ब्रिगेडियर हेमंत महाजन, (निवृत्त)
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील लढाई निरंतन चालणारी आहे आणि दहशतवादाचा धोका टळलेला नाही, या दोन बाबी सुस्पष्ट केल्या आहेत. याचे कारण भारताचा शत्रू असणारा पाकिस्तान हा सातत्याने यासाठीच आपली शक्ती खर्च करत असून, त्याला चीनचीही साथ आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेचे अनेक नेते मारले गेले होते. त्याचा बदला घेण्यासाठी ही संघटना सातत्याने चाचपडत होती. ती संधी अखेर त्यांनी साधली, असे म्हणता येईल. आजही भारतात पाकिस्तानचे 100 ते 150 छुपे सेल्स कार्यरत आहेत. त्यांना शोधून काढणे आवश्यक आहे. तसेच, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी लोकांनी डोळ्यांत तेल घालून आणि कान उघडे ठेवून सजग राहणे गरजेचे आहे.
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे पुन्हा एकदा देशापुढे असणारा दहशतवादाचा धोका टळलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. केंद्रीय संस्था आता या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. फरिदाबादमध्ये टप्प्याटप्प्याने तीन हजार किलोपेक्षा अधिक स्फोटके जप्त झाल्याच्या घटना आणि दुसर्याच दिवशी दिल्लीत स्फोट होणे, या दोन्ही गोष्टी पाहता दहशतवाद्यांकडून मोठा कट रचला गेला होता, हे स्पष्ट होते. फरिदाबादच्या फतेहपूर टगा गावात एसटीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त छाप्यात 2,563 किलो संशयित स्फोटके, 360 किलो अमोनियम नायट्रेट, आयईडी तयार करण्याचे साहित्य आणि रसायने सापडली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील नौगाम भागात केंद्रीय यंत्रणांशी व्यवहार करू नका, असे पोस्टर लागले होते. सीसीटीव्हीत पोस्टर लावणार्याची ओळख पटली असून, तो सहारनपूरचा काश्मिरी डॉक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याचे श्रीनगरमधील इतर डॉक्टरांशी संबंध उघड झाले. फरिदाबादमध्ये डॉ. मुजम्मिलसह इतर डॉक्टरांची नावे समोर आली. रुग्णसेवेची आणि मानवतेची शपथ घेऊन वैद्यकीय व्यवसायात आलेले हे डॉक्टर धर्मांध कट्टरवादाच्या प्रभावाखाली येत जीव घेणार्या खेळात सामील झाले, हे दुर्दैवी आहे. या मॉड्यूलचा उद्देश देशात विविध ठिकाणी स्फोट घडवून भीतीचे वातावरण निर्माण करणे हाच होता.
दिल्लीत मेट्रोजवळचा स्फोट ही तेथील ‘एनडीए’ सरकारच्या काळातील पहिली मोठी दहशतवादी घटना आहे. स्फोट झालेल्या कारमधील एक जखमी पोलिसांच्या ताब्यात आहे. जर तो सूत्रधारांचा साथीदार ठरला, तर तपासाला वेग येईल आणि कदाचित यातून मोठ्या कटाचा उलगडा होईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला सज्जड दम देताना असे म्हटले होते की, यापुढील कोणताही दहशतवादी हल्ला हा ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानला जाईल आणि त्यानुसार प्रत्युत्तर दिले जाईल. दिल्लीतील स्फोटानंतर गृह मंत्रालय, एनआयए, एफएसएल, एनएसजी, एटीएस या सर्व एजन्सीज एकत्रितपणे सक्रिय झाल्या आहेत.
वास्तविक, गेल्या दहा वर्षांमध्ये तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, पोलिस प्रशासन आणि एकंदरीत सुरक्षा व्यवस्थांच्या सक्रियतेमुळे आणि काटेकोरपणामुळे जवळपास 99 टक्के दहशतवाद्यांना त्यांचे मनसुबे पूर्ण होण्यापूर्वीच पकडण्यात आपल्याला यश आले आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये घडवून आणलेल्या स्फोटामध्ये सहभागी असणार्यांनाही पकडण्यात आपल्याला पूर्णपणे यश येईल, अशी अपेक्षा आहे. तथापि, मी सातत्याने एक गोष्ट सांगत आलो आहे आणि ती पुन्हा एकदा यानिमित्ताने सांगणे गरजेचे आहे की, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरुद्धची लढाई भारत गेल्या तीन दशकांपासून लढत आला असून, ती येणार्या काळातही अनेक वर्षे सुरू राहणार आहे. कारण, पाकिस्तान कितीही भिकेकंगाल झालेला असला, फुटीच्या उंबरठ्यावर असला, तरी भारतामध्ये दहशतवाद पसरवणे हे त्याचे अघोषित राष्ट्रीय धोरण आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने आणि राजकीय नेतृत्वाच्या संमतीने तेथे दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळे चालवली जातात. पाकिस्तानच्या या दहशतवाद पोसण्याच्या धोरणाला चीनचीही मोठी मदत मिळते आहे. त्यामुळे पाकिस्तान, चीन आणि दहशतवादाविरुद्ध भारताला प्रदीर्घ काळ संघर्ष करावा लागणार आहे. भारताने ही लढाई निकराने आणि पद्धतशीरपणाने लढत राहणे गरजेचे आहे.
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. यामागचे एक कारण असे असू शकते की, 26 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ नामक आक्रमक दहशतवादविरोधी जी मोहीम राबवली आणि त्यांतर्गत जे एअर स्ट्राईक केले त्यामध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’चे मोठे नुकसान झाले होते. त्यांचे अनेक मोठे नेते यामध्ये मारले गेले. यानंतर ‘जैश’ने महिलांची एक टेररिस्ट विंगही तयार केली होती. या गटाचे नेतृत्वही ‘जैश’चा प्रमुख मौलाना मसूद अझहरच्या बहिणीकडे होते. याचाच अर्थ अशाप्रकारच्या दहशतवादी संघटना कधीही नष्ट होत नाहीत. एखादा अड्डा नष्ट झाला, तरी इतर ठिकाणीही त्यांची प्रशिक्षण शिबिरे सुरू असतात. याशिवाय अन्य छोट्या-छोट्या दहशतवादी गटांनी त्यांच्याशी संलग्नता जाहीर केलेली असते. म्हणजेच, या छोट्या गटातील दहशतवादीही ‘जैश’च्या इशार्यानुसार कारवाया करत असतात. अलीकडच्या काळात ‘जैश’ने आपली प्रशिक्षण शिबिरे खैबर पख्तुनख्वा भागात स्थलांतरित केल्याचे समोर आले आहे. हे ठिकाण भारताच्या सीमेपासून खूप दूर आहे. यामागचे कारण भारताने भविष्यात एअर स्ट्राईक करू नये, हे आहे. याशिवाय कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफिज सईद यानेही बांगला देशातून भारतविरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. त्यानेही दिल्लीतील स्फोट आम्ही घडवल्याचा दावा केल्याचे समोर आले आहे. यावरून एक गोष्ट निश्चित झाली आहे की, हा दहशतवादी हल्ला आहे आणि तो पाकिस्तानपुरस्कृतच आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि लष्कर याबाबत लवकरच पुढची भूमिका निश्चित करतील.
या स्फोटाने 2014 पासून जम्मू-काश्मीरमध्येच रोखण्यात आलेला दहशतवाद आता उर्वरित देशात पसरवण्यासाठी दहशतवाद्यांची धडपड सुरू झाल्याचे दिसत असून, ती आपल्यासाठी अधिक चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला भारतात लपलेले दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स शोधावे लागतील आणि त्यांचा बीमोड करून आपला भाग सुरक्षित करावा लागेल. आजघडीला पाकिस्तानच्या विखारी प्रचाराने आणि धार्मिक मूलतत्त्ववादाने प्रभावित होऊन देशविरोधी कारवाया करण्यासाठी तयार असलेले अनेक जण देशाच्या विविध भागांत आहेत.
पहलगाम येथील हल्ल्यानंतरच्या तपासातूनही ही बाब स्पष्ट झाली की, हल्ला करणारे चार दहशतवादी जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांना तेथील स्थानिकांनी मदत केली होती. काहीजणांनी त्यांना जेवायला दिले होते, काहींनी त्यांना रस्ता दाखवला होता, काहींनी त्यांना गाईड केले होते, या सर्व गोष्टी भारतात घडल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत भारतात राहून पाकिस्तानला मदत करणारे आपण शोधत नाहीत, तोपर्यंत हे दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत.
मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेपासून ते दिल्ली स्फोटापर्यंतचे बॉम्बस्फोट पाहिल्यास कोणताही दहशतवादी हल्ला हा स्थानिकांच्या किंवा स्लीपर सेल्सच्या मदतीशिवाय पूर्णत्वास जात नाही, हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या ‘अस्तनीतील निखार्यांना’ शोधून त्यांना पायबंद घालणे सर्वात पहिली जबाबदारी असून, ती आव्हानात्मक आहे. यासाठी त्यांचे मोबाईल टॅप करून, त्यांच्यावर लक्ष ठेवून, संशयित बँक व्यवहार तपासून, घातक पदार्थांच्या तस्करीवर लक्ष ठेवून या स्लीपर सेल्सच्या मुसक्या आवळाव्या लागतील. हे काम एकट्या सुरक्षा यंत्रणा करू शकणार नाहीत. त्यांच्याबरोबरीने लोकांनीही आता सजग राहण्याची आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका बजावण्याची गरज आहे. आपले डोळे आणि कान उघडे ठेवून आपल्या भवताली काय सुरू आहे, काही संशयास्पद परिस्थिती दिसते आहे का, संशयास्पद वस्तू कुठे आढळली आहे का, या सर्वाची माहिती पोलिस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना द्यायला हवी. त्यातून अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले टाळता येणे शक्य होऊ शकते. ही एक प्रदीर्घ काळ चालणारी लढाई असून, यासाठी भारताला तयार राहावे लागेल.