Devdutt Padikkal | कसोटीतील नवी ‘भिंत’! 
बहार

Devdutt Padikkal | कसोटीतील नवी ‘भिंत’!

पुढारी वृत्तसेवा

विवेक कुलकर्णी

'तिसरा क्रमांक' हा केवळ फलंदाजीचा क्रम नाही, तर ती आहे प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमणासमोर उभी राहणारी एक अभेद्य तटबंदी. नव्वदीच्या दशकात राहुल द्रविडने, त्यानंतर चेतेश्वर पुजाराने हा वारसा पुढे चालवला. 'नंबर ३' ची महत्त्वाची जागा कोण घेणार, हा यक्षप्रश्न संघापुढे उभा होता. त्‍याचे उत्तर लंका दौर्‍यात मिळाले. त्‍या नव्‍या भिंतीचे नाव म्‍हणजे देवदत्त पडिक्‍कल!

खेळपट्टीवर चेंडूचा टप्पा अचूक ओळखून सहजतेने मारलेले देखणे कव्हर ड्राईव्ह, मनगटाच्या जादूने फिरवलेले फ्लिक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे अभिजात तंत्र... श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलच्या बॅटमधून जेव्हा धावांचा पाऊस पडत होता, तेव्हा क्रिकेटप्रेमी एका नव्या युगाच्या उदयाचे साक्षीदार ठरत होते. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी देवदत्त पडिक्‍कलला अचानक संधी मिळाली आणि त्‍यानेही त्‍याचे पुरेपूर सोने करण्‍यात किंचीतही कसर सोडली नाही. त्याने गॉलमध्ये १६७ धावा आणि कोलंबोमध्ये ११७ धावांची दिमाखदार खेळी साकारली. या दोन लागोपाठच्या शतकांनी केवळ भारताचा विजय सुकर केला नाही, तर दिग्गजांचा हा वारसा पुढे नेणारा एक नवा, आधुनिक दावेदार भारताला मिळवून दिला आहे. अर्थात, या सार्‍या वाटचालीमागे देवदत्तने संघर्षातून केलेला प्रवासही तितकाच महत्‍वाचा!

आज ज्या देवदत्तच्या तंत्राचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक संपूर्ण क्रीडाविश्व करत आहे, त्याच खेळाडूचे अस्तित्व अवघ्या दोन वर्षांपूर्वी हॉस्पिटलच्या खाटांवर आणि गंभीर आजाराशी सुरू असलेल्या एकाकी संघर्षात अडकले होते. काही वर्षांपूर्वी आयपीएलच्या झगमगाटात चमकणारा हा बंगळूरचा तारा अचानक अंधारात हरवला होता. २०२२ च्या सुमारास त्याला पोटाच्या गंभीर विकाराने (ॲक्‍यूट इंटेस्‍टिनल इनफेक्‍शन) ग्रासले. हा आजार इतका बळावला की, त्याला वारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागले. अवघ्या काही महिन्यांत त्याचे वजन तब्बल १० किलोंनी घटले. एका आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी शरीरातील ऊर्जा आणि स्नायूंची ताकद संपुष्टात येणे म्‍हणजे करिअर जवळपास संपल्‍यात जमा! ज्या वयात तरुण खेळाडू धावा खोऱ्याने ओढत असतात, त्या वयात देवदत्त साधे अन्न पचवण्यासाठी आणि मैदानावर उभे राहण्यासाठी संघर्ष करत होता. हा काळ त्याच्यासाठी तीव्र मानसिक कसोटीचा होता; पण यातूनच तो उभा राहिला आणि त्‍याने फिनिक्‍स झेपही घेऊन दाखवली.

जेव्हा नशीब तुमची परीक्षा घेते, तेव्हा स्वतःवरचा विश्वास ढळू न देणे म्हणजे काय, याचे जिवंत उदाहरण म्हणजे देवदत्त पडिक्कल. हॉस्पिटलच्या बेडवरून सुरू झालेला हा प्रवास गॉल आणि कोलंबोच्या मैदानावर विजयाची गुढी उभारण्यापर्यंत पोहोचला आहे. देवदत्त पडिक्कलचे हे पुनरागमन हे सिद्ध करते की, जेव्हा तुमचे तंत्र शुद्ध असते आणि इरादे पक्के असतात, तेव्हा खेळपट्टीवर कितीही प्रतिकूल परिस्‍थिती असो वा आव्‍हाने कितीही कठीण असोत, विजय तुमचाच होतो!

झाले असे की, त्या आजारपणामुळे पडिक्कलच्या फलंदाजीतील लय पूर्णपणे बिघडली होती. २०२२-२३ च्या देशांतर्गत रणजी हंगामात त्याला सात डावांत अवघ्या २६० धावा करता आल्या. सर्वत्र टीकेची झोड उठली आणि राज्य संघातूनही वगळले जाण्याची भीती निर्माण झाली होती; पण देवदत्तने खचून न जाता बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत शांतपणे स्‍वत:चे तंत्र बदलण्‍यावर लक्ष केंद्रित केले. आहार बदलला, जीवनशैली बदलली. थोडक्‍यात सांगायचे तर क्रिकेटकडे पाहण्‍याचा दृष्‍टिकोन बदलला. पडिक्‍कलने प्रतिकूल परिस्‍थितीवर, आव्‍हानांच्‍या डोंगरावर मात करत देशांतर्गत हंगामात रणजी करंडकात ९२.६६ च्या थक्क करणाऱ्या सरासरीने ५५६ धावांचा डोंगर उभा करून स्वतःचे अढळ स्थान पुन्हा निर्माण केले. मार्च २०२४ मध्ये धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करत त्याने ६५ धावांची देखणी खेळी साकारली आणि आपण आंतरराष्ट्रीय कसोटीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दाखवून दिले.

सामान्यतः आशियाई उपखंडात विशेषतः श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी खेळताना फलंदाज 'फ्रंटफूट'वर येऊन चेंडूचा टप्पा दाबण्याचा प्रयत्न करतात; मात्र देवदत्तने या मालिकेत एक पूर्णपणे वेगळी आणि आधुनिक तांत्रिक शैली घडवून आणली. त्याने श्रीलंकेच्या फिरकीपटूंना खेळताना खेळपट्टीवर पुढे जाण्याऐवजी क्रीझचा वापर मागे जाण्यासाठी केला. चेंडू फिरणार की सरळ येणार, हे ओळखण्यासाठी त्याने स्वतःला अतिरिक्त 'मायक्रोसेकंद'चा वेळ दिला. कोलंबोतील ११७ धावांच्या खेळीदरम्यान त्याने फिरकीविरुद्ध केलेल्या धावांपैकी जवळपास ५२ धावा एकट्या बॅकफूटवर केल्या. फिरकीपटूंच्या चांगल्या टप्प्यावरील चेंडूंना बॅकफूटवरून पंच करणे, कट करणे किंवा जागा बनवून लेट-कट मारणे यातील त्याचे कसब या नव्या युगातील क्रिकेटचे खास वैशिष्ट्य ठरले. पडिक्‍कल आधुनिक क्रिकेटच्या जमान्यातील खेळाडू असल्याने त्याचा बचावात्मक खेळ नीरस वाटत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT