David Szalay | अस्तित्ववादी लेखकाचा गौरव 
बहार

David Szalay | अस्तित्ववादी लेखकाचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

डॉ. जयदेवी पवार

डेव्हिड स्झाले हे हंगेरीतून आलेले पहिले ब्रिटिश-हंगेरीयन लेखक आहेत, ज्यांना यंदाचा बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ‘फ्लेश’ या कादंबरीची निवड बुकर सन्मानासाठी करण्यात आली आहे. साहित्यविशारदांच्या मते, स्झाले हे 21व्या शतकातील ‘अस्तित्ववादी वास्तववाद’ या प्रवृत्तीचे महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत. ते मानवी जीवनातील तुकड्यांमध्ये अर्थ शोधतात, अपूर्णतेला स्वीकारतात आणि शांततेतील भाष्य तयार करतात.

जगभरातील साहित्य क्षेत्रात यंदाच्या बुकर पुरस्कारासाठी निवड झालेल्या डेव्हिड स्झाले या साहित्यिकाचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या ‘फ्लेश’ या कादंबरीला यंदाचा बुकर सन्मान जाहीर झाला आहे. आधुनिक माणसाच्या मानसिक, सामाजिक आणि अस्तित्ववादी प्रवासाला त्यांनी नवीन भाष्य दिलं आहे. हा लेखक हंगेरीतला; पण ब्रिटिश साहित्यसंस्कृतीत विकसित झालेला आणि म्हणूनच त्याच्या लेखनात दोन संस्कृतींची छाया एकाच वेळी दिसते.

डेव्हिड स्झाले हे कॅनडात जन्मले; पण लेबनॉन, इंग्लंड, हंगेरी आणि आता व्हिएन्ना अशा विविध देशांत त्यांनी वास्तव्य केलं. त्यामुळे ते पूर्णपणे युरोपीयही नाहीत आणि पूर्णपणे ब्रिटिशही; पण विविध ठिकाणच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब ही त्यांच्या लिखाणातील सर्वात महत्त्वाची बाजू ठरते. त्यांच्या पात्रांमध्ये सीमारेषा धूसर झालेल्या असतात. ते मुळात मानवजातीतील भाषा, देश, धर्म किंवा समाज या सर्वसाधारण भावनांचा शोध घेत त्यांच्या मर्यादांच्या पलीकडे जातात. त्यांची लेखनशैली अत्यंत मितभाषी आहे. शब्द कमी; पण आशय प्रखर. ‘फ्लेश’ ही कादंबरी या शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या कादंबरीचा नायक इस्त्वान हंगेरीतील एका लहान शहरात वाढलेला आहे. तो अस्थिर पण प्रखर संवेदनशील तरुण असून वाचकांसमोर जणू तो रिकाम्या जागांमधून उभा राहतो. पुस्तकात त्याचं बाह्य वर्णन जवळजवळ नाही; पण त्याचं अस्तित्व प्रत्येक पानावर जिवंत आहे. त्याचं जगणं, त्याचे गोंधळ, त्याच्या इच्छा आणि त्याची अपराधीपणाची भावना या सगळ्यांतून लेखक आपल्याला एका माणसाच्या ‘देह’या मूलभूत अनुभवापर्यंत पोहोचवतो.

स्झाले यांच्या लिखाणात ‘देह’ हा केवळ जैविक घटक नसून एक तत्त्वज्ञान आहे. देह म्हणजे अनुभवाचे माध्यम. ‘फ्लेश’ या नावातच जीवनाचा विरोधाभास दडलेला आहे. देह म्हणजे अस्तित्वाचं भान आणि त्याच वेळी त्याचं बंधन. इस्त्वानच्या आयुष्यातील पहिला शारीरिक अनुभव हा नैतिक गोंधळाचा आरंभ ठरतो आणि त्यानंतर संपूर्ण जीवन त्या देहाच्या ओझ्याखाली झुकत जातं. स्झाले या प्रवासाकडे न्यायनिवाड्याच्या द़ृष्टीने पाहत नाहीत. ते केवळ निरीक्षक आहेत. वाचकालाही त्या निरीक्षणात सामील करून घेतात.

बुकर परीक्षकांनी या कादंबरीबद्दल म्हटलंय की, ही अशी कादंबरी आहे जिथे रिकाम्या जागा वाचकाने भरायच्या आहेत. खरंच, स्झाले यांच्या गद्यलेखनात शब्दांइतकीच शांतताही बोलते. अनेक पानांवर कोणतेही संवाद नसतात; पण त्या शांततेतून व्यक्त होणारी वेदना, ईर्ष्या, अपूर्णता आणि रिक्तता हीच कथानकाची भाषा बनते. स्झाले यांनी 2008 मध्ये ‘लंडन अँड द साऊथ-ईस्ट’ या कादंबरीने साहित्यविश्वात प्रवेश केला. त्यानंतर ‘ऑल दॅट मॅन इज’ आणि ‘टर्ब्युलन्स’ या कृतींनी त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. ‘फ्लेश’ही त्यांची सहावी कादंबरी आहे; पण या पुस्तकाने त्यांच्या लेखनाचा उत्कर्षबिंदू गाठला आहे. त्यांचं लेखन आधुनिक युरोपीय समाजाच्या बदलत्या मूल्यांवर तीक्ष्ण प्रकाश टाकतं. जागतिकीकरण, स्थलांतर, वर्गभेद, आर्थिक यशाची भूक आणि भावनिक शून्यता हे सारे घटक त्यांच्या कथांमध्ये एकत्र गुंफलेले असतात. स्झाले यांच्या द़ृष्टीने माणूस हा एकाच वेळी आर्थिक प्राणी आणि भावनिक अस्तित्व आहे. या दोन शक्तींमधील संघर्षच त्यांच्या साहित्यातील प्रमुख विषय ठरतो.

‘फ्लेश’मधील इस्त्वान हा माणूस सामाजिक स्तरावर वर जातो; पण आतून अधिकाधिक रिकामा होतो. त्याची प्रगती जणू आत्मविस्मरणाच्या दिशेने होते. स्झाले या प्रक्रियेला टीकेच्या नजरेने पाहत नाहीत, तर ते तिला आधुनिक जीवनाच्या अपरिहार्य मूल्याप्रमाणे दाखवतात. साहित्यविशारदांच्या मते, स्झाले हे 21व्या शतकातील ‘अस्तित्ववादी वास्तववाद’ या प्रवृत्तीचे महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत. ते मानवी जीवनातील तुकड्यांमध्ये अर्थ शोधतात, अपूर्णतेला स्वीकारतात आणि शांततेतील भाष्य तयार करतात. डेव्हिड स्झाले यांच्या साहित्यातील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अंतर्मनातील अल्पभाषी प्रामाणिकपणा. त्यांच्या पात्रांच्या भावना फारशा व्यक्त होत नाहीत; पण त्या शांततेतूनच त्यांच्या अस्तित्वाचे जडत्व जाणवते. ‘फ्लेश’मधील इस्त्वानसारखा नायक बोलत नाही, वाद घालत नाही, आत्मकथन करत नाही. तो फक्त जगतो आणि त्या जगण्यातूनच जीवनाची गुंतागुंत उलगडते. अभ्यासकांच्या मते, स्झाले यांच्या कथनशैलीतली ही मितकथनाची रचना आपल्याला आल्बर्ट काम्यू किंवा पॅट्रिक मॉडियानो यांच्या अस्तित्ववादी परंपरेची आठवण करून देते.

‘फ्लेश’ या कादंबरीत देह हा केंद्रस्थानी आहे; पण तो कामुकतेच्या पातळीवर नसून तर अस्तित्वाच्या पातळीवर आहे. इस्त्वान आपल्या शरीराशी, इच्छांशी आणि जगाशी असहज नातं जगतो. बालपणापासून त्याला मिळालेली भावनिक एकाकीपणाची सवय त्याच्या आयुष्यभर कायम राहते. एका विवाहित स्त्रीबरोबरच्या त्याच्या पहिल्या नात्यापासून सुरुवात होऊन त्याचं संपूर्ण आयुष्य ‘आकर्षण आणि रिक्तता’ यांच्यातल्या सततच्या झुल्यात अडकलेलं दिसतं. स्झाले या कथानकातून ‘आधुनिक पुरुषत्वाचं चित्र’ उभं करतात. हा पुरुष वर्चस्व गाजवणारा नाही. उलट आपल्या असुरक्षिततेमुळे, भावनिक निर्जीवतेमुळे आणि सामाजिक प्रगतीच्या वेगामुळे स्वतःपासून दूर गेलेला आहे. बुकर परीक्षकांनी यावर भाष्य करताना म्हटलंय की, स्झाले यांचं पुरुषत्व म्हणजे निष्क्रियता आणि हीच निष्क्रियता त्यांच्या कथेला भेदक बनवते. हे पुरुषत्व सामर्थ्याचं नाही, तर रिक्ततेचं प्रतीक आहे; पण स्झाले यांच्या साहित्याची आणखी एक बाजू म्हणजे वर्गभानाची तपशीलवार जाणीव. इस्त्वानचा प्रवास लहानशा हंगेरीतील समाजातून लंडनच्या उच्चभ्रू जगात होतो. हा प्रवास त्याच्या आर्थिक उन्नतीचा आहे; पण अंतर्मनातील अधोगतीचंही प्रतीक आहे. स्झाले या कादंबरीत आधुनिक भांडवलशाहीचे आणि वैयक्तिक शून्यतेचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करतात. त्यांच्या कथांमध्ये समाज आणि व्यक्ती यांच्यातील नाते अत्यंत शांत पण तीव्र स्वरूपात व्यक्त होतं. पात्रं आपल्या भावनांबद्दल बोलत नाहीत; पण त्यांच्या कृतींतून, रिकाम्या संवादांतून आणि पानांवर पसरलेल्या शब्दांच्या मधल्या शांत जागांमधून लेखक वाचकाला अनुभवायला भाग पाडतो.

डेव्हिड स्झाले हे हंगेरीतून आलेले पहिले ब्रिटिश-हंगेरीयन लेखक आहेत, ज्यांना बुकर पुरस्कार मिळाला आहे. 2016 मध्ये ‘ऑल दॅट मॅन इज’ या कादंबरीसाठी त्यांना नामांकन मिळाले होते. त्यांना यंदाचे विजेतेपद मिळालं. त्यांच्या सहा कृती 20 हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. साहित्यजगतातील समीक्षक त्यांना नव्या शतकातील युरोपीय वास्तववादी लेखक म्हणतात. कारण, त्यांच्या लेखनात ना अलंकारिकता आहे ना कृत्रिम नाट्यमयता. आहे ती फक्त माणसाच्या जिवंत अनुभवाची स्पष्ट, प्रामाणिक नोंद. स्झाले यांची पात्रं महाकाव्यात्मक नाहीत. ती दैनंदिन जीवनात हरवलेली सामान्य माणसं आहेत. त्यांच्या आयुष्यातील रिक्तपणा हीच खरी कथा आहे. आजच्या डिजिटल, वेगवान आणि तुटक समाजात जेव्हा माणूस स्वतःपासूनच तुटत चालला आहे, तेव्हा ‘फ्लेश’सारखं लेखन आपल्याला आठवण करून देतं की, आपण अजूनही शरीरात जगतो, श्वास घेतो, स्पर्श अनुभवतो आणि दुःख भोगतो. हा देहच आपल्या अस्तित्वाचा एकमेव पुरावा आहे आणि त्याचाच शोध घेणं म्हणजे स्झाले यांचं साहित्य!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT