देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ.  Pudhari File Photo
बहार

COVID-19 | ...तो परत आला आहे!

देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसून आली

पुढारी वृत्तसेवा
डॉ. नानासाहेब थोरात (रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन लंडन)

कोव्हिड-19 हा सतत बदलत राहणारा विषाणू असल्यामुळे त्याचे नवे उपप्रकार (सब-व्हेरियंटस्) वेळोवेळी उद्भवत असतात. त्यामुळे अनेक वेळा रुग्ण संख्येतील अचानक वाढीचे कारण हे नवीन उपप्रकारच ठरतात. तसेच हवामान आणि ऋतूंचाही कोव्हिडच्या प्रसारावर ठळक प्रभाव पडतो. 2020-21 मध्ये जागतिक तज्ज्ञांनी खात्रीशीररीत्या सांगितले होते की, आपल्याला कोव्हिडबरोबरच जगायचे आहे. म्हणजेच कोव्हिडचा विषाणू हा सतत आपल्या वातावरणात राहणारच असून त्याचे नवीन उपप्रकार वेळोवेळी समोर येतील; पण 2020 च्या तुलनेत ते कमी घातक असतील. सध्या भारतामध्ये हेच होत आहे.

जानेवारी 2022 नंतर जो विषय आपल्या विस्मरणात गेला होता, तो या आठवड्यात पुन्हा लोकांच्या ओठी येताना दिसून येतोय. कोव्हिड हा शब्द पुन्हा जगभरातील माध्यमांच्या मथळ्यात आणि सरकार दरबारी चर्चिला जाऊ लागला आहे. याचे कारणही तसेच आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आग्नेय आशियातील काही देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसून आली. यावरून हाँगकाँग, सिंगापूर, चीन आणि थायलंडमध्ये नवीन लाट आल्याचे संकेत दिले गेले. सिंगापूरमध्ये तर एका वर्षातील सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असून, 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात तेथे 14,200 रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून आले. हा आकडा त्यापूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 28 टक्के अधिक होता. याचदरम्यान चीन आणि थायलंडमध्येही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून आली.

चीनमध्ये गेल्या उन्हाळ्यामधील सर्वोच्च संख्येशी तुलना करता यंदाच्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोव्हिडबाधित रुग्णांची संख्या अत्युच्य पातळीवर पोहोचल्याची नोंद आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, केपी-2 आणि इतर सबव्हेरिएंटस्मुळे संसर्ग वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोव्हिडचा विषाणू बदलतोय : कोव्हिड-19 हा सतत बदलत राहणारा विषाणू असल्यामुळे त्याचे नवे उपप्रकार (सब-व्हेरियंटस्) वेळोवेळी उद्भवत असतात. त्यामुळे अनेक वेळा रुग्णसंख्येतील अचानक वाढीचे कारण हे नवीन उपप्रकारच ठरतात. तसेच हवामान आणि ऋतूंचाही कोव्हिडच्या प्रसारावर ठळक प्रभाव पडतो. 2020 आणि 21 मध्ये जागतिक तज्ज्ञांनी खात्रीशीररीत्या सांगितले होते की, आपल्याला कोव्हिडबरोबरच जगायचे आहे. म्हणजेच कोव्हिडचा विषाणू हा सतत आपल्या वातावरणात राहणारच असून त्याचे नवीन उपप्रकार वेळोवेळी समोर येतील; पण 2020 च्या तुलनेत ते कमी घटक असतील. सध्या भारतामध्ये हेच होत आहे.

विषाणू कोव्हिडचा; वर्तणूक फ्लूसारखी : कोव्हिडचा विषाणू हा फ्लूच्या विषाणूसारखा वतर्णूक करत आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये ऋतुमानानुसार आणि स्थानिक वातावरणीय परिस्थिनुसार बदल होत असून वेळोवेळी त्याच्या प्रसार वाढताना दिसून येतोय. युरोपियन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये थंडीच्या दिवसात फ्लू असलेली रुग्णसंख्या वाढते, तर भारतासारख्या आशियाई देशांमध्ये सहसा उन्हाळ्याच्या महिन्यात पावसापूर्वी रुग्णसंख्या वाढलेली दिसते. हाच पॅटर्न कोव्हिड विषाणूच्या प्रसारात पण दिसून येत आहे. भारतात गेल्या वर्षी 2024 मध्येदेखील याच काळामध्ये कोव्हिड रुग्णसंख्या वाढली होती आणि जून-जुलैमध्ये कमी झाली होती. ऋतूनुसार बदलाचे निरीक्षण केले, तर भारतात उन्हाळा (मार्च-मे) हा 2020 पासून कोव्हिड रुग्णसंख्येच्या वाढीचा कालखंड दिसून येतो. गरम हवामान असूनही लोक घरात बंद राहतात, वातानुकूलित जागेत असतात ही बाब विषाणूंच्या संक्रमणासाठी अनुकूल ठरते. तसेच शालेय परीक्षा, सुट्ट्यांमुळे घडणारा प्रवास यामुळे संसर्गाची साखळी निर्माण होते.

दरवर्षी घ्यावी लागणार दक्षता : पावसाळ्याच्या सुरुवतीनंतर जून-जुलैमध्ये हवामानातील आर्द्रता, संसर्गाचे नैसर्गिक चक्र आणि पूर्वी संक्रमित झालेल्या लोकांची प्रतिकारशक्ती यामुळे संसर्ग कमी होतो. त्यामुळे हाच ऋतूनिहाय ट्रेंड पुढेही कायम राहिला, तर भारतात दरवर्षी फेब्रुवारी-मेदरम्यान दक्षता घेणं अत्यावश्यक ठरेल आणि यावरच सरकारी आरोग्यविषयक धोरणात्मक बदल करावे लागतील.

जागतिक आरोग्य संघटना काय सांगते? : जागतिक आरोग्य संघटनेच्या 28 मेच्या परिपत्रकानुसार एनबी 1.8.1 हा ओमायक्रॉनच्या जेएन 1 या उपप्रकाराचा एक नवीन उपप्रकार तयार झाला असून जो जानेवारी 2025 मध्ये प्रथम ओळखला गेला होता. जगभरात 40 हून अधिक देशांमध्ये या उपप्रकाराचा प्रसार झाला आहे. यामध्ये अमेरिका, आयर्लंड, थायलंड, भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश आणि ब्रिटन यांचा समावेश आहे.

उपप्रकारांचा उच्छाद : ज्या डेल्टा व्हेरिएंटमुळे मार्च 2021 ते जुलै 2021 मध्ये भारतात कोव्हिडची दुसरी लाट आली होती, त्याच्या तुलनेत सध्या दिसत असलेले अनेक नवे उपप्रकार उदा. ओमिक्रॉन आणि त्याचे बीए 2, एक्सबीबी, जेएन 1, केपी 2 हे उपप्रकार साधारणतः सौम्य लक्षणे असणारे आणि अधिक सहजपणे पसरणारे असल्याचे आढळले आहे. याची सौम्य लक्षणे असली, तरी हे उपप्रकार जलद पसरत असल्याने एकाच वेळी अनेक लोक बाधित होतात, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो.

सध्या दिसत असलेला कोव्हिडचा प्रसार हा सौम्य सर्दी, घसा खवखव, थकवा, क्वचित ताप इथपर्यंतच दिसून येत आहे. भारतात सध्या पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण असून सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1,416 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 494 सक्रिय रुग्ण आहेत.

एका उपप्रकारात सहा म्युटेशन्स

या वाढीमागे एनबी 1.8.1 आणि एलएफ 7 या नवीन उपप्रकारांचा वेगाने होणार प्रसार कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एनबी 1.8.1 उपप्रकारात 6 नवीन म्युटेशन्स आढळून आली असून, ज्यामुळे हा विषाणू एसीई रिसेप्टरला अधिक सहजपणे चिकटतो आणि शरीरातील प्रतिकारशक्तीला चकवा देतो.

एसीई म्हणजे काय?

एसीई 2 (अँजिओटेन्सिन कनव्हर्टिंग एंझाईम 2) हे एक महत्त्वाचे प्रथिन असून ते मानवी शरीरातील विविध पेशींच्या पृष्ठभागावर आढळते. हे प्रथिन अँजिओटेन्सिनोजेन या मोठ्या प्रथिनाचे लहान प्रथिनांमध्ये रूपांतर करते. यामुळे पेशींच्या कार्यांवर परिणाम होतो. कोव्हिडचा विषाणूच्या वर असणार्‍या स्पाईक प्रथिनाचा वापर करून, हा विषाणू एसीई 2 शी बांधला जातो आणि पेशींमध्ये प्रवेश करतो व यामुळे संसर्ग होतो.

पुन्हा तीच चूक नको :

मागील कोव्हिडच्या लाटेत आरोग्य यंत्रणेकडून सर्वांत मोठी चूक (यामध्ये खासगी रुग्णालयांचा खूप मोठा वाटा होता.) झाली होती ती म्हणजे, कोव्हिड रुग्णांना चुकीचे औषध देणे. यामध्ये रेमडेसिवीरचा वापर खूप प्रमाणात झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेने अनेक वेळा सांगितले की, कोव्हिड-19 रुग्णांचा आजार कितीही गंभीर असला, तरी त्यांच्यावर रेमडेसिवीर या अँटिव्हायरल औषधाचा वापर करू नये. कारण, त्याचा रुग्णांच्या जगण्याच्या शक्यतांवर कोणताही महत्त्वाचा परिणाम होत नाही. उलटपक्षी रेमडेसिवीर हे यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम करते. त्यामुळे अचानक रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

सध्या कोव्हिडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या बातम्या येत असल्या, तरी सर्वसामान्य लोकांनी घाबरण्याची गरज नाही. याऐवजी जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींची (उच्च धोका गट) विशेष काळजी घ्यायला हवी. वृद्ध, सहव्याधी असलेले, लहान मुले, प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. 2020 आणि 2021 च्या तुलनेत कोव्हिडचा धोका काहीसा कमी असला, तरी पूर्णपणे संपलेला नाही. विशेषतः उच्च जोखीम गटांनी अधिक काळजी घेणे आणि संसर्ग टाळणे हेच सुरक्षिततेचे सर्वोत्तम मार्ग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT