बहार

‘रिल्स’वेडाचे कटू सत्य

Arun Patil

चार वर्षांपूर्वी 'टिकटॉक'वर बंदी घातल्यानंतर निर्माण झालेल्या 'पोकळी'चा फायदा घेण्यासाठी 'इन्स्टाग्राम'ने 'रिल्स' या संकल्पनेला जन्म दिला. आज पाहता पाहता या रिल्सनी तरुण पिढीवर अक्षरशः गारुड घातले आहे. यामुळे अनेकांना अफाट प्रसिद्धी आणि काहींना रोजगारही मिळाला असला तरी त्यासाठी खर्ची होणारा वेळ आणि रिल मेकिंगच्या नादात भान हरपल्याने होणारे मृत्यू यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

जून 2020 मध्ये भारत सरकारने 'टिकटॉक' या चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भारतात शॉर्ट व्हिडीओंसाठी सर्वांत लोकप्रिय ठरलेले हे अ‍ॅप होते. भारताच्या या निर्णयानंतर महिनाभरातच 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया अ‍ॅपने 15 ते 30 सेकंदांच्या व्हिडीओंची म्हणजेच रिल्स या संकल्पनेची सुरुवात केली. 'टिकटॉक' गेल्यामुळे निर्माण झालेली 'पोकळी' अचूकपणे भरून काढण्याचे काम 'रिल्स' या संकल्पनेने केले. 2020 मध्ये याची कल्पना कुणी केली नव्हती; पण आज चार वर्षांनंतरचे चित्र पाहिल्यास 'इन्स्टाग्राम रिल्स' हा तरुण पिढीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेल्या आहेत.

जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असणार्‍या भारतातील किशोरवयीन आणि तरुण-तरुणी हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील मोलाचे 'तास' या रिल्स पाहण्यात आणि काही अंशी तयार करण्यात व्यतीत करत आहेत. या 'रिल्स'मुळे अनेकांना प्रसिद्धी मिळाली, अनेकांना रोजगारही मिळवून दिला; पण त्याचबरोबरीने अनेक भारतीयांचा मृत्यूही झाला. इतकेच नव्हे तर रिल्सच्या व्यसनात अडकल्यामुळे काही वैवाहिक दाम्पत्यांमध्ये वादविवाद होऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटात झाल्याचीही उदाहरणे देशात पाहायला मिळाली आहेत. मध्यंतरी पश्चिम बंगालमधील एका जोडप्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला आयफोन 14 विकत घेण्यासाठी चक्क विकल्याची घटना समोर आली होती. या जोडप्याला आयफोन घेऊन रिल्स करायचे होते.

सद्य:स्थितीत देशामध्ये 358.55 दशलक्ष इतके इन्स्टाग्राम यूजर्स आहेत. जगातील सर्वाधिक इन्स्टाग्राम वापरकर्ते असलेला देश म्हणून आज भारताची 'ओळख' आहे. जानेवारी 2020 मध्ये म्हणजेच रिल्स या संकल्पनेचा जन्म होण्यापूर्वी भारतात केवळ 8 कोटी इन्स्टाग्राम वापरकर्ते होते. इन्स्टाग्रामचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतशी रिल्सची क्रेझ झपाट्याने वाढत चालली असून आता या रिल्सच्या नादात जीव जाण्याच्या घटनाही वाढत आहेत.

रुरकीमध्ये ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे रेल्वे रुळांच्या बाजूला व्हिडीओ शूट करताना 20 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीला ट्रेनने धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. मैत्रिणीसोबत ही मुलगी रहिमतपूर रेल्वे गेटजवळ ट्रॅकवर उभी होती. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी ती तिच्या मोबाईलवरून व्हिडीओ शूट करत होती. यादरम्यान तिला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रेनने धडक दिली. अगदी असाच प्रकार उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे घडला होता. तेथे काही तरुण रेल्वे ट्रॅकवर व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी गेले होते. त्यांना धावत्या ट्रेनजवळचे दृश्य चित्रीत करायचे होते. भरधाव वेगात येणारी ट्रेन पाहून एक तरुण ट्रेनच्या जवळ गेला. सोबत त्याचा मित्रही जवळ जाऊन उभा राहिला. पण भरधाव वेगात येणार्‍या रेल्वेने यातील एकाला धडक दिली आणि तो मरण पावला.

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये रविशंकर साहू नावाचा हा तरुण आपल्या मित्रांसह कॉलेजला गेला होता. कॉलेजमधील क्लासेस संपल्यानंतर दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान रविशंकर आपल्या मित्रांसह कॉलेजच्या इमारतीच्या गच्चीवर चढला. यानंतर त्याने त्याच्या मित्रांना इन्स्टाग्राम रीलसाठी व्हिडीओ शूट करण्यास सांगितले आणि इमारतीच्या छतावरून बाल्कनीमध्ये उडी मारली. यानंतर तरुणाने दुसर्‍या बाल्कनीत उड्या मारायला सुरुवात केली. यादरम्यान तो घसरला आणि जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला.

गेल्या वर्षी बिहारमधील मोतिहारीमध्ये रील बनवण्याच्या नादात तीन अल्पवयीन मुलांना जीव गमवावा लागला होता. चंपारण येथील टिकुलिया गावातील नदीच्या काठावर ही मुले रिल्स बनवत होती. मात्र तेवढ्यात त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे डोंबिवलीत ठाकुर्ली येथे रील बनवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या एका 18 वर्षीय तरुणाचा पंपहाऊसमधील खोल विहिरीत पडून मृत्यू झाला होता. उत्तराखंडमध्ये गेल्या दोन वर्षांत रेल्वे ट्रॅकवरील मृत्यूंच्या संख्येत 63 टक्के वाढ झाली आहे. सेल्फी आणि रिल्सची क्रेझ हे या वाढीचे प्रमुख कारण आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

या आणि अशा अनेक घटना कशाचे निदर्शक म्हणायच्या? एक्साईटमेंट, थ्रील, जरा हटके काही तरी करण्याची मानसिकता आणि त्यापलीकडे जाऊन प्रसिद्धीचे अफाट वेड यामुळे तरुणाई आपली विवेकबुद्धी हरपून बसली आहे का? जीवाचे मोल सर्वांत वरच्या स्थानी आहे. तरुण वयात जोखीम पत्करण्याची अफाट ऊर्मी असते; पण ती सत्कार्यासाठी खर्ची घातली पाहिजे. त्याऐवजी धावत्या रेल्वेजवळ उभे राहून रील बनवणे, इमारतींवरून उड्या मारणे यांसारख्या गोष्टींमध्ये जोखीम पत्करली जात असेल तर त्याला शुद्ध वेडगळपणा म्हणावा लागेल. पण इन्स्टावरील रिल्स असोत किंवा व्हॉटस्अ‍ॅपवर अपलोड करण्यात येणारे स्टेटस व्हिडीओ असोत, यातील कित्येक व्हिडीओंमध्ये वेडगळपणाच अधिक असतो. हे आज बहुतेकांना माहीत असूनही त्यासाठी दैनंदिन कामातील वेळ यासाठी खर्ची घातला जात आहे. रील पाहण्याची सवय केवळ तरुणांमध्येच आहे असे नाही, तर 10 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांमध्येही दिसून येते. त्यामुळे मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याचाही धोका वाढला आहे. मध्यंतरी केलेल्या एका पाहणीमध्ये तर काही लोकांनी हे कबूल केले की, त्यांना रील्स बघायला आवडतात आणि रील्स दिसले नाहीत तर त्यांना विचित्र वाटू लागते.

दोन महिन्यांपूर्वी सिन्नर शहरात एका पल्सर मोटारसायकलवर बसून हातात असलेली तलवार हवेत फिरवताना व्हिडीओ रील बनवून तो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. तो पाहून पोलिस पथकाने या दोन तरुणांना ताब्यात घेतले. तपासाअंती या दोघांनी दोन तलवारी पंजाब अमृतसर येथून विकत आणल्या असल्याची कबुली दिली. कायद्याने बंदी असलेले प्राणघातक हत्यार बाळगणे व त्याचे प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारची कृत्ये ही विकृती मानली जातात. म्हणजेच एकीकडे जीवाची पर्वा न करता रिल्स बनवायच्या तर दुसरीकडे आपल्या भवितव्याचा विचार न करता कायद्याच्या कक्षेत न बसणारी कृत्ये करून रिल्स बनवायच्या, अशा विविध पातळ्यांवर हे वैचारिक अधःपतन सुरू आहे.

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तशाच रिल्स या संकल्पनेलाही निश्चितच आहेत. या माध्यमातून समाजाच्या कानाकोपर्‍यात दडलेले टॅलेंट जगासमोर येत आहे; पण त्याच वेळी रिल्सचा हा मोह घातकही ठरत आहे. रिल्स पाहणार्‍यांची वाढती संख्या इन्स्टाग्रामकर्त्यांच्या अर्थकारणाला बळकटी देत आहे, तर उद्याचे भवितव्य मानल्या जाणार्‍या तरुण पिढीची वैचारिक क्षमता बाधित करत आहे. यामध्ये दोष माध्यमाचा निश्चितच नाही. कारण काल टिकटॉक होते, आज इन्स्टाग्राम आहे, यू ट्यूब आहे, उद्या अन्य कुठले तरी व्यासपीठ उपलब्ध होईल. प्रश्न आहे तो आपल्या विवेकपूर्ण आणि जबाबदारीपूर्ण वर्तनाचा. भवताली वाढत चाललेली रिल्सवेडी तरुणाई आणि सोशल मीडियात गुरफटत चाललेले जग पाहून याबाबत प्रबोधन, प्रशिक्षण आणि समुपदेशनाची गरज किती प्रचंड आहे याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.

SCROLL FOR NEXT