नीती मेहंदळे
धाराशिव लेणी ही 'शैल-उत्कीर्ण' वास्तुकलेचा नमुना असून, ती धाराशिव शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेसाल्ट खडकाच्या टेकडीमध्ये कोरलेली आहेत. या ठिकाणी सात लेण्यांचा समूह असून, त्या एका उतारावर विखुरलेल्या स्थितीत आहेत. या प्रत्येक लेण्यामध्ये बौद्ध, जैन आणि नंतरच्या काळातील हिंदू धर्माशी संबंधित वास्तुकलेचे घटक दिसून येतात.
धाराशिव जिल्ह्यावर मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, तसेच बहामनी, विजापूर आणि मुघल साम्राज्यासारख्या अनेक राजवंशांनी राज्य केलं होतं. या इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला तिथे पाहायला मिळतात. उस्मानाबाद म्हणजे आताचा धाराशिव जिल्हा, महाराष्ट्राच्या प्राचीनतम इतिहासाचं माहेरघर आहे; पण या जिल्ह्याला एक अनोखा आणि सुंदर ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. हा ठेवा म्हणजेच त्याच्या आताच्या नावाची व्युत्पत्ती आहे. ते म्हणजे बालाघाट पर्वतरांगांमध्ये असलेली धाराशिव लेणी. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांसारखी या लेण्यांना पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली, तरी अजिंठा इथल्या महायान लेण्यांच्या समकालीन ही लेणी असल्याचं सांगितलं जातं. ती आहेतही उस्मानाबाद गावाला लागूनच.
धाराशिव लेणी ही 'शैल-उत्कीर्ण' वास्तुकलेचा नमुना असून, ती धाराशिव शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेसाल्ट खडकाच्या टेकडीमध्ये कोरलेली आहेत. या ठिकाणी सात लेण्यांचा समूह असून, त्या एका उतारावर विखुरलेल्या स्थितीत आहेत. या प्रत्येक लेण्यामध्ये बौद्ध, जैन आणि नंतरच्या काळातील हिंदू धर्माशी संबंधित वास्तुकलेचे घटक दिसून येतात. ही लेणी इसवी सनाच्या ५ व्या ते १० व्या शतकातील असून, ती दख्खनमधील धार्मिक इतिहासाचे विविध स्तर दर्शवतात. बौद्ध आणि जैन दोन्ही परंपरांशी संबंधित असल्यामुळे या धारशिव लेण्यांना प्रचंड सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे. सुरुवातीला ही लेणी बौद्ध मठ म्हणून वापरली जात होती, ज्यात बुद्धांच्या मूर्ती आणि वाकाटक शैलीतील वास्तुकला होती. तथापि, दहाव्या शतकात काही लेण्यांचे जैन मंदिरांमध्ये रूपांतर करण्यात आलं. या दुहेरी धार्मिक महत्त्वामुळे धारशिव लेणी या प्रदेशाचा सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचं ठिकाण ठरतात. धाराशिव लेणी टेकडीच्या दोन बाजूंना आहेत. चार लेणी दरीच्या उत्तरेला असणाऱ्या टेकडीवर, तर उरलेली तीन लेणी त्या लगतच्या बाजूवर ईशान्येला आहेत. या लेण्यांचा अभ्यास सर्वात आधी करण्याचं श्रेय जेम्स बर्जेसना जातं. त्यांनी इ.स. १८७५-७६ मध्ये या लेण्यांना भेट दिली होती अशी नोंद सापडते. त्यांच्या 'आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' पुस्तकात या लेण्यांचा उल्लेख केला आहे.
पण, त्याही पुष्कळ आधी या लेण्यांचा प्राचीन संदर्भ सापडतो तो मात्र जैन साहित्यात. 'करकण्डचरिउ' आणि 'बृहत्कथाकोश' या दोन जैन ग्रंथांत या कोरीव लेण्यांचा उल्लेख आढळतो. अकराव्या शतकातील जैन मुनी कनकामर यांच्या 'करकण्डचरयु' या प्राकृत ग्रंथाच्या चौथ्या आणि पाचव्या भागात तगर या गावाजवळ असलेल्या लेण्यांबद्दलचा उल्लेख सापडतो. हे तगर म्हणजेच आजचं तेर शहर. ते तसंही आद्य मंदिर स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहे. या 'करकण्डचरयु' ग्रंथानुसार करकंड नावाच्या राजाचा मुक्काम तेरापुरच्या दक्षिणेस असलेल्या अरण्यात पडला होता. तेव्हा तेरापूरच्या शिव नावाच्या राजाने त्याची भेट घेऊन जवळच असलेल्या लेण्यांसंबंधी माहिती सांगितली. या लेण्यांमध्ये अनेक स्तंभ आहेत. त्यात असलेल्या पार्श्वनाथाच्या मूर्तीची करंडक राजाने पूजा केली. त्याचबरोबर या लेण्यांचा त्याने जीर्णोद्धार केला. तिथल्या डोंगरमाथ्यावर त्याला वारुळात असलेली एक पार्श्वनाथाची मूर्ती सापडली. ती आणून त्याने त्या मूर्तीची इथल्या एका लेण्यात प्रतिष्ठापना केली. इतकंच नाही तर राजाने तिथे त्या लेण्यांच्या वरील बाजूला अजून दोन लेणी खोदली.
असं मानतात की, ही लेणी मूलतः जैन लेणी होती. कारण, इथे लेण्यांमध्ये खडगासन आणि कायोत्सर्ग स्थितीत अनेक दिगंबर तीर्थंकरांच्या मूर्ती आढळतात. जेम्स बर्जेस यांच्या महाराष्ट्रातील १२०० लेण्यावरील संशोधनानुसार मूलतः धाराशिव लेणी इ.स.५ व्या शतकात बौद्ध लेणी होती. कालांतराने त्यांचं जैन स्मारकांमध्ये रूपांतर झाले आणि जवळच १० व्या शतकात राष्ट्रकूट राजांनी आणखी काही लेणी जैन भिक्षूंसाठी खोदली होती. अर्थात, याला वास्तुशिल्प वैशिष्ट्यांचा आधार आहे. त्यांवरून पाचव्या शतकातील आणि दहाव्या शतकातील लेणी ओळखण्यात फरक करता आला.
धाराशिव लेण्यांमध्ये प्रत्येक लेण्याची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये आहेत. या लेण्यांत उत्तर व दक्षिण दिशेस अनुक्रमे चार जैन व तीन हिंदू लेणी असा सात लेण्यांचा समूह आहे. पहिली ते तिसरी लेणी बौद्ध वास्तुकलेची वैशिष्ट्ये दर्शवतात. यात 'चैत्यगृह', 'विहार' (भिक्षूंसाठी राहण्याच्या खोल्या) आणि 'गर्भगृह' यांचा समावेश आहे. पहिली लेणी २० स्तंभांवर आधारलेली असून, त्यात कोणतीही शिल्पं नाहीत. क्रमांक २ चं लेणं हे प्रमुख लेण्यांपैकी एक असून त्याची वास्तुरचना अजिंठा येथील वाकाटक लेण्यांच्या वास्तुशैलीशी मिळतीजुळती आहे. ते बहुधा वाकाटक काळातील (सुमारे इसवी सन २५०–५५०) असावं. या लेण्यांचं सुरुवातीचं खोदकाम इसवी सनाच्या ५ व्या शतकात कदाचित सातवाहन काळाच्या दरम्यान किंवा त्यानंतरच्या काळात झालं असावं. यामध्ये एक मध्यवर्ती सभागृह (८०×८० फूट) असून त्यात भिक्षूंसाठी १४ कक्ष आहेत आणि गर्भगृहात गौतम बुद्धांची पद्मासनातील मूर्ती कोरलेली आहे. धाराशिव लेण्यांमधील कलात्मक घटक उल्लेखनीय आहेत. दुसऱ्या लेण्यामध्ये गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे, तिसऱ्या लेण्यातल्या बुद्धाच्या मूर्तीच्या प्रभावळीत असलेल्या सर्पफण्यावरून तिचा संबंध जैन तीर्थंकर पार्श्वनाथांशी जोडला जातो. तथापि, धर्मचक्र आणि मूर्तीच्या चौथऱ्यावरील धर्मचक्र यांच्यामधील दोन हरणांच्या शिल्पामुळे ही बुद्धांची मूर्ती असल्याची पुष्टी होते. तिसरं लेणं पहिल्या लेण्याप्रमाणेच असून त्यात पहिल्या लेण्याप्रमाणे एक सभागृह (५९×५९ फूट) आहे. धाराशिव लेण्यांवर बौद्ध आणि जैन दोन्ही परंपरा दावा करतात. या लेण्यांमध्ये सुंदर कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. तसंच बौद्ध धर्मातील जातक कथा आणि देवतांच्या प्रतिमा शिल्पकलेतून साकारल्या आहेत.
चौथं लेणं एक मोकळं लेणं असून त्यात कोणतीही मूर्ती नाही. लेणी ६ मध्ये एक भग्न मूर्ती आहे. सातव्या लेण्यात पुन्हा कोणतीही मूर्ती दिसत नाही. या क्रमांक ५ आणि ६ क्रमांकाच्या गुंफा राष्ट्रकूट काळात (इ.स. ९वे-१०वे शतक) खोदण्यात आल्या आहेत. या नंतरची लेणी प्रामुख्याने जैन धर्माच्या आहेत. सातव्या क्रमांकाचे लेणे हिंदू लेणे असून त्यात लेण्याच्या दर्शनी शीर्षावर कृष्ण लीला दर्शवणारे शिल्प आहे. लेण्यांचा दगड ठिसूळ असल्यामुळे बरीचशी शिल्पं आज भग्नावस्थेत आहेत. चौथी ते सातवी लेणी जैन वास्तुकलेची वैशिष्ट्ये दर्शवतात. यात तीर्थंकरांच्या मूर्ती आणि दगडात कोरलेली नक्षीदार कामे आहेत, जी बहुधा राष्ट्रकूट राजवटीच्या काळात (सुमारे इसवी सन ८ व्या ते १० व्या शतकात) जोडली गेली असावीत. कारण, राष्ट्रकूट राजवटीने जैन आणि हिंदू वास्तुकलेला राजाश्रय दिला होता. काही भागांत हिंदू धर्माशी संबंधित छोटी शिल्पेही आढळतात, ज्यावरून असे सूचित होते की, नंतरच्या काळात या जागांचा पुन्हा वापर किंवा रूपांतर केले गेले असावे. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांशी असलेले साम्य पाहता असे दिसते की, धाराशिव लेणी ही तत्कालीन दख्खनमधील एका व्यापक मठाधिष्ठित व्यापाचा भाग असावीत. या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यावरून दगडी पायऱ्या खाली जातात आणि हा परिसर हंगामी वनस्पतींनी वेढलेला असतो. पावसाळ्याच्या काळात हा परिसर अत्यंत रमणीय असा दिसतो. पावसाळ्यात येथे नैसर्गिकरीत्या पाण्याचे छोटे साठे तयार होतात, ज्यांना 'मलराणा' असे म्हटले जाते.
राज्य पुरातत्त्व विभागाने धाराशिव लेण्यांमध्ये केलेल्या साफसफाईच्या कामावेळी त्याच्या खालच्या बाजूला जुन्या पायऱ्या असल्याचं दिसून आलं. लेण्यांकडे हातला देवी मंदिराकडून पायवाटेने शहरालगतच्या बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. लेण्यांसमोर मराठा कालखंडातील एक शिव मंदिर आहे. इ.स. १९९६ मध्ये, जागतिक बँकेच्या मदतीने गुहांच्या काही भागांची दुरुस्ती करण्यात आली; परंतु आजही काही लेण्यांची स्थिती अतिशय शोचनीय आहे. त्यात गर्भगृहात वटवाघळांचं साम्राज्य असल्याने त्यांचे पुरातत्त्वीय मूल्यदेखील धोक्यात आले आहे. धाराशिवपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेली शैव लेणी हे आणखी एक महत्त्वाचं स्थळ आहे. या भागातील मराठा काळातील एका शिव मंदिरालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. पेशवाईच्या काळात या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. त्यांच्या संप्रदायाचा एक मठही धाराशिवमध्ये आहे. इतर प्रसिद्ध लेण्यांच्या तुलनेत धाराशिव लेणी कमी परिचित असली, तरी ती या प्रदेशातील धार्मिक, वास्तुशिल्पीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतरांवर प्रकाश टाकतात.