विश्वनाथन आनंद बुद्धिबळातील भारतीय क्रांतीचा खराखुरा जनक. जेथे पाश्चिमात्यांचा, युरोपियन्सचा या खेळात प्रचंड दबदबा असताना, सारी परिस्थिती प्रतिकूल असताना आनंदने पाच जगज्जेतेपदे खेचून आणत भारतासाठी इतिहास रचला, तेथेच डी. गुकेश नावाचा, अवघ्या 18 वर्षांचा, सळसळत्या रक्ताचा तरुण आनंदचा खराखुरा उत्तराधिकारी ठरला आहे.
डिंग लिरेनसारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याला निर्णायक चौदाव्या डावात मात देत असताना गुकेशने संयम, आक्रमण, बचाव या त्रिसूत्रीचा जो सहजसुंदर मिलाफ साधला त्याला तोड नाही. डी. गुकेशचे हे क्रांतिकारी जेतेपद पुढील अनेक दशके भारताच्या युवा पिढीसाठी खराखुरा दीपस्तंभ ठरत राहील, हे ओघानेच आले!
गुकेश रजनीकांत डोम्माराजू. अवघ्या 18 वर्षांचा चेन्नईतील तरुण. वडील रजनीकांत हे ईएनटी सर्जन, तर आई पद्मा या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. कौतुकाची बाब म्हणजे, गुकेशच्या बुद्धिबळावर या दोघांचाही बराच जीव. इतका जीव की, त्याचे वडील रजनीकांत हे महिन्यातील 15 दिवस प्रॅक्टिस करायचे आणि उरलेले 15-16 दिवस गुकेशला विविध स्पर्धांना घेऊन जायचे. गुकेशही असा हरहुन्नरी, ज्याने बुद्धिबळासाठी चक्क शाळेलाही रामराम करण्यात कसर सोडली नाही; पण गुरुवारचा दिवस उजाडला आणि या सार्या त्यागाचे, सार्या कष्टाचे शब्दश: चीज झाले. डी. गुकेश विश्वजेता ठरला आणि त्याने अत्यानंदाने हवेत घेतलेली ती उडी अवघ्या विश्वाने याची देही, याची डोळा अनुभवली! एरव्ही, आपले सेकंडस् अर्थात स्पर्धेच्या तयारीसाठी आपल्याला मदत करणारी टीम कोणीही जाहीर करण्यास फारसे उत्सुक नसते. अगदी स्पर्धेतील निकाल झाल्यानंतरच अशा बाबींवर पडदा पडतो. ती परंपरा गुकेशनेही पाळली. त्याच्या पथकात पोलंडचे काही सेकंडस् होतेच; पण त्याही शिवाय दोघे बिनीचे शिलेदार आवर्जून होते, ते म्हणजे विशी आनंद आणि पॅडी उप्टन!
गुकेशचा जन्म 29 मे 2006 चा. आंध्र प्रदेशातील एका तेलुगू कुटुंबात जन्मलेल्या गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासूनच बुद्धिबळाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. चेन्नईमधील वेलम्मल विद्यालय प्रशालेत शिकत असताना त्याचे लक्ष मात्र बुद्धिबळावर केंद्रित असायचे. 2013 मध्ये त्याने आठवड्यातून तीन दिवस रोज एक तास बुद्धिबळाचा सराव सुरू केला. त्यानंतर त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा, त्यात यश खेचून आणण्याचा सिलसिला सुरू झाला. शालेयस्तरावर बुद्धिबळाचे धडे गिरवत असताना गुकेशने स्वप्न पाहिले ते चॅम्पियन होण्याचेच! गुकेशचा लहानपणीचा एक व्हिडीओ असाही आहे, ज्यावेळी त्याला विचारले गेले होते, तुला बुद्धिबळात काय व्हायचे आहे... त्याने क्षणार्धात सांगितले, मला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचे आहे. त्यावेळी आजूबाजूला जे होते, ते सर्वजण हसले.