सायबर जग हे आधुनिक मानवी जीवनाचे एक अपरिहार्य अंग बनले आहे. या जगात वावरताना आपण दररोज असंख्य संकेतस्थळांवर, अॅप्सवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रवेश करतो; पण या सर्व माध्यमांचा वापर करताना आपण नकळतपणे एका चक्रव्यूहात कधी अडकतो ते आपल्यालाही समजत नाही. यासाठी आवश्यक असणारे जाळे तयार करणार्या गुप्त फसवणूक तंत्राला ‘डार्क पॅटर्न’ असे म्हणतात. काय आहे हा भूलभुलैया?
आज देशातील 80 टक्के लोकसंख्येच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, इतेकच काय, तर अगदी आपले विचारविश्वसुद्धा इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या आभासी विश्वाने प्रभावित झालेले आहेत. दुसरीकडे, आपल्याकडून हरेक प्रकारातून काढून घेतलेली माहिती आभासी दुनियेतील कंपन्यांसाठी ‘मूल्यवान खजिना’ ठरत आहे. हेच पाहा ना, आपण एखादे संकेतस्थळ शोधून आपल्याला आवश्यक असणारी माहिती शोधत असताना किंवा वाचत असताना अचानक वेबपेजवर जाहिरात झळकू लागते. विशेष म्हणजे, ती हटवायची म्हटली, तरी हटत नाही. कारण, ती बंद करण्यासाठीची फुली कुठे तरी कोपर्यात छोट्या आकारामध्ये दिलेली असते. वरवर ही गोष्ट साधी वाटू शकते; पण यामागे आहे एक काळीकुट्ट रणनीती असते. तिला डार्क पॅटर्न म्हणतात.
डार्क पॅटर्न म्हणजे असा यूजर इंटरफेस जो वापरकर्त्यांना भ्रमित करण्यासाठी मुद्दाम तयार केला गेलेला असतो. यामध्ये जाणीवपूर्वक अशा गोष्टी समाविष्ट केल्या जातात ज्यामुळे वापरकर्त्याच्या नकळत त्याच्याकडून काही गोष्टी करवून घेतल्या जातात. एखाद्या अटींना सहमती देणे, माहिती शेअर करणे, खरेदी करणे किंवा नको असलेल्या गोष्टी स्वीकारणे.
अनेकदा वेबसर्फिंग करत असताना ‘अॅक्सेप्ट’ असे लिहिलेली विंडो ओपन होते. ‘रिजेक्ट’ किंवा ‘क्लोज’चा पर्याय काही सेकंदांनी डिस्प्ले होतो; पण तोवर थांबण्याची तयारी नसलेले यूजर्स अॅक्सेप्टच्या पर्यायावर क्लिक करतात; पण हा स्वीकार करताच ती साईट तुमच्या संगणकाची किंवा मोबाईलची काही मूलभूत माहिती, लोकेशन, सर्च हिस्ट्री यांसारखी अनेक प्रकारची माहिती चक्क चोरते. कारण, हे सर्व यूजर्सच्या नकळत आणि त्याच्या परवानगीशिवाय घडते. हा डार्क पॅटर्नचा एक प्रकार आहे.
यामध्ये अनेक प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ, अशा प्रकारे तत्काळ स्क्रिनवर येणार्या विंडोंमध्ये खरेदीसाठी किंवा माहिती देण्यासाठी काही सेकंदांचा काऊंटडाऊन दाखवला जातो. यामुळे वापरकर्त्यावर तणाव येतो आणि तो चुकीचा निर्णय घेतो. काही साईटस्वर तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केली आणि ती नंतर रद्द करायची असेल, तर रद्द करण्याचा पर्यायच आढळत नाही. बरेचदा ऑनलाईन शॉपिंग करताना तुमच्या कार्टमध्ये एखादी अनावश्यक वस्तू आपोआप जोडली जाते. काही वेबसाईटस् फक्त माहिती मिळवण्यासाठी आधी तुमच्याकडून नोंदणी करवून घेतात; पण नंतर तुम्ही ज्या माहितीच्या शोधासाठी ती वेबसाईट ओपन केली होती ती माहिती साईटवर दिसतच नाही.
काही सॉफ्टवेअर्स ‘फ्री ट्रायल’नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तुमच्या कार्डवरून रक्कम वसूल करतात. यूट्यूबसारख्या साईटस्वर तर सर्रास आपल्यावर जबरदस्तीने जाहिरात लादली जाते. या सर्व क्लृप्त्यांमागचा मुख्य हेतू एकच असतो तुमच्याकडून अधिकाधिक पैसा आणि माहिती मिळवणे. कंपन्यांसाठी ग्राहक हा ‘मानव’ नसतो, तो एक ‘डेटा पॉईंट’ असतो. याच मानसिकतेतून निर्माण होतो हा डार्क पॅटर्नचा वापर.
अमेरिकेतील प्रिन्स्टन आणि शिकागो विद्यापीठांनी 2019 मध्ये एकत्रितपणे 11,000 ई-कॉमर्स वेबसाईटस्चा अभ्यास केला होता. त्यामध्ये 10 टक्के वेबसाईटस् डार्क पॅटर्न वापरत असल्याचे उघड झाले होते. 2022 मध्ये युरोपियन आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, युरोपातील 97 टक्के लोकप्रिय अॅप्समध्ये डार्क पॅटर्नचा वापर आढळून आला.
भारतातही ही स्थिती वेगाने गंभीर होत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये भारतीय जाहिरात मानक परिषदेने केलेल्या अभ्यासात 53 लोकप्रिय अॅप्सपैकी 52 अॅप्स डार्क पॅटर्न वापरत असल्याचे स्पष्ट झाले.
नोव्हेंबर 2023 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदाच 13 प्रकारच्या डार्क पॅटर्न्सना ‘अनुचित व्यापारी वर्तन’ घोषित केले. या निर्णयानंतर केंद्र सरकारने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगी, मीशो, पेटीएम, ओला, अॅपल, व्हॉटस्अॅप, मेक माय ट्रिप, ईज माय ट्रिप इत्यादी कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावले. या बैठकीत ग्राहक व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सर्व कंपन्यांनी हे अनैतिक पॅटर्न्स त्वरित थांबवावेत. त्यासाठी प्रत्येक कंपनीने अंतर्गत ऑडिट करून तपासणी करावी आणि तो अहवाल सार्वजनिक करावा. याशिवाय, एक संयुक्त कार्यकारी समिती (वर्किंग कमिटी) स्थापन करण्याचाही प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे.
डार्क पॅटर्नचा कंपन्यांवरही परिणाम
डार्क पॅटर्नच्या मदतीने कंपन्यांना काही काळापुरता आर्थिक फायदा होतो; मात्र दीर्घकालीन नुकसान अटळ असते.
* ग्राहकांचा कंपनीवरचा विश्वास डळमळीत होतो.
* वापरकर्त्याचा अनुभव (यूजर एक्सपिरियन्स) खराब होतो.
* नकारात्मक अभिप्राय सोशल मीडियावर वेगाने पसरतो.
* ब्रँडची प्रतिष्ठा धोक्यात येते.
डार्क पॅटर्नचा वापर केवळ अनैतिकच नाही, तर अनेकदा कायद्याच्या विरोधातदेखील ठरतो. ग्राहकांची दिशाभूल करणे, त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या माहितीचा वापर करणे किंवा आर्थिक व्यवहार करवणे हे भारतीय ग्राहक संरक्षण कायद्याच्या द़ृष्टीने स्पष्टपणे दंडनीय आहे.
सायबर कायदेतज्ज्ञांच्या मते, डार्क पॅटर्न ही एक गंभीर डिजिटल समस्या आहे. भारतात ऑनलाईन व्यवहारांची वाढ पाहता वापरकर्त्यांना या युक्त्यांची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी म्हटले की, डिजिटल इकोसिस्टीममध्ये या पॅटर्न्सचा वापर ग्राहकांची स्वायत्तता हिरावून घेणारा ठरतो. वापरकर्त्याच्या डोळ्यांत धूळफेक करून, त्यांच्या दिशाभूल करून, त्यांना हतबल करून कंपन्या आपले खिसे भरतात. हे थांबवण्यासाठी कठोर धोरण आवश्यक आहे.
युरोपमध्ये सामान्य डेटा संरक्षण नियम (जीडीपीआर) किंवा अमेरिकेतील कॅलिफोर्निया ग्राहक गोपनीयता कायदा (सीसीपीए) अशा कायद्यांद्वारे गुप्त फसवणुकीस प्रतिबंध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात मात्र यासंदर्भात विशेष कायदे अद्याप अस्तित्वात नाहीत. डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक (2022) हा एक प्रारंभ आहे; पण तो अजूनही अपुरा आहे. या पार्श्वभूमीवर, वापरकर्त्याने स्वतः सजग राहून आपल्या वैयक्तिक माहितीचे आणि निर्णय क्षमतेचे रक्षण करणे काळाची गरज आहे. कोणत्याही संकेतस्थळावर किंवा अॅपवर अज्ञात पर्यायांवर क्लिक करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचाव्यात, सूचना व्यवस्थित तपासाव्यात, स्वयंचलित निवडी (डिफॉल्ट ऑप्शन्स) बदलाव्यात आणि शक्यतो विश्वासार्ह स्रोतांचा वापर करावा.
* संकेतस्थळांवर किंवा अॅप्सवर एखाद्या सेवेच्या अटी, अतिरिक्त शुल्क किंवा गोपनीयता धोरणे अगदी लहान, अस्पष्ट अक्षरांत दिली जातात. त्यामुळे वापरकर्त्यांना ते समजत नाहीत आणि त्यामुळे ते अडचणीत येतात.
* फक्त 5 तासांत संधी संपेल, फक्त 2 शिल्लक, अजून 10 जण पाहत आहेत अशा प्रकारच्या सूचनांनी वापरकर्त्यांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी मानसिक दबाव टाकला जातो.
* ‘एस’ हे बटन मोठे आणि आकर्षक दिसणारे; पण नको किंवा ‘नो’ हा पर्याय लपवलेला किंवा गुंतागुंतीत दिलेला असतो. वेळेच्या बचतीसाठी अनेक वापरकर्ते ‘एस’वर क्लिक करतात आणि या अद़ृश्य सापळ्यांत अडकतात.
* आपल्याला आपली खात्री पटवायची आहे का? आपण ही संधी गमावू इच्छिता का? अशा प्रकारे वापरकर्त्यांच्या निर्णयक्षमतेवर भावनिक दडपण आणले जाते.
* तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत कंपन्या वापरकर्त्यांच्या मानसिकतेचा सूक्ष्म अभ्यास करून संकेतस्थळांचे डिझाईन तयार करतात; पण या पद्धती केवळ वापरकर्त्याच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेत नाहीत, तर त्यांच्या अधिकारांवर घाला घालतात.