Atlantic Nina | ‘अटलांटिक निना’ दिलासा देणार? 
बहार

Atlantic Nina | ‘अटलांटिक निना’ दिलासा देणार?

पुढारी वृत्तसेवा

रंगनाथ कोकणे, पर्यावरणतज्ज्ञ

भारतासारख्या कृषिप्रधान देशात 'अल निनो’चा धोका निर्माण होतो, तेव्हा कमी पाऊस आणि दुष्काळाच्या सावटाने चिंता वाढते; मात्र अशाच कठीण परिस्थितीत निसर्गाने 'अटलांटिक निना’ या हवामानविषयक घटनेच्या रूपात एका नव्या आशेचा किरण दाखवला आहे.

निसर्गाने आपल्या अंतरंगात कितीतरी रहस्ये दडवून ठेवली आहेत. विज्ञान एकेक करून त्यांची उकल करीत आहे. एखादी नवी नैसर्गिक घटना समोर आली की, आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव पुन्हा होते. भूविज्ञान, हवामानशास्त्र आणि खगोलशास्त्र या क्षेत्रांत अजूनही बरेच काही जाणून घेणे, समजून घेणे आणि शिकणे बाकी आहे. हवामान बदलाचे परिणाम तीव्र होत असताना वातावरणातील अनिश्चिततेने शास्त्रज्ञांची चिंता वाढविली आहे. ‘अल निनो’मुळे अनियमित मान्सूनची आणि भीषण दुष्काळाची शक्यता व्यक्त होत असतानाच ‘अटलांटिक निना’च्या सक्रियतेने काहीसा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

‘अटलांटिक निनो’ आणि ‘अटलांटिक निना’ या तुलनेने अलीकडे अधिक स्पष्टपणे समजलेल्या हवामानविषयक घटना आहेत. सुरुवातीला त्यांचे अस्तित्व शास्त्रज्ञांसाठीही कुतूहलाचा विषय ठरले होते. त्यांचे स्वरूप आणि परिणाम यांचा अभ्यास केल्यानंतर जागतिक हवामान आणि वाढत्या तापमानाशीही त्यांचा संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची नावे प्रशांत महासागरातील ‘अल निनो’ आणि ‘ला निना’ यांच्याशी साधर्म्य दर्शवित असली, तरी या घटना एकच नाहीत. अटलांटिक निनो आणि अटलांटिक निना या विषुववृत्तीय अटलांटिक महासागरात घडणार्‍या परस्परविरोधी हवामानविषयक घटना आहेत. विषुववृत्तीय अटलांटिक महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा वाढते, तेव्हा अटलांटिक निनोची स्थिती निर्माण होते. याउलट अटलांटिक निनाच्या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी होते. अटलांटिक निनोच्या वेळी पूर्वेकडून वाहणारे वारे कमकुवत होतात, तर अटलांटिक निनाच्या काळात ते तुलनेने अधिक वेगवान होतात. वेगवान वार्‍यांमुळे समुद्राच्या खोल भागातील थंड पाणी पृष्ठभागाकडे येण्यास मदत होते. या दोन्ही स्थितींचे पर्जन्यमान आणि हवामानावर परस्परविरोधी परिणाम होतात.

अटलांटिक निनोमुळे उष्णकटिबंधीय अटलांटिक प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागांत पाऊस वाढू शकतो. अटलांटिक निनाच्या स्थितीत मात्र पावसाचे स्वरूप बदलते. आफ्रिकेतील साहेल प्रदेशात कमी पाऊस आणि गिनीच्या आखाताच्या परिसरात तुलनेने अधिक पाऊस अशा स्थितींमागे समुद्राच्या तापमानातील आणि वातावरणीय अभिसरणातील बदलांची महत्त्वाची भूमिका असते.

जागतिक तापमान सातत्याने वाढत असतानाही काही वेळा अटलांटिक आणि पूर्व प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागांत एकाच वेळी थंडावा निर्माण होतो, ही बाब शास्त्रज्ञांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची ठरली आहे. अशा स्थितीचा संबंध ‘ला निना’ आणि ‘अटलांटिक निना’ यांसारख्या घटनांशी असू शकतो. समुद्र आणि वातावरण यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परक्रिया समजून घेण्यासाठी या दोन्ही घटना महत्त्वाचे संकेत देतात. जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये उत्तर अटलांटिक महासागरात दीर्घकाळ असामान्य उष्णता कायम असतानाच विषुववृत्तीय अटलांटिक प्रदेशात थंडावा जाणवला होता. ही स्थिती आणखी एका कारणामुळे उल्लेखनीय होती. जूनच्या सुरुवातीला समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान बरेच अधिक होते. त्यानंतर अटलांटिक निना विकसित होण्याचे संकेत दिसू लागले. याच काळात पूर्व प्रशांत महासागरात विषुववृत्ताजवळील समुद्राचे पाणीही थंड होत होते. प्रशांत महासागरात ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता सर्वसाधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुमारास व्यक्त केली जात होती; मात्र त्याची चिन्हे त्यापूर्वीच दिसू लागली.

या घटनांचा वेध घेण्यासाठी शास्त्रज्ञ वातावरणातील हवेच्या प्रवाहांचा अभ्यास करतात. विस्तृत प्रदेशात कोणत्या भागात हवा वरच्या बाजूला जाते आणि कुठे खाली उतरते, यावरून ढग, पाऊस आणि वादळांच्या निर्मितीला अनुकूल परिस्थिती आहे की नाही, याचा अंदाज घेता येतो. खाली उतरणारी हवा साधारणतः वातावरणात स्थिरता निर्माण करते. त्यामुळे ढगांची निर्मिती आणि उष्णकटिबंधीय वादळांची सक्रियता कमी होऊ शकते. याउलट वर जाणारी हवा अधिक ढग, पर्जन्य आणि उष्णकटिबंधीय वादळांच्या निर्मितीला अनुकूल ठरू शकते. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि वातावरणीय दाब यांचा या प्रक्रियांशी निकटचा संबंध असतो. गेल्या ४ दशकांतील आकडेवारीवरून असे दिसते की, अटलांटिक निना सक्रिय असताना तुलनेने अधिक असलेला वातावरणीय दाब चक्रीवादळांची संख्या आणि ती किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता यावर परिणाम करू शकतो. याउलट अटलांटिक निनोमुळे आफ्रिकी तरंगांची सक्रियता आणि वातावरणाच्या खालच्या स्तरातील चक्रीय अभिसरण बळकट होते. अशा परिस्थितीत केप व्हर्डे द्वीपसमूहाच्या आसपासच्या खोल उष्णकटिबंधीय प्रदेशात शक्तिशाली वादळे निर्माण होण्याची शक्यता वाढते.

अटलांटिक निनाचा परिणाम त्या वेळच्या हवामानापुरताच मर्यादित राहत नाही. गेल्या ४ दशकांतील अभ्यासातून असेही संकेत मिळाले आहेत की, उन्हाळ्यातील अटलांटिक महासागराची स्थिती त्यानंतरच्या हिवाळ्यावरही परिणाम करू शकते. उन्हाळ्यात अटलांटिक निनोची स्थिती निर्माण झाल्यानंतर कॅनडा आणि अमेरिकेच्या उत्तर भागावर कमी वातावरणीय दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून आली आहे. त्याचा परिणाम वातावरणाच्या वरच्या स्तरातून वाहणार्‍या ‘जेट’ प्रवाहांच्या तीव्रतेवर होऊ शकतो. ‘जेट’ प्रवाह म्हणजे वातावरणाच्या वरच्या थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वेगवान आणि अरुंद वायू प्रवाह. साधारणतः २०,००० ते ५०,००० फूट उंचीवर हे प्रवाह आढळतात. त्यांचा वेग ताशी १२० ते २४० किलोमीटर किंवा त्याहून अधिक असू शकतो. ध्रुवीय प्रदेशातील थंड हवा आणि विषुववृत्तीय प्रदेशातील उष्ण हवा यांच्यातील तापमान व वातावरणीय दाबातील फरक त्यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो. चक्रीवादळांच्या निर्मितीवरही जेट प्रवाहांचा प्रभाव पडतो. आता सक्रिय अटलांटिक निना आगामी काळात कोणते परिणाम घडवू शकते, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT