक दिवस अचानक धर्मेंद्र याला ही बातमी कळाली आणि आपल्या गुरूचे अपूर्ण स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायला पाहिजे, याची त्याला जाणीव झाली. त्याने मनोमन निश्चय केला. एक दिवस बिमल रॉय यांच्या घरी तो पोहोचला. बिमलदा यांच्या पत्नीला वाटले की, इतर कलावंतांप्रमाणे धर्मेंद्रदेखील त्याच्या चित्रपटाचे उर्वरित पेमेंट घेण्यासाठी आला आहे; पण कुणी काही बोलण्याच्या आतच धर्मेंद्रने एक ब्रिफकेस बिमलदा यांच्या पत्नीच्या हाती दिली. या ब्रिफकेसमध्ये पैसे होते. धर्मेंद्र विमलदांच्या पत्नीला म्हणाला, ‘माझ्या गुरूचा अपूर्ण राहिलेला चित्रपट आपण पूर्ण करूया. हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करायला तयार आहे. तुम्ही कुठलीही काळजी करू नका. बिमलदांचे अधुरे स्वप्न आपण पूर्ण करूया!’ बिना रॉय यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. धर्मेंद्रच्या रूपाने जणू देवच त्यांच्या मदतीला आला होता.
त्याने पुन्हा नव्याने पुन्हा चित्रपटाची सुरुवात केली. आता चित्रपटाची नायिका म्हणून त्याने सायरा बानूची निवड केली. दिग्दर्शक म्हणून बिमलदांचे सहायक असलेले हृषीकेश मुखर्जी यांना पाचारण केले. बिमल रॉय प्रोडक्शनची संपूर्ण टीम पुन्हा एकदा कामाला लागली. सर्वांना खूप आनंद वाटत होता. चित्रपट पूर्ण झाला आणि दि. 18 सप्टेंबर 1975 रोजी ‘चैताली’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. तो काळ अॅक्शनपटाचा होता. ‘चैताली’सारख्या भावोत्कट कथानक असलेल्या चित्रपटांचा तो काळ नव्हता. त्यामुळे या सिनेमाला यश मिळाले नाही. पण, धर्मेंद्रला एक समाधान नक्की मिळाले की, ज्या कलावंतामुळे मी आज या पोझिशनला आहे त्या कलावंताचे अधुरे स्वप्न मी पूर्ण करू शकलो.